आयेशाच्या आत्महत्येने इस्लामी नैतिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित केलेले आहे
या आठवड्यात 23 वर्षीय आयेशा मकरानी या गुजराती महिलेच्या आत्महत्येने भारतीय जनमानस ढवळून निघाले. विशेषतः मुस्लिम समाजामध्ये या आत्महत्येमुळे प्रचंड सामाजिक उलथापालथ झाली. समाजमाध्यमांवर उलट-सुलट प्रतिक्रियांचा महापूर आला. मौलाना सय्यद सलमान नदवी यांनी तर स्पष्ट शब्दात सांगितले की, ’’ही फक्त एक घटना उघडकीस आलेली आहे, अशा हजारो घटना होत आहेत ज्या उघडकीस आलेल्या नाहीत.आयेशाच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा भार समस्त भारतीय मुस्लिमांच्या शिरावर आहे.’’
या घटनेचा तपशील एव्हाना सर्वांनाच कळून चुकलेला आहे. त्यातून या घटनेसाठी कारणीभूत असलेली दोन कारणं ठळकपणे पुढे आलेली आहेत. एक - आयेशाचा पती आरीफ खान याचे दुसऱ्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध. दोन - सासरवाडीकडून सातत्याने होत असलेली पैशाची मागणी. मुस्लिम तरूण-तरूणींमध्ये लग्नापूर्वी प्रेमसंबंध प्रस्थापित करणे ही जरी सामान्य बाब नसली तरी अशा प्रकरणांची संख्या दुर्लक्ष करण्याएवढी नक्कीच नाही; याचाही स्वीकार करावा लागेल. या दोन्ही कारणासाठी जबाबदार एक कारण आहे, ते म्हणजे मुस्लिम समाजाची इस्लामच्या नैतिक शिक्षणापासून दूर राहण्याची प्रवृत्ती. कुरआनपासून संपर्क तुटल्यामुळे भारतीय मुस्लिमांतील मोठा घटक इस्लामी शिष्टाचारापासून लांब झालेला आहे. स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटने त्यांना दिवसेंदिवस कुरआनपासून दूर नेण्याचे काम केलेले आहे. जोपर्यंत मुस्लिम समाज या समस्येवर नियंत्रण मिळविणार नाही तोपर्यंत त्यांची तरूणाई अशीच भटकत राहील आणि त्याची किंमत समाजाला मोजावी लागेल. नवीन पिढिचे समुपदेशन त्यांना समजेल अशा भाषेतून आणि माध्यमातूनच करावे लागेल, असे माझे वैयक्तिक मत आहे. चांगले चारित्र्य हीच इस्लामची निर्णायक शक्ती राहिलेली आहे, याचा विसर अलिकडे बहुतेक मुस्लिमांना पडलेला आहे. पाश्चिमात्यांच्या चमकदार जीवन शैलीने बहुतेक मुस्लिमांचे डोळे दिपवून टाकलेले आहेत. त्यामुळे त्यांना पवित्र, सौम्य आणि सौहार्दपूर्ण इस्लामी जीवनशैलीचा विसर पडलेला आहे. दुसरे कारण सासरवाडीकडील मंडळीकडून वधूच्या मात्या-पित्याकडून लग्नात आणि लग्नानंतर सातत्याने पैशाची मागणी करणे ही सुद्धा इस्लामी नैतिक शिक्षणाच्या अभावामुळेच निर्माण झालेली समस्या आहे.
विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली आहे.
भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही.
निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे रूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ या नावाखाली अनेकजण हुंडा आणि ’दहेज-ए-फातमी’ या नावाखाली दहेजमध्ये उंची फर्निचर, फ्लॅट पासून ते कार वगैरे देण्या-घेण्याचे प्रकार वाढलेले आहेत. तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेले आहेत. आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे. हेच मूळ कारण आहे आयेशाच्या आत्महत्येचे. ज्या धाडशीपणे तिने खळखळून हसत मृत्यूला कवटाळले ते धाडस सर्वांनाच चकित करून गेले. आयशाने जरी हसत-हसत मृत्यूला कवटाळले असेल तरी तिच्या हास्यामागील वेदना सर्वांच्या मनाला हेलावून टाकणाऱ्या होत्या.
मुस्लिमांचे लग्नसोहळे
इस्लामी लग्न किती साधे असते याचे एक उदाहरण येथे नमूद करण्याचा मोह आवरत नाहीये. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! प्रेषित सल्ल. हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो.
लग्न संस्कार की सोहळा
इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा. ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. करार आहे म्हणून तो न पाळला गेल्यास, करार भंग करण्याचे अधिकार दोन्ही पक्षांना प्राप्त आहेत.
भारतीय मुस्लिमांमध्ये गरीबांंची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.
मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिक इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातूनही अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते.
मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे.
अल-मारूफ वल-मशरूत
एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीती मध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूत पद्धतीमध्ये झालेले आहे. महागडे लग्नसोहळे त्यापैकी एक आहे.
इस्लाममध्ये निकाह
लग्नास इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे ’कुबूल’, दोन साक्षीदार, एक वकील, काझी, महेर, छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होवून जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. .
इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्र-प्रवणे आणि दागदागिन्यांत खर्च केले जात आहेत.
काही ठिकाणी लोक-लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागितल्या जात नसल्या तरी मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशीच स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाह मध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की, एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारी मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकार या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे.
केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण पद्धत जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, मग तेच जेवण आपण कोणत्या तोंडाने देतो? हे एकच उदाहरण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे.
एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते.
असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील.
रस्मे तआम जबसे निकाह में आयी है
यकीन किजिए बडी तबाही मचाई है
ये जो बिरयाणी सबने दबाके खाई है
दुल्हन के बाप की उम्रभर की कमाई है
आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट, घरदार किंवा शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाखीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही. मी पुन्हा सांगतो हा माझा व्यक्तीगत विचार आहे.
1. - प्रत्येकाने स्वतः निश्चय करून टाकावा की, काही झाले तरी मी स्थानिक निकाह समारंभामध्ये जेवण करणार नाही.
2- आपल्या मुलाच्या निकाहच्या वेळी मुलीच्या वडिलांना स्थानिकांना जेवणाची व्यवस्था करू देणार नाही. आपुले पाहूणे मुलींच्या वडिलांच्या माथी मारणार नाही.
काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की, ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून हैद्राबादला जावून मजूरी करत आहे.
ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही.
मित्रांनों! एक खूनगाठ उराशी बांधून घ्या की, लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.
मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.
लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील.
एक - वर्गकलह वाढेल.
दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील).
1. हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह ला सोपे बनवावेच लागेल’.
2. लग्नापूर्वीच नियोजित वधू-वर तसेच दोन्हीकडील सासू-सासरे यांचे शरियतच्या प्रकाशमध्ये सुपदेशन करून दोंघाच्या जबाबदाऱ्या दोघानां स्पष्टपणे सांगाव्या लागतील.
3. एवढे करूनही काही कुरबूर सुरू झालीच असेल तर स्थानिक शरई पंचायतीकडे प्रकरण सामोपचाराने मिटविण्याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण नियमित कोर्टांकडे आधीच खटल्यांचा एवढा बोझा आहे की, ही घरेलू प्रकरणे ही तेथेच नेली तर न्याय मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागेल आणि तोपर्यंत दोन्ही पक्षाची प्रचंड मोठी हानी होईल, आर्थिक खर्च वेगळा.
4. महागड्या लग्न सोहळ्याचा पूर्णपणे बहिष्कार करावा लागेल.
5. निकाहमध्ये वधू पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या भोजनाची कुठलीच शरई हैसियत नसल्यामुळे त्याचाही पूर्ण बहिष्कार करावा लागेल.
6. घरामध्ये कुरआन आणि हदीसचे शिक्षण देणारे फॅमिली इज्तेमा नियमितपणे सुरू करावे लागतील.
7. आपल्या पाल्यांच्या भौतिक शिक्षणासोबतच नैतिक शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष द्यावे लागेल.
8. रोजगाराची चिंता न करता वयात येताच मुला-मुलींचे लग्न ईश्वरावर विश्वास ठेवून करावे लागतील.
9. घरातील टीव्हीला पॅरंटल लॉक लावावा लागेल.
10. मुलांच्या हातात स्मार्ट फोन देणे अलिकडे गरजेचे झालेले आहे. मात्र ते देतांना त्याचा वापर कसा करावा, याची आचार संहिता मुलांना समजावून सांगावी लागेल. तसेच ते मोबाईलचा पॅड लॉक करणार नाहीत, याच शर्थीवर त्यांना मोबाईल द्यावा. तसेच अधुन-मधून अचानक त्यांचा मोबाईल तपासावा लागेल.
11. स्वतः पालकांनीही आपल्या वर्तणुकीचे सातत्याने आत्मपरीक्षण करावे लागेल. तसेच ईश्वराकडे सद्वर्तनाची प्रार्थना करावी लागेल.
प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण वर नमूद सर्व उपाय केले तर आपण निश्चित एक चारित्र्यवान तरूणाई घडवू शकू जी फक्त मुस्लिम समाजासाठीच नाही तर देशासाठीही उपयोगी होउ शकेल.
शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करून शरई जीवन जगण्याची समज दे. (आमीन.)
- एम. आय.शेख
Post a Comment