डॉ. सय्यद पारनेरकर यांचे प्रतिपादन
आकुर्डी (पुणे)
या जगातील मनुष्याचे जीवन क्षणभंगूर आहे. इथे मृत्यू अटळ आहे. काळ्या दगडावरची रेष आहे. मात्र मृत्यू आला अग्नी दिला, राख झाली किंवा दफन केले, माती झाली म्हणजे शेवट नव्हे. मृत्यू पश्चात जीवन आहे. ते शाश्वत जीवन आहे. निरंतर व अविलाशी जीवन असल्याचे प्रतिपादन डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी व्यक्त केले. ते नुराणी मस्जिद वाल्हेकरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मंचावर प्रमुख पाहूणे दिनेश तावरे होते. डॉ. पारनेरकर म्हणाले, आपला देश हा विविध आस्था व धारणांचा देश आहे. शांती, बंधुभाव, एकात्मता, तसेच ऐहिक व पारलौकिक साफल्यप्राप्तीसठी सर्वधर्मांची किमान माहिती असणे आवश्यक आहे. सामाजिक सौहार्दासाठी हे अनिवार्य असल्याचेही ते म्हणाले. पारलौकिक जीवनाच्या यशापयशाची धुरा आपल्या ऐहिक जीवनातील कर्मावर आहे. हे जीवन परीक्षास्थळ आहे. आज मनुष्याने भौतिकतेला अति महत्व दिले आहे. परिणाम स्वरूप माणसं भौतिकदृष्ट्या तर जवळ आली मात्र मनानं दुरावत गेली. माणूस माणूस राहिला नाही. तो पशुपेक्षा वाईट वागू लागला आहे. हे वृद्धाश्रमाचं कल्चर, हा बोकाळलेला भ्रष्टाचार, ही बेईमानी, कोरोना काळातही औषधांचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी रूग्णांची लूट, अश्लीलता, नग्नता हे सर्व कशाचे द्योतक आहेत? प्रगतीचे की विकासाचे की विनाशाचे? या दुर्दशेचे मूळ कारण मनुष्याचे स्वतःविषयीचे व निर्मात्याविषयीचे अज्ञान आहे. जीवन उद्देशाचे अज्ञान आहे. मृत्यू पश्चात जीवना विषयीचे अज्ञान आहे. आपल्याला वाटते ही दुनिया एक कुरण आहे, चरण्यासाठी ! मोकळं रान आहे, घ्या चरून, हवं तिथं, हवं तेवढं! कशाला न्याय नि कसला निवाडा! जे काही आहे ते फक्त याच जीवनात आहे. निर्मात्याने हे अज्ञान दूर करण्यासाठी या जगात वेळोवेळी अनेक पैगंबरांना ज्ञानासह पाठविले. पैगंबर आदम (अलै.) हे पहिले आणि पैगंबर मुहम्मद (सल्ल.) हे अंतिम पैगंबर आहेत. त्या सर्वांच्या संदेशाचा सारांश, या जगात प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा जबाबदार आहे. प्रत्येकाला एका ठराविक वेळी निर्मात्यासमोर जाब द्यावाच लागेल. हे जग अंधेर नगरी नाही, पाहणारा आहे. हे जीवन खरे पाहता प्रत्येकाची परीक्षा आहे. आज प्रत्येकाला आचार, विचारांचे स्वातंत्र्य आहे. परंतु, हे स्वातंत्र्य स्वैराचारासाठी नव्हे, भ्रष्टाचारासाठी नव्हे, विध्वंस करण्यासाठी नव्हे तर रचनात्मक विधायक, कार्य करण्यासाठी आहे. मस्जिद म्हणजे काय, अजान का दिली जाते, नमाज का व कशी पठण केली जाते, तसेच कुरआन व हदीसबद्दलची माहिती प्रमुख मार्गदर्शक डॉ. सय्यद रफिक पारनेकर यांनी आपल्या रसाळ मायमराठीत दिली.
यावेळी नगरसेवकांसह नागरिक, महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेख मसूद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष अझीमुद्दीन शेख, शहराध्यक्ष बासीत खान समवेत जमाअतचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment