(११४) इब्राहीम (अ.) ने आपल्या वडिलांकरिता जी क्षमेची प्रार्थना केली होती ती तर त्या वचनामुळे होती जे त्याने आपल्या वडिलांना दिलेले होते,११२ पण जेव्हा ही गोष्ट त्याच्यावर उघड झाली की त्याचा पिता अल्लाहचा शत्रू आहे तेव्हा तो त्याच्यापासून अलिप्त राहिला. सत्य असे आहे की इब्राहीम (अ.) मोठा कोमलहृदयी ईशपरायण आणि सहिष्णू माणूस होता.११३
(११५) अल्लाहची ही रीत नव्हे की लोकांना मार्गदर्शन दिल्यानंतर पुन्हा मार्र्गभ्रष्ट करावे - जोपर्यंत की त्यांना स्पष्टपणे हे दाखविले जात नाही की त्यांनी कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहिले पाहिजे.११४ वास्तविक पाहता अल्लाह सर्वज्ञ आहे.
(११६) आणि हीदेखील वस्तुस्थिती आहे की अल्लाहच्याच ताब्यात पृथ्वी व आकाशांचे राज्य आहे, त्याच्याच अधिकारांत जीवन व मरण आहे आणि तुमचा कोणीही समर्थक व सहाय्यक असा नाही जो तुम्हाला त्यापासून वाचवू शकेल.
(११७) अल्लाहने क्षमा केली नबीला व त्या मुहाजिरीन व अन्सार लोकांना (देशांतर करणाऱ्या व त्यांची मदत करणाऱ्या लोकांना) ज्यांनी मोठ्या विपत्तीच्या प्रसंगी नबीला साथ दिली.११५ यद्यपि त्यांच्यापैकी काही लोकांची हृदये डळमळू लागली होती.११६ (परंतु जेव्हा त्यांनी नबीला साथ दिली तेव्हा) अल्लाहने त्यांना क्षमा केली.११७ नि:संशय त्याचा व्यवहार या लोकांशी अत्यंत प्रेमळ व कृपेचा आहे.
(११८) आणि त्या तिघांनादेखील त्याने माफ केले ज्यांचे प्रकरण पुढे ढकलले गेले होते.११८ जेव्हा जमीन सर्वथैव विस्तीर्ण असूनदेखील त्यांच्यावर तंग झाली आणि त्यांच्या स्वत:चे जीवदेखील त्यांना भारी वाटू लागले आणि त्यांनी जाणून घेतले की अल्लाहपासून वाचण्यासाठी कोणतेही आश्रयस्थान खुद्द अल्लाहच्या कृपाछत्राशिवाय नाही; तेव्हा अल्लाह आपल्या कृपेने त्यांच्याकडे वळला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे परत यावे. नि:संशय अल्लाह अत्यंत क्षमाशील व परम दयाळू आहे.११९
(११९) हे श्रद्धावंतांनो! अल्लाहचे भय बाळगा आणि सत्यवादी लोकांना साथ द्या.
(१२०) मदीनानिवासी व सभोवतालच्या बदावींना हे मुळीच शोभले नाही की अल्लाहच्या पैगंबराला सोडून घरी बसून राहावे आणि त्यांच्यापासून बेपर्वा होऊन आपापल्या जीवाचीच काळजी घेण्यात लागले असावे. कारण असे कधीही घडणार नाही की अल्लाहच्या मार्गात भूक, तहान आणि शारीरिक कष्टाचा एखादा त्रास त्यांनी सोसावा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना जो मार्ग अप्रिय आहे, त्यावर एखादे पाऊल त्यांनी टाकावे आणि एखाद्या शत्रूवर त्यांनी (सत्याशी शत्रुत्वाचा) सूड उगवावा. आणि याच्या मोबदल्यात त्यांच्या हिशेबी एखादे सत्कृत्य लिहिले जाऊ नये. नि:संशय अल्लाहजवळ परोपकारींच्या सेवेचा हक्क हिरावला जात नाही.
(१२१) अशाचप्रकारे हेदेखील कधी घडणार नाही की (अल्लाहच्या मार्गात) त्यांनी थोडा किंवा फार खर्च सोसावा आणि (जिहाद व प्रयत्न करताना) त्यांनी एखादी दरी पार करावी आणि त्यांच्या हिशेबी त्याची नोंद होऊ नये, जेणेकरून अल्लाह त्यांच्या या उत्त्तम कामगिरीचे फळ त्यांना प्रदान करील.
११२) संकेत त्या गोष्टीकडे आहे जेव्हा आपल्या अनेकेश्वरवादी बापाशी संबंध विच्छेद करताना आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी सांगितले होते, ``आपणास सलाम असो! मी आपणासाठी माझ्या पालनकर्त्यांशी प्रार्थना करील की आपणास क्षमा करावी. तो माझ्यावर अत्यंत दयावान आहे.'' (कुरआन १९:४७) म्हणून याच वचनाच्या आधारावर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या बापासाठी प्रार्थना केली होती, ``माझ्या बापाला क्षमा कर, नि:संदेह तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी होता आणि त्या दिवशी मला अपमानित करू नकोस जेव्हा सर्व मानव उठविले जातील. जेव्हा संपत्ती कुणाच्या कामी येणार नाही, न संतती, मुक्ती केवळ त्यालाच मिळेल जो आपल्या अल्लाहसमोर विद्रोहविरहित मन घेऊन येईल.'' (कुरआन २६ : ८६-८९) ही प्रार्थना संतुलित शैलीमध्ये मागितली गेली होती. परंतु यानंतर जेव्हा आदरणीय इब्राहीम (अ.) यांचे लक्ष याकडे गेले की ज्या माणसासाठी प्रार्थना केली जात आहे, तो अल्लाहचा तर उघड उघड विद्रोही होता. तेव्हा इब्राहीम (अ.) यांनी असे करणे सोडून दिले आणि एका सच्च ईमानधारकाप्रमाणे विद्रोहींशी सहानुभूती दाखविण्यापासून स्वत:ला दूर ठेवले.
११३) अरबीमध्ये `अव्वाह' आणि `हलीम' शब्द आले आहेत. अव्वाह म्हणजे अति हाय हाय करणारा, रडका, भित्रा आणि आकांक्षा बाळगणारा. `हलीम' त्या माणसाला म्हणतात जो आपल्या स्वभावाला काबूत ठेवतो. क्रोध, शत्रुत्व आणि विरोधात अतिशयोक्ति करीत नाही. तसेच प्रेम, मैत्री आणि संबंध ठेवण्यात संतुलन ठेवतो. हे दोन्ही शब्द येथे दोन दोन अर्थाने वापरले गेले आहेत. आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पित्यासाठी मुक्तीची प्रार्थना केली कारण ते अत्यंत दयाळू होते. माझा हा बाप नरकाग्निचे इंधन बनेल या विचाराने ते घाबरले. ते हलीम होते. त्या अत्याचारानंतर सुद्धा जे त्यांच्या बापाने त्यांना इस्लाम पासून रोखण्यासाठी केले होते तरी पण इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पित्यासाठी मुक्तीची प्रार्थना केली. नंतर त्यांना जाणवले की माझा बाप तर अल्लाहचा वैरी आहे. म्हणून स्वत:ला त्यापासून वेगळे केले. कारण ते अल्लाहच्या कोपाचे भय बाळगणारे होते आणि एखाद्याच्या प्रेमात सीमोल्लंघन करणारे नव्हते.
११४) म्हणजे अल्लाह प्रथम हे दाखवून देतो की लोकांना कोणत्या विचारांपासून, कामांपासून आणि कार्यपद्धतीपासून वाचले पाहिजे. लोकांनी जेव्हा ऐकले नाही तर अल्लाह त्यांना मार्गदर्शन करण्यापासून दूर होतो आणि त्यांना मार्गभ्रष्ट होण्यासाठी मोकळे सोडतो ज्याच्यासाठी ते प्रयत्न करतात.
हे कथन एक सर्वसामान्य सिद्धान्त वर्णन करतो. याद्वारा कुरआनचे अनेक ठिकाणी आलेले वर्णन चांगल्या प्रकारे समजू शकते. या ठिकाणी अल्लाहने मार्गदर्शन करणे किंवा मार्गभ्रष्ट करणे हे आपले कार्य म्हटले आहे. वर्णनशैलीच्या या विशेष क्रमातही एक प्रकारे चेतावनी आहे. याला मागील वर्णनाचे समापन आणि पुढील येणाऱ्या वर्णनाची प्रस्तावनासुद्धा म्हटले जाईल.
११५) म्हणजे तबुकच्या युद्धासंबंधी ज्या लहान लहान चुका पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या साथीदारांकडून झाल्या होत्या, त्या सर्वांना अल्लाहने त्यांची श्रेष्ठ सेवा लक्षात घेऊन माफ केले. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून त्यांच्या सहकाऱ्यांना दिलेली सवलत उल्लेख आयत नं. ४३ मध्ये आला आहे.
११६) म्हणजे काही निष्ठावान सहाबासुद्धा त्या कठीण समयी युद्धावर जाण्यासाठी तयार नव्हते. परंतु त्यांच्या मनात ईमान होते आणि मनापासून ते सत्य धर्माशी जुडलेले होते म्हणून शेवटी त्यांनी आपल्या विवशतेवर मात केली.
११७) म्हणजे अल्लाह या गोष्टीवर त्यांची पकड करणार नाही की त्यांच्या मनात असे विचार का आले आणि त्याकडे मन का वळले. कारण अल्लाह त्या विवशतेवर पकड करीत नाही ज्याला मनुष्याने स्वत: सुधारून घेतले आहे.
११८) पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा तबुकहून मदीना येथे आले तेव्हा ते लोक विवशता सांगू लागले जे घरी बसून होते. त्यांच्यापैकी ८० पेक्षाजास्त दांभिक होते आणि तीन सच्च्े ईमानधारकसुद्धा होते. मुनाफिक (दांभिक) खोटे बहाणे सांगत गेेले आणि प्रेमळ पैगंबर मुहम्मद (स.) त्यांच्या विवशतेला स्वीकारत गेले. नंतर या तिन्ही ईमानधारकांची पाळी आली आणि त्यांनी स्पष्टपणे आपली चूक मान्य केली. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या तिघांविषयीच्या निर्णयाला स्थगित केले आणि सर्व मुस्लिमांना आदेश दिला की जोपर्यंत अल्लाहचा आदेश येत नाही तोपर्यंत यांच्याशी कोणत्याही प्रकारचा सामाजिक संबंध ठेवला जाऊ नये. याच विषयासंबंधी निर्णय देण्यासाठी ही आयत अवतरित झाली. (येथे हे स्पष्ट डोळयांसमोर ठेवावे की या तीनही सहाबींचा (साथीदार) मामला त्या सात सहाबींपेक्षा वेगळा आहे ज्यांचा उल्लेख टीप नं. ९९ मध्ये आलेला आहे. ज्यांनी चौकशीपूर्वीच स्वत: आपल्याला शिक्षा दिली होती.)
११९) हे तिघेजण म्हणजे काब बिन मलिक (रजि.) हिलाल बिन उमैया (रजि.) आणि मुरारा बिन रूबैया (रजि.) होते. हे तिघेही सच्च्े ईमानधारक होते. यापूर्वी त्यांनी आपल्या निष्ठेचा अनेकदा पुरावा दिला होता आणि त्याग केला होता. शेवटचे दोन साथीदार तर बदर युद्धात सामील झाले होते. त्यांच्या ईमानविषयी शंका घेण्यास अजिबात वाव नव्हता. पहिले साथी जरी बदर युद्धात सामील नव्हते तरी बदरच्या युद्धा ऐवजी इतर सर्व युद्धांत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर राहिलेले होते. परंतु या सेवाव्यतिरिक्त त्यांनी तबुक युद्धाच्या गंभीर समयी सुस्ती दाखविली. ईमानधारकांना युद्धात सामील होण्याचा आदेश होता तरी त्यांनी सुस्ती दाखविली म्हणून त्यांची सक्त पकड केली गेली. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तबुकहून परतल्यानंतर मुस्लिमांना आदेश दिला की कोणीही त्यांच्याशी सलाम कलाम करू नये. ४० दिवासनंतर त्यांच्या पत्नींनासुद्धा त्यांच्यापासून वेगळे राहाण्याची ताकीद करण्यात आली. खरे तर समाजात त्यांची तशीच दशा झाली होती ज्यांचे चित्र या आयतमध्ये रेखाटले गेले आहे. शेवटी जेव्हा त्यांच्या बहिष्काराला ५० दिवस झाले तेव्हा क्षमा करण्याचा आदेश आला. या तिघांपैकी माननीय काब बिन मलिक (रजि.) यांनी आपली करूण कहानी अतिविस्ताराने वर्णन केली आहे जी अत्यंत बोधप्रद आहे.
Post a Comment