Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)

 


(१०९) मग तुमची काय कल्पना आहे की उत्तम मनुष्य तो आहे ज्याने आपल्या इमारतीचा पाया अल्लाहचे भय व त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यावर ठेवला आहे अथवा तो ज्याने आपली इमारत नदीच्या किनाऱ्यावर एका दरीच्या पोकळ व निराधार कड्यावर१०३ उभारली आणि ती त्याला घेऊन सरळ नरकाच्या आगीत जाऊन कोसळली? असल्या अत्याचारी लोकांना अल्लाह कधीही सरळमार्ग दाखवीत नसतो.१०४ 

(११०) ही इमारत जी त्यांनी बनविली आहे सदैव त्यांच्या हृदयांत अविश्वासाचे मूळ बनून राहील. (ज्याच्या उच्चाटनाची आता कोणतीच शक्यता नाही) याशिवाय की त्यांच्या हृदयांची शकले होतील.१०५ अल्लाह अत्यंत जाणकार व बुद्धिमान आहे. (१११) वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहने श्रद्धावंतांकडून स्वत: त्यांना व त्यांच्या मालमत्तेला स्वर्गाच्या मोबदल्यात खरीदिले आहे.१०६ ते अल्लाहच्या मार्गात लढतात आणि मारतात व मरतात. त्यांच्याशी (स्वर्गाचे अभिवचन) अल्लाहच्या पाशी एक पक्के अभिवचन आहे. तौरात, इंजिल आणि कुरआनमध्ये.१०७ आणि कोण आहे जो अल्लाहपेक्षा अधिक आपली प्रतिज्ञा पूर्ण करणारा असेल? तर आनंद साजरा करा आपल्या या सौद्यावर जो तुम्ही अल्लाहशी पूर्ण केला आहे, हेच सर्वात महान यश आहे. 

(११२) अल्लाहकडे पुन्हा पुन्हा वळणारे,१०८ त्याची भक्ती करणारे, त्याचे महिमागान करणारे, त्याच्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करणारे,१०९ त्याच्यासमोर झुकणारे व नतमस्तक होणारे सत्कर्माचा हुकूम देणारे व दुष्कर्मापासून रोखणारे आणि अल्लाहच्या मर्यादांचे रक्षण करणारे,११० (अशी शान असते त्या श्रद्धावंतांची जे अल्लाहशी खरेदी-विक्रीचा हा सौदा चुकता करतात) आणि हे पैगंबर (स.)! या श्रद्धावंतांना शुभवार्ता द्या. (११३) नबी आणि त्या लोकांसाठी ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, हे उचित नाही की अनेकेश्वरवादींसाठी क्षमेची प्रार्थना करावी; मग ते त्यांचे नातेवाईक का असेनात, ज्याअर्थी ही गोष्ट त्यांच्यावर उघड झालेली आहे की ते नरकाचे हक्कदार आहेत.१११



१०३) अरबी शब्द `जुरुफ' आहे. याचा अर्थ नदीचा तो किनारा ज्याच्या खालील मातीला पाण्याने वाहून नेले आहे आणि पाण्यावर एक भाग उभा असतो. जे लोक आपल्या कर्माचा आधार अल्लाहच्या प्रती निर्भयता आणि त्याच्या प्रसन्नतेपासून विमुखतेवर ठेवतात. त्यांच्या जीवनाला ही उपमा दिली आहे की ती इमारत जी नदीच्या अस्थिर किनाऱ्यावर बांधली आहे.

१०४) `सरळमार्ग' म्हणजे तो मार्ग ज्याच्यामुळे मनुष्याचे मनोरथ पूर्ण होते. हा मार्ग वास्तविक सफलतेच्या ठिकाणी मनुष्याला पोहचवितो.

१०५) म्हणजे त्यांनी विद्रोह आणि धोकाधडीचा इतका मोठा अपराध करून आपल्या मनाला नेहमीसाठी ईमानच्या क्षमतेपासून वंचित ठेवले आहे. बेईमानीचा रोग त्यांच्या नसानसांत भिणला आहे की जोपर्यंत त्यांची मने शिल्लक राहतील हा रोगसुद्धा राहील.

१०६) येथे ईमानच्या त्या मामल्यास जो अल्लाह आणि दासांमध्ये निश्चित होतो त्यास `क्रय-विक्रय' म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की ईमान एक करार आहे ज्यानुसार दास आपले तन, मन, धन अल्लाहच्या हाती विकतो आणि त्याच्या मोबदल्यात अल्लाहशी वचन घेतो की त्याला मृत्यूपश्चात स्वर्ग बहाल करील. या महत्त्वपूर्ण विषयाच्या विहित अर्थाला समजण्यासाठी सर्वप्रथम `क्रय-विक्रय'च्या वास्तवतेला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. जोवर मूळ वास्तविकतेचा प्रश्न आहे, त्यानुसार मनुष्याच्या जीव व वित्ताचा स्वामी अल्लाह आहे. म्हणून हा क्रय-विक्रय या अर्थाने नाही की जे काही मनुष्याचे आहे त्याला अल्लाह खरेदी करू इच्छितो. याचे खरे स्वरुप म्हणजे जे अल्लाहचे आहे, त्याला ठेवीच्या (अमानत) स्वरुपात अल्लाहने मनुष्याकडे सुपूर्द केले आहे. यात ईमानदारी दाखविणे (अमानतदारी) किंवा धोका देणे (खयानत) सर्वस्वी मनुष्याच्या अधिकारात आहे. याविषयी अल्लाह मनुष्याशी मागणी करतो की त्याने स्वखुशीने माझ्या वस्तूला माझीच वस्तू मान्य करून जीवनभर त्याच्या स्वामीच्या रूपात नव्हे तर अमानतदार होण्याच्या स्वरुपात वापरण्यास स्वीकारावे. क्रय-विक्रयाच्या या वास्तविकतेला समजून घेतल्यानंतर त्यांच्या अंतरनिहित अर्थाला समजून घेऊ या. १) याविषयी अल्लाहने मनुष्याला दोन मोठ्या परीक्षेत टाकले आहे. पहिली परीक्षा म्हणजे स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर मनुष्य आपल्या स्वामीच्या स्वामीत्वाच्या अधिकाराला स्वीकारतो किंवा नाही? दुसरी परीक्षा म्हणजे मनुष्य अल्लाहवर भरोसा ठेवून आहे किंवा नाही? अल्लाहने दिलेल्या वचनानुसार उद्याच्या स्वर्गात दाखल होण्यासाठी मनुष्याने आजची स्वत:ची स्वतंत्रता आणि आनंद (आराम) विक्रीसाठी स्वखुशीने तयार व्हावे. २) अल्लाहजवळ जे ईमान विश्वसनीय आहे त्याची वास्तविकता ही आहे की दास आचार आणि विचारस्वातंत्र्याला अल्लाहच्या हाती विकतो आणि त्याच्यासाठी आपल्या मिळकतीच्या दाव्यापासून पूर्णता वेगळे व्हावे. ३) ईमानची ही वास्तविकता इस्लामी जीवनपद्धतीला आणि अनेकेश्वरवादी जीवनपद्धतीला आदि ते अंतापर्यंत पूर्णत: एक-दुसऱ्यापासून वेगळे करते. मुस्लिम व्यक्ती आणि मुस्लिम समाज आपल्या जीवनव्यवहारात अल्लाहच्या अधिन राहून काम करतो. अल्लाहच्या मर्जीपासून स्वतंत्र होऊन जीवनव्यवहार पार पाडणे आणि मन मानेल तसे वागणे अधर्म व अनेकेश्वरवादी जीवनपद्धती आहे. ४) या क्रय-विक्रयाच्या प्रकाशात अल्लाहच्या मर्जीचे पालन मनुष्यासाठी अनिवार्य आहे. ती मर्जी मनुष्य प्रस्तावित नव्हे तर ती मर्जी ज्यास अल्लाह स्वयम् दाखवित आहे.

हा त्या खरेदी-विक्रीत अंतरनिहित विषय आहे. विषयाला समजून घेतल्यानंतर हे आपोआप समजते की या खरेदी-विक्रीत मूल्य (म्हणजे स्वर्ग) वर्तमान ऐहिक जीवनाच्या अंतापर्यंत स्थगित का करण्यात आले? स्पष्ट आहे की स्वर्ग फक्त हे तोंडी मान्य करण्याची गोष्ट नाही की ``विकणाऱ्याने आपले जीव व वित्त अल्लाहच्या हाती विकले आहे.'' ते तर या कर्माचा मोबदला आहे की विकणारा आपल्या ऐहिक जीवनात या विकलेल्या वस्तूचा मनमानी उपयोग करणे सोडून अल्लाहचा विश्वासू (अमानतदार) बनून अल्लाहच्या मर्जीनुसार त्याचा उपयोग करतो. म्हणून ही विक्री तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा विकणाऱ्याचे ऐहिक जीवन समाप्त् होईल. जीवनात हे सिद्ध व्हावे की विक्रीकरार केल्यानंतर आपल्या ऐहिक जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्याने विक्रीकराराच्या अटीपूर्ण केल्या आहेत. यापूर्वी मनुष्य ऐहिक जीवनात न्यायाच्या दृष्टीने मूल्य (स्वर्ग) प्राप्त् करण्याचा हकदार बनू शकत नाही.

१०७) इंजिल (बायबल) मध्ये येशू मसीह (अ.) यांची अनेक कथनं आहेत जी या आयतच्या समानार्थी आहेत. उदा. ``धन्य आहेत ते जे सत्यासाठी सताविले गेले. कारण आकाशाचे राज्य त्यांचेच आहे.'' (मत्ती ५ :१० मत्ती १० :३९ मत्ती १९ : २९) सध्या स्थितीच्या तौरातमध्ये हा विषय सापडत नाही. मृत्यूपश्चात जीवन, हिशोबाचा दिवस, परलोकातील मोबदला इ.पासून तौरात रिक्त आहे. ही विचारसरणी तर प्रथमपासून सत्य धर्माचा अभिन्न अंग राहिली आहे. परंतु सध्यास्थितीतील तौरातमध्ये हा विषय नसल्यामुळे आपण असा निर्णय काढणे अयोग्य आहे की तौरात या विषयापासून खाली होता. खरे तर यहुदी आपल्या पतनकाळात अशाप्रकारे अतिभौतिकवादी आणि ऐहिक समृद्धी आणि लाभासाठी इतके भुकेले बनले होते की त्यांच्याजवळ ईनाम आणि मोबदल्याचा अर्थ म्हणजे या जगातील सुखसमृद्धी बनून राहिला. याशिवाय दुसरा अर्थ त्यांच्याजवळ नव्हता आणि आताही नाही.

१०८) अरबीत ``अत्ताईबून''चा शाब्दिक अर्थ मराठीत पश्चात्ताप करणारे असा आहे. परंतु ज्या शैलीत हा शब्द वापरला गेला त्याने स्पष्ट होते की पश्चात्ताप व्यक्त करणे ईमानधारकांच्या स्थायी गुणांपैकी एक आहे. म्हणून याचा खरा अर्थ म्हणजे ते एकदाच पश्चात्ताप व्यक्त करीत नाही तर सतत तौबा (पश्चात्ताप) करतात. तौबाचा मूळ अर्थ अल्लाहकडे रूजू होणे आणि वळणे आहे. म्हणून या शब्दाचा वास्तविक भाव व्यक्त करण्यासाठी त्याचा अनुवाद ``ते अल्लाहकडे पुन्हा पुन्हा वळणारे'' असा केला आहे. ईमानधारक विचारांति अल्लाहशी आपले जीवन वित्त खरेदी-विक्री करण्याचा व्यवहार करतो. परंतु पुन्हा पुन्हा अशा घटना घडतात की मनुष्याच्या स्वभावानुसार अस्थायी रूपात तो हा व्यवहार विसरतो. जेव्हा त्याला याची जाण येते तो आपल्या गफलतीने भयभीत होतो. त्याला लाज वाटू लागते. तेव्हा तो अल्लाहकडे वळतो आणि आपली प्रतिज्ञा ताजी करतो. 

१०९) अरबी शब्द `साइहून' चे स्पष्टीकरण काही भाष्यकारांनी `अस्साइमून' (रोजा ठेवणारे) असे केले आहे. परंतु `सियाहत' चा अर्थ रोजा लाक्षणिक अर्थाने आहे. शब्दकोशात हा अर्थ नाही आणि सही हदीसनुसारसुद्धा हा अर्थ प्रमाणित होत नाही. म्हणून आम्ही या शब्दाला मूळ अर्थानेच प्रयुक्त करणे योग्य समजतो. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी `इनफाक' शब्द आला आहे आणि त्याचा अर्थ होतो खर्च करणे. याच्याशी तात्पर्य अल्लाहच्या मार्गात खर्च करणे आहे. याचप्रमाणे येथे `सियाहत' म्हणजे सैरसपाटा मारणे नव्हे तर अशासाठी पृथ्वीवर फिरणे ज्यात अल्लाहची प्रसन्नता, इस्लामी जीवनपद्धतीचा प्रचार-प्रसार, मानवसुधार, ज्ञानासाठी तसेच अल्लाहच्या निशाण्यांचे अवलोकन आणि हलाल (वैध) उपजीविका शोधण्यासाठी असावे.

११०) म्हणजे अल्लाहने आस्था, उपासना, नैतिकता, सामाजिकता, सभ्यता, अर्थव्यवस्था, राजनीती, न्याय आणि करार तसेच युद्धाविषयी ज्या मर्यादा घालून दिल्यात त्यांना पूर्णत: डोळयांसमोर ठेवून जगात त्यांना स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे रक्षण करतात आणि आपल्यातर्फे पूर्ण प्रयत्नशील राहातात की या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये.

१११) एखाद्या व्यक्तीसाठी क्षमेसाठी विनंती म्हणजे आम्ही त्याच्याशी प्रेम आणि बंधुभाव ठेवून आहोत आणि दुसरे म्हणजे त्याच्या चुकांना क्षमा करण्यायोग्य समजले जाते. या दोन्ही गोष्टी त्या माणसासाठी योग्य आहेत जो निष्ठावानात सामील आहे आणि फक्त अपराधी आहे. परंतु जो मनुष्य स्पष्ट द्रोही आहे त्याच्याशी प्रेम आणि बंधुत्वाचे संबंध ठेवणे आणि त्याच्या अपराधांना क्षमा करण्यायोग्य समजणे तत्वत: चुकीचे आहे व त्या ईमानविरुद्धसुद्धा आहे ज्याची निकड आहे की अल्लाह आणि इस्लामी जीवनपद्धतीवर (दीन) असीम प्रेम असावे. अल्लाहचा दोस्त आपला दोस्त आणि त्याचा शत्रू आपला शत्रू आहे म्हणूनच अल्लाहने असे सांगितले नाही, ``अनेकेश्वरवादीसाठी क्षमेची प्रार्थना करू नका'' तर असे म्हटले आहे, ``तुम्हाला हे शोभनिय नाही की तुम्ही त्यांच्यासाठी (अनेकेश्वरवादी) क्षमेची प्रार्थना करावी.'' म्हणजे आमच्या मनाईमुळे तुम्ही असे केले नाही तर ठीक आहे. तुमच्यात निष्ठेची अनुभूति इतकी तीव्र असली पाहिजे की जो अल्लाहचा द्रोही आहे त्याच्याशी प्रेम आणि सहानुभूतीपूर्ण संबंध ठेवावे तसेच त्यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करावी, हे तुम्हा स्वत:ला अशोभनीय कृत्य वाटावे.

येथे हे समजून घेतले पाहिजे की अल्लाहच्या विद्रोहीप्रती ज्या सहानुभूतीपासून मनाई केली आहे ती सहानुभूती म्हणजे जी इस्लामी जीवनपद्धतीत हस्तक्षेप करण्याचे कारण बनते. मानवी सहानुभूती आणि जगातील नातेसंबंध स्थापित करण्यासाठी मनाई केली गेली नाही. हे तर एक प्रिय काम आहे. नातेवाईक ईशद्रोही असो की ईमानधारक, त्याचे ऐहिक अधिकार आणि हक्क अवश्य दिले गेले पाहिजे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget