Halloween Costume ideas 2015

भारतीय संविधान : परिवर्तनाच्या लढाईतील दुधारी तलवार


भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची सुरवातच " आम्ही भारतीय लोक...We the people of India...,"अशी करण्यात आली आहे.अनेक जाती, धर्म, प्रदेश, वंश आदी विविध घटकांना समाविष्ट करून घेणा-या या भारत नावाच्या महाकाय देशाची ही राज्यघटना २६ जानेवारी रोजी ७० वर्षांची वाटचाल करून ७१ व्या वर्षात पदार्पण करीत अमृतमहोत्सवी वर्षाकडे झेप घेत आहे. भारतीय संविधान जगातील एक सर्वश्रेष्ठ संविधान आहे,असा उचीत गौरव अनेक राजकीय विश्लेषक तसेच समाजशास्त्रज्ञ यांनी केला आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.अनेक स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून व बलिदानातून भारत देश  स्वतंत्र झाला.तत्पूर्वी दीर्घकाळ हा देश परकियांच्या गुलामगिरीत आला दिवस ढकलत होता. बहूसंख्य जनता अशिक्षित व अडाणी होती.अंधश्रध्देचा पगडा तर खूप मोठ्या प्रमाणात होता.त्यामुळे हा देश आपलं स्वातंत्र्य कसं टिकवून ठेवेल,असा प्रश्न अनेकांना पडला होता. विविधतेने नटलेल्या या देशातील विविध भावना, विविध संस्कृती आणि विविध विचार यांचा एकत्रित मेळ घालून हा महाकाय देश चालवायचा सोपी गोष्ट नव्हती. या सर्वांना समान न्याय देणारी राज्य घटना कशी तयार करायची हा ही एक मोठा प्रश्न होता.याशिवाय कित्येक भौगोलिक व राजकीय प्रश्न आ वासून उभे राहिले होते.पण भारताने या सर्व प्रश्नांना आपल्या कृतीतून उत्तर दिले.आपले स्वातंत्र्य, आपले सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आपले प्राण पणाला लावले.आपल्या राज्य घटनेच्या हातात हात घालून हे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व गेलीं ७०वर्षे टिकवून ठेवले.आपल्या देशाच्या शेजारी आसपास स्वतंत्र झालेले अनेक देश कोलमडून पडत होते, त्यांच्या राज्यघटना गोठवल्या जात होत्या, लोकशाहीचा मुडदा पाडून तेथे अधूनमधून हुकुमशाहीचा नंगानाच घातला जात होत्या.अराजक निर्माण केले जात होते,धर्मवाद यशस्वी होत होता, लोकशाहीचा मुडदा पाडला जात होता,त्याच वेळी आपली राज्यघटना सुखनैव विहार करत होती. संपूर्ण जगात ही गोष्ट नावाजली जात होती.गुलामांचा देश म्हणून जे कोणी आपल्या देशाची निर्भर्त्सना करीत होते,त्यांची तोंडे बंद झाली होती.

आज आपल्या देशाची राज्यघटना वयाची ७० वर्षं पूर्ण करून अमृतमहोत्सवी वाढदिवसाकडे यशस्वी वाटचाल करीत आहे,या लांब पल्ल्याच्या वाटचालीचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. जगातल्या अनेक राज्यघटना प्रेषितांना,स्वर्गातल्या शक्तींना, राजेरजवाडे यांना अर्पण केल्या गेल्या आहेत. मात्र कालपर्यंत गुलामगिरीत असलेल्या लोकांनी जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं, आत: स्वत:साठी स्वत:च्या देशासाठी राज्यघटना लिहायला बसले, तेव्हा त्यांनी सर्व प्रथम मानसिक, अध्यात्मिक, अनामिक अशी सर्व प्रकारची गुलामगिरी फेकून दिली.आपली राज्य घटना आपल्या स्वत:प्रती अर्पण केली.आता हा आपला देश गुलामगिरीत राहिला नाही.या देशातील नागरिक केवळ स्वतंत्र झालेला नाही तर त्यांनी स्वतंत्र देश जन्माला घातला आहे.सर्व प्रकारच्या बेड्या फेकून दिल्या आहेत.बेड्यांचे वळ तिरंग्याच्या डौलदार फडकण्याच्या वा-याने कधीच सुकून गेल्या आहेत.या देशातील प्रत्येक नागरिकाला आपण सामर्थ्यवान झालो आहोत असा विश्र्वास वाटतो आहे. देशाभिमान, राष्ट्रप्रेम व देशभक्ती यांमुळे प्रत्येकाची छाती आणि मान ताठ झाली आहे.

देश सार्वभौम झाला आहे,याचा अर्थ लोक सार्वभौम झाले आहेत.या सार्वभौम लोकशाहीतील  लोकांचं उज्वल आणि आशादायी स्वप्न म्हणजेच त्या देशातील राज्यघटना असते.हा सर्व विचार या देशाच्या घटनाकारांनी केला असल्याचे प्रत्कर्षाने दिसून येते आहे. अर्थात म्हणूनच आपली राज्यघटना कोणा बाहेरच्या लोकांना किंवा स्वातंत्र्यबाह्य हातात न देता ती आपल्या देशातील लोकांच्या हाती देण्यात आली आहे.या लोकांना ती अर्पण करण्यात आली आहे.या लोकांनीच स्वत:प्रती अर्पण करताना शपथ घेतली आहे की,"आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी निर्धार करित आहोत......"अशी ती जणू भीष्मप्रतिज्ञा आहे.लोकांनी लोकांसाठी केलेली ती भीष्मप्रतिज्ञा आहे.ती गेली ७० वर्षें लोकांनी टिकवून ठेवली आहे.न्याय आणि स्वातंत्र्य या मुल्यांचा नितांत आदर करणारी आपली ही राज्यघटना घटनाकारांनी तयार केली आहे.माणसाला माणूस म्हणून जगण्याचा ती अधिकार बहाल करते.या देशातील एक जबाबदार नागरिक म्हणून समर्थपणे मान्यता देते.त्यासाठीचे सारे हक्क स्वाधीन करण्यात आले आहेत. राष्ट्रपती आणि हमाल यांच्या मताचे मूल्य सारखेच असते.कोण कुठं व कसा रहातो यावर त्याचे मुल्य ठरत नाही,तर ते राज्यघटनेच्या दिलेल्या अधिकारावरून ठरत असते.अशी ही विलक्षण, सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क व अधिकार देणारी महाशक्तीमान आणि परिवर्तनाची लढाई करणा-यांसाठी दुधारी तलवार असणारी ही आपली राज्यघटना आहे.

- सुनीलकुमार सरनाईक, 

कोल्हापूर, 

भ्रमणध्वनी:९४२०३५१३५२


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget