सध्या काही लोकप्रिय आणि निर्विवाद सकारात्मक शब्द नवीन आणि कधीकधी घातक अर्थ घेत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा, देशभक्ती वगैरे असे काही शब्द आहेत ज्यांचा वापर बहुसंख्यांक वर्चस्व प्रस्थापित करणे, बहुलवाद नाकारणे आणि विरोधकांविरुद्ध हिंसक सूड उगवणे यांचे औचित्य साधण्यासाठी केला जात आहे. पेगासस हेरगिरीच्या प्रकरणाला न्याय देण्यासाठी हे शब्द पुन्हा वापरले जाऊ शकतात. इतिहासात निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये हुकूमशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांनी या शब्दांना अयोग्य आणि मनमानी अर्थ वारंवार दिले आहेत. तात्त्विक सत्य हे आहे की सत्ता स्वतःला नागरिकांच्या हक्कांवर दडपशाही आणि नियंत्रणाने सुरक्षित समजते, जरी हे फक्त एक भ्रम आहे. गेल्या काही वर्षांत मानवी हक्क, नागरी स्वातंत्र्य आणि वृत्तपत्रस्वातंत्र्य यांचे मूल्यमापन करणाऱ्या जागतिक निर्देशांकांच्या आपण चिंताजनक तळाशी आहोत. नागरी स्वातंत्र्याचे अपहरण आणि बहुलवाद नाकारणे ही राष्ट्रीय सुरक्षा आणि जलद विकासासाठी पहिली अट मानण्यासाठी हळूहळू आम्हाला प्रशिक्षण दिले जात आहे. जेव्हा जेव्हा राजकीय, व्यावसायिक, धार्मिक सत्तेचे केंद्र असुरक्षित आणि भयभीत होते, तेव्हा ते आपल्या विरोधकांवर (ज्यांना ते शत्रू म्हणून पाहते) हेरगिरीचे अस्त्र सोडते. सध्या लोकशाहीच्या युगात जनतेला माध्यमांद्वारे याचे प्रशिक्षण दिले जाते. अनैतिक, प्रतिशोधक आणि हिंसक धोरणांमध्ये अडकलेला लोकशाही समाज अधिक घातक ठरत आहे, कारण दडपशाहीविरोधात बंड करण्याचे हे ठिकाण आहे मात्र येथे आता दडपशाहीला स्वातंत्र्य संबोधले जाते. तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या या युगात राजकीय पक्षांचा लोकांशी थेट संपर्क हळूहळू कमी होत आहे. सुख-दु:खात लोकांच्या पाठीशी उभे असलेले, दारिद्र्य आणि वंचितता दूर करणारे राजकीय पक्ष, लोकनेते आता दिसत नाहीत. आता लोकांच्या मनाचा वेध घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. यासाठी डिजिटल माध्यमांना शस्त्रसज्ज केले जात आहे. हे राजकीय पक्षांचे आयटी सेल्स तेच काम करत आहेत जे जाहिरात एजन्सी करतात. लोकांमध्ये त्यांच्या उत्पादनांची गरज निर्माण करतात, ज्यामुळे जनतेला त्यांच्या उत्पादनांचे व्यसन लागते. जेव्हा देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी आणि त्यांचे भविष्य ठरविणारी राजकीय विचारसरणी हिंसक, दिशाभूल करणारी आणि विभाजनकारी विपणन रणनीतीद्वारे बदलली जाते तेव्हा राजकीय पक्षाला फायदा होतो आणि मग हे संकट चव्हाट्यावर येते. आता काही विशिष्ट मुद्द्यांवर जनमत चाचणीसारख्या निवडणुकीसाठी जनतेला प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. आधुनिक लोकशाही समाजांना कंडिशनिंग करण्याचे आणि त्यांना प्रत्यक्ष संघर्षापासून दूर नेण्याचे काम तंत्रज्ञानाने केले आहे. आज सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष, या तांत्रिक युद्धात अडकले आहेत. तळागाळातील जनआंदोलने दिवसेंदिवस कमी होत आहेत. सत्तासंघर्ष असो किंवा जनविरोध, तांत्रिक वर्चस्व सर्वांमध्ये यशासाठी आवश्यक झाले आहे. यामुळेच पेगासससारखे स्पायवेअर अत्यावश्यक बनले आहे आणि त्यांच्यावर अवलंबून राहणे भाग पडत आहे. आता अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे जे केवळ लोकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ते सर्वांसाठी समान आहे असा भ्रम निर्माण झाला असला तरी ते त्याच्या निर्मात्याच्या हितासाठी एकतर्फी कार्य करते. म्हणूच पेगासससारख्या तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाविरुद्धचा लढा लोकशाहीप्रणित स्वातंत्र्य वाचवण्यासाठीचा संघर्ष ठरू पाहात आहे. निःसंशयपणे, आपल्या देशात राजकीय वर्गाला त्यांच्या कृतींच्या नैतिकतेची पर्वा नाही. त्यांच्यासाठी कसेही करून निवडणूक जिंकणे हे एकमेव उद्दीष्ट आहे. राजकीय वर्ग, काही अपवाद वगळता, कोणत्याही पातळीवर खाली उतरू शकतो. राजकीय वर्ग गुन्हेगारी घटक, काळा पैसा, जात, धर्म, प्रादेशिकता, भाषा यांचा वापर करून लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्यास मागेपुढे पाहत नाही. अनेक दशकांपासून ही आपल्या देशाची प्रबळ राजकीय संस्कृती आहे. सर्व राजकीय पक्ष, कोणताही अपवाद न करता भ्रष्टाचार, अनैतिकता, असत्य आणि खोटेपणा या संस्कृतीत खोलवर बुडालेले आहेत. जेव्हा राज्यकर्ते अप्रामाणिक, अनैतिक, असत्य बनतात आणि आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी बेईमान पद्धती आणि साधनांचा वापर करण्यास सुरवात करतात, तेव्हा संपूर्ण देश मागे पडतो आणि जनता दारिद्र्य, अन्याय, प्रत्येक प्रकारच्या विषमतेने घेरली जाते आणि असंख्य मार्गांनी त्रास सहन करावा लागतो. लोकशाही व्यवस्थेत राजकीय प्रणाली अनैतिक मार्गाने चालायला सुरुवात करते, तेव्हा संपूर्ण प्रशासन व्यवस्था, नोकरशाही आणि सामान्य जनता आपला मार्ग भटकते. या पेचप्रसंगातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपली सडलेली राजकीय व्यवस्था शुद्ध करण्यासाठी व्यापक सार्वजनिक मोहीम आणि दृढ कृती. जोपर्यंत राजकारण त्याच्या सर्व घाणीपासून शुद्ध करण्यासाठी प्रामाणिक आणि एकत्रित प्रयत्न केले जात नाहीत, तोपर्यंत भारताचे उज्ज्वल भविष्य आणि भरभराट होऊ शकत नाही. कृती करण्याची वेळ आली आहे.
- शाहजहान मगदुम
कार्यकारी संपादक,
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment