Halloween Costume ideas 2015

विक्रम आणि बेताल (भाग - 2)


विक्रमने नेहमीप्रमाणेच आपला हट्ट सोडला नाही. आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्याने बेतालला शोधून काढला आणि त्याला आपल्या गाडीत बसवून तो परत पक्ष कार्यालयाकडे निघाला.गाडीच्या मागच्या सीटवरून आपलं तोंड वेताळच्या कानाजवळ नेत बेताल बोलला, 'विक्रमा, कृषी कायदा काय आहे ते मला माहीत नाही. फक्त टाईमपास करण्यासाठी मी तिथे जाऊन बसलो होतो. मी तिथे जाऊन बसलो याचा अर्थ मी विरोधकांना सामील झालो असा होत नाही, तरी तुला माझा संशय आला आणि तू मला शोधत तिथे आलास. आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐक आणि मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं दे. तुझ्या उत्तरांनी माझं समाधान झालं नाही तर मी तुझ्या गाडीतून उतरून परत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसेन. समजलास?'

विक्रमने समोरच्या आरशातून बेतालकडे पाहत काही न बोलता फक्त संमतीदर्शक मान डोलावली.

'ऐक विक्रमा, आटपाट एक राज्य होतं. त्या राज्यात सर्वच 'महा' होत असे. जसे की सत्ता प्राप्तीसाठी महातडजोड आघाडी, राज्यकारभारात  महागोंधळ, एकमेकांचा महाअपमान, महाभ्रष्टाचार, महाप्रगती (रिक्षावाला ते थेट करोडपती!) महाउत्पादन (साडेतीन एकरांत चक्क ११० कोटी रुपयांची वांगी!) इत्यादी इत्यादी, त्यामुळे त्या राज्याचं नाव महाराज्य पडलं होतं. त्या महाराज्यात एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या तीन पक्षांनी सत्तेसाठी महातडजोड करीत तयार केलेली आघाडी सत्तेवर होती. त्या महातडजोड आघाडी सरकारमध्ये असलेले आणि सरकारमध्ये नसलेले, पण  बाहेर राहून सरकारच्या तंबूच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवणारेही, या तंबूच्या दोऱ्या आम्ही पुढची पंचवीस वर्षे ओढून धरू, हे सरकार पुढील पंचवीस वर्ष चालेल असे सांगत असतांना आणि सरकारला जेमतेम एकच वर्ष झालेलं असतांना, सरकारमध्ये मंत्री असलेल्या यशोमती मैय्यांंनी दुसऱ्या पक्षाच्या 'जाणत्या सरदारा'स, 'सरकार स्थिर ठेवायचे असेल तर आमच्या नेत्यावर टीका करू नका. आघाडी धर्म पाळा.' असा दम का दिला असावा? दुसऱ्या एका मंत्र्याने, ''जाणता सरदार'ची समज आमच्या सरदाराला समजून घेण्यासाठी कमी पडली.' असा टोला का लगावला असावा? त्या भडीमारातून 'जाणत्या सरदार'ला वाचविण्यासाठी वाचाळतेच्या एका स्पर्धेत 'सामना'वीर ठरलेल्या संपादकाने फुकटची वकिली का केली असावी? 'डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं.' असे अकलेचे तारे तोडणाऱ्या एका विद्वानाने आपली शस्त्रक्रिया कंपाऊंडरकडून न करवून घेता डॉक्टरांकडून का करवून घेतली असावी?  राज्यावर कितीही संकटे येवोत, कोव्हीडने हजारो माणसं पटापट मरोत की बळीराजा झाडाला लटको, पण आपल्या तब्बेतीचा बाऊ करून घरातच बसून राहणारे महातडजोड आघाडीचे महामुख्यमंत्री एका महामार्गाच्या पाहणीसाठी जीवावर उदार होऊन घरातून बाहेर का पडले असावेत? माझ्या या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दे विक्रमा.'

'बेताला, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे अनेकांच्या आधीच जीर्ण झालेल्या इज्जतीच्या अजूनही चिंध्या करण्यासारखं आहे, पण तू विचारतोस म्हणून मी सांगतो. ऐक. सत्ताप्राप्तीसाठी आपण ज्यांच्या मिनतवाऱ्या केल्या, ज्यांच्या पाठिंब्यावर आपले बुड सत्तेच्या गादीवर टेकलेले आहे; त्यांच्यावरच टीका करणाऱ्याच्या बुद्धीत आणि ज्या फांदीवर आपण बसलेले आहोत त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवणाऱ्या शेख चिल्लीच्या बुद्धीत काय फरक असावा? मग अशा तथाकथित 'जाणत्या सरदारा'ला यशोमती मैय्यांंनी दम दिला किंवा आपल्याच पंखांखाली राजकारणात वावरणाऱ्या आपल्याच पुतण्याला जे नीट समजू शकले नाही त्यांच्या 'समज'ची मापं  कोणा मंत्र्याने जाहीररीत्या काढली तर त्यात गैर ते काय? आता  'सामना'विराने फुकटची वकिली का केली, हे काय विचारणं झालं? 'ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.' ही म्हण तू ऐकली नाहीस का? दुसऱ्यांंच्या मुलाखती घेण्याची नोकरी करणाऱ्याची मुलाखत कोणी घेऊ लागला तर तो आपली नसलेली विद्वत्ता पाजळणार नाही का? मग त्यासाठी तो वाट्टेल ती पोरकट विधानं करणार नाही का? पण जेव्हा स्वतःच्या जीवाचा प्रश्न असतो तेव्हा माणसाची अक्कल बरोबर काम करते, मग शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरच आठवतो. भंगोडी, गंजडी नशेत वाट्टेल ते बडबडतात ,पण नशेत त्यांनी स्वतःच्याच मानेवर चाकू फिरविल्याचं तू कधी ऐकलं आहेस का? आता राहिला तुझा शेवटचा प्रश्न. महामुख्यमंत्री घराबाहेर का पडले? मला सांग, राज्यावर येणारी संकटं असोत, की कोव्हीडने मरणारी हजारो माणसं असोत,  की झाडाला लटकणारा बळीराजा असो ,यांच्याशी महामुख्यमंत्र्यांचा काय संबंध? यांनी बनवला का त्यांना महामुख्यमंत्री? महामुर्ख कुठला? अरे, बेताला, त्या महामार्गाला महामुख्यमंत्र्यांच्या पिताश्रींच नाव दिलं जाणार आहे! मग आपल्याला पिताश्रींच्या नावासाठी कोणी घरातून बाहेर पडत असेल तर काय बिघडलं?'

'विक्रमा, जसं बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या यादीने राज्यपालांचं समाधान झालेलं नाही ,तसंच तू दिलेल्या उत्तरांनी माझं समाधान झालेलं नाही.' असे बोलून बेताल गाडीतून उतरून परत आंदोलनाच्या जागेकडे चालू लागला.

आंदोलनाच्या जागी गर्दी वाढत असल्याची दृश्ये माध्यमांवर झळकू लागली होती.

- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक,  संपर्क-७८७५०७७७२८


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget