नुकतेच धुळे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाढदिवसाचे प्रक्षोभक, भीतीदायक, भडक बॅनर शहरभर लावण्याचा प्रकार डीएसपी चिन्मय पंडित यांनी स्वतः रस्त्यावर उतरून उधळून लावला आणि विविध पोस्टरवरील तथाकथित शुभेच्छूक कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले. सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे १४ फेब्रुवारी रोजी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या व रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी आर्म अॅक्ट ४/२५, महा.पो.का. कलम३७ (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व संबंधितांना अटक करण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्याच्या आतच पुणे पोलिसांनीही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जेलमधून बाहेर पडताच पाचशे गाड्यांची रॅली काढणाऱ्या गजानन मारणे या गुंडाच्या व त्याच्या साथीदारांच्या विरोधात पाऊल टाकत विविध मार्गांनी मुसक्या आवळणे सुरु केले आहे. त्याबाबतच्या वेगवेगळ्या बातम्या राज्यभरातील वृत्तपत्र व समाज माध्यमातून दररोज समोर येत आहेत.
धुळ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध शहरांत वाढदिवसाचे भयावह पोस्टर बॅनर लावणारे, चौकात डिजे लावून, धिंगाणा करीत तलवारीने केक कापणारे गुंड मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत. अशा वाढदिवसाच्या प्रकाराने मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करून राजकारणात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
धुळ्यानंतर नागपूर व अन्यत्र काही ठिकाणी या प्रकारे दहशतीच्या फुकट्या बॅनरबाजीवर कारवाई झाली. गुंडाच्या श्रद्धांजलीचेही बॅनर एका शहरात पोलिसांनी उतरविले. हा धुळे पॅटर्न आता राज्यातल्या प्रत्येक शहरात राबविला गेला पाहिजे, अशी सामान्य जनतेची मनापासून इच्छा आहे. कारण या सगळ्या भाई, दादा, तात्या, अण्णांचे, चेहरे त्यांच्या स्वतःच्या घरातल्या लोकांनाही पहावेसे वाटत नाहीत, मात्र चौकाचौकात लावलेल्या भल्या मोठ्या डिजिटल फलकावर झळकणारे यांचे चेहरे नाईलाजाने सर्व सामान्यांना पहावे लागत आहेत. यासारख्या डिजिटल फलकावर बंदी आणली पाहिजे आणि 'शेर की झलक सबसे अलग'वाल्यांचे, फायटरांचे, बुलेटवाल्यांचे, चौकात तलवारीने केक कापणाऱ्यांचे दहशतयुक्त वाढदिवस बंद झाले पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची सरकारकडे कळकळीची मागणी आहे.
अक्षरश:या भाई, दादा, तात्या, आण्णांनी समाजकारण आणि राजकारण नासवले आहे. समाजाच्या सर्व थरांतील लोक यांच्या या कारनाम्याने हैराण झालेली आहे, यासाठी केवळ धुळ्यात किंवा पुण्यात कारवाई होवून उपयोग नाही. संपूर्ण राज्यभरासाठी याबाबत गृह खात्याने एक धोरण ठरविणे आवश्यक आहे. संपूर्ण शहर दहशतीखाली ठेवणाऱ्या गुंडांना त्यांच्याच भाषेत ‘पुलिस से बडा कोई गुंडा नही होता है' हे गृहखात्यानेच दाखवून दिले तर खऱ्या अर्थाने ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्यास शोभेलसे होईल. ही वास्तविकता आहे, की पुरेसा पुरावा, साक्षीदारातली दहशत, कायद्यातील पळवाटा याचा लाभ असे गुंड घेतच राहतात. पूण्यात गुंड मारणेचे निर्दोष सुटणे, जामिनवर सुटणे हे प्रकार त्याचाच एक भाग आहेत. म्हणून पोलिस डिपार्टमेंट हातावर हात धरून बसू शकते काय? पुण्यात पोलिस अधिकारी अमिताभ गुप्ता व कृष्ण प्रकाश यांनी यावर जी भूमिका घेतली आहे, ती खरोखर स्वागतार्ह व अभिनंदनीय आहे. प्रत्येक जिल्ह्यात व शहरात याच भूमिकेची अंमलबजावणी पोलिस डिपार्टमेंटने केली पाहिजे. पुण्यात गुंड मारणे कोर्टातून सुटला, जामीनावर सुटला. हरकत नाही. पोलिसांनी विना टोल गाडी प्रकरणी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. मारणे सोबतच्या रॅलीतल्या बड्याबड्या गाड्या जप्त केल्या. उत्तर प्रदेशात गुंडगिरी निपटून काढण्यासाठी याच प्रकारे चौफेर कारवाईची छडी लावली जाते. सुदैवाने पुण्यात आता तेच सुरु आहे. गुंडांना मोकळे रान सोडले तर वैतागलेली जनताच त्यांचा भर चौकात खात्मा करते, याची लागोपाठची उदाहरणे राज्याची क्राईम सिटी नागपूरमध्ये मौजुद आहेत. जनतेने ही कारवाई करण्याआधी पोलिसांनीच या गुंडगिरीचा व दहशतीचा बंदोबस्त केला पाहिजे. पुण्यात पोलिसांनी गुंडाच्या मालमत्तेवर कारवाई केली. तलवारीने चौकात केक कापणाऱ्या त्याच्या माणसावर गुन्हा दाखल केला. अशी मोहीम राज्यभर झाली पाहिजे. एखादा गुंड, डॉन कारागृहातून बाहेर आला, की याच प्रकारे त्याचे शेकडो समर्थक कारागृहाबाहेर गर्दी करीत असतात. त्यानंतर एखाद्या विजयी वीराच्या आविर्भावात डिजेवर दहशतयुक्त गाण्यांच्या तालावर नाचत त्या गुंडाची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक फेसबुक वर लाईव्ह केली जाते. हे सामान्यांना मुकाट्याने सहन करावे लागते. अशा दहशतवादी मिरवणूकांवर बंदी आणली पाहिजे, एकदा दोनदा कारवाई ही होते. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे कारागृहातून गुंड बाहेर आला, की त्याची दहशतवाढीसाठी मोठी मिरवणूक काढण्याची पध्दतच या सुरू झाल्याचे चित्र दिसते. पुण्यातला गुंड कारागृहातून सुटल्यावर पाचशे गाड्यांची रॅली काढतो, हा प्रकार इथून पुढे सर्वत्र पहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण गुन्हेगार वृत्तीचे लोक त्याचेच अनुकरण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. पुणे पोलिसांनी जसे याप्रकरणी गुंडगिरीचे पुरेपूर पोस्टमार्टम सुरू केले आहे. तसे राज्यभरात सर्वत्र असे पोस्टमार्टम सुरू झाले पाहिजे. राज्यभरातील सर्व सामान्य माणसाला दहशतमुक्त वातावरण मिळवून देण्यासाठी राज्याचे गृहखात्याने याबाबत कंबर कसली पाहिजे आणि काही धोरणात्मक निर्णय घेऊन गुंडगिरीला मुळातून उखडून टाकली पाहिजे.
सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे ग्राहक संरक्षण विषयक राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)
Post a Comment