मा. प्रातःस्मरणीय (आपले नाव घेतले की 'ती पहाट' आठवते आणि दरदरून घाम फुटतो, या अर्थाने. सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही 'साहेबांना' सांगून 'दादांच्या' मोबाईलमध्ये पहाटेचा गजर वाजणार नाही अशी सेटिंग करून घेतली आहे! असो.) देवानाना नागपूरकर यांसी साष्टांग दंडवत. पत्रास कारण की, बऱ्याच दिवसांपासून आपली भेट नाही. (आपली भेट बरीच महागडी ठरते म्हणून मीच मुद्दाम टाळतो. असो.) आपली मागची भेट आठवते ना? एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटलो होतो आपण! (बिल मीच भरलं होतं. स्मरण असू द्यावे.) ते असू देत. आता मुद्द्याचं सांगतो. ते काय आहे ना आमच्या 'दै. विटी- दांडू'च्या 'ठोकाठोक' सदरात मला मुद्दे सोडून भरकटायची सवय आहे, त्यामुळे लिहितांना असं होतं. जाऊ द्या. तर मुद्द्याचं काय सांगत होतो की, कधीकाळी आपण भाऊ-भाऊ होतो. मोठ्या भावाने छोट्या भावाला असा त्रास देणं चांगलं आहे का? आम्ही तुम्हाला 'सख्खे' मानतो. 'चुलत' असले आणि त्रास दिलात तर एकवेळ समजू शकते, (आणि आम्हाला त्याची सवयही झाली आहे.) पण सख्खांनी त्रास द्यावा? आमचे 'प्रताप' उघडे पाडून जनतेसमोर मांडावेत, याला काय म्हणावे? जुन्या संबंधांची, जुन्या भेटीची (बिल मीच भरलं होतं! स्मरण असू द्यावे.) थोडीफार जाणीव ठेवावी. वास्तविक शिवरायांच्या 'गनिमी काव्या'वर वारसाहक्काने आमचाच हक्क आहे, (जरी त्यांचे वारस तुम्हाला फितूर झाले असले तरी!) पण तुम्ही त्याचा गैरवापर केलात आणि डाव साधून आमच्या गोटात हलकल्लोळ माजविलात. त्यात ते तुमचे कोकणातले शिलेदार भुयार आमच्या राजेंच्या महालापर्यंत पोहचेल अशी जाहीर वाच्यता करतात, हे बरं नाही. आज महालात आम्ही आहोत. उद्या कदाचित तुम्ही असाल, (आमचा तसा विचार चालला आहे.) मग भुयारं तुमच्या महालापर्यंत पोहचतील त्याचं काय? आवरा त्यांना. ( वागळेंचा सल्ला ऐकून आम्ही त्यांच्या फार नादी लागत नाही. असो.) खरं म्हणजे ही ओसाड गावची पाटीलकी. त्यात तीन भागीदार. एक कायम कुरकुर करणार. दुसरा सर्व सूत्र हातात ठेवणार आणि आम्ही मात्र दिल्लीश्वरांच्या दारात हातात कटोरा घेऊन उभं राहायचं! त्यांनी कटोऱ्यात भीक तर घालायची नाही पण कुत्रं मात्र अंगावर घालायचं! नुसतं 'भीक नको पण कुत्रं आवर असं झालंय.' मला वाटतं तुम्ही समजदार आहात, ( म्हणून तर तुम्ही इतक्या सहजासहजी ओसाड गावची पाटीलकी आमच्या राजेंना मिळू दिली. यात तुमचा नक्कीच काहीतरी डाव असणार, हे मी आमच्या राजेंना आधीच सांगितलं होतं, पण ते हट्टालाच पेटले होते.) मला काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आपले भूतकाळातले (आणि भविष्यकाळातलेसुद्धा!) संबंध लक्षात घेऊन दिल्लीश्वरांकडेस आमची रदबदली करावी. बोलतांना ते दांडकेवाले समोर असले म्हणजे माझं माझ्या जिभेवर नियंत्रणच राहत नाही. ती जरा जास्तच सैल सुटते. काही कमी जास्त (कमीची शक्यता कमीच, जास्तीची शक्यताच जास्त!) बोलले गेले असल्यास माफ करावे. (बिल मीच भरलं होतं. स्मरण असू द्यावे.)
आपला नम्र
संपादक दै. विटी दांडू
ता.क. :- आमचे राजे 'हात धुवून मागे लागेन' असं जे बोलले ते जास्त मनावर घेऊ नका. ते फक्त वारंवार हातच धुवू शकतात. (आठवा खिशातले राजीनामे!)
*******
संपादक, दै.विटी दांडू,
वास्तविक या नावाचा एखादा पेपर कुठूनतरी निघतो हेही मला माहित नाही. तो मी कधी पहिला नाही. कधी पाहिलाच नसल्यामुळे कधी वाचलाच नाही, पण तुम्ही पत्राखाली स्वतःचा तसा उल्लेख केल्यामुळे मी तसा उल्लेख केला.
आधी माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा घेतो. हे नेहमी नेहमी 'बिल मीच भरलं होतं. स्मरण असू द्यावे.' असं लिहिण्याची काही गरज आहे का? आणि वेटर टीप मागायला आला तेव्हा (वेटर समोर असतांना सुद्धा) तुम्ही उठून माझ्या कानात, 'मालक जेवणाचं बिल मंजूर करतील, पण 'टीप'चे पैसे देणार नाहीत. टीप तुम्ही देता का?' असं बोलून मला टीप देणं भाग पाडलंत, ते विसरलात का? (स्मरण असू द्यावे.) तुम्ही तुमच्या कार्यालयाबाहेरच्या टपरीवर चहा घेतला तरी तुमचा हात खिशात जात नाही, बिल सोबतच्यालाच द्यावे लागते असे तुमच्याच कार्यालयातला उपसंपादक कम कारकून कम शिपाई कम सफाई कामगार सांगत होता. बोलताना लिहिताना तुम्ही मर्यादा पाळत नाही हे तर जगजाहीर आहे, पण निदान खासगी पत्र लिहिताना तरी काही मर्यादा पाळत चला. असो.
राहिला प्रश्न तुमचे 'प्रताप' चव्हाट्यावर आणण्याचा, तर तुम्ही तर तुमच्या कार्यकर्त्यांना 'वडा पाव', 'झुणका भाकर', ' ५ रुपयांत थाळी' असले शानदार धंदे करायला सांगता, मग तुमचे शिलेदार 'पंचतारांकित हॉटेल', 'रियल इस्टेट' असले भिकार धंदे करून स्वतःला आणि तुम्हालाही का अडचणीत आणतात? आणि तुमची भेट किंवा तुमचं पत्र नेहमी 'याला वाचवा, याला आवरा.' असं सांगायलाच असते का? राहिला प्रश्न ओसाड गावच्या पाटीलकीचा तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्ही लहान असताना (म्हणजे आमच्या लहानपणी. आम्ही लहान भाऊ कधीच नसतो, सांगून ठेवतो.) एक दिवटा त्याच्या मोठ्या भावाच्या घरात राहून आयतं गिळायचा. मोठ्या भावाकडे आयतं गिळायला मिळतंय याचं त्याला कधीच कौतुक वाटलं नाही. सारखी 'माझ्या नावावर काही नाही. माझ्या नावावर काही नाही.' अशी कुरकुर करायचा. वेगळं निघायची स्वप्नं बघायचा. एके दिवशी एका भानामतीकर काकांनी त्याला, 'तुला माझ्या दुकानाचा मालक करून टाकतो. भावाच्या घरातून बाहेर पड.' असं गाजर दाखवलं. दिवटा हुरळला. भावाचं घर सोडून भानामतीकर काकाच्या दुकानाचा मालक बनला. नंतर लक्षात आलं की, दुकान दिवाळखोरीत आहे. दुकानावर करोडो रुपयांचं कर्ज आहे. असो. राहिला प्रश्न तुमच्या आणि तुमच्या राजेंच्या वाट्टेल ते बरळण्याचा तर मला सांगा, ' ये चाबी अपनी जेब में रख ले पीटर. अब ये ताला मैं तेरी जेब से चाबी निकाल कर ही खोलूंगा.' हा अभिताभचा डॉयलॉग मुक्रीने किंवा 'पेट सफा'वाल्या राजू श्रीवास्तवने म्हटला तर कसा वाटेल? पुन्हा असो.
परावलंबी नसलेला
देवानाना नागपूरकर.
ता.क.:- तुमचे राजे घरातच असतात. त्यांना म्हणावं ईसापनीती आणि जातक कथा वाचत चला. माणसात थोडीफार हुशारी येते.
-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
संपर्क-७८७५०७७७२८
Post a Comment