हिला रहा है कौन आज बुनियादें,
बुलंदतर घरोंको सोचना होगा ।
निरीह मछलिया डरी-डरी क्यों हैं;
सभी समंदरों को सोचना होगा ।
८ मार्च जागतिक महिला दिन. संपूर्ण जगातून महिलांवर आज शुभेच्छांचा वर्षाव होणार. बऱ्याच ठिकाणी महिलांचा सन्मान, सत्कार करण्यात येणार. जरी संपूर्ण लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या ही महिला आहे, तरी आज महिला दिवस साजरा करावा लागत आहे. आपण पुरुष दिवस साजरा करतो का? पुरुषांच्या अधिकारांसाठी लढावे लागते का? मग महिलांच्या समानतेच्या अधिकारासाठी का लढावे लागत आहे? कारण वर्षानुवर्षे पुरुषसत्ताक व्यवस्था या संपूर्ण जगात नांदत आहे. या व्यवस्थेला जर भेदायचे असेल तर संपूर्ण जगाला गरज आहे ‘स्त्रीवादी’ होण्याची. स्त्रीवाद म्हणजे काय? स्त्रीवाद म्हणजे हे मान्य करणे की, ज्याप्रमाणे पुरुष आहे, त्याचप्रमाणे स्त्रीसुध्दा एक मनुष्य आहे. स्त्री आणि पुरुष जन्म घेतात मनुष्य म्हणून. परंतु स्त्रीला नंतर अबला बनवण्यात येते. निसर्गाने निर्माण तर समान केले, परंतु एक मालक झाला आणि एक गुलाम!
भारतीय स्त्रीच केवळ शोषिक आहे असे नाही संपूर्ण जगात पुरुषसत्ताक संस्कृती आहे. ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लढाई तेथील महिलांची सुध्दा आहे. ‘मीटू’ ही चळवळ विदेशातूनच आलेली आहे. फक्त ‘मीटू’ म्हणून काय होते? या एका छोट्याश्या वाक्यातून संपुर्ण जगातील स्त्रीया एकवटल्या गेल्या. ज्याप्रमाणे तुला कठीण काळाचा सामना करावा लागला, त्याचप्रमाणे मलासुध्दा! तू एकटी नाहीस ‘जिंदगानी के सफर मे तू अकेली ही नही है, हम भी तेरे हमसफर है।’ ही भावना या शब्दांमागे आहे. ही एक चळवळ आहे. स्त्रीवादी चळवळ!
स्त्रीवादासाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे,
‘फेमिनिझम’, या शब्दाचा शब्दकोषीय अर्थ आहे. ‘Advocacy of woman’s rights of the movement for the advancement and emancipation of women’, या व्याख्येनुसार स्त्रीवाद दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतो, १) स्त्रियांच्या अधिकाराचा पुरस्कार आणि २) स्त्रियांची प्रगती व बंधमुक्तता. या व्याख्येने स्त्रीवादी चळवळ म्हणजे काय? हे स्पष्ट होते. जी चळवळ स्त्रियांचे अधिकार, प्रगती आणि बंधमुक्ततेसाठी चालवल्या जाईल ती स्त्रीवादी चळवळ होय. हे अधिकार सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक या बाबतीत अपेक्षित आहे. पाश्चात्य
राष्ट्रांत या संदर्भात तीन चळवळी झाल्या 1st wave, 2nd wave, 3rd wave. 1st wave मध्ये मध्यम आणि उच्चवर्गीय स्त्रियांचा सहभाग होता. दुसऱ्या व तिसऱ्यामध्ये हळूहळू सर्वच स्तरातील स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. भारताच्या संदर्भात अशी कुठलीही वेव दिसून येत नाही.
भारतात स्त्रियांचे समान अधिकार, स्त्री सशक्तीकरण, महिलांचे अधिकार याबद्दल बरेच बोलल्या जाते. परंतु हे बोलण्याच्या पातळीवरच. हे जर अंमलबजावणीच्या पातळीवर उतरले असते तर कवीवर हा दोहा रचायची पाळीच आली नसती. कवी कलीम खान म्हणतात.
‘स्थान भले कोई रहे, कोख, जगत, समलोक।
ऐ नारी, तेरे लिये, आज नही निर्धोक’
या देशात ज्या महिलेच्या गर्भातच आपण जन्म घेतो, त्याच महिलेच्या संवैधानिक अधिकारांबद्दल फार उदासिनता आहे. तिला स्वत: ही तिचा अधिकार माहीत नाही. आपल्या देशातील स्त्रिया पूर्वीपासून हलाखीच्या परिस्थितीत होत्या असे नाही. विद्वान लोकांचं मानणं असं होतं की, महिलांना प्राचीन भारतात पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त होता. पण ही फार पूर्वीची गोष्ट झाली, अगदी उपनिषद काळातली. या काळात मैत्रेयी आणि गार्गी सारख्या स्त्रिया तत्वज्ञानावर पुरुषांच्या बरोबरीने वाद घालू शकत होत्या. बौध्द काळातही स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होते. परंतु बौध्दधर्माचा पाडाव करूनपुष्यमित्र शुंग याची राजवट सुरु झाली. त्याच्या काळात मनुस्मृतीला संविधानाचा अधिकार देण्यात आला. त्यानुसार -कारभार होऊ लागला.
मनुस्मृतीनुसार ‘न स्त्री
स्वातंत्र्यम अऱ्हति।’
म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्यच
नाही. या प्रकारची वागणूक महिलांना देण्यात येऊ लागली. भारतीय महिलांच्या जीवनात मध्ययुगीन काळात आणखी कठीण काळ आला. भारतातील काही जातींमध्ये सतीप्रथा, बाल विवाह प्रथा होती. राजस्थानमध्ये ‘जौहर’ ही प्रथा होती. याच काळात मुघल साम्राज्य आले. त्यांनी पडदा पध्दत आणली. मुस्लिमांसाठी ‘शरियत’ इस्लामिक संविधान लागू झाले.
भारतीय संविधान लागू होण्याच्या आधी भारतात दोन संविधाने १) मनुस्मृती प्रणीत, २) इस्लाम प्रणीत झालीत. इंग्रजी शासन होते तेव्हा इंग्रजांनी या बाबतीत बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. या काळातराममोहन राय, ईश्वर चंद्र विद्यासागर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, इत्यादी समाजसुधारकांनी बऱ्याच कुप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान लागू झाले. भारतीय महिलांच्या जीवनात तत्वत: क्रांती घडून आली. भारतीय स्त्री कायद्याने का होईना मुक्त झाली. परंतु दुर्दैव हे की, तिला स्वत:च तिचे अधिकार माहीत नाहीत. आजकाल फेसबुक, वॉट्सअप, इंन्स्टाग्राम सारख्या सोशल मिडियावर आपण महिलांबद्दल, अनेक जोक्स वाचतो किंवा बघतो. त्यात पुरुष किती सोशिक आहे आणि महिला (पत्नी) कितीअत्याचारकरतेह- ेदाखवतात. वास्तविक जीवनात बघितले तर महिला विरोधातून होणाऱ्या गुन्ह्यांचे विश्लेषण केले तर हे स्पष्ट होते की दर ६ मिनिटांत महिलांसोबत छेडखानी, विनयभंग, अश्लिता, बलात्कार, लैंगिक उत्पीडन, हत्येचा प्रयत्न यासारख्या घटना घडत असतात. स्त्रियांवर होणारे अपराध थांबवण्यासाठी संविधानात तरतुदी आहेत. परंतु जोपर्यंत पुरुष आणि समाजाच्या मानसिकतेत सुधार होत नाही, तोपर्यंत संवैधानिक तरतुदीचे काही औचित्य नाही.
गरज आहे समानतेची, समान अधिका-रांची. बरेच लोक म्हणतात, स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे किंवा तिच्यावर मातृत्वाची जबाबदारी आहे, तिला मुलांचा सांभाळ करावा लागतो. मान्य आहे. निसर्गाने तिच्यावर मातृत्व लादले आणि तिला या मातृत्वाचा अभिमान आहे. मातृत्व लादून निसर्गाने तिला निसर्गाएवढी शक्तीशाली बनवले. चूल आणि मूल सांभाळूनही जर ती काही करत असेल तर सहकार्य करायला काय हरकत आहे.
‘अस्मिता माझी नसांतून थिरकते आहे
तरीही पैंजणांतील घुंगरांना उंबऱ्याचे भान आहे.’
कवी कलीम खान यांच्या कवीतेतील ओळी. एक मुद्दा आणखी गाजतो आहे, तो तिच्या सुरक्षेचा. तिच्या सुरक्षिततेसाठी तिच्यावर बंधने लादलीत. तिला जर काही झाले तर, घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण केल्या जातो. संपूर्ण परिवाराच्या इज्जतीची जबाबदारी तिच्यावरच आहे! उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांत तर मुलींचे आंतरजातीय विवाह केले तर ‘ऑनर किलिंग’ सारख्या घटना घडतात. घरातील लोक स्वत:च तिला मारून टाकतात. जर एखाद्या मुलाला अपघात झाला तर त्याच्या जखमा भरल्यानंतर त्यास पुन्हा ते जीवन जगता येते. परंतु मुलीवर बलात्कार झाला तर ती पूर्ववत जीवन जगू शकत नाही. दोन्ही घटना या अपघात आहेत. परंतु आपला बघण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे. सुरक्षित-तेपायी तिला आणखी बंधनांत जकडण्यात येत आहे. सुरक्षा कोणाकडून? ८० टक्के अत्याचार हे जवळचे नातेवाईक, शेजारी, सोबत काम करणारेच करतात. ज्यांच्यावर भरवसा करायचा तेच घात करतात. सध्या आम्ही स्त्रिया सुरक्षित कुठेच नाही. आमचा संघर्ष तर जन्म घ्यायचा की नाही येथूनच सुरू होतो. महिलेला तर तो अधिकरही नाही की, आपल्या पोटात वाढणाऱ्या मुलीला जन्म द्यायचा की नाही, हे असे आहे. तर मग काय करायचे? जगणं सोडून द्यायचं का? हे जर बदलायचं असेल तर गरज आहे संपूर्ण जगाला स्त्रीवादी होण्याची.
स्त्रीवादी या शब्दाबद्दल अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. स्त्रीवाद म्हणजे काय आहे? आणि काय नाही? याबद्दल संकल्पना स्पष्ट असल्या तर स्त्रीवादी असल्याचे अभिमानाने सांगता येईल. स्त्रियांची आंदोलने म्हणजे पुरुषांविरुध्द सूड उगवणे नाही. स्त्रियांना न्याय हवा आहे. पण अन्यायाचा प्रतिकार अन्यायाने करता येत नाही. स्त्रीवाद, पुरुषाला दोष देत नाही, तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला दोष देतो. दोन देश, दोन वर्ग, दोन जाती, दोन धर्म या लढायाप्रमाणे ही लढाई नाही. उपरोक्त लढायामध्ये एकाचा विजय व एकाचा पराभव होतो. इथे दोघांचे हितसंबंध एकच आहे. कर्तव्ये सारखीच आहेत. म्हणून सत्तेचे हस्तांतरण हा स्त्रीवादाचा मुद्दाच नाही.स्त्रीयांना पुरुष व्हायचे नाही. स्त्रीमध्ये जी-जी नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत त्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक भिन्नता जरी असली तरी व्यक्ती म्हणून दोघांत समता नांदू शकते. स्त्रियांनी गुलामी इतकी स्विकारली की, त्यांना महीतच नाही. ज्याला ती पवित्रता, पातीव्रात्य आणखी काय काय मानते ते पुरुषांनी लादलेले जबरदस्तीचे विचार आहेत. जीवन हे सहज, आनंदी आणि उत्सवी असले पाहिजे. जोपर्यंत आपण हे मानणार नाही की, ज्याप्रमाणे पुरुष हा मनुष्य आहे, त्याचप्रमाणे स्त्रीसुध्दा मनुष्य आहे आणि जोपर्यंत आपण तिला इज्जत-आबरू सारख्या बंधनातून मुक्त करणार नाही तोपर्यंत समाज स्त्रीवादी होणार नाही. जोपर्यंत समाज स्त्रीवादी होणार नाही, तोपर्यंत जागतिक महिला दिवस साजरा करावा लागणार.
अत्यंत कमी शब्दात स्त्रीवादाची व्याख्या करायची झाल्यास मी असं म्हणेन -
महिमा मंडित मत करो, मत रौंदो एहसास।
नारी नारी ही रहे, ना देवी ना दास।
- समिना खलील शेख
(यवतमाळ)
मो.: ७३५०२४८२३८
Post a Comment