वचनपूर्ती : पूरग्रस्त कनवाड येथील 34 कुटुंबांना घरांचे व संसारोपयोगी साहित्यांचे वाटप
कोल्हापूर (अशफाक पठाण)
कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागात 2019 ला प्रलंयकारी महापुरात तालुक्यातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. कनवाड येथे इतर नुकसानीबरोबरच अनेकांची घरे उध्वस्त झाली. अशा गरीब घटकांना जमाअते इस्लामी हिंद या सेवाभावी संघटनेकडून जवळपास दीड कोटी रूपये खर्चून 34 पक्की घरे बांधून देण्यात आली. त्याचबरोबर दोन शाळांना कंपाऊंड बांधून दिले. हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले.
जमाअते इस्लामी हिंद व आयडिएल रिलीफ कमेटी महाराष्ट्र द्वारा आयोजित घरांचा हस्तांतरण सोहळा कनवाड येथे 14 मार्च रोजी श्रीमती ए.ए.पाटील हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्री पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअतचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान होते. मंचावर सरपंच डॉ. बाबासो बवनपाल अरसगोंडा, जि.प.चे सीईओ संजयसिंह चव्हाण, जयसिंगपूरचे एसडीपीओ रामेश्वर वेंजने, जमाअतचे महाराष्ट्र सचिव मो. जफर अन्सारी, ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन नवी दिल्लीचे सहायक जनरल सेक्रेट्री मोअज्जम नाईक, शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, बीडीओ शंकर कवितके, एसआयओ दक्षिण महाराष्ट्राचे अध्यक्ष सलमान खान, जनसेवा विभागाचे सचिव मो. मजहर फारूक, जमाअतचे जिल्हा संघटक नदीम सिद्दीकी, कोल्हापूरचे जेआयएच अध्यक्ष अन्वर पठाण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कनवाड गावात 2019 च्या प्रलयंकारी महापुरात उध्वस्त घरे पुन्हा उभारण्याचा निर्णय जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र आणि आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टने घेतला आणि ती घरे एका साध्या पण सन्माननीय सोहळ्यामध्ये रहिवाशांना देण्यात आलीे.
बांधलेल्या घरांचा दर्जा अतिशय उत्तम असल्याचे सांगत राज्यमंत्री पाटील म्हणाले, संस्थेच्या वतीने कनवाड हे गाव दत्तक घ्यावे, शासन आपल्यासोबत हातात हात घालून काम करेल. संस्थेकडून मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचेही यड्रावकर म्हणाले.मानवकल्याणासाठी सर्वांनीच पुढाकार घेवून काम केले पाहिजे. जमाअते इस्लामी हिंदने पुरग्रस्त कनवाड गावात 34 कुटुंबांना संसोरोपयोगी साहित्यासह घरे उभा करून दिली. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. जमाअतने हे कार्य पूरग्रस्तांना दाखविण्यासाठी नव्हे तर अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी केले आहे. धर्म विचारात न घेता त्यांनी पीडितांची सेवा केली असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजयसिंह चव्हाण यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक सलोख्याचे उदाहरणं देत, जमाते इस्लामी हिंद ने केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की हा उपक्रम म्हणजे एक सामाजिक सलोख्याचे प्रतीकच आहे. भविष्याचा विचार करून ही घरे बांधण्यात आली आहेत. ट्रस्टने केलेल्या कामाची किंमत कोणालाही पैशामध्ये मोजता येणार नाही. इतके हे काम मोठे असल्याचे चव्हाण म्हणाले.
जमातचे प्रदेशाध्यक्ष रिजवान-उर-रहमान खान म्हणाले, ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी लोकांच्या समस्या सर्वजन विसरले असतील पण जमाअतने त्या स्मरणात ठेवून आपली जबाबदारी ओळखत त्यांना उभे करण्याचे कार्य हाती घेतले आणि आज ते पूर्णत्वास नेले. सर्व माणसे एका पालकांची संतती आहेत. आपल्याला एकमेकांच्या सुख-दुःखाच्या वेळी कामी यावे लागेल. यामुळेच आपल्यात पसरलेला द्वेष दूर होईल. याच उद्देशाने आम्ही आपल्या बांधवांसाठी घरे बांधली आहेत. 34 कुटुंबांना मुलभूत आणि घरगुती साहित्यासहीत सोपविण्यात आली. त्यांमध्ये पलंग, कपाट, जेवणाचे टेबल व खुर्च्या, स्वयंपाकघरातील भांडी, मिक्सर ग्राइंडर इत्यादी मुलभूत व घरगुती वस्तू पुरविल्या गेल्या. तसेच सदर गावात उर्दु आणि मराठी शाळांची दुरुस्ती करून ती वापरण्यायोग्य बनविण्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदचा जनसेवा विभाग आणि आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट यांनी काम केले.
जमात-ए-इस्लामी हिंदने कनवाड या गावाला आदर्श गाव बनवण्याचा निश्चय केला. 26 जानेवारी 2020 रोजी या घरांची पायाभरणी करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 20 जानेवारी 2020 रोजी आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला होता. जमात-ए-इस्लामी हिंद च्या जनसेवा विभागाचे सचिव मो. मजहर फारूक म्हणाले, आम्हाला हे गाव एक आदर्श गाव बनवायचे आहे. आदर्श गावे केवळ स्वच्छता, चांगले रस्ते, प्रशस्त घरे आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्यावरच बनत नाहीत तर इथं राहणाऱ्या प्रत्येक वर्गातील आणि समाजातील लोकांनी आपले मने मोकळी व खुली ठेवावीत. प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे यावे, दुसऱ्याच्या दुःखाला स्वत:चे दु:ख समजावे. असे एकात्मतेचे उदाहरण उभे केल्यास आपल्याला या गावामध्ये एक समृद्ध भारत पाहायला मिळेल. यावेळी गावातील नागरिक, प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने जमाअतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मोहम्मद मजहर फारूख यांनी केले. आभार नदीम सिद्दीकी यांनी मानले. कार्यक्रम कोविड-19 चे नियम पाळून करण्यात आला.
Post a Comment