मागच्या आठवड्यात माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्या एका वक्तव्याने समाजमाध्यमांमध्ये खळबळ उडाली व त्यांचा अतिशय खालच्या शब्दात पानउतारा करण्यात आला. काँग्रेसचे खा. शशि थरूर यांचे नवे पुस्तक ’द बॅटल ऑफ बिलाँगिंग’च्या डिजिटल विमोचनाच्या समारंभामध्ये बोलतांना हामीद अन्सारी म्हणाले की, ”जरी आता कोरोना महामारी आली असली तरीही धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन अन्य महामारींच्या जोखडात भारतीय समाज जखडला गेलेला आहे.” ते पुढे म्हणाले की, ”धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवादाच्या तुलनेत देशप्रेमाची भावना जास्त सकारात्मक आहे. ’आपण’ आणि ’ते’ या काल्पनिक श्रेणीमध्ये लोकांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” हामीद अन्सारी यांच्या अनुसार गेल्या चार वर्षाच्या अवधीमध्ये एका उदारवादी राष्ट्रवादाच्या पायाभूत विचारापासून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या उग्र विचारापर्यंत समाजाने प्रवास केलेला आहे.
उपराष्ट्रपती पदावर राहिलेल्या हामीद अन्सारी यांनी एवढ्या कडक शब्दांचा उपयोग करावा लागला यावरून ही समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल. आक्रमक दक्षीणपंथी राष्ट्रवादाचा परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकावर झालेला आहे. विशेषकरून याचा परिणाम कोर्टाच्या निर्णयावरसुद्धा झालेला आहे. कप्पनच नव्हे तर हाफिज सुलतान नावाचे जम्मू कश्मीरमधील एक पत्रकार यांना गेल्या 800 दिवसांपासून जामीन मिळालेला नाही. मात्र अर्णब गोस्वामीला तात्काळ जामीन मिळालेला आहे. विशेष म्हणजे अर्णबच्या प्रकरणात न्या. चंद्रचूड यांनी अर्णबच्या याचीकेमध्ये व्यक्तीस्वातंत्र्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो इतर तुरूंगात बंद असलेल्या लोकांच्या याचिकांची दखल न घेतली गेल्यामुळे एकांगी असल्याचे प्रकर्षाने जानवते. अर्णब हा काही पत्रकारीतेतील चुकीमुळे नव्हे तर दोन लोकांच्या आत्महत्येच्या फौजदारी गुन्ह्यामध्ये अटक झालेला होता. त्याच्या नावाची चिठ्ठी लिहून अन्वय नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली होती.
अर्णब यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करतांना कोर्टाने आत्महत्या केेलेल्या दोन लोकांच्या जगण्याच्या अधिकाराचा विचार केल्याचा दिसून येत नाही. अर्णबवर मेहेरबानी करण्याचे कारण त्याची पत्रकारिता असून, ती कशी आहे आणि कोणत्या प्रकाराची आहे, हे सगळे जाणून आहेत. अर्णबने समाज नासविण्याचे हरसंभव प्रयत्न केलेले आहेत.
एकंदरित आक्रमक राष्ट्रवाद आणि कट्टर धार्मिकता या दोन्ही गोष्टींनी मागच्या काही वर्षांपासून समाजाच्या मानसिकतेचा ताबा घेतलेला आहे व यातून मानसिक विभाजन होत आहे आणि हे कधीच राष्ट्रहितामध्ये नाही. त्यामुळे हामीद अन्सारी यांच्या वक्तव्याचे नाईलाजाने समर्थन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे
Post a Comment