समाजाचा पाया मजबुत कुटुंब व्यवस्थेवर अवलंबून आहे. स्वस्थ समाजासाठी कुटुंबामध्ये सशक्तता, स्थिरता, आवश्यक असते. व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीबरोबर प्रेमाने, जिवाभावाने, आनंदी जीवन व्यतीत करतो. तेव्हाच समाजात शांतता प्रस्थापित होते. घर आनंंदी तर समाज समाधानी ! कुटुंबातच सामाजिक मुल्ये रुजतात. नैतिक मुल्ये विकसीत होतात.
कुटुंब म्हणजे पती-पत्न्नी, आई-वडिल, मुले, बहिण, भाऊ, इतर नातलग मिळून सशक्त परिवार बनतो. कुटुंबासाठी विवाह पवित्र बंधन, जीवन व्यतीत करण्याचा मार्ग, भावभावनांचा समन्वय. अशा कुटुंबात जन्मलेले बालक आत्मविश्वासाने जीवन व्यतीत करणारे, भविष्यातील एक जागरूक नागरिक बनते. आई बालकांची प्राथमिक ज्ञानपीठ, प्राथमिक ज्ञानाचे भंडार, आयुष्याची शिदोरी मिळण्याचे ठिकाण. याच ठिकाणी प्रेम, माया, त्यागावर आधारीत जीवन जगण्याचा धडा मिळतो. व्यक्तिमत्व विकसित करण्यास समर्थता येते. तेच कुटुंब, तोच समाज सुरक्षित, सुखी, समाधानी असू शकतो. पण जर का कुटुंबातील प्रमुख आधारस्तंभ पती-पत्नीच जर मजबूत नसतील तर समाजाची इमारत भक्कम उभी राहणार का?
आज माणवाने तांत्रिक युगात प्रगतीपथावर पाऊल टाकले असले तरी अनेक सामाजिक कलह पहावयास मिळतात. कुटुंबातील पती-पत्नीमधील तणाव, इतर नात्यातील कलह, भेदभाव, आपसातील अंतर, द्वेषाची भावना पहावयास मिळत आहे. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. निर्मळ, प्रेमळ नाती दूरावली जात आहेत. खानदानी कलाहांनी समाज अनेक समस्यांनी पोखरला जात आहे. सुदृढ कुटुंबच सुदृढ समाज निर्मिती करु शकते. म्हणूनच कौटुंबिक कलह, सामाजिक अस्थिरतेला कारण काय याचा विचार करावा लागेल.
एखाद्या रोगाचे निदान झाल्याशिवाय डॉक्टर उपचाराला सुरुवातच करत नाही. तिच स्थिती आज आमच्या परिवाराची, खानदानाची होत आहे. आज विवाहासारख्या पवित्र बंधनाचे खेळणे केले आहे. विवाहात दोन व्यक्ती स्त्री-पुरुष पवित्र बंधनात बांधले जातात. नवीन जीवनाची सुरुवात वेगवेगळ्या घराण्यात जन्न्मलेले, वाढलेले, संस्कारीत झालेले, स्वभाव निराळे, अनोळखी परिचयात येणे व आपल्याला एका नवीन वातावरणात समाविष्ट करुन घेतात. पसंती-नापसंती गुंडाळून नवीन नात्याला जोडली जातात. पण आज नवीन जोडपी सामंजस्याची भूमिका निभावण्यासाठी कोठे तरी कमी पडत असल्याचे पहावयास मिळते. कुटुंब विस्तारित करण्याच्या आधीच त्यांच्यात ताण-तणाव पहावयास मिळत आहे आणि अशातच कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. एकमेकांना समजून घेण्याची शक्तीच नसल्यामुळे ती कुटुंबे रोगट बनतात. मानसिक खच्चीकरणामुळे कौटुंबिक स्वास्थ्य पार ढासळते. नाती विखुरली जातात. कुटुंबाचा आधारस्तंभ पती-पत्न्नीच जर घरात शांतता, समाधान, प्रेम स्थापित करु शकत नाहीत तर संसार रूपी गाड्याची चाके रूतली तर प्रवास थांबणारच !
आज घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. हजारो कौटुंबिक कलहाची प्रकरणे न्यायालयात चालू आहेत. अनेक फायली जीवनाची वाट पाहत आहेत. जीवनात अंध:कार घेऊन जगणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कुटुंबे विखुरली जात आहेत. घरात, समाजात वृध्दांना मान-सन्मान दिला जात नाही. ज्येष्ठ नकोसे झाले आहेत. ज्येष्ठ घरात अडगळ वाटू लागले आहेत. त्यामुळे वृध्दाश्रमात त्यांची रवानगी होत आहे. वृध्दाश्रमात वृध्द स्त्री असो की पुरुष संख्या वाढत आहे.
खरे पाहिले तर तरूणपिढीला ज्ञानाचे धडे देणारे, संस्कारीत करणारी ज्येष्ठ मंडळीच महान. पण त्यांचा या आधुनिक म्हणून घेणाऱ्या कुटुंबाला विसर पडत आहे. खरे तर ज्या घरात वयस्क आजी-आजोबा वृध्द मंडळींच्या ज्ञानाचा लाभ घरातील मुलांना होतो ते घर एखाद्या विद्यापीठापेक्षा कमी नाही.
आजही वृध्दाश्रमातील भावी पिढी घडविणारी मंडळी प्रेमाला आसुसलेली आहेत, याचा विसर पडता कामा नये. आईचे प्रेम, वात्सल्यसिंधु, तिच्या चरणाखाली स्वर्ग आहे, पण मुले तिच्या प्रेमाला वंचित होत आहेत. पती-पत्नीच्या तणावात मुलांचा वनवास पहावयास मिळतो. जे घर व आई ही मुलांची पहिली शाळा असते, तेथेच जर ती मुले अस्वस्थ असतील तर ते कुटुंब, तो समाज कसा विकसीत होईल. मुलांच्या या तणावाचा वाईट परिणाम होतो व मुले बाहेरख्याली बनतात. खोटे बोलण्याचे धाडस करतात. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडच्या शोधात चूकीच्या मार्गाचा अवलंब करतात. पावले वाकडी पडतात. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचाराला ऊत येतो. श्रशर्रींश ळप ठशश्ररींळेपीहळि वासना तृप्ती एकमेव उद्देश बनतो आणि परिणाम वाईटच ! वेळ निघून गेलेली असते, दु:ख ऐकणारे कोणी शिल्लक राहात नाही आणि जीवनाचा अंत करण्याइतपत पावले उचलली जातात. आत्महत्येला मीठी मारली जाते.
मुलींना वडिलांच्या वारसा हक्कात तिचा वाटा दिला जात नाही. त्यामुळे तंटे-भांडणे न्यायासाठी कोर्ट, कचेरीमुळे मानसिक संतुलन संपत जाते. फेसबुकवर मैत्री करणे व जीवनाच्या अंताला तयार होणे, परिणाम अंध:कारमय पहावयास मिळतात. माणसाच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती संपली तर त्या व्यक्तीच्या शरीरात रोगांचे जंतू ठाण मांडून बसतात तसेच मानसिक, शारीरिक रोगाने शरीर ग्रासले जाते. मग कुटुंबं व त्यानंतर समाज कुचकामी होत जातात.
आज कुटुंबातील रक्ताच्या नात्यात जवळीक राहिलेली नाही. आपसातील संवाद होत नाही. त्यामुळे पण दूरावा वाढतो. घराच्या सभ्यतेची आधारशिला स्त्री विवाहाचे आवश्यक अंग, जीवनाच्या गाड्याचे एक चक्र, विवाह पवित्र बंधन, स्त्रीला मानाचे स्थान देणे आवश्यक. पण हुड्याची मागणी यामुळे समाजातील वातावरण दूषित झाले आहे.
प्रेमाने मुलांचे संगोपन करण्यासाठी माता-पित्यास वेळच नाही. आज जस जशा गाड्या किरायाने मिळतात तसे पालक पाल्याच्या संगोपनाला मिळतील का ? अशी जाहिरात आम्हा आदर्श सुसंस्कारीत भारतीयांना म्हणण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. पाश्चिमात्यांप्रमाणे एका रात्रीसाठी पती-पत्नीचे नाते ठेवायचे व सकाळी विभक्त व्हायचे, अशी रीत आहे. पशुपेक्षाही हीन वृत्ती कुटुंबाला पोखरून समाजातील नीतिमत्तेला धक्का देणारी आहे.
विवाह म्हणजे पुण्यकर्म, तो अतिशय सोप्या पध्दतीने व्हावा, विवाहाला मुलीची संमती असलीच पाहिजे. पती-पत्नीचे नाते इतके जवळचे की ईश ग्रंथ कुरआनात म्हटले आहे,’’ त्या तुमच्यासाठी पोशाख आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोशाख आहात.’’ (सुरह अलबकरा-02-187)
जसे पोशाख आणि शरीराच्या दरम्यान काही एक पडदा नसतो. किंबहुना दोघांचे परस्पर संबंध अभिन्न आहे. त्याचप्रमाणे तुमचा आणि तुमच्या पत्नीचा संबंध सुध्दा अभिन्न आहे.
विवाह पवित्र बंधन, सुनही घरची मालकीन म्हणून येते. मान-सन्मानासह वागणूक मिळविणारी ती घरची एक सदस्य आहे, याची आठवण ठेवणे गरजेचे असते.
पैगंबर मुहम्मद (सल्ल) म्हणतात, ’’पतीचे पत्नीवर हक्क आहेत. तसेच पत्न्नीचेही पतीवर हक्क आहेत. आपल्या पत्न्नीला प्रेमाने व सहानुभूतीने वागवा, कठोर होऊ नका, दयाळू राहा. तुम्ही ईश्वराच्या जामिनीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. ईश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर सहभागी झालेल्या असतात, हे विसरु नका.’’
स्त्रीशी चांगली वर्तणूक ठेवण्याची ताकीद दिली आहे. इमारत किती मोठी आहे त्यापेक्षा त्या घरातील वृध्दाच्या चेहऱ्यावरील हास्यावर सुखी कुटुंबाची ओळख होते. ज्येष्ठांना कुटुंबाचा भाग बनविण्याचे आदेश आहेत. आपुलकीच्या बळावर सशक्त कुटुंब बनविणे अत्यंत आवश्यक आहे.
घरातील व्यक्ती एकमेकांशी मिळून-मिसळून राहतील तर तोच समाज, तोच देश एकोप्याने राहणार. जग एक परीक्षा गृह आहे. सत्याच्या कसोटीवर मानवता टिकवता येते. आदर्श कुटुंब, समाज, देश बनवायचा असेल तर सहानुभूती, प्रेम, समता, बंधुता इत्यादी मुल्यांना जोपासावेच लागेल.
पवित्र ईश ग्रंथात म्हटले आहे, ’’लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. (पवित्र कुरआन सुरह अन्नीसा आयत नं.1)
जीवनातील प्रत्येक क्षणी आपण ईशभय मनात ठेवावे. इथपावेतो की त्याच परिस्थितीमध्ये त्याला पारलौकिक जीवन प्राप्त व्हावे.
- डॉ. आयेशा पठाण,
नांदेड
9665366489
Post a Comment