जैसे-जैसे जिंदगी पेचिदातर हो जाएगी
वैसे-वैसे आदमी की बेचारगी बढ जाएगी
जागतिक स्तरावर प्रगतीच्या नावाखाली माणसाने एवढी प्रगती केली की तिचे रूपांतर अधोगतीमध्ये झाले, जीवन जगणे कठीण झाले. तणावाचा अतिरेक झाला. नवनवीन आजार सुरू झाले. औषध कंपन्या आणि डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेचे व्यावसायात रूपांतर केले. माणुसकी संपली. भारतासारख्या मानवी मुल्यांना जगणार्या देशात लाखो शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या, तरी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची सरकार आणि समाजाला गरज वाटली नाही. प्रगतीने स्त्रीला उपभोग्य वस्तूचे स्थान देउन तिचे शोषण केले. अनैतिकतेचा कळस पहा पॉर्नसारख्या किळसवान्या व्यवसायात गुंतलेल्या महिलांना पॉर्नस्टार म्हणून गौरविण्यात आले, त्यांच्या हस्ते अनेक व्यावसायिक दालनांचे उद्घाटन झाले, शिक्षणाचे बाजारीकरण झाले. जे-जे मानवाच्या अस्तित्वास घातक आहे त्या-त्या वस्तूंचे भरपूर उत्पादन घेण्यात आले. प्रगतीच्या नावाखाली वनांचा नाश करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झाला.
कुठल्याही नात्याचा पाया विश्वास असतो. आधुनिक जीवनात त्याच्याशीच तडजोड करण्यात आली. परिणामी, कुटुंब व्यवस्था धोक्यात आली. मुल्यहीन पिढी निर्माण झाली. त्यांचे वेगाने गुन्हेगारीकरण झाले. थोडक्यात जागतिक स्तरावर माणसाची चारही बाजूने कोंडी झाली व ती त्याने स्वतः निर्माण केली. प्रगतीच्या नावाखाली अधोगतीने माणसाला अशा खिंडीत गाठले आहे की, माणसाला पुन्हा माणूस बनविण्याची चळवळ निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोविड-19 नंतर तर ही गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे. माणसाची वैद्यकीय आणि औषध शास्त्रातील प्रगती सुद्धा किती कुचकामी आहे हे ही स्पष्ट झाले.
अशा परिस्थितीत माझा दावा आहे की, जागतिक मानव समूहाला पुन्हा त्याच नैसर्गिक जीवन व्यवस्थेकडे परतावे लागेल, ज्याकडे सातव्या शतकामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगाला येण्याचे आव्हान केले होते. याखेरीज माणसाकडे दुसरा मार्गच उपलब्ध नाही. कुरआनने दिलेला मार्ग नाकारून माणसाने अगोदरच स्वतःचे भरपूर नुकसान करून घेतलेले आहे.
ज्यांच्या डोळ्यावर चंगळवादाची पट्टी बांधलेली आहे, ज्यांच्या बुद्धीचा ताबा वाममार्गाने येणार्या प्रचंड संपत्तीने घेतलेला आहे, ज्यांच्यावर कुसंस्कार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, त्यांना माझा हा दावा पटणार नाही, जसा सातव्या शतकात राहणार्या लोकांनाही प्रेषित सल्ल. यांचा हा दावा पटलेला नव्हता. त्या दाव्याची तेव्हा खिल्ली उडविली गेली होती. पण कालांतराने जगाला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा दावा मान्य करावा लागला. मानवी इतिहासात त्या दाव्यावर आधारित अनेक समाज निर्माण झाले आणि यशस्वीसुद्धा झाले. उलट आज तथाकथित प्रगतीशील समाजाचा जो दावा पेश केला गेला आहे तो सर्वार्थाने सर्व ठिकाणी पोकळ ठरला आहे. फरक एवढाच आहे की, काही लोकांना ह्या दाव्यातील फोलपणा समजला आहे तर काहींना अजूनही समजलेला नाही.
स्पष्ट आहे प्रगतीच्या नावाखाली माणसाने स्वतःच्या इच्छांची गुलामगिरी पत्करलेली आहे. त्यामुळे दुसर्याचे नुकसान करून स्वतःचा स्वार्थ साधण्याची गळेकापू स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेचा कोणताच अंत नाही. म्हणून जोपर्यंत अनैतिक वर्तनातून मिळणारे लाभ सोडण्याची व नैतिक वर्तनातून येणार्या समस्या सहन करण्याची शक्ती लोकांमध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत समाजाचे भले होणार नाही. माणसाने आपल्या हाताने स्वतःचा एवढा र्हास करून घेतलेला आहे की, एका उडीत कुरआन सूचवत असलेल्या नैसर्गिक जीवन व्यवस्थेकडे आपण जावू शकणार नाही. त्यासाठी अगोदर निरपेक्ष भावनेने कुरआनचा अभ्यास करावा लागेल, पूर्वग्रह बाजूला ठेवून ते सिद्धांत समजून घ्यावे लागतील. ज्यांची गरज एक आरोग्यदायी मानवी समुहाच्या निर्मितीसाठी कुरआनने सांगितलेले आहेत.
व्याज का हराम ठरविले गेले? परद्याची व्यवस्था का सूचविली गेली? दारू, ड्रग्जच नव्हे तर प्रत्येक नशा आणणारी वस्तू निषिद्ध का केली गेली? पती-पत्नीच्या नात्याला कमकुवत करणारी कारणं का प्रतिबंधीत केली गेली? अश्लिलतेच्या जवळसुद्धा फटकू नका असे का म्हटले गेले? आई-वडिलांचा विरोध तर सोडा त्यांच्या समोर उंच स्वरात बोलण्याची का मनाई करण्यात आली? ह्या सार्या प्रश्नाची उत्तरं थंड डोक्याने कुरआनचा अभ्यास करून त्यातून मिळवावी लागतील. तेव्हा कुठे प्रगतीच्या नावाखाली आपण किती घोडचुका केल्या हे आपल्या लक्षात येईल. मानवाने केलेली प्रगती निसर्गविरोधी सिद्धांतांवर आधारित आहे. त्याला निसर्गाच्या अनुकूल सिद्धांतांवर खेचून आणावे लागेल. त्यासाठी कुरआनचे सिद्धांत समजून घ्यावे लागतील. मानवी अस्तित्वाबाबतीत आपले ज्ञान अतिशय अल्प आहे, हे पहिल्यांदा स्विकारावे लागले व कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे हे प्रथम स्विकार करून तो अचूक आहे हे अगोदर मान्य करावे लागेल.
मानवाला स्वतःच्या बुद्धीवर नको तेवढा विश्वास बसलेला आहे. त्याला वाटते की, त्याने आपल्या बुद्धीने विमाने बनविली, मिजाईल बनविले, अॅटम आणि हायड्रोजन बॉम्ब बनविले, मोठमोठे पूल, रेल्वे ट्रॅक बनविले, तर प्रकृतीचे नियम समजायला त्याला कसे काय कठीण जाणार? पण हे सत्य आहे की, ज्या बुद्धीचा वापर करून माणसाने भौतिक प्रगती केली त्याच बुद्धीचा वापर करून माणसाला नैतिक जीवन प्रणाली, एकमेकांविषयीच्या धारणा, आचार-विचार, व्यवहार, एकमेकांविषयीची कणव या संबंधीचे सिद्धांत समजता आले नाहीत. ते आले असते तर आज जगामध्ये एवढे दारिद्रय राहिले नसते. लोक असहाय्य झाले नसते. महिला व मुलांवर अत्याचार झाले नसते. गरीबांचे शोषण झाले नसते. आपल्या बुद्धीच्या शक्तीविषयी माणूस किती भ्रमात आहे हे माणसाच्या वरील स्थितीवरून दिसून येते. दुर्दैव म्हणजे या विचारधारेची पाळेमुळे पाश्चात्य सभ्यतेच्या दीर्घ इतिहासामध्ये खोलपर्यंत रूजलेली आहेत. परंतु, पाश्चात्य सभ्यतेला दोष देवून भागणार नाही, कारण या सभ्यतेने भारतीय मनाचा पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. म्हणूनच मुस्लिमेत्तर तर सोडा मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकांना कुरआन समजून घेण्याची गरज वाटत नाही. विज्ञान आणि संस्कृती दोघांना एकाच प्रकारे हाकण्याचा मानवी प्रयत्न निंदनीय आहे. माणूस यंत्र नाही की विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे त्याला चालविता येईल. तो एक भावना प्रदान जीव आहे. भावना या सातत्याने बदलत असतात. उदात्त भावनांचे संस्कार त्याच्यावर केले गेले तर तो चांगला वागतो आणि स्वार्थी संस्कार त्याच्यावर केले गेले तर तो हैवानासारखा वागू लागतो.
कुरआन मानव प्रवृत्ती आणि त्याची भौतिक प्रगती यामध्ये द्वंद्व उत्पन्न होवू देत नाही. दोघांचाही विकास नियंत्रित पद्धतीने होवून एक आरोग्यदायी समाज निर्माण होईल, याचे सिद्धांत मांडतो. केवळ भौतिक प्रगती ही एकांगी प्रगती असते. जोपर्यंत त्याला आत्मीक उन्नतीची साथ लाभत नाही तोपर्यंत समतोल विकास शक्य होत नाही. कुरआनने भौतिक प्रगती आणि आत्मीक प्रगती या दोघांमध्ये आश्चर्यकारक पद्धतीने संतुलन निर्माण करण्याची व्यवस्था दिलेली आहे, जी की त्रुटी आणि वासनेपासून मुक्त आहे. या व्यवस्थेचा आधार एकमेकांवर प्रेम, परोपकार, दया आणि करूनेवर आधारित आहे. बौद्धिक शक्ती हे एक महान उपकरण आहे, परंतु या उपकरणाचा एकांगी वापर आता थांबवावा लागेल. कोविड-19 मुळे जगामध्ये हाहाकार माजलेला आहे. कोविड नंतर या बुद्धीरूपी उपकरणाचा उपयोग समाजातील रंजल्या गांजल्या लोकांना आधार देण्यासाठी करावा लागेल. तुच्छ इच्छा आणि वासनांच्या आहारी न जाता उच्च आणि नैतिक विचारांना जोपासावे लागेल. तेव्हाच प्रगतीच्या नावाखाली झालेल्या अधोगतीतून मानवी समूह वर येईल, अशी आशा करता येईल. म्हणून शेवटी विनंती करतो की, बुद्धिवादी बना आणि कुरआनचा अभ्यास करा. तो आपल्या सर्वांना नक्कीच वाचवून घेईल. आवश्यकता फक्त पूर्वग्रह नाकारून खुल्या मनाने कुरआनचा अभ्यास करण्याची आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की,”हे अल्लाह ! सर्वांना कुरआन समजून त्याच्या शिकवणी मानवकल्याणासाठी उपयोगात आणण्याची समज दे. आमीन.
- एम.आय. शेख
Post a Comment