कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे.
ये पहला सबक था किताबे हुदा का
के मखलूक सारी है कुन्बा खुदा का
एक काळ होता जेव्हा मुस्लिम हे जागतिक महासत्तेच्या ठिकाणी होते. औद्योगिक क्रांतीनंतर त्यांचे हे स्थान ब्रिटिशांनी हरवून घेतले. कालांतराने अमेरिकन्स त्यांच्या जागी आले आणि सुपर पॉवर झाले. आज त्यांच्या स्थानाला चीन धक्के देत आहे. या घटनाचक्राच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम उम्माहच्या पतनाची कारण मिमांसा करून त्यावर काही उपाय सुचविता येतील का हा या आठवड्याचा चर्चेचा विषय आहे.
इस्लामला पृथ्वीवर का आणले गेले
मिटाया कैसरो किसरा के इस्तब्दाद को जिसने
वो क्या था जोरे हैदर, फकरे बुज़र, सिद्दीके सलमानी
या पृथ्वीवर अवतरित झालेले पहिले जोडपे म्हणजे अॅडम आणि ईव्ह यांच्यापासून आजतागायत सात अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्येचा विस्तार झालेला आहे. हजारो वर्षांच्या कालखंडात मानवाने अनेक चढउतार पाहिले, अनेक चांगली कामं केली, अनेक वाईट कामं केली, पुण्य केले, पाप केले, जेव्हा-जेव्हा पाप जास्त झाले, माणूस पथभ्रष्ट झाला, नेकीपासून लांब गेला, त्या-त्या वेळी ईश्वराने त्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी पैगंबर पाठविले. ज्यांची संख्या 1 लाख 24 हजार मानली जाते. शेवटी मानवाने एवढी प्रगती केली की पुढे प्रेषित पाठविण्याची गरज उरली नाही. म्हणून ईश्वराने शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्यानंतर प्रेषित पाठविण्याचा सिलसिला बंद केला. परंतु हा सिलसिला बंद करण्यापूर्वी त्यांच्यापासून ते प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जीवन जगण्याची एक आचारसंहिता ईश्वराने ठरवून दिली. प्रेषित सल्ल. यांनी ती अरबस्थानामध्ये प्रत्यक्षात लागू केली आणि शेवटच्या हजच्या समापनाच्या दिवशी अराफातच्या मैदानातील टेकडीवर उभे राहून शेवटचे संबोधन करताना सांगितले की, ’’इस्लामचा हा जो संदेश मी तुम्हाला दिलेला आहे आज पूर्ण झाला. आज जे या ठिकाणी हजर आहेत त्यांचे हे कर्तव्य आहे की, जे या ठिकाणी हजर नाहीत त्यांच्यापर्यंत हा संदेश जसाचा तसा पोहोचवावा.’’ येणेप्रमाणे त्या ठिकाणी हजर असलेल्या एक लाखापेक्षा जास्त जनसमुदायाने प्रेषितांचा तो आदेश शिरसावंद्य मानला व जगात विखुरले गेले. भारतातही केरळच्या समुद्रकिनारी मलबार येथे सन 51 हिजरी मध्ये सहाबा रजि. यांचा एक काफिला हजरत तमीम अन्सारी रजि. यांच्या नेतृत्वाखाली आला व त्यांनी इस्लामचा संदेश केरळमधील लोकांपर्यंत पोहोचविला. राजा चिरामन पेरूमल आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी तो स्विकारला. आजही त्यांच्या काळात मालिक बिन दिनार यांनी बांधलेली चिरामन जामा मस्जिद आबाद आहे.
थोडक्यात इस्लामला पृथ्वीवर आणण्याचे एकमेव कारण होते मानवकल्याण. म्हणून मुस्लिमांचे ही जगण्याचे एकमेव कारण मानवकल्याणच आहे. नैतिकतेचा आदेश देणे आणि अनैतिक कामांपासून रोखणे हेच इस्लामचे म्हणजेच पर्यायाने मुसलमानांचे प्राथमिक कर्तव्य आहे, यालाच कुरआनच्या भाषेत अम्रबिल मारूफ व नही अनिल मुनकर असे म्हणतात. (संदर्भ : सुरे आलेइम्रानः110)
आजच्या मुस्लिमांची अवस्था
परंतु इस्लाम स्थापनेच्या 1442 वर्षानंतर मुस्लिमांची अवस्था काय आहे? याचा आपण जेव्हा मागोवा घेतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, इस्लाम आहे तसाच आहे मात्र मुसलमानांतील बहुसंख्य लोक हे इस्लामच्या शिकवणीपासून लांब गेलेले आहेत. दूरची गोष्ट सोडा भारतीय मुस्लिम समाजाची काय अवस्था आहे हे पहा. मुस्लिम सदृश्य नाव असलेल्या मात्र इस्लामची सर्व गुणवैशिष्ट्य हरवलेला हा समाज म्हणजे फक्त 20 कोटी लोकांची गर्दी बणून राहिला आहे. काही हजार, फारतर काही लाख लोक इस्लामी चारित्र्याचे आहेत असे म्हणता येईल. बाकी 20 कोटी लोक इस्लामचा इबादतींपुरता भाग घेऊन त्यातच संतुष्ट राहून बाकी इस्लामचा त्यांनी व्यवहारातून त्याग केलेला आहे. मानवतेचे कल्याण तर सोडा आज मुस्लिमांना स्वतःचेच कल्याण करता येत नाही. आपसात प्रचंड तंटे आहेत, बहुसंख्य मुस्लिम संधी मिळेल तिथे भ्रष्ट आचरण करतात, अन्याय व अत्याचार करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही, गटातटात विखुरलेले आहेत, त्यांना भारतात सत्तेत स्थान नाही, त्यांच्या हातात सत्ता असती तर त्यांनी भारताची अवस्था ही पाकिस्तानसारखी करून टाकली असती यात शंका नाही. त्यांचे आपसातील हितसंबंधही चांगले नाहीत. मसलकी (स्कूल ऑफ थॉट) कलह एवढा मोठ्या प्रमाणात आहे की, अफगानिस्तानसारखी खुली आर्म पॉलिसी असती तर यांनी अफगानिस्तान आणि पाकिस्तानसारखा आपसात हिंसाचार केला असता, यातही शंका नाही. त्यांची सामाजिक अवस्थाही फारशी चांगली नाही. जवळ-जवळ प्रत्येक लग्नात इस्लामी निकाह संहितेच्या विरूद्ध जावून वरपक्ष, वधूपक्षाकडून जमेल तेवढी लूट करतो. व्यसनाधिनता कमी जरी असली तरी ती आहे. प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये मुस्लिमांचा सहभाग दखलपात्र असा आहे. याच स्थितीला पाहून इ्नबालनी म्हटले होते की,
रह गई रस्मे अजां रूहे बिलाली न रही
फलसफा रह गया तलकीने गजाली न रही
इस्लाम धर्मच नव्हे एक जीवन व्यवस्था
मुस्लिम असे म्हणताना थकत नाहीत की इस्लाम फक्त धर्मच नाही तर एक जीवन जगण्याची परिपूर्ण व्यवस्था आहे पण त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर उत्कृष्टता तर सोडा ती सरासरी दर्जाची सुद्धा नसल्याचे दिसून येते. मग बिगर मुस्लिमांनी का बरे त्यांच्या या तथाकथित (अल्लाह क्षमा करो) सर्वोत्कृष्ट जीवन पद्धतीच्या दाव्यावर विश्वास ठेवावा? दूसरी महत्त्वाची बाब अशी की, सामाजिक शिष्टाचार हा इस्लामी जीवन पद्धतीचा पाया आहे. बहुसंख्य मुस्लिमांच्या जीवनातून तोच गायब आहे. मग बिगर मुस्लिमांनी त्यांच्या उत्कृष्टतेच्या दाव्यावर का विश्वास ठेवावा? पहा ! इस्लामी जीवन शैलीचा त्याग केल्याने आपण आपली तर हानी करूनच घेत आहोत उलट आपल्या वागण्याने आपणच आपल्याच दाव्याला सुरूंग लावत आहोत याची जाणीवसुद्धा आपल्याला नाही. यापेक्षा दुर्दैव ते कोणते?
केवळ इस्लाम महान आहे व इस्लामी जीवनशैली परिपूर्ण आहे म्हणून भागणार नाही. इस्लामचा उदोउदो केल्याने काहीच बदलणार नाही. उलट आपण खोटारडे आहोत हे सिद्ध होईल. नुकतीच ईदुल अजहा झाली किती लोकांना या ईदचा मूळ गाभा माहित आहे? ईदुल अजहाला बकरी ईद म्हणणारे हे अज्ञानी लोक या ईदवर पशुबळी दिला जातो, असा आरोप करणाऱ्यांना नीट उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यांना हे म्हणता आले नाही की पशुबळी आणि कुर्बानी याच्यामध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करता आलेला नाही? म्हणून मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सदस्याला इस्लाम आणि इस्लामी जीवनशैलीकडे केवळ भावनाशील होवून पाहून जमणार नाही तर त्यासाठी वस्तुनिष्ठ प्रयत्न करावे लागतील.
कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे.
मुस्लिम आपले जन्मजात कर्तव्य विसरले आणि त्याची त्यांना ईश्वरीय शिक्षा मिळत आहे. सत्तेत असो की नसोत, बहुसंख्य असो की अल्पसंख्यांक असोत ते सर्व क्षेत्रात अयशस्वी होत आहेत नव्हे पराजित होत आहेत. जोपर्यंत मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक एकत्रितरित्या हा निर्णय करणार नाहीत की, व्यवहार्यरित्या आपल्यामधील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या प्रवृत्तींची (जाणीवपूर्वक) जोपासना करू व इस्लामचा संदेश इतरांपर्यत पोहोचवू तोपर्यंत समाजसुधारणेचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होईल.
त्यांच्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली व त्यांनी इस्लामच्या मानवतेचा संदेश व्यापक प्रमाणात आपल्या वर्तणुकीतून देशबांधवांना दिला तरच बहुसंख्य हिंदू बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवतील नसता फाळणीला जबाबदार नसूनही आजच्या मुस्लिम पीढिला ज्या तिरस्काराचा सामना करावा लागत आहे तो पुढेही करावा लागेल, यात शंका नाही.
ही झाली भारतीय मुस्लिमांची अवस्था. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिमांची अवस्था काय आहे हे पाहू. जगात एकूण 56 मुस्लिम राष्ट्र आहेत. त्यापैकी शुद्ध इस्लामी म्हणावे असे एकही राष्ट्र नाही. आज त्यांचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वैयक्तिक वर्तणूक ही बिगर इस्लामीच आहे. जोपर्यंत ती इस्लामी होणार नाही तोपर्यंत ते यशस्वी होणार नाहीत व दुसऱ्यांना संदेश देण्याचा तर प्रश्नच उत्पन्न होणार नाही.
बिगर इस्लामी वर्तणुकीमागची कारणे
हो मुबारक तुम्हे बातील की परस्तीश लेकीन
हक का खुर्शीद जरा देर सही चमकेगा
इस्लामी वर्तणुकीपासून लांब जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुस्लिमांवर झालेला पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव होय. कारण या जीवनशैलीमध्ये माणसाच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही इच्छापूर्तींची कशाही मार्गाने पूर्ती करण्याची मूभा आहे. माणूस प्रवृत्तीनेच आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीकडे प्राधान्याने पाहत असतो. इस्लामी जीवनशैलीमध्ये हलाल, हरामची कैद असल्यामुळे व पाश्चात्य जीवनशैलीमध्ये ती नसल्यामुळे ज्यांची श्रद्धा कमकुवत आहे असे लोक इस्लामी जीवनशैलीपासून दूर गेलेले आहेत.
दुसरे कारण मुस्लिाम समाजातील एका मोठ्या गटाने इस्लामी आदेशांची प्रत्यक्षात जवळ-जवळ अवहेलना केलेली आहे. मुस्लिमांमध्येही पुरोहितवाद वाढलेला आहे. केवळ 4 टक्के मुस्लिम मदरशात जातात म्हणून त्यांच्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण हेच 4 टक्के तरूण धर्माचा अभ्यास करतात आणि समाजाचे धार्मिक नेतृत्व करतात. प्रत्येक मस्जिदीवर त्यांचे वर्चस्व असते आणि सामान्य लोक त्यांचेच ऐकतात. भारतीय मदरशातून शिकवला जाणारा इस्लाम हा परिपूर्ण नाही हे खेदाने म्हणावे लागते. या 4 टक्क्यांमधील अर्धेअधिक मुलं केवळ कुरआन मुखोद्गत करून बाहेर पडतात व जे आलीम, मुफ्ती होतात त्यांचा अभ्यासही कालबाह्य झालेल्या पारंपारिक पद्धतीने करवून घेतला जातो म्हणून त्यांच्यात आधुनिक सामाजिक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होत नाही. मदरश्यातून बाहेर पडल्यानंतर हे विद्यार्थी दैनंदिन आणि जनाजाची नमाज पढविणे तसेच लग्न लावण्यापुरते मर्यादित होऊन राहिले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर मुस्लिम समाजात प्रचंड बिगर इस्लामी रूढी-परंपरा रूजलेल्या आहेत. त्यांच्याविरूद्ध हे मदरश्यातून निर्माण झालेले नेतृत्व चळवळ उभी करू शकत नाहीत. कुरआन जगातील एकमेव असा ग्रंथ आहे ज्याचे फक्त वाचन करून व करवून घेऊन हे धार्मिक नेतृत्व संतुष्ट आहे. नमाजमध्ये इमाम काय पठण करत आहे? काय दुआ मागत आहे? हे नमाजींना माहितच नाही आणि ते समजून सांगण्याची इमामांना गरजही वाटत नाही. कुरआन कळत नाही म्हणून जीवन वळत नाही. कलमा आणि इबादती गळ्याखाली उतरत नाहीत. हृदयापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून त्या आचरणात येत नाहीत. मुस्लिम जनता ही न कळणाऱ्या भाषेत इबादतीकरून संतुष्ट झाल्यामुळे, त्या इबादतींचा खोलवर परिणाम न झाल्यामुळे, भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहते आणि इस्लामी जीवनशैलीपासून लांब जाते. त्यामुळे त्यांना इस्लामी आचरण करण्याचे व तिचा संदेश इतरांना देण्याचे कर्तव्य पार पाडता येत नाही.
मुस्लिम ही इतरांप्रमाणे सतत भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहिल्यामुळे मानवतेची मोठी हानी होत आहे. यातून एक अशी विचित्र कोंडी निर्माण झालेली आहे की, मुस्लिम मोठ्या प्रमाणात वाईट गोष्टींना उत्तेजन जरी देत नसले तरी ईश्वराला अपेक्षित असा विरोधही करतांना दिसत नाहीत. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय मुस्लिम समुदाय हा ईश्वरीय सैन्य आहे जे की, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत वाईट गोष्टी आजूबाजूला घडत असतांना हे सैन्य जर मूक दर्शक बणून त्याकडे कानाडोळा करत असेल तर या लष्कराला निलंबित करणे हाच एक मार्ग उरतो. म्हणून मुस्लिम उम्मा ही ईश्वराकडून निलंबित केलेली गेलेली उम्मा आहे. निलंबित अधिकारी जसे तिरस्कारास पात्र असतात तसेच मुस्लिमही तिरस्काराला पात्र झालेले आहेत. म्हणून सर्वत्र त्यांचा तिरस्कार केला जातोय. या तिरस्कारातून सुटका करून घ्यावयाची झाल्यास काय करावे लागेल? याची चर्चा खालीलप्रमाणे -
उपाय
1. इस्लामच्या दृष्टीने मृतप्राय झालेल्या या उम्माहमध्ये पुन्हा जीव फुंकावयाचा झाल्यास सर्वप्रथम त्यांना कुरआन समजून वाचण्याचे आंदोलन सुरू करावे लागेल. हे सहजशक्य आहे. फक्त त्याची जाणीव समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. नियोजनपूर्वक जनजागृती केल्यास कुरआन समजून वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत जाईल आणि एकदाका बहुतेक मुस्लिमांनी कुरआन समजून घेतला तर ईश्वराला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपोआपच त्यांना कळेल. मग आपोआपच त्यांच्या मनात वाईट गोष्टींबद्दल तिरस्कार व चांगल्या गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण होईल. कारण वाईट गोष्टी करणाऱ्यांनासुद्धा शेवटी चांगल्याच गोष्टी आवडतात. कुठल्याही चोराला वाटत नाही की आपली मुले चोर व्हावीत. तद्वतच कुरआन समजून वाचल्यावर वाईट मुस्लिम माणसाला सुद्धा वाटणार नाही की, आपली मुलं वाईट व्हावीत. त्याच्या मनातसुद्धा पश्चातापाची भावना निर्माण होईल व त्याचे परिमार्जन करण्यासाठी तो पेटून उठेल व मुल्ला-मौलवींपेक्षा जास्त तीव्रतेने इस्लामी जीवनशैली प्रमाणे वागू लागेल. कुरआन समजून घेण्याची व्यक्तीगत पातळीवर सुरू झालेली ही मोहीम बघता-बघता सामाजिक होईल. कारण निलंबित जरी असला तरी शेवटी तो ईश्वरीय फोर्समधील शिपाई आहे. एकदा का त्यानं चांगलं वागण्याचा निश्चय केला व कुरआनला कवटाळले की त्याचा मार्ग आपोआप सुखर होईल. ईश्वरीय मदत वेगाने त्याच्याकडे आकर्षित होईल व अम्र बिल मआरूफ व नही अनिल मुनकर या मिशनचा मार्ग सुकर होईल आणि मुस्लिम उम्माह गतवैभवाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही.
सदाचाराने वागा असा सल्ला, मॉबलिंचिंग करू नका असा सल्ला देण्याइतपतसोपा आहे पण त्याची अमलबजावणी करण्याच्या मार्गात इतक्या अडचणी आहेत. इतक्या की ईश्वरी मदतीशिवाय सदाचारी समाजाची स्थापना होणे शक्य नाही. उदाहरणार्थ 10 बाय 10 च्या खोलीमध्ये अंगार फुलवून त्यात मधोमध एका परातीमध्ये बर्फ ठेवण्यासारखे आहे. बर्फ हा सदाचार असून अंगार हा दुराचार आहे. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. ईश्वरीय मदतीशिवाय बर्फ हा मोठ्या प्रमाणात खोलीत पसरलेल्या विस्तवाला थंड करू शकणार नाही. तसेच प्रचंड संख्येत पसरलेल्या दुराचाऱ्यांच्यामध्ये परातभर मुस्लिमांनी एकदा का सदाचाराचा निश्चय केला तर ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर मुठभर मुसलमानांची मोठ्या लष्कराच्या तुलनेत कशी मदत करतो याचे दाखले जंगे बदर पासून ते अफगानिस्तानच्या ताज्या परिस्थितीपर्यंत विखुरलेले आहेत. प्रश्न फक्त विश्वासाचा आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’मुस्लिम समाजाला कुरआन समजून इस्लामी जीवनशैली प्रमाणे जीवन जगण्याचा व इस्लामचा संदेश इतर लोकांना देण्याची समज व शक्ती देओ’’ (आमीन)
- एम.आय. शेख
Post a Comment