Halloween Costume ideas 2015

कोरोनाचा कहर

जगभर कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. लाखो लोकांचे प्राण या आचाराने घेतले आहेत आणि सहा कोटींच्या वर लोक या आजाराला बळी पडलेले आहेत. या आजाराने माणसावर इतका प्रभाव टाकला आहे की आजवर जगाच्या इतिहासात मानवता कधी इतकी भयभीत झालेली नसावी. मानवी जीवनाचे कोणते अंग या रोगामुळे प्रभावित झाले नसेल असे नाही. मग ते सामाजिक सहजीवन असो की आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक कुठलेही प्रमुख समाजजीवनाचे क्षेत्र कोरोनापासून बचावलेले नाही.

मानवजातीच्या जीवनासहितच तिला जगण्याचा आधार म्हणजेच आर्थिक जीवन पणाला लागले असून माणसासमोर जगण्यासाठीची साधनं आणि त्याचबरोबर रोगापासून बचावाची साधनं कशी मिळवायची या दोन्ही समस्या उभ्या ठाकल्या आहेत. माणसाला जगण्यासाठी सर्वांत मोठी गरज कोणती असेल तर ती त्याच्या आर्थिक गरजांची पूर्तता सतत होत राहणे याची असते. यासाठी सामाजिक सहजीवनाला दुसरा कोणताच पर्याय नाही आणि या रोगाला आळा घालायचा असेल, त्याचा फैलाव रोखायचा असेल तर सर्वांत अगोदर सामाजिक सहजीवन सोडून सामाजिक अंतर ठेवावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. माणसांनी आपलं माणुसकीचं नातं इतर माणसांशी तोडून टाकणं म्हणजे स्वतःचं जगणं धोक्यात आणणं होय. आणि म्हणूनच लोक या रोगाच्या प्रभावापेक्षा याच्या परिणामांना अधिक घाबरत आहेत. कुणी आजारी पडला की ही व्यक्ती मरेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे कोणी आप्तस्वकीय फिरकत नाही. यामुळे लोकांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण पसरते. प्रत्यक्ष आणि भीतीचं वातावरण याचा परिणाम माणसाच्या मानसिकतेवर पडतो. लोकांच्या मनात मग प्रश्न उपस्थित होतात की आजवर पाहिला नाही असा हा आजार कसा असेल आणि कशामुळे हा आजार जगभर पसरला असेल?

कोरोनाला आळा घालण्यासाठी म्हणजे त्याचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील राष्ट्रांनी जो सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे ‘लॉकडाऊन!’ हा लॉकडाऊन केवळ व्यापार-उद्योग, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दळणवळण यापुरताच मर्यादित राहिला नाही. त्यामुळे सामान्यांचे रोजगार गेले. मोठमोठ्या उद्योगधंद्यांची नासधूस झाली. मजुरांचा आधारच जणू कुणी हिरावून घेतला. कालपरवापर्यंत जे लोक बऱ्यापैकी समाधानाचं जीवन जगत होते ते समाधानच नष्ट झालं. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था कमी-अधिक नष्ट झाली. साहजिकच याचा परिणाम जगातल्या प्रत्येक व्यक्ती, समूह आणि राष्ट्रावर झाला. एकंदरीत माणसाच्या जगण्यावरच ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला की काय असा प्रश्न लोक स्वतःला, एकमेकांना विचारू लागले. त्यांच्या या संशयाला दुजोरा मिळाला तो यामुळे की एकीकडे लाखोंच्या संख्येने रोजगाराच्या सोयी संपत आहेत, हजारो कारखाने बंद पडले आहेत, लाखो लोकांचे लहानसहान धंदे संपुष्टात आले. परिणामी कोट्यवधी लोक गरीबीशी झुंज देत आहेत. त्याच वेळी मोठमोठ्या उद्योगांच्या उद्योगपतींच्या उत्पन्नात लाखो रुपयांची भर कशी पडते? श्रीमंत लोक याच काळात अधिक श्रीमंत कसे होत आहेत? या प्रशांचं उत्तर सामान्य माणसाला कळेनासं झालं आहे. त्याचा एकच प्रश्न असतो की जर अर्थव्यवस्थाच लॉकडाऊन स्थितीशी झुंज देत होती, बाजार बंद होते, व्यापार ठप्प होते, त्याच काळात या मोठ्या उद्योगपतींच्या श्रीमंतीत वाढ कशी शक्य आहे? एका आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार २०२० साली मोठ्या कंपन्यांना १.३३ लाख कोटींचा फायदा झाला, एवढेच नव्हे तर याच काळात या कंपन्यांच्या उत्पादनात २७ टक्क्यांची घसरण झाली होती. उत्पादन २७ टक्के आणि नंतरच्या काळात ६ टक्क्यांनी खालावला तरी त्याच कंपन्यांच्या मालकांच्या श्रीमंतीत वाढ होते, म्हणजे काय? या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर आर्थिक-तांत्रिक भाषेत देणारी तज्ज्ञ मंडळी नेहमी तत्पर असते. त्यांच्याकडे याची अनेक उत्तरे असतील. पण सामान्य माणसाचा एकच प्रश्न उद्योगधंदे बंद पडलेले असताना तुमची श्रीमंती कशी चालू होती, याचं उत्तर कुणी देत नाही.

ही महामारी म्हणूनच नैसर्गिक की मानवनिर्मित असा संशय लोकांच्या मनात येणं शक्य आहे. यामागे कोणते षड्यंत्र असेल का, असा प्रश्न जगभरातल्या सामान्य माणूस, विद्वान, वैद्यकीय मंडळी आणि इतर तज्ज्ञांना भेडसावत आहे. कोणत्याही गोष्टीवर सर्वांत आधी संशय व्यक्त करणे ही माणसाची नैसर्गिक वृत्ती आहे. आपल्या दैनंदिन जीवनात याचा प्रत्यय येत असतो. कधी कधी तर माणसाला स्वतःवरदेखील विश्वास नसतो. स्वतःबाबतदेखील तो संशय व्यक्त करत असतो. आणि यात त्याची चूक नाही. हाच त्याचा मूळ स्वभाव आहे. माणसाची हीच मानसिकता असल्याने कुरआनात पहिल्याच अध्यायात स्पष्टपणे सांगितले गेले आहे की हा ग्रंथ, यातील मजकूर कोणाच्याही संशयाला थारा देत नाही. असा दावा जगातल्या इतर कोणत्याही धर्मसंस्कृतीनं धर्मग्रंथांमध्ये किंवा इतर साहित्य-संपदांच्या बाबतीत कुणी केलेला नाही. फक्त कुरआन सुरुवातीलाच हे सांगतो की हा दैवी ग्रंथ आहे, यात कोणी शंका घेता कामा नये. आणि या आजाराविषयी शंकाकुशंका, षड्यंत्र या प्रश्नात न पडता आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की हा रोग गंभीर आहे. माणसाच्या डोळ्यांत त्याचा मृत्यू डोकावत आहे आणि म्हणून यापासून वाचण्यासाठी जे काही शासकाकडून, तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे त्याचे पालन केले पाहिजे. महामारी आलेली असो की आणलेली असो, हे भयंकर धोक्याचे आहे. ही गोष्ट नक्कीच आपण सर्व लक्षात ठेवू या.

-  सय्यद इफ्तिखार अहमद, 

संपादक, 

९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget