पाश्चात्य राष्ट्रांना आपण मानवाधिकार त्याचबरोबर पशुप्रेमीही असल्याचा मोठा अभिमान आहे. जगभर इतर राष्ट्रांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाले तर त्याची दखल घेणं स्वतःवर अनिवार्य समजतात. यात वाईटदेखील काही नाही. त्यांचे कौतुक करणे उचितच ठरेल. पण त्यांनी स्वतःवर ओढावून घेतलेल्या जबाबदारीमागे खरेच मानवजातीचे प्रेम आहे. जगातील तमाम मानवजातीचे की त्यांचे हे प्रेम विशिष्ट मानवजाती प्रती आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतेच बेल्जियमने एक कायदा पारित केला. हा कायदा त्याच्यातल्या पशुप्रेमाच्या भावनांशी ओतप्रोत असल्याचे ते सांगत आहेत. या कायद्याद्वारे त्यांनी जगातील दोन धर्मसमुदायांना जे बेल्जियममधील रहिवाशी आणि नागरिक आहेत त्यांना लक्ष्य केले आहे. धार्मिक कारणांनी बळी-पशुबळी देताना त्या पशुंना आधी स्तब्ध (Stunn) करावे आणि नंतरच त्यांना कापले जावे. अशा या कायद्याच्या तरतुदी आहेत. ज्यू आणि मुस्लिम धर्मानुयायांना हा कायदा मान्य नाही. कारण पशुबळी देत असतानाच्या वेळी तो पशू निरोगी असून त्याच्यात कोणताही दोष नासावा, अशी या धर्मियांची धार्मिक शिकवण आहे. म्हणून ते नाराज आहेत. या कायद्याचे उद्दिष्ट विषद करताना तिथल्या पशुपालन मंत्र्यानी म्हटले आहे की पशुकल्याण आणि धार्मिक स्वातंत्र्यात संतुलन निर्माण करण्याचा हा सरकारचा हेतू आहे. जवळजवळ सर्वच पाश्चात्य देशांमध्ये पशु कापण्यापूर्वी एका लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर जोरदार आघात केला जातो. त्या पशूचा मेंदू बेशुद्ध झाल्यावरच पुन्हा त्याला कापले जाते. पण या पद्धतीपासून ज्यू आणि मुस्लिमांना धार्मिक कारणाने पशुबळी देण्यासाठी वगळण्यात आले होते. आता ही सवलत संपुष्टात आणली गेली असून सर्वांनीच आता या नवीन पद्धतीनुसारच पशूंना कापले पाहिजे. याचा अर्थ ज्यू लोकांनी कोश्र आणि मुस्लिम लोकांना हलाल पद्धती सोडून द्याव्या लागतील. ज्यू आणि मुस्लिम हलाल मांसाचाच भोजनात उपयोग करतात. या दोन्ही समुदायांतील लोक एकमेकांच्या धार्मिक पद्धतीनुसार कापलेल्याच जनावराचे मांस सेवन करू शकतात. त्यांच्यासमोर आता हलाल मांस उपलब्ध होण्याची समस्या उद्भवणार आहे. युरोपियन देशांमध्ये स्वीडन, नॉर्वे, आइसलँड, डेन्मार्क आणि स्लोवेनियामध्ये आधीपासूनच हलाल मांस उपलब्ध नाही. हा कायदा पारित केल्यानंतर युरोपीय समुदायांच्या सर्वच देशांनी त्याचे स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ते आता मध्ययुगीन काळात राहात नाहीत. याचा अर्थ इतर युरोपीय देशांमध्ये लवकरच असा कायदा केला जाणार आहे. प्रश्न असा आहे की जर पशुप्रेमाखातर केलेला कायदा असेल तर असाच एखादा कायदा तुम्ही माणसांच्या प्रेमासाठी त्यांची सर्रास हत्या करण्यापूर्वी त्यांना अगोदर स्तब्ध (Stunn) करण्यासाठी का आजवर केला नाही? पशुप्रेमींनी जगभर ज्या पाशवी लत्याकांडाची मालिका सुरू ठेवलेली आहे त्या वेळी पाश्चात्यांना माणसेही पशूसारखेच प्राणी आहेत, पशुंचे जसे जीव आहेत तसेच माणसांनाही जीव आहे. पशुंना कापतेवेळी जसा त्रास सहन करावा लागत असेल तसाच माणसांची सर्रास कत्तल करताना त्यांना त्रास होत असेल, असे विचार तुमच्या मनात का आले नाहीत? आखाती देशांतील तेल उपसण्यासाठी इराकवर जैविक अस्त्रे बाळगण्याचा खोटा आरोप करून तेथील लक्षावधींची लत्या करणारे हेच तर पशुप्रेमी होते. सीरियामधील पशुप्रेमी हेच आहेत. सऊदीअरेबियाच्या पाठीमागून येमेनची नासधूस करणारे, लीबियाची राजवट संपुष्टात आणणारे हेच पशुप्रेमी होते. फरक एवढाच की त्यांनी आपल्या पाशवी वृत्तीला पशुप्रेम असे नाव दिलेले आहे. याच पाशवी वृत्तीमुळे ६० लाख ज्यू धर्मियांना गॅस चेंबरमध्ये टाकून त्यांची हत्या करणाऱ्यांना आधी त्यांना बेशुद्ध करण्याची युक्ती का सुचली नाही? शेवटी ज्यू धर्मियांनी असा कोणता भयंकर अपराध केला होता ज्यासाठी त्यांच्या एका पिढीची भयंकररित्या हत्या करण्यात आली? युरोपीय देशांनी याचे उत्तर द्यायचे बाकी आहे. ते म्हणतात की त्यांना अजूनही मध्ययुगीन काळात जगायचे नाही. याचा अर्थ मध्युयुगीन काळ अन्याय-अत्याचार, माणसांची हत्या, कत्तली घडवण्याचा काळ होता. पण इतिहासात जितके भयंकर गुन्हे माणसांनी माणसांविरूद्ध सद्यकाळात केलेले आहेत आणि करत आहेत तेवढे अत्याचार कोणत्याही राष्ट्र-समुदायांनी केलेले नाहीत. हाच त्यांचा मानवाधिकार आहे. माणसांशी प्रेम की पशुंशी प्रेम! पशूदेखील आपल्या जातीवर इतके अत्याचार करत नाहीत. आपल्या पोटासाठी फक्त शिकार करतात. नुसतेच एकमेकांना ठार करण्यासाठी शिकार करत नसतात. तेवढे गुण तरी यांच्या अंगात असते तर बरे झाले असते. विशेष म्हणजे त्यांनी हा कायदा पारित केल्यावर तिथले मंत्री बेनवोयेट्रस यांनी ट्वीटरवर असे जाहीर केले की मला राष्ट्रवादी असल्याचा अभिमान आहे. त्याचबरोबर पशुप्रेमी असल्याचाही अभिमान वाटतो. पशुप्रेमाची गोष्ट तर त्यांनी आपला हेतू लपवण्यासाठी केली, त्यांना तर आपण किती राष्ट्रप्रेमी आहोत हे सांगायचे होते. म्हणजे त्यांनी पशुप्रेमापोटी हा कायदा पारित केला नाही तर इतर धर्मियांच्या विरोधात हा कायदा बनवला आहे हे स्पष्ट होते. या मंत्रीमहोदयांचे नाते नाझींशी असल्याचेही आता उघड झाले आहे. आपल्या देशातील नाझींनीही असाच एक पशुहत्या प्रतिबंध कायदा सध्या एका राज्यात लागू केला आहे. भविष्यात तो सबंध देशावर लागू होणार आहे. हा कायदादेखील पशुप्रेमापेक्षा इतर गोरगरीब जनतेच्या पोटावर लात मारण्यासाठीच असणार आहे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment