ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. गेल्या ७३ वर्षाच्या काळात भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा आलेख पाहून प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने अचंबित झाले आहे. १९४७ पूर्वी या देशात टाचणी देखील तयार होत नव्हती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७३ वर्षांत भारताने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रगत असलेल्या जगातल्या दहा राष्ट्रांमध्ये भारताचा उल्लेख गौरवाने केला जातो.औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच भारताने कृषी क्षेत्रातील केलेली भरीव प्रगती निश्चितच गौरवास्पद आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या सारख्या कृषिप्रधान राष्ट्राला दरवर्षी लाखो टन गहू अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशांतून आयात करावा लागत होता.आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.नव्हे नव्हे अन्नधान्याच्या निर्यातीच्या बाबतीत भारताचा नंबर पहिल्या दहा राष्ट्रांमध्ये लागतो. १९७०नंतर अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली असून ही देशाची नेत्रदीपक प्रगती पाहून अनेक शेजारची राष्ट्रे आश्र्चर्यचकित झाली आहेत.कारण अन्नधान्याच्या उत्पादनात जवळपास चौपटीने वाढ झाली आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात केलेली प्रगती देखील अभिमानास्पद आहे. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांने १९७४ साली राजस्थानातील वाळवंटात ॲटमबॉम्बचा स्फोट करून संपूर्ण जगाला आश्र्चर्यचकित केले होते. त्यावेळी ऑटमबाॅम्ब तयार करणारे जगात भारत हे ६ वे राष्ट्र होते. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेली काही वर्षे भारतीय अभियंत्यांनी मोठा नावलौकिक मिळविला आहे.या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगतीप्रमाणे भारताने काही उदात्त मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक अडचणींना तोंड देत भारताने इथली लोकशाही कणखर आणि मजबूत करण्यासाठी दमदार पाऊले उचलली आहेत. तसेच सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांच्या आधारे वाटचाल केली आहे.जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहीले जाते.आपली राज्यघटना ही जगातल्या इतर कोणत्याही चांगल्या राज्यघटनेशी तुलना करावी,इतकी उत्तम प्रकारची आहे, असे अनेक विचारवंतांनी मत मांडले आहे.आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्वावर आधारित आहे, याचे कारण आपल्या राष्ट्रीय नेत्यांची सर्वधर्मसमभावाच्या तत्वावर अभंग निष्ठा होती.
आपल्या देशातील लोकशाही कणखर आणि खंबीर आहे. याचे एक कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वामध्ये सापडेल. पंडित नेहरू यांचा पिंड पूर्णपणे लोकशाहीवादी होता.त्यांनी आपल्या १७ वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या काळात येथील लोकशाहीचा पाया अनेक दृष्टींनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेमध्ये व देशामध्ये लोकशाहीला पोषक अशा परंपरा आणि प्रथा निर्माण केल्या. त्यांनी विरोधी पक्षांना सुध्दा प्रतिष्ठा मिळवून दिली. विरोधी पक्ष देखील राष्ट्र उभारणीच्या कार्यातील आपला भागीदार आहे,अशा दृष्टीने त्यांनी विरोधी पक्षांना वागविले. आपल्या हातातल्या सत्तेचा वापर त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सूड घेण्यासाठी वापरली नाही, तर ती सत्ता राष्ट्राच्या विकासासाठी वापरली.त्यांची ही भूमिका आजच्या काळात ही अतिशय महत्त्वाची असून उठसूट पंडितजींना बदनाम करणाऱ्या लाचखोर प्रवृत्तींनी व तथाकथित अंधभक्तांनी लक्षात घेण्यासारखी आहे.
वास्तविक जगातल्या इतर कोणत्याही देशासमोर नसतील अशी गुंतागुंतीची अनेक आव्हाने या देशातील लोकशाही समोर आहेत, येथे जगातील अनेक धर्माचे लोक अनेक शतके राहत आहेत, जगात कोठेही नसलेली आणि केवळ याच देशात असलेली अस्पृश्यता, जातीव्यवस्था आपल्या समाजात खोलवर रूजलेली आहे, शिवाय सामाजिक व आर्थिक विषमता हा ज्वलंत प्रश्न नेहमीच ऐरणीवर आहे, अशा या देशामध्ये सर्वांच्या मध्ये एकात्मकतेची भावना निर्माण करून राष्ट्राच्या विकासासाठीची धोरणे अंमलात आणणे हे खरे तर फार मोठे आव्हान होते, मात्र या देशाच्या सुदैवाने पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सारख्या लोकशाहीप्रवण पुरोगामी विचारांचे नेतृत्व या देशाला लाभले आणि म्हणूनच या देशातील लोकशाही हळूहळू पण निश्चितपणे बळकट होत गेलेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र अलिकडच्या काळात सत्तेचा गैरवापर करून या देशातील राष्ट्रपुरूषांचे राष्ट्रासाठीचे भरीव योगदान व प्राणार्पण यांना अनुल्लेखाने मारले जात असून उठसूट त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्वाथांने चुकीचे व निषेधार्ह आहे, हे अनेकांनी मान्य केले आहे.
भारताने गेल्या ७३ वर्षात राजकीय क्षेत्राप्रमाणेच आर्थिक क्षेत्रात ही प्रगतीचा मोठा टप्पा पार केला आहे.देशात नियोजनबध्द आर्थिक विकासाचा वेग वाढता राहील यासाठी पंचवार्षिक योजना सुरू केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रयत्नांमुळे १९५६साली भारताने संमिश्र अर्थव्यवस्थेचे तत्व स्विकारले.पंडित नेहरूंनी एका दृष्टीने देशाला समाजवादी विचारसरणीचे धडे दिले,तर दुसऱ्या बाजूला खाजगी क्षेत्र व सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिले.त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक पायाभूत उद्योगधंद्यांच्या पायाभरणीचे कार्य झाले. त्यांनी पोलादाचे ५-६ मोठमोठे कारखाने देशात सुरू केले. वीज निर्मितीला चालना मिळावी म्हणून अनेक मोठमोठी धरणे बांधली.देशातील अंतर्गत दळणवळण व वाहतूक व्यवस्था यांनाही उत्तेजन दिले. इंदिरा गांधी यांनी तर बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले.आपल्या देशाने १९९२नंतर मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि लवचिकतेचा एक सुंदर आविष्कार आपण जगाला दाखवून दिला. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ही नवी तत्वे स्विकारल्यामुळे पंडित नेहरू यांच्या पूर्वीच्या समाजवादी विचारसरणीचे धोरण चुकीचे होते की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली, मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील वाढ आवश्यकच होती. पोलादासारखे अनेक कारखाने आपण सुरू केले.त्यामुळे खाजगी उद्योगधंद्यांना चालना मिळाली. १९६५ च्या पाकिस्तानच्या युध्दात याच पोलादाची शस्त्रे तयार करून ती आपण युध्दभूमीवर पाठवू शकलो.१९६५ चे युध्द आपण अवघ्या दहा दिवसांत जिंकू शकलो याचे कारण आधीच्या काळात आपण केलेल्या पोलादासारख्या पायाभूत उद्योगधंद्यांची वाढ हे होय.नंतरच्या काळात या राष्ट्रीयीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांमुळे कोट्यावधी रुपयांचा तोटा होऊ लागला.अशा उद्योगधंद्यांचा आपल्याला वाईट अनुभव आला, त्यामुळे खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी आपले लक्ष वेधून घेतले.अर्थात असाच अनुभव जगातल्या कम्युनिस्ट राष्ट्रांनाही आला, चीनसारख्या कम्युनिस्ट देशानेही खाजगीकरण अवलंबिले. खाजगीकरण ही आज काळाची गरज आहे, तर राष्ट्रीयीकरण व सार्वजनिक क्षेत्रातील विस्तार ही सुरुवातीला आपली निकड होती, दोन्ही अर्थव्यवस्था पुरक ठरल्या आणि विकासाच्या गतीने वेध घेतला,हे वास्तव नाकारता येणार नाही.
भारताने गेल्या ७३ वर्षात विविध क्षेत्रांत पुष्कळ उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मात्र दुर्देवाने गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवाया वाढत आहेत, त्याचबरोबर देशाला नैसर्गिक आपत्तींशीही सामना करावा लागतो आहे, त्यातच यंदा कोरोनाच्या जागतिक संकटामुळे देशाला आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला आहे, या महामारीमुळे देश महामंदीत जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असतानाच एकीकडे विविध क्षेत्रांत केलेल्या विकासकामांचा आनंद आहे, तर दुसरीकडे नोटाबंदीचा फसलेला निर्णय, प्रचंड महागाई, वाढती बेकारी आणि बेरोजगारी, तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, देशातील ढासळणारी अर्थव्यवस्था यासारख्या अनेक नैसर्गिक व मानवी संकटांमुळे अस्मानी दु:ख पचवावे लागत आहे, कधी नव्हे ते आज देशात अत्यंत जीवघेण्या भयभीत वातावरणात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागतो आहे, भविष्यात काय वाढून ठेवले आहे, या प्रश्नाचे उत्तर आज तरी कोणापाशी दिसत नाही, ही खंत, खेद आणि मनस्वी दु:ख आहे.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
( लेखक भारत सरकारच्या ग्राहक संरक्षण विषयक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Post a Comment