देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी असे जाहीर केले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला नाही. खोटे बोलायला कधीच कसलीही सीमा नसते. माणूस आपल्या गरजेनुसार, एपतीनुसार, परिस्थितीनुरूप खोटे बोलत असतो आणि खोटे बोलायचेच झाले तर त्याला मर्यादा का? कुणी एका कथित खोट्या घटनेचे वर्णन केले की एकापेक्षा अधिक यात फरक काय? खोटे बोलायला कमी-अधिकाची मर्यादाच कशाला? जी आकडेवारी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली ती ६००-७०० च्या घरात आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ज्यांचे प्राण गेले अशांची आणि असंख्य असे दुर्दैवी लोक आहेत ज्यांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नव्हते, अशांनी ऑक्सिजनच्या प्रतिक्षेत रांगेत बसून आपले प्राण गमावले, तर असंख्य लोक असे होते ज्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते आणि जेव्हा त्यांना ऑक्सिजनची गरज पडली तेव्हा त्यांना हॉस्पिटलसुद्धा गाठता आले नाही. कसेबसे काहींनी जरी हॉस्पिटल गाठले तरी ऑक्सिजनसाठीच्या लांब रांगा पाहून त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले असते. वास्तव असे आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माणसांचे जीवन कवडीमोल केले होते. शासकीय रुग्णालयात बेड नाही, बेड असेल तर ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन असेल तर व्हेंटिलेटर नाही. या महामारीत नागरिकांची कशी दुर्दशा झाली होती ते पाहायला राज्यकर्त्यांना आपल्या बंगल्यातून बाहेर पडायला वेळ कुठे होता! शिवाय बाहेर महामारी चालू असताना हे लोक आपल्या जीवाला धोका कसा पत्करणार, यांना तर राज्य आणि त्याबरोबरच सुखसोयींचा लाभ घ्यायचा होता. काँग्रेसच्या गेल्या सत्तर वर्षांच्या शासनाने बरेच काही उपाय सध्याच्या सरकारच्या मदतीसाठी आधीच करून ठेवलेले आहेत, ज्यांचा पुरेपूर फायदा सध्याचे सरकार घेत आहे. राजद्रोहाचा कायदा भले ब्रिटीश शासनाने केलेला असेल, पण काँग्रेस सरकारने तो जसाच्या तसा चालू ठेवला, यूएपीएचा कायदा खुद्द काँग्रेस सरकारने आपल्या शासनकाळात केला होता, त्याच कायद्याची अंमलबजावणी आपल्याला हवी तशी सध्याचे सरकार करत आहे. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतात भूकमरीच्या समस्येवर चिंता व्यक्त केली होती, म्हणून काँग्रेस शासनाने फूड सेक्युरिटी अॅक्ट केला आणि प्रशासनाला अशी ताकीद दिली होती की यापुढे देशात उपासमारीची एकही घटना घडता कामा नये. ब्रूरोक्रॅसीसारखा चतुर दुसरा प्राणी कोण असू शकतो बरे! त्यांनी एक शक्कल लढवली. कुणी कोणत्याही आजाराने किंवा उपासमारीने मरण पावला तर मृत्यूचे कारण अमुक अवयवाच्या निकामी होण्याने झाले असे देऊ लागले. त्याच कायद्याचा वारसा आपल्या नेत्यांनी पुढे चालू ठेवला आहे. कुणी ऑक्सिजन कमी पडल्याने मरण पावल्यास तसे न दाखवता त्याचे फुप्फुस निकामी झाले किंवा हार्ट अटॅक आला असे देऊ लागले. म्हणूनच मंत्री महोदयांचे म्हणणे आहे की कुणाचा ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झालेला नाही, त्याला दुसरा आजार होता आणि त्याचा अमुक अवयव निकामी झाल्याने तो मरण पावला. यवतमाळच्या भागातून दरवर्षी कुपोषणाने लहान मुलांचे प्राण जात आहेत, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी माध्यमांमध्ये नेहमीच येत होत्या. आता तशा बातम्या येत नाहीत, कारण आता तेथील कुपोषणग्रस्त मुले कुपोषणाने मरत नाहीत तर त्यांचा एखादा अवयव निकामी झाल्याने मरत असतील. म्हणून कुपोषणग्रस्तांच्या बातम्या आता माध्यमांमध्ये दिसत नाहीत. ही गोष्ट जगजाहीर आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा भयंकर तुटवडा होता. जगभरातून ऑक्सिजन पाठवण्यात येत होते. त्याचबरोबर ऑक्सिजनसाठीची इतर उपकरणे, जसे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरदेखील काही देशांनी पाठवले होते. जर आपल्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर या देशांना काय झाले होते. जसा देशभर ऑक्सिजनचा तुटवडा होता तसाच तो हॉस्पिटलमध्येही होता आणि या तुटवड्यामुळेच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाले नाही, म्हणून त्यांचे जीव गेले. पण जर शहाण्या माणसाला मूर्ख लोक यशस्वीपणे मूर्ख बनवत असतील तर यात दोष कुणाचा, शहाण्यांचा की मूर्खांचा?
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment