Halloween Costume ideas 2015

क्रांतीवीर निजामुद्दीन काझी

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर काही जण ब्रिटीशांच्या अत्याचाराला बळी पडले व आयुष्यभर शारीरिक अपंगत्व येऊन जायबंदी झाले. अनेकांच्या पराक्रमाने आणि बलीदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांनी महत्वाची कामगिरी पार पाडली, यामध्ये चिकोडी तालुक्यातील खडकलाटचे निजामुद्दीन ऐनुद्दीन काझी यांनी मोठं योगदान दिलं आहे. खडकलाटसह २८ गांवचे"काझी" असणा-या ऐनुद्दीन इब्राहिम काझी हे त्यांचे वडील. स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे स्थायिक झालेल्या काझी कुटूंबाने २१ डिसेंबर रोजी क्रांतीवीर निजामुद्दीन काझी यांची जन्मशताब्दी साजरी केली.... २१ डिसेंबर १९१८ रोजी खडकलाट येथे निजामुद्दीन काझी यांचा जन्म झाला. खडकलाट येथे त्यांचे शिक्षण झाले.  ते महात्मा गांधींच्या भाषणामुळे प्रभावित झाले. त्यांच्या प्रेरणेतून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभागी असतांनाच कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी चे करवीरय्या स्वामी यांचा परिचय झाला. क्रांतीवीर माधवराव बागल, देशभक्त रत्नाप्पांण्णा कुंभार आणि करवीरय्या स्वामी हे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करत होते. रत्नाप्पा कुंभार यांच्या आदेशानुसार करवीरय्या स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गारगोटी कचेरीवर सशस्त्र हल्ला करून कचेरीतील राजबंदींची मुक्तता करण्यात करण्याचं ठरलं.६० ते ६५ क्रांतीवीरांनी पाल येथील घनदाट जंगलात असलेल्या गुहेत याबाबत आखणी केली.१३डिसेंबर१९४२ ला गारगोटी कचेरीवर सशस्त्र हल्ला करण्याचा बेत आखला. दरम्यान ११ डिसेंबर १९४२ला कूर येथील वेदगंगा नदीवरील पूल डायनामाईटने उडवण्याचा कट रचला गेला.यात निजामुद्दीन काझी, लक्ष्मण सुतार यांचा प्रामुख्याने सहभाग होता. त्यानंतर गारगोटी कचेरीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी इंग्रज पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात हुतात्मे झाले. या सात हुताम्‍यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या हुतात्म्यांच्या बलिदानास तब्बल ७७ वर्षे लोटली असली तरी या आठवणी आजही भुदरगड तहसीलदार कार्यालयासमोर उभा असलेल्या क्रांतीज्योतीच्या रूपाने ताज्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांना 'चले जाव' चा नारा दिला. गांधींच्या या नार्‍याने देशभर ब्रिटीश सरकाराविरोधात संतापाची लाट निर्माण झाली. सर्वत्र क्रांतीच्या मशाली पेटून उठल्या. यामध्ये कोल्हापूर जिल्हाही अग्रेसर राहिला. देशभक्त रत्नापाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली भुदरगडमध्येही क्रांतीकारकांची एक तुकडी काम करत होती. या तुकडीने गारगोटी कचेरी लुटण्याचा एक धाडसी बेत आखला होता.  गारगोटीतील सरकारी कचेरीवर ताबा मिळवून तिरंगी निशाण फडकविणे, कचेरीत स्थानबद्ध केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मुक्त करणे व सरकारी खजिन्यावर हल्ला करून तो पैसा स्वातंत्र्यासाठी मिळविणे. कोल्हापूरवरून पोलिसांची कुमक गारगोटीपर्यंत पोहचू नये म्हणून कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कूर येथे वेदगंगा नदीवरील पूल उडविण्याची धाडसी योजना स्वामी वारके यांनी योजली होती. १३ डिसेंबर १९४२ रोजी खजिना लुटण्याचा बेत पक्का झाला. वेगवेगळे गट पाडण्यात आले. यामधीळ एक गट खजिन्याची कुलपे तोडत असताना मॅजिस्ट्रेटचा संरक्षक बाबू जाधव याने केलेल्या हल्ल्यात अंधारात गोळ्या कोठून येतात हे न समजल्यामुळे शूरवीर करवीरय्या स्वामी, नारायण वारके, शंकरराव इंगळे, तुकाराम भारमल, पैलवान मल्लाप्पा चौगुले, बळवंत जबडे, परशुराम साळुंखे हे सात क्रांतीवीर धारातीर्थ झाले. निजामुद्दीन काझी यांचा पाय अधू झाला.त्यांच्या पायाला गोळी लागली.ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी निजामुद्दीन काझी यांना जखमी अवस्थेत अटक केली. माफीचा साक्षीदार होण्यासाठी पोलिसांनी त्यांचा अमानुष छळ केला. मात्र प्रखर देशभक्ती पुढे पोलिसांना माघार घ्यावी लागली.पुढे त्यांना ब्रिटिश सरकारने ३ एप्रिल १९४४रोजी ११ वर्षें ९ महिने सश्रम कारावास व ७०रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पुढे निजामुद्दीन काझी यांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर कारावासातून मुक्त करण्यात आले. १५ ऑगस्ट १९७२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निजामुद्दीन काझी यांना देशातर्फे ताम्रपट देऊन गौरविण्यात आले. इंदिरा गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना एका भाषणात निजामुद्दीन काझी यांच्याकडे इशारा करत "जिंदा शहीद देखना है, तो निझाम काझी को देखो" अशा शब्दांत गौरव केला. या थोर क्रांतीवीराचे २० जानेवारी १९८९ रोजी वयाच्या ७१व्या वर्षी कबनूर येथे निधन झाले. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वत:च्या प्राणाची पर्वा न करणा-या क्रांतीवीर निजामुद्दीन काझी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...

- सुनीलकुमार सरनाईक

कोल्हापूर, 

भ्रमणध्वनी: ७०२८१५१३५२


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget