Halloween Costume ideas 2015

अदखलपात्र पत्र


प्रिय मित्र उधोजीराजे यांसी सप्रेम नमस्कार. दोन दिवसांपासून तुम्हाला सारखा फोन करतोय, पण तुम्ही काही माझा फोन ( नेहमीप्रमाणे) उचलत नाही. (नोटापेक्षा कमी मतांच्या धक्क्यातून तुम्ही अजूनही सावरले नसाल असं तुमच्या अमृता वहिनी सांगत होत्या.) माझा फोन न उचलण्याची तुमची जुनी सवय अजून गेलेली दिसत नाही. तुम्ही चुकून 'वर्षा'वर गेला असाल म्हणून तिथेही फोन लावून पहिला, पण तोही कोणी उचलला नाही. अगदी परवा परवापर्यंत आपलाच असलेला आणि परत लवकरच आपलाच होणार असलेला फोनही कोणी उचलू नये याच्यासारखं दुःख दुसरं नाही. असो.

खरं म्हणजे बिहारचं सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्हांला जंगी पार्टी द्यावी असा विचार करत होतो, पण तुम्ही घरातून बाहेरच पडत नाही म्हटल्यावर पार्टी कशी देणार? तशी तुमच्या बाळराजेंना पार्ट्यांची चांगलीच सवय आहे असे ऐकून आहे. खरं आहे का? खरं असलं तरी 'अभी बच्चा है वो.'. त्यांना पार्टी कशी देणार? म्हणून मग पार्टीचा बेतच रद्द करून टाकला. वास्तविक तुम्हीच माझं अभिनंदन करून मला पार्टी दयायला हवी होती. आपलंच दुःख उगाळत बसण्यापेक्षा माणसाने दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हावं, म्हणजे तेवढंच आपलं दुःख हलकं होतं. ( हवं तर नितीसबाबूंना विचारा.) तशा माझ्याशी वागतांना तुमच्या बऱ्याच गोष्टी चुकत असतात, पण तुम्हाला लहान भाऊ समजून मी त्या सर्व पोटात घालत आलो आहे. परिणामी माझ्या पोटाचा आकार बिघडला आणि वर तुमचेच 'ट्रोल भैरव' माझ्या पोटावर वाट्टेल त्या कॉमेंट्स करतात! आवरा त्यांना अर्णवला आवरला तसं. (की बारामतीकरांना सांगायला लावू?)

आता बिहारमधून मोकळा होतो न होतो तोच पक्षश्रेष्ठींनी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी अंगावर टाकली. वास्तविक मुंबई महानगरपालिका तुमच्या हातातून हिसकावून घेणं म्हणजे तुमच्या तोंडातला घास काढून घेण्यासारखं आहे. भविष्यात घडणाऱ्या उपवासाच्या भीतीने तुमच्या संपादकांच्या पोटात आतापासूनच चांगलाच गोळा उठलेला दिसतो! कोणाच्या तोंडातला घास हिरावून घेणं ही काही आम्हां नागपूरकरांची संस्कृती नाही. आम्ही तर दुसऱ्यांना खिलवून खिलवून तृप्त करणारी माणसं आहोत. (काही लोकांना 25 - 25 वर्ष खिलवूनही ती बेईमानी करतात तो वेगळा भाग झाला.) हवं तर गडकरी साहेबांना विचारा. मी मुंबई महानगरपालिकेत तुमच्या मार्गात आलोही नसतो, पण पक्षशिस्त पाळावीच लागते ना? आपली इच्छा असो की नसो, पण पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश मानावच लागतो. (नाहीतर मागच्या वेळेस तुम्हाला मुख्यमंत्री बनवून तुमच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती. (आमच्या शुद्ध भगव्या झेंड्याची शप्पथ! ) एकदा का माणूस पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरला की त्याचा 'नाथाभाऊ' व्हायला वेळ लागत नाही. कशाला उगाच आपल्याच हाताने आपल्याच पायावर दगड पाडून घ्या? आपण काय नाथाभाऊ आहोत? तुम्ही अजिबात काळजी करू नका. चुकून माझ्या हातून तुमचं काही नुकसान झालंच तर पुढच्या विधानसभेत भरपाई करून देईन. आम्ही दिल्या शब्दाला जागणारी माणसं आहोत. हवं तर नितीसबाबूंना विचारा.

ते जाऊ द्या. ते आपलं रोजचंच आहे. वाहिनींचा रिअल इस्टेटचा व्यवसाय काय म्हणतो? आमचा राग आहे बरं तुमच्यावर. इतकी वर्ष आपण सोबत राहिलो, पण तुम्ही काही आम्हांला वहिनींच्या व्यवसायाची खबर लागू दिली नाही. आम्हांलाही सांगितले असतं तर हिने कशाला बँकेत नोकरी केली असती? दोघींची पार्टनरशिप छान झाली असती. किरकीऱ्यांना मी सांभाळून घेतलं असतं. बाकी वहिनींच्या दूरदृष्टीला दाद द्यायलाच हवी हं. उद्या जर राजकारण सोडावं लागलं तर दुसरं उत्पन्नाचं साधन आधीच तयार ठेवायलाच हवं. असो.

आपला मित्र आणि शुभचिंतक

देवानाना नागपूरकर

ता. क. - पुढच्या वेळी तुम्हाला 'महाराष्ट्राचा नितीसबाबू' बनविण्याचा विचार आहे. विचार करून कळवावे.


********** 

देवा नाना,

मुद्दामच प्रिय मित्र वगैरे काही लिहिलं नाही. बाहेर काही वेगळं आणि आत काही वेगळं असलं काही मला जमत नाही. माझं जे काही असतं ते उघड उघड असतं. तुमचा बिहारचा विजय तुम्हालाच लखलाभ होवो. कोणाला तरी 'वोट कटवा' बनवून तुम्ही नितीसबाबूंना फसवलं. अशा विजयाची पार्टी मला अजिबात नको. तुमच्या पत्रातला इतर मजकूर अदखलपात्र आहे त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही. मी सद्या जबाबदारीच्या पदावर काम करीत असल्यामुळे फालतू गोष्टींवर बोलण्यास मला वेळ नसतो. तुमची गोष्ट वेगळी आहे.

उधोजीराजे बांद्रेकर (सरकारप्रमुख) 


-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक,

संपर्क -७८७५०७७७२८


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget