उत्तर प्रदेशामध्ये पोलीस कधी काय करतील याचा नेम नाही. लव्ह जिहादच्या नावाखाली केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचा पोलिसांनी सर्रास दुरूपयोग सुरू केलेला आहे. मागच्या आठवड्यात मंगळवारी कुशीनगरमध्ये पोलिसांनी लग्नमंडपात घुसून नवरा-नवरीला लव्ह जिहादखाली उचलले आणि पूर्ण रात्र पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवले. रात्रभर चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री झाली की, नवरा-नवरी दोघेही मुस्लिम असून, अतिउत्साहात आपण दोघांनाही चुकीच्या पद्धतीने उचलून पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलेले आहे. यातील पुरूष 39 वर्षीय हैदरअली असून, त्याने प्रेस समोर पोलिसांवर आरोप लावला आहे की, पोलिसांनी रात्रभर त्या दोघांना डांबून ठेवले आणि त्याला चामडी बेल्टाने मारहाण केली. दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा आझमगड जिल्ह्यात राहणार्या त्या मुलीच्या भावाने कसया पोलीस ठाण्यामध्ये जावून पोलिसांना लेखी जबाब दिला की, त्याच्या बहिणीच्या हैदरअलीशी लग्न करण्याच्या निर्णयावर त्याचा किंवा त्याच्या कुटुंबाची कसलीच आपत्ती नाही. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की, दोन्ही व्यक्ती सज्ञान असून, एकाच धर्माचे आहेत. तेव्हा त्यांच्याकडून पोलिसांकडून तक्रार नाही, असे लिहून घेवून सोडून देण्यात आले.
कुशीनगरच्या पोलिसांनी सांगितले की, कोणीतरी त्यांना फोन करून सुचित केले होते की, एका हिंदू महिलेचे मुस्लिम पुरूषाबरोबर बळजबरीने लग्न लावून देण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला. कसया पोलीस स्टेशनचे सचिव संजयकुमार यांनी लव्ह जिहादची अफवा पसरविणार्या लोकांना यात दोषी ठरविले आहे. परंतु, पोलिसांना खोटी माहिती देणार्या व्यक्तीविरूद्ध कुठलीही कारवाई करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment