Halloween Costume ideas 2015

आपण खरोखर मानव म्हणून घेण्यास पात्र आहोत का?


आजच्या समाजाची स्थिती पाहता प्रश्न पडतो की आपण खरोखर मानव म्हणण्यास पात्र आहोत का? म्हणजे, जन्म मानवी शरीरात आणि विचार, कृती वन्य प्राण्यापेक्षाही वाईट. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अत्याचार, अंमली पदार्थांचे व्यसन, लोभ, अश्लीलता, अनादर, द्वेष, लबाडी, फसवणूक, स्वार्थ सातत्याने वाढत आहे, जे संपूर्ण मानवतेला पोकळ करत आहे. आपल्या समोर अनेकदा मानवतेला सुद्धा लाजवेल अशी घटना घडतात आणि आपण फक्त पाहत राहतो. लोकांमध्ये परोपकाराची भावना शून्य होत आहे. मानवता हा शब्द मानवापासून बनला आहे. मानवता हा एक गुण आहे जो इतरांच्या कल्याणाशी संबंधित आहे. यात एकमेकांबद्दल करुणा आणि प्रेमाच्या भावना आहेत. लोककल्याणाची इच्छा आपल्या जीवनाचे ध्येय असावे. मानवतेला समर्पित राहून नैतिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध रहावे, मानवी जीवनाची सार्थकता यातच आहे. मानवता ही मानवाची गुणवत्ता आहे ज्यांचे मूलभूत घटक सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, दया, त्याग, शुद्धता, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा आहेत.

दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी आपण जागतिक मानवतावादी दिन साजरा करतो. या विशेष दिवसाचा उद्देश जगभरातील असहाय नागरिकांच्या दुर्दशा बद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. संघर्षात असलेल्यांना मदत करण्यासाठी, आणि त्या मानवतावादी कामगारांसाठी आदर आणि समर्थन वाढवणे जे मदतीसाठी आपला जीव धोक्यात घालतात आणि कधीकधी प्राण सुद्धा गमावतात. युद्ध, गरिबी, भूक, रोग, अन्न समस्या, संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगभरातील कोट्यवधी लोक संकटात आहेत आणि त्यांना मानवतावादी मदतीची गरज आहे. मानवजातीला शरण जाणे हे मानवतेचे परम कर्तव्य आहे, म्हणूनच जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढे मदतीसाठी पुढे आले पाहिजे.

समाजात स्वार्थ शिगेला पोहोचला आहे आणि तिरस्कार सर्वत्र रुजलेला दिसतो. फक्त एक रुपयाचा सुद्धा फायदा का नसावा, पण भेसळ करणारे लोक समाजातील निष्पापांना स्लो पॉइझन देऊन (अन्नपदार्थांमध्ये घातक रसायनांचा वापर आणि जे खाण्यास योग्य नाही अशा अन्नाद्वारे) गंभीर आजारांनी ग्रस्त करून, त्यांना मृत्यू दिला जातो. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आणि शिफारशी द्वारे काम करून घेण्याचा प्रयत्न केला जातो, स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे अधिकार काढून घेतले जातात आणि शब्द व कृतीत फरक जाणवतो. एखाद्या व्यक्तीची ओळख व स्थिती संपत्ती द्वारे निश्चित होते, लोकांना श्रीमंतांना मदत करायला आवडते, गरीबांना नाही, जेव्हा की गरीब गरजू आहेत. कमजोरांवर राग काढला जातो, प्रत्येकजण स्वतःच्या नजरेत सर्वोत्तम असतो तर इतरांच्या नजरेत का नाही? माणूस बऱ्याचदा इतरांमध्ये दोष शोधण्यात मग्न असतो, इतरांचे शेकडो दोष लगेच दिसतात, पण आपण स्वतःला गुणांनी परिपूर्ण समजतो. 

नेहमी वाईट घटना घडल्यानंतर आपण रॅली आणि प्रदर्शनाद्वारे आपला शोक व्यक्त करतो, पण या वाईट घटना घडूच नयेत यासाठी आपण कधी पुढाकार घेतो का? एक जबाबदारी म्हणून मी आणि माझे कुटुंब, पण यापुढे आपला समाज, आपला देश आणि मानवजातीच्या उन्नतीची अभिव्यक्ती विचारात घेतली आहे का? निरागस मुले इतरांच्या आनंदात आनंदी आणि इतरांच्या दुःखात दुःखी वाटतात, पण मोठे असून सुद्धा आपल्याला इतरांच्या सुख-दु:खात तीच भावना जाणवते का? अनेकदा आपल्या आजूबाजूला अवैध घटना घडतात, ज्यांना आपण आपल्या जागरूकतेने थांबू शकतो, पण आपण आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतो का? आधुनिकतेच्या अंध शर्यतीत प्रत्येकजण इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी धावत आहे ते सुद्धा फक्त देखाव्यासाठी, पण यात तो स्वतःचा आनंद आणि शांती गमावत आहे. स्टेटस सिम्बॉल च्या नावाखाली आपण माणुसकी पासून दूर चाललोय.

कायदे आणि नियम मानवजातीच्या कल्याणासाठी बनवले जातात जेणेकरून प्रणाली सुरळीत चालेल, परंतु नियमांचे उल्लंघन करण्यात, सुशिक्षित आणि निरक्षर सर्वच समाविष्ट आहेत. जर प्राण्यांना देखिल नियम शिकवले गेले, तर ते सुद्धा नियमांनुसार वागायला शिकतात पण विवेक बुद्धि असूनही माणूस स्वतः स्वार्थाने वागतो. समाजात सभ्य, भीतीने राहतात आणि बदमाश निर्भयपणे जगतात, चुका करूनही लढण्यासाठी सदैव तयार असतात, मौल्यवान वेळ वाया घालवतात, तरुणांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. कोरोना महामारीमध्येही मोठ्या संख्येने लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करतात, वाहतुकीचे नियम तसेच अनेक क्षेत्रात सरकारी नियम उघडपणे मोडले जातात, आजकाल प्रत्येकजण म्हणतो की जग खूप वाईट आहे पण जग तर आपल्या सर्वांना मिळूनच बनलेले आहे, पालक देखील म्हणतात की मुले खूप बिघडली आहेत, मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, फॅशन आणि नशेकडे आकर्षित होत आहेत पण पालक मुलांना योग्य वातावरण निर्माण करून देत आहेत का? पालक स्वतः अनेकदा मुलांसमोर अयोग्य वर्तन करतात, मुलांचा चुकांकडे दुर्लक्ष करतात आणि ते इच्छितात की त्यांची मुले समाजाचे कर्तव्यनिष्ठ व दक्ष नागरिक व्हावी, पण हे विसरू नका की मुलांना त्यांचे पहिले धडे घरातूनच मिळतात आणि नंतर बाहेरून. पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा कितीही असली तरी जर माणुसकी नसेल तर माणूस म्हणता येणार नाही.

मुलांकडे पालकांची थोडीशीही निष्काळजीपणा मुलांसाठी तसेच संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत घातक ठरते. पालकांना प्रार्थना आहे की आयुष्यात तुम्ही तुमच्या मुलांना काही  देऊ किंवा नका देऊ पण चांगले संस्कार अवश्य द्या चांगले संस्कार शिष्टाचार चांगले आचरण, वर्तन शिकवतात, जीवनाच्या प्रत्येक समस्येशी लढायला आणि एक चांगला माणूस बनायला शिकवतात. तुम्ही दिलेले संस्कार मुलांचे संपूर्ण आयुष्य सुखी करतात. समाजात हजारो स्वार्थी लोकांनंतर एक परोपकारी दिसून येतो, जिथे एका व्यक्तीची मर्यादा संपते तिथे दुसऱ्या व्यक्तीची मर्यादा सुरू होते म्हणून आपली मर्यादा कधीही ओलांडू नका. कृपया प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी असहाय लोकांना मदत करू नका, चांगले काम करून विसरून जावे. जर आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत, तर आपले ध्येय मानवतेसह जगणे असावे. तुम्ही आयुष्यात चांगली कामे केल्याचे आनंद विकत घेऊ शकत नाही, ते तुमच्या सत्कर्मानेच मिळेल. वाईट कृत्ये करून माणूस आनंदी होऊ शकत नाही. वाईट कृतीत माणसाचे आयुष्य वाया घालवू नका, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान बाळगून माणुसकीने जगावे.

-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget