Halloween Costume ideas 2015

हैद्राबाद निवडणुकीचा अन्वयार्थ

hyderabad Election

1983 साली विश्व हिंदू परिषदेने जुन्या अस्मितेचा पुनरूद्धार करण्यासाठी राष्ट्रव्यापी एकात्मता यात्रेचे आयोजन केले होते. यासाठी 1925 च्या सुमारास याच अस्मितांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. नुकत्याच संपन्न झालेल्या हैद्राबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत परत त्याच अस्मितेचा मुद्याचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न  गृहमंत्री अमित शहा यांनी केला. एका शहराच्या महापालिकेच्या निवडणुकांत त्या शहराचे मुलभूत प्रश्न, स्थानिक सोयीसुविधा अशा कोणत्याही बाबीचा उल्लेख न करता शहा म्हणाले की, ’’जर आम्ही ही निवडणूक जिंकलो तर हैद्राबाद शहरातून नवाब निजाम कल्चर हद्दपार करून हैद्राबादला आधुनिक शहर बनवू’’. त्यांनी हैद्राबादच्या नागरिकांना स्पष्ट संदेश दिला की, यापुढे हैद्राबादची ओळख असलेल्या अस्मितेच्या प्रतिकांना नष्ट करून तिथे एक दूसरी संस्कृती रूजवायची आहे. खरे पाहता हैद्राबादला या योजनेचा प्रारंभ करून भारतात सर्वत्र त्यांना जुन्या अस्मितांची संस्कृती रूजवायची आहे. या संस्कृतीला त्यांनी जरी आधुनिक म्हटले असले तरी ती अस्मिता भारतात हजारो वर्षांपासून एका विशिष्ट वर्गाने लादलेली आहे. आधुनिकतेच्या नादात प्राचीन संस्कृतीची स्थापना करण्याचा हा केवळ शहा यांचा मानस नसून संबंध संघ आपल्या या उद्देशासाठी गेली जवळ-जवळ शंभर वर्षे झटत आहे. केंद्रात सत्ता काबीज केल्यावर पहिल्यांदाच भाजपने किंवा संघाने अमित शहा यांच्या तोंडातून त्यांना यापुढे काय करायचे आहे? याची प्रखरपणे घोषणा केली आहे आणि म्हणूनच हैद्राबादच्या निवडणुकीच्या निकालांची कारणमिमांसा निवडणुकींच्या चौकटीत न करता येत्या काळात देशात प्राचीन संस्कृतीला रूजविण्याचे हे पहिले पाऊल आहे असे समजून करावी लागेल. 

गेल्या महापालिकेत भाजप सदस्यांची संख्या फक्त 4 होती, आता ही 48 वर पोहोचली आहे. भाजपने ही निवडणूक स्थानिक मुद्यावर लढली असती तर पक्षाला इतक्या जागा सोडाच मागील चारची संख्या देखील गाठता आली नसती. म्हणूनच त्यांना ह्या निवडणुकींना अमित शहाच्या म्हणण्याप्रमाणे नवाब निजाम कल्चर संपुष्टात आणून आधुनिक शहर (व्हाया प्राचीन संस्कृती रूजविणे) बनवायचे आहे. संघ आणि भाजपच्या प्रभावाखाली मोठ्या संख्येने असणाऱ्या मतदारांनी याचा अर्थ अचूकपणे लावला आणि म्हणूनच भरघोस यश भाजपला प्राप्त झाले. हैद्राबादचे नागरिक शहांच्या वक्तव्याने जणू इतके प्रभावीत झाले असावेत की त्यांनी तेलंगणा राज्याची निर्मिती, काँग्रेस पक्षाने केली होती या वास्तवाकडे देखील दुर्लक्ष केले. काँग्रेसच्या पदरात तेलंगणा राज्य निर्मितीचे श्रेय पडण्याऐवजी अभूतपूर्व अशी राजकीय नामुष्की पदरात पडली. टीआरएसच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला देखील बहुमत गाठता आले नाही. तो सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरीही भाजपा हे अंतर कोणत्याही पद्धतीने, केव्हाही कापू शकते. पैसा, यु्नत्या आणि दडपशाही यांची त्यांच्याकडे कसलीच कमतरता नाही. सुदैवाने असदोद्दीन ओवेसी वाचले पण त्याचे कारण काय आहे? ते पुढे पाहू या. 

भाजपने आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात जनसंघापासून केली. जनसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभारलेला पक्ष होता. 1977 साली आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत त्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती केली होती. नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करीत अखेर भाजपला स्वबळावर केंद्रात सत्ता काबिज करण्यात यश मिळाले. प्रादेशिक पक्षांशी आघाडी करत असतांनाच त्या पक्षांना नामोहरम करत, काँग्रेस पक्षाची स्थिती देशाच्या राजकारणात इतक्या खालच्या स्तरावर आणून सोडली आहे की, तो पक्ष वर्तमान राजकीय विचारधारेद्वारे कधी भाजपला आव्हान देऊ शकेल की नाही, हे आजतरी सांगता येत नाही.

काँग्रेसचा पराभव केल्यावर भाजपाने हिंदुत्वाच्या विचारसरणीचा अवलंब करीत देशातील सर्वात बलशाली आणि श्रीमंत पक्ष म्हणून जम बसविला आहे.

अशात जर भाजपला आव्हान देऊन सत्तेतून बाहेर करायचे असेल तर काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना हिंदुत्वाचे राजकारण केल्याशिवाय, आजतरी अन्य पर्याय नाही. राजकारण आणि धर्मकारण एकत्र आल्यास अशा शक्तीला आव्हान देणे कोणत्याही विचारसरणीला शक्य होणार नाही.

एमआयएमला जे यश हैद्राबाद निवडणुकीत मिळाले आहे त्याचे कारण भाजपच्या विचारसरणीत दडलेले आहे. जसा भाजपा हिंदु संस्कृतीवादी पक्ष आहे तसेच ओवेसींचा पक्ष देखील मुस्लिम संस्कृतीचा पुरस्कर्ता पक्ष आहे. म्हणून या पक्षाला भाजपासारखे यश मिळाले आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की यापुढे इतर पक्षांना स्वतःच्या आजवरच्या राजकीय विचारसरणीला तिलांजली देऊन भाजपासारखी हिंदू संस्कृतीवादी विचारसरणीचा स्विकार करावा लागेल. 

याचा अर्थ भारताला आधुनिक लोकशाही, समता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या मुद्यांचा त्याग करावा लागणार आहे आणि अमित शहा यांना हैद्राबादला ज्या धर्तीवर आधुनिक शहर बनवायचे आहे ती कोणत्या अर्थाने आधुनिक आहे की प्राचीन काळातील संस्कृतीतील आहे जिला ते आधुनिक म्हणत आहेत, हा प्रश्न समोर येतो. 

भाजपाला फक्त राजकारणात हिंदू संस्कृतीच्या मुल्यांची पुर्नउभारणी करावयाची नाही तर अर्थव्यवस्थेत, न्यायव्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत सुद्धा ही संस्कृत रूजवायची आहे. 

भाजपाला शेती असो का इतर उद्योगधंदे आज ज्या परिस्थितीशी तोंड देत आहेत त्याचे नेमके कारण त्यांना उत्पन्नाची सर्व साधने कार्पोरेट उद्योगपतींच्या हवाली करावयाची आहेत. भाजप आपल्या ध्येयधोरणापासून मागे हटणार नाही. भाजपाला आपल्या अजेंड्यावर कार्यरत ठेवण्यासाठी देशातील सर्व शक्ती त्याची साथ देत आहेत. मग ते उद्योगपती असोत, भांडवलपती असोत, विद्यापती असोत, बुद्धीपती असोत की आणखीन कोणते पती असोत. महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की, कोणते पक्ष भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा जास्त जहाल हिंदुत्वाचा स्विकार करतील, यातच त्यांचे राजकीय भवितव्य दडलेले आहे.

नवाब निजाम कल्चर

हैद्राबादला ज्या नवाब निजाम कल्चरपासून मुक्ती देण्याचे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्या निजामांनी केेलेल्या दानधर्माची यादी भली मोठी आहे. त्यातील काही निवडक आकडे खालीलप्रमाणे आहेत. 

हैद्राबादच्या निजामशाहीबद्दल एका लेखात ’द हिंदू’ या वर्तमानपत्राने लिहिले आहे की, निजामची राजवट पुरोगामी आणि प्रगत होती. शिक्षणाच्या क्षेत्रात निजामांची कारकिर्द उल्लेखनिय आहे. त्यांनी आपल्या राज्यात अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. त्यांना उदार हस्ते आर्थिक मदत पुरविली. जाती-धर्माचा विचार न करता त्यांनी केवळ आपल्या राज्याचाच नव्हे तर भारताच्या इतर ठिकाणीही मस्जिदी, मंदिरे, चर्च आणि गुरूद्वारासाठी उदार हस्ते मदत केली होती. हिंदू मंदिरांची दुरूस्ती व रखरखावासाठी आर्थिक सहाय्यता केली होती. 

द हिंदू वर्तमानपत्रानुसार मीर उस्मानअलीखान यांनी भोनगीर येथील यादगारपल्ली मंदिराला 82 हजार 825 रूपये, सिताराम मंदिराला 50 हजार रूपये, भद्राचलम मंदिराला 29 हजार 999 रूपये आणि बालाजी मंदिराला 8 हजार रूपयांची आर्थिक सहाय्यता दिली होती. त्यांनी 1918 साली उस्मानिया विद्यापीठाची स्थापना केली.  मंदिराखेरीज शांतीनिकेतन, शिवाजी विद्यापीठ, लेडी हार्डिंग स्कूल इत्यादींना भरघोस आर्थिक मदत दिली होती. 1932 साली पुणे येथील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला दरवर्षी 1 हजार रूपयांची आर्थिक सहाय्यता देण्यास आपल्या प्रशासनाला फरमाविले होते. 11 वर्षे ही मदत त्यांना दिली गेली. त्याच बरोबर अमृतसर येथील गोल्डन टेंपललाही निजामांनी मदत केली होती. 

ऑ्नटोबर 1965 सालाच्या युद्धात देशाच्या अर्थव्यवस्था बिघडली असता तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ’राष्ट्रीय सुरक्षा निधी’ची स्थापना केली होती. या निधीसाठी मीर उस्मानअलीखान यांची हैद्राबादला जावून शास्त्रीजींनी भेट घेतली होती. तेव्हा निजामांनी 5000 किलो सोने या फंडामध्ये उपलब्ध करून दिले होते.

टाईम मॅगझीनच्या एका लेखात असे म्हटलेले आहे की, त्या काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हैद्राबादचे शेवटचे निजाम मीर उस्मानअली खान हे होते. त्यांची त्यावेळची मालमत्ता 200 कोटी अमेरिकन डॉलर होती, जी अमेरिकेच्या आयातीच्या 2 टक्के इतकी होती. त्यांच्या निधनानंतर त्यांनी मागे सोडलेल्या संपत्तीची मोजदात करण्यासाठी त्यांचे सुपूत्र मुकर्रमजाह यांना एक महिन्याचा कालावधी लागला होता. (संदर्भ : द लल्लनटॉप) 

तर हाच तो नवाब निजाम कल्चर आहे ज्यापासून अमित शहा हैद्राबादला मुक्ती देण्याचे आश्वासन देत आहेत.

हिंदू एकात्मता यात्रा

16 नोव्हेंबर 1983 साली विश्व हिंदू परिषदेद्वारे एकात्मता यज्ञाचे आयोजन केले गेले होते. आठव्या शतकामध्ये शंकराचार्याद्वारे हिंदूंना संघटीत करण्याच्या प्रयत्नानंतरचे हे सर्वात मोठे यज्ञ होते. या यात्रा आणि यज्ञामध्ये जवळपास 100 दशलक्ष हिंदूंनी भाग घेतल्याचा अंदाज आहे. यामध्ये सुरूवातीला व्हीएचपीचे महासचिव हरमोहनलाल यांनी हे स्पष्ट केले होते की, ’’मला स्पष्टपणे सांगावयाचे आहे की, हे यश त्या लोकांसाठी आहे जे या भूमीला आपली मातृभूमी मानतात आणि फक्त हिंदूच या भूमीला भारतमाता असे संबोधतात. इतर लोक या भूमीला आपली मातृभूमी म्हणून स्विकारत नाहीत म्हणूनच व्हीएचपीसाठी राष्ट्रीय एकात्मता म्हणजे हिंदूंचे संघटन होय’’ या यात्रेसाठी चार मार्ग ठरविण्यात आले होते. पहिला मार्ग नेपाळमधून, दूसरा उत्तर प्रदेशातील हरिद्वारमधून, तिसरा मार्ग पश्चिम बंगालमधील गंगासार आणि चौथा मार्ग दक्षिण भारतातील रामेश्वर मंदिरापासून ह्या यात्रा निघाल्या. या यज्ञासाठी त्या काळात 53 लाख रूपये बजट ठरविले गेले होते. यात वाढ होवून 1 कोटी 53 लाखापर्यंत खर्च येण्याचा अंदाज लावला गेला होता. यात्रेदरम्यान, गंगाजलाच्या बादल्यांचे वितरण केले गेले होते. हिंदू समाज विभिन्न जाती, पंचायतीमध्ये विभागलेला आहे, हे मान्य करून गंगाजल आणि भारतमातेद्वारे सर्वांना एकत्र करता येईल म्हणून ही योजना आखली गेली होती. सर्व हिंदूंसाठी गंगाजल आणि भारतमातेबद्दल आदर आहे. तसेच ’भारतमाता की जय’ हे घोषवाक्यदेखील या यात्रेदरम्यान उपयोगात आणले जावे असे सर्वांना कळविण्यात आले होते. राजकीय नेते, पक्षाचे कार्यकर्ते यांना या यात्रेपासून दूर ठेवले गेले होते. तत्कालीन भारताच्या गृहमंत्र्यांनी अल्पसंख्यांकांना या यात्रे आणि यज्ञाकडे शांततेने पहावे (म्हणजे याचा काही उलट अर्थ काढू नये) असे म्हटले होते. (संदर्भ : टाईम्स ऑफ इंडिया 10 नोव्हेंबर 1983).

-इफ्तेखार अहेमद

मो.: 9820121207


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget