Halloween Costume ideas 2015

‘खेलरत्न’ची कारणमीमांसा

...या कारणांमुळे माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव यांनी स्व. राजीव गांधी यांचे नांव खेलरत्न पुरस्काराला दिले. ज्याचे खापर गांधी परीवारावर फोडले जाते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या क्रिडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' या पुरस्काराचे नाव बदलून 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असे केले. यावरुन समाज माध्यमांमध्ये दोन्ही बाजूंनी टिकाटिपण्णी झाली. खेलरत्न पुरस्काराला खेळाडूचे नाव असायला हवे याबद्दल एकमत दिसून आले. तर दुसरीकडे हाच न्याय क्रिकेट स्टेडीयमला जिवंतपणी स्वतःचे नाव देताना मोदींनी स्वतःला लागू केला नाही म्हणून टिका झाली. पण मुळात राजीव गांधींचे नांव खेलरत्न पुरस्काराला का दिले? याबाबतची माहिती काँग्रेस कडून आजच्या पिढीला देणे गरजेचे होते. मात्र सुस्त अजगराप्रमाणे पक्षाच्या पदांवर सरंजामदारीची अंडी उबवत बसलेल्या भेकड पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे याबाबत चकार शब्द काढला नाही. आणि लोकांच्या मागणीखातर पुरस्काराचे नाव बदलले या लबाडीखाली मोदी त्यांचा खोटा पैसा नेहमीप्रमाणे चालवून गेले.

मग राजीव गांधींचे नाव खेलरत्न पुरस्काराला देण्यामागे काय कारण होते?

तर, स्व. संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर राजीव गांधी भारतीय राजकारणाच्या पटलावर सक्रीय झाले. त्यावेळेस स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्याचवेळी भारतात एशियाड गेम्सच्या स्पर्धा तब्बल ३० वर्षांनंतर भरवल्या जाणार होत्या. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतावरचा दारिद्री देशाचा शिक्का पुसायची संधी आयती चालून होती. इंदिरा गांधींनी या संधीचे सोने करण्याची जबाबदारी राजीव गांधी यांचेवर सोपवली.

राजीव गांधीनी दिल्लीत स्टेडीयम उभारुन एशियाड गेम्सच्या स्पर्धा पार पाडल्या. देशात कलर टि.व्ही. आणून स्पर्धेचे प्रक्षेपण देशभरात केले. जगभरातून भारतातील एशियाड गेम्सचे कौतुक झाले. हे सगळं करत असताना राजीव गांधींनी भारताकडे ठोस क्रिडा धोरण नसल्याचे लक्षात घेतले आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पश्चात अचानक जबाबदारी शिरावर येऊन पंतप्रधान झाल्यावर भारताचे ठोस क्रिडा धोरण ठरवताना १९८६ साली स्पेशल एरीया गेम्स प्रोग्रॅम भरवण्यात आले. टॅलेंट हंट कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आदिवासी भागातील चपळ युवांना शोधून यामध्ये सहभागी करण्यात आले. या युवांना दिल्लीत सरकारी खर्चाने अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या. यातूनच लिंबा राव हा आदिवासी मुलगा देशाचा धनुर्धर बनला. 

नैऋत्यपूर्व भारतातून या कार्यक्रमांतर्गत अनेक प्रतिभावान खेळाडू उभारी घेत असताना राजीव गांधी पराभूत झाले. राजीवजींच्या पश्चात पंतप्रधान झालेल्या व्ही.पी. सिंगांनी राजीवजींच्या क्रिडा धोरणाला वायफळ खर्च म्हणत बासनात गुंडाळले. पुढे दुर्दैवाने १९९१ मध्ये राजीवजी शहीद झाले, आणि त्यांनी आखलेल्या क्रिडा धोरणाचा सन्मान म्हणून पंतप्रधान नरसिंह राव यांनी खेलरत्न पुरस्काराला राजीवजींचे नाव दिले. ज्याला सज्जन काँग्रेसी नेते विरोध करु शकले नाहीत. 

खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधींचे नाव देण्याचे श्रेय नरसिंहरावांना जाते. तर देशाच्या क्रिडा धोरणांवरुन नेहरु आणि काँग्रेसच्या नावाने बोंबा मारणारे शेठ, तसेच राज्यपाल कोश्यारी व इतर भाजपेयी हे व्ही.पी.सिंगांचे आधुनिक वंशज मानायला हवेत कारण जे व्ही.पीं. सिंगानी देशाच्या क्रिडा धोरणांबाबत केलं त्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन शेठ पुरस्कृत भाजपनी क्रिडा क्षेत्राचे बजेट कपात करुन केलंय!

- अफसर खान

संपादक, महाराष्ट्र मीडिया नेटवर्क


अज्ञातनायक

आठ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक सभेनंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपासून मान्यवर नेत्यांच्या अटका सुरू झाल्या. महात्मा गांधी, नेहरू, मौलाना आज़ाद, असफ अली, सरदार पटेल, पट्टाभी इत्यादी नेत्यांना अटक करून स्पेशल ट्रेनने पुणे व पुढे अहमदनगरला रवाना करण्यात आलं. 

त्यादिवशी झालेली जाहीर सभा अनेक कारणामुळे ऐतिहासिक ठरली होती. युसूफ मेहरअली यांनी सुचवलेली #QuitIndia ही घोषणा क्रांतिकारी ठरली. या घोषणेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मेहेरअली यांनी एक पुस्तिका काढली होती, जी सभेच्या ठिकाणी वितरीत करण्यात आली. नंतर ही पुस्तिका जप्त झाली हा भाग अलाहिदा. 

गवालिया टँक मैदानातून अनेक घोषणा त्या दिवशी दिल्या गेल्या. त्याची परिणामकारकता इतकी होती की देशभरातून अनेकजण 'चले जाव' चळवळीला येऊन सामील झाले. मुंबईत क्रांतीचं लोणचं पसरलं. वृद्ध, तरुण आणि बालबच्चेच नव्हे तर महिलादेखील या चळवळीत सरसावल्या.

बैरिस्टर असफ अली यांच्या बेगम अरुणा वेळीच भूमिगत झाल्याने ब्रिटिश सरकारच्या हाती आल्या नाहीत. त्यांनी बाहेर राहून महिलांचं संघटन बांधलं. या संघटनेत अनेक मान्यवर स्त्रिया होत्या. ज्यात प्रामुख्याने नाव घेता येईल अशा दोन बहिणी; एक आमिना तय्यबजी तर दुसरी सकीना लुकमानी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. या दोन्ही काँग्रेसचे संस्थापक सदस्य बदरुद्दीन #तय्यबजी यांच्या कन्या होत.

अरुणा असफ अली भूमिगत राहून देशभर सक्रिय होत्या. स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांना ठिक-ठिकाणाहून अनेक स्त्रियांनी लागेल ती मदत पुरवली. सकीना #लुकमानी त्यापैकी एक. 

चले जाव घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी आमिना तय्यबजी यांना अटक करण्यात आली. अनेक महिलांसोबत पुण्यातील येरवडा तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. 

अटक केलेल्या स्त्रियांची संख्या इतकी होती की त्यांना ठेवण्यासाठी बराकी पुरत नव्हत्या. अशावेळी कापडी शेल्टर उभारून त्यात महिलांना ठेवण्यात आलं होतं. अटक केलेल्या स्त्रियांमध्ये काही क्रांतिकारक होत्या तर काही अतिसामान्य महिला. सार्वजनिक कार्यासाठी त्यांनी घराच्या उंबरठा ओलांडला होता, अशा महिलांना संघटित करण्याचे काम तय्यबजी कुटुंबातील महिलांनी केलं होतं. त्यापैकी सकीना व आमिना. 

आमिना एक व्यवहार कुशल महिला होती. बडोदा संस्थानचे न्यायाधीश श्रीयुत अब्बास तय्यबजी यांच्या त्या बेगम. घरंदाज असलेली ही महिला क्रांतिकारी व चळवळी होती. #स्वदेशी चळवळीमध्ये त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे.  परकीय वस्तूंचा बहिष्कार करणे व चरखा चालवण्यासाठी अनेक महिलांना त्यांनी प्रवृत्त केलं होतं. #येरवडा तुरुंगात देखील त्यांनी हे काम सुरू ठेवलं. अटक केलेल्या स्त्रियांसाठी चरखा चालवणे, कढाई व हस्तकला शिकवण्याचे काम त्यांनी केलं. शिवाय सर्वांना मानसिक आधार देखील दिला.

चले जाव चळवळीत स्त्री क्रांतिकारकांचे कार्य बेदखल राहिलेले आहे. अनेक स्त्रिया अशा होत्या ज्यांच्यामुळे मान्यवर नेते तुरुंगात असतानादेखील दीर्घकाळ १९४२चा लढा चालू राहू शकला. अरुणा असफ अली यांनी लिहिलेल्या आपल्या स्मृतीमध्ये या चळवळीत कार्य करणाऱ्या काही निवडक महिलांचा उल्लेख आलेला आहे. 

-कलीम अजीम, पुणे

(लेखकाच्या फेसबुक वॉल वरून)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget