Halloween Costume ideas 2015

सूरह अल् आअराफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(६६)  त्याच्या समाजाच्या सरदारांनी, जे त्याच्या गोष्टी ऐकण्यास नकार देत होते, उत्तरादाखल सांगितले, ''आम्ही तर तुम्हाला मूर्ख समजतो आणि आम्हाला वाटते की तुम्ही खोटे आहात.'' 

(६७) त्याने सांगितले, ''हे देशबांधवांनो! मी मूर्ख नाही याउलट मी जगांच्या पालनकर्त्याचा रसूल (पैगंबर) आहे   

(६८) तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो आणि तुमचा असा हितैषी आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. 

(६९) काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी स्वत: तुमच्या स्वकीयांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून 'स्मरण' आले, ज्याद्वारे त्याने तुम्हाला सावध करावे? विसरू नका की तुमच्या पालनकर्त्याने नूह (अ.) लोकानंतर तुम्हाला त्याचे उत्तराधिकारी बनविले आणि तुम्हाला खूप धष्टपुष्ठ केले, म्हणून अल्लाहच्या सामर्थ्याच्या चमत्काराची आठवण ठेवा,५२ आशा आहे की तुम्ही यश संपादन कराल.'' 

(७०) त्यांनी उत्तर दिले, ''काय तू आमच्यापाशी याकरिता आला आहेस की आम्ही एकट्या अल्लाहचीच उपासना करावी आणि त्यांना सोडून द्यावे ज्यांची उपासना आमचे पूर्वज करीत आले आहेत?५३ घेऊन ये त्या यातना ज्यांची तू आम्हाला धमकी देतोस जर तू खरा असशील.'' 

(७१) त्याने सांगितले, ''तुमच्या पालनकर्त्याने तुमचा धिक्कार केला व त्याचा प्रकोप कोसळला. तुम्ही त्या नावांकरिता माझ्याशी भांडता ज्याचे नामकरण तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी केले आहे,५४ ज्यांच्यासाठी अल्लाहने कोणतेच प्रमाण अवतरित केले नाही?५५ ठीक आहे! तुम्हीसुद्धा प्रतीक्षा करा व मीदेखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो.'' 

(७२) सरतेशेवटी आम्ही आपल्या कृपेने हूद (अ.) आणि त्यांच्या सोबत्यांना वाचविले आणि त्या लोकांचे समूळ उच्चाटन केले ज्यांनी आमची संकेतवचने खोटी लेखली होती आणि श्रद्धाळू नव्हते.५६ 

(७३) आणि समूदकडे५७ त्यांचे बंधु सॉलेह (अ.) ला पाठविले त्याने सांगितले, ''हे देशबांधवांनो! अल्लाहची बंदगी (भक्ती) करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही, तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याचे उघड प्रमाण आले आहे. ही अल्लाहची सांडणी तुमच्यासाठी एक संकेतचिन्ह स्वरूप आहे,५८ म्हणून हिला मोकळी सोडा  जेणेकरून ती अल्लाहच्या जमिनीत चरत राहील. तिला कोणत्याही वाईट हेतूने स्पर्श करू नका नाहीतर एक अत्यंत दु:खदायक यातना तुम्हाला गाठील. 

(७४) आठवा, तो प्रसंग जेव्हा अल्लाहने आद लोकांनंतर तुम्हाला त्याचे उत्तराधिकारी बनविले आणि तुम्हाला भूतलावर वास्तव्य प्रदान केले की आज तुम्ही त्याच्या समतल मैदानांवर वैभवशाली महाल बनविता आणि त्याच्या पर्वतांना कोरून घरे बनविता,५९ म्हणून त्याच्या सामर्थ्याच्या चमत्कारापासून बेसावध बनू नका आणि भूतलांवर उपद्रव माजवू नका.''६०

(७५) त्याच्या समाजाच्या सरदारांनी जे गर्वाने मोठे झाले होते, दुबळया वर्गाच्या त्या लोकांना ज्यांनी श्रद्धा ठेवली होती - सांगितले, ''काय तुम्हाला खरोखरच माहीत आहे की सॉलेह (अ.) आपल्या पालनकर्त्याचा पैगंबर आहे?'' त्यांनी उत्तर दिले, ''नि:संशय ज्या संदेशासहित त्याला पाठविण्यात आले आहे, तो आम्ही मान्य करतो.''५२) म्हणजे यास दोन्ही स्थितीत स्मरणात ठेवा. एक म्हणजे त्याने पैगंबर नूह (अ.) यांच्या लोकसमूहाला नष्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या जागी श्रेष्ठता प्रदान केली. तसेच यासाठीसुद्धा की अल्लाह उद्या तुम्हाला नष्ट करून इतर दुसऱ्या लोकसमुहाला तुमचा उत्तराधिकारी बनवू शकतो.

५३) येथे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की हे राष्ट्रसुद्धा अल्लाहचे द्रोही किंवा अल्लाहपासून अपरिचित नव्हते आणि त्यांना अल्लाहच्या भक्तीशीसुद्धा नकार नव्हता. वास्तवता ते लोक पैगंबर हूद (अ.) यांच्या एकेश्वरत्वाच्या आवाहनाला अमान्य करीत होते. दुसऱ्या कोणाची भक्ती अल्लाहच्या भक्तीबरोबर करू नये हे त्यांना मान्य नव्हते.

५४) म्हणजे तुम्ही कोणाला पावसाचा तर कोणाला हवेचा तर कोणाला संपत्तीचा आणि आजाराचा देवता मानता. यातील कोणीही कोणत्याच गोष्टीचा निर्माणकर्ता नाही. याचे उदाहरण वर्तमान युगातही सापडते. एखाद्या काल्पनिक देवाला कोणी दु:खहर्ता, विघ्नहर्ता म्हणतात, परंतु विघ्न आणि दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य त्यात नसते. कोणाला संपत्ती देणारा (गंजबख्श) परंतु त्याच्याकडे देण्यासाठी काहीच खजिना (संपत्ती) नसतो. कोणाला दाता म्हणतात, परंतु तो कोणत्याच वस्तूचा मालक नाही तर दाता कोठून बनणार? कुणाला गरीबांची मदत करणारा (गरीब नवाज) म्हटले जाते परंतु तोच स्वत: गरीब बेचारा, सृष्टी-सत्तामध्ये काहीएक भागीदारी ठेवत नाही ज्याच्यामुळे तो इतरांना मदत करू शकेल. कोणाला तक्रार ऐकणारा (गौस) म्हटले जाते, परंतु त्याच्यामध्ये काय सामर्थ्य की दुसऱ्याची तक्रार (प्रार्थना) ऐकावी. खरे तर ही सर्व नावे केवळ नावेच आहेत त्यांच्या मागे तसे गुणधारी व्यक्तित्व नाही. जो कोणी त्यांच्यासाठी भांडतो, तो खरेतर काही नावांपुरतेच भांडतो, सत्यासाठी तो मुळीच भांडत नाही.

५५) म्हणजे अल्लाह, ज्याला तुम्ही स्वत: महानतम निर्माणकर्ता प्रभु म्हणता त्याने काही प्रमाण या तुमच्या बनावटी उपास्यांना (ईश्वर) पालनहार आणि पुज्य होण्यासाठी प्रदान केले नाही. अल्लाहने कुठेच असे सांगितले नाही की मी अशा अशा व्यक्तीला ईशत्वात भागीदार केले आहे. अल्लाहने कुणालाच विघ्नहर्ता, दु:खहर्ता, सुखकर्ता पालनकर्ता, गरीबांचा वालीसाठीचे लायसन्स (अनुमतीपत्र) दिलेले नाही. लोकांनी स्वत: आपल्या कल्पनाविलासाने आणि अंधविश्वासाने अल्लाहच्या ईशत्वातून जितका भाग ज्याला वाटेल त्याला देऊन टाकला!

५६) `समूळ उच्चटन केले' म्हणजे जगात त्यांचे नावसुद्धा शिल्लक ठेवले नाही. हे अरबांच्या ऐतिहासिक परंपरांनीसुद्धा प्रमाणित आहे. तसेच आधुनिक शोधकार्य याची ग्वाही देत आहे. प्रथम `आद' नष्ट झाले, त्यांचे नामोनिशाणसुद्धा जगात बाकी राहिले नाही. म्हणून अरब इतिहासकार या `आद' राष्ट्राला `उम्मते बाईदा' म्हणजे लुप्त् पावलेले राष्ट्र म्हणून संबोधतात. अरबांच्या ऐतिहासिक मान्यतांपैकी एक आहे की आदचा केवळ तोच भाग शेष राहिला जो पैगंबर हूद (अ.) यांचा अनुयायी होता. आदवंशाच्या याच लोकांचे नाव मानवी इतिहासात `आद द्वितीय' आहे. हिस्ने गुराबचा वर उल्लेखित आलेख याच स्मरणांपैकी एक आहे. या आलेखात (ज्याला इ. स. पूर्व अठराशेचा लेख समजले जाते.) पुरातत्वविशेषज्ञांनी जे अंश वाचले त्याचे खालीलप्रमाणे विवरण आहे, ``आम्ही दीर्घकाळ या किल्ल्यामध्ये खुशहालीत जीवन व्यतीत केले. आमचे जीवन तंगीने आणि दु:स्थितीने अलिप्त् होते. आमचे येथील कालवे नदीच्या पाण्याने नेहमी भरलेले होते आणि आमचे शासक असे बादशाह होते जे दुष्ट विचारांपासून दूर होते. ते दुष्ट, दुर्जनांवर आणि उपद्रवीवर कठोर होते. ते आमच्यावर हूद यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे शासन करीत होते आणि चांगले निर्णय एका ग्रंथात लिहिले जात होते. आम्ही चमत्कारावर आणि मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवून होतो.''

वरील वाक्य आजसुद्धा कुरआनच्या त्या उक्तीचे स्पष्टीकरण देत आहेत की आदचे प्राचीन वैभव आणि समृद्धीचे उत्तराधिकारी शेवटी तेच लोक झाले ज्यांनी पैगंबर हूद (अ.) यांच्यावर ईमान धारण केले होते. 

५७) हा अरबांच्या अतिप्राचीन वंशापैकी एक दुसरा वंश (राष्ट्र) आहे जो आदनंतर सर्वाधिक प्रसिद्ध आणि सुविख्यात आहे. कुरआन अवतरणापूर्वी या राष्ट्राच्या कथा अरबवंशात प्रसिद्ध होत्या. अज्ञानकाळातील काव्य आणि त्या काळातील भाषणांतून याचा उल्लेख सापडतो. असीरियाचे लेख तसेच युनान, स्कन्दरिया आणि रोमचे प्राचीन इतिहासकार आणि भूविशेषज्ञसुद्धा याचा उल्लेख करतात. इसा (अ.) यांच्या जन्मापूर्वी या लोकसमूहाचे (राष्ट्राचे) अवशेष सापडत होते. रोमच्या इतिहासकारांचा उल्लेख आला आहे की हे लोक रोमच्या सेनेत भरती झाले होते आणि नब्तियांच्या विरुद्ध लढले होते, ज्यांच्याशी त्यांचे शत्रुत्व होते. या राष्ट्राचे निवासस्थळ उत्तर पश्चिम दिशेला अरबांचे एक क्षेत्र होते जे आजसुद्धा `अल् हिज्र' या नावाने ओळखले जाते. वर्तमान युगात मदीना आणि तबुकच्या दरम्यान हिजाज रेल्वेचे एक स्टेशन आहे ज्याला `मदाईने सॉलेह' म्हणतात. हेच समूदचे मुख्यालय होते. हे प्राचीन काळात `हिज्र' या नावाने प्रसिद्ध होते. तिथे आजसुद्धा हजारो एकर जमिनीवर दगडी इमराती उभ्या आहेत. ज्यांना समूदच्या लोकांनी डोंगरकपारीत कोरीव काम करून बनविले होते. या ``मौननगरी''ला पाहून वाटते की या शहराची लोकसंख्या त्या काळी चार-पाच लाखांपेक्षा कमी नसावी. कुरआन अवतरणकाळात हिजाजचे व्यापारी या भग्नावशेष इमारतीजवळून जात असत. पैगंबर मुहम्मद (स.) तबुकच्या युद्धासमयी जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा आपल्या साथीदारांना त्यांनी या निशाण्या आवर्जून दाखविल्या होत्या. ती शिकवण आपल्या साथीदारांना दिली जी या बोधप्रद निशाण्यांद्वारा (पुरावशेष) प्रत्येक विचारी व्यक्ती बोध घेत असतो. एके ठिकाणी विहिरीकडे बोट दाखवून पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ``या विहिरीचे पाणी पैगंबर सॉलेह (अ.) यांची उंटीनी पीत असे.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना आदेश दिला की केवळ याच विहिरीचे पाणी प्यावे दुसऱ्या विहिरीचे पाणी पिऊ नये. एका पर्वत खिंडीला दाखवून पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले की याच खिंडीतून ती उंटीनी पाणी पिण्यासाठी येत असे. ती जागा आजसुद्धा `फज्जुन्नाका' या नावाने प्रसिद्ध आहे. या भग्नावशेषात मुस्लिम फिरत असताना त्या सर्वांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकत्रित केले आणि त्यांच्यासमोर भाषण दिले. भाषणात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी समूदच्या परिणामापासून बोध घेण्यास सांगितले. पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ``ही त्या राष्ट्राची भूमी आहे ज्याच्यावर अल्लाहचा कोप झाला होता. म्हणून येथून लवकर निघा. ही जागा सहलीची मुळीच नाही तर अश्रू ढाळण्याची जागा आहे.''

५८) लेखाच्या बाह्यांगावरून माहीत होते की पहिल्या वाक्यात अल्लाहच्या स्पष्ट पुराव्याचा उल्लेख आला आहे, त्याने अभिप्रेत हीच सांडणी आहे. दुसऱ्या वाक्यात याला निशाणी असे म्हटले आहे. कुरआन २६:१५४-१५८ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे तो म्हणजे समूदवाल्यांनी स्वत: एक अशा निशाणीची मागणी पैगंबर सॉलेह (अ.) यांच्याजवळ केली होती की अल्लाहने प्रत्यक्ष पुराव्याच्या स्वरुपात द्यावी. याच्याच उत्तरात पैगंबर सॉलेह (अ.) यांनी त्या सांडणीला समोर ठेवले होते. यावरुन हे निश्चित सिद्ध होते की सांडणीचे प्रकट होणे हा एक चमत्कार होता. हा त्याच चमत्कारांपैकी एक चमत्कार होता ज्यांना पैगंबर नाकारणाऱ्या लोकांपुढे त्यांच्या मागणीनुसार प्रस्तुत करीत होते. त्या सांडणीचा चमत्कारिकरित्या जन्म घेणे एक प्रमाण आहे. पैगंबर सॉलेह (अ.) यांनी त्यास प्रस्तुत करून नाकारणाऱ्यांना धमकी दिली की या सांडणीच्या जिवंत राहण्यावर तुमचे जीवन अवलंबून आहे. ही सांडणी बेधडक तुमच्या शेतात चरत फिरेल, एक दिवस ही एकटी पाणी प्यायला येईल. नंतर दुसऱ्या दिवशी इतर सर्व जनावरे पाणी प्यायला तिथे येतील. जर तुम्ही तिला हात लावला तर अचानक अल्लाहचा कोप तुमच्यावर होईल. जाहीरीत्या हीच गोष्ट वैभवशाली पद्धतीने मांडली गेली असती जिचे असामान्य असणे लोकांनी आपल्या डोळयांनी प्रत्यक्ष पाहिले. नंतर बऱ्याच काळापर्यंत हे लोक तिच्या चरण्या-फिरण्यास आणि एक दिवशी एकटीने तिने पाणी प्यावे आणि दुसऱ्या दिवशी बाकीच्या सर्वजणानी पाणी प्यावे; लोकांना हे आवडले नाही. तरीही त्यांनी सहन केले. शेवटी लोकांनी डाव रचून त्या सांडणीला ठार केले. कारण त्या वेळी पैगंबर सॉलेह (अ.) यांच्या हातात सत्ता नव्हती त्यामुळे लोकांनी त्यांच्या धमकीला न भिता सांडणीला ठार केले. या वस्तुस्थितीवर आणखी एक पुरावा म्हणजे जे ते लोक या सांडणीला घाबरत होते आणि ओळखून होते की या सांडणीमागे अवश्य एखादी शक्ती आहे त्यामुळे ती आमच्यामध्ये बिनधास्त फिरते. परंतु सांडणी कशाप्रकारे जन्माला आली आणि ती कशी होती यावर भाष्य कुरआनात आलेले नाही. हदीसनुसारसुद्धा हे सिद्ध होत नाही. म्हणून त्या टीकाकारांच्या कथनांना मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ती सांडणी एक चमत्कार होता हे कुरआननुसार आहे.

५९) समूदच्या लोकांची ही कला भारतातील एलोरा, अजंठा व इतर ठिकाणी असलेल्या लेणीसारखी आहे. ते डोंगर कपारीत कोरीव काम करून भव्य इमारती बनवित असत. याचा उल्लेख वर आला आहे. ``मदाइने सॉलेह' या ठिकाणी त्या इमारतीपैकी काही इमारती अद्याप उभ्या आहेत. त्यांना पाहून अनुमान केला जाऊ शकतो की त्या लोकांमध्ये स्थापत्यशास्त्र फार प्रगत होते.

६०) म्हणजे `आद'च्या परिणामांपासून बोध घ्या. अल्लाहने या दुष्ट राष्ट्राला नष्ट करून तुम्हाला त्या जागी वसवले. तोच अल्लाह तुम्हाला नष्ट करून दुसऱ्यांना तुमचा उत्तराधिकारी बनवू शकतो जेव्हा की तुम्ही `आद' सारखे दुष्ट बनाल.
Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget