डॉक्टरी पेशात रुची असूनही संविधानाच्या मूल्याधिष्ठित चौकटीत राहून निर्भीड पत्रकारिता करणारा हाडाचा पत्रकार, इस्लामी साहित्याचे गाढे अभ्यासक आणि सामाजिक बांधिलकीतून गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात कायदेशीर मार्गाने सर्वतोपरी मदत करणारा सामाजिक कार्यकर्ता, परखड मत व्यक्त करणारा वक्ता आणि साप्ताहिक शोधनचे माजी व्यवस्थापक व कार्यकारी संपादक वकारअहमद इस्माईल अलीम यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी गुरुवार दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
वकार अलीम हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी असून सध्या त्यांचे पुणे शहरात वास्तव्य होते. बी.ए. पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. मराठीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत पदवी संपादन केली. स्थानिक वृत्तपत्रांबरोबरच रेडिओ अँकर म्हणून आणि न्यूज चॅनलमध्ये पत्रकारिता अत्यंत कार्यक्षमरित्या केली होती.
इस्लामचा सखोल अभ्यास करताना त्यांचा विविध मुस्लिम व इस्लामी धर्मगुरू, उलेमा आणि इस्लामी संघटनांशी जवळचा संबंध आला. सन २००५ मध्ये ते जमाअत-ए-इस्लामी हिंद या संघटनेच्या संपर्कात आले. जवळपास सहा वर्षे ते या संघटनेच्या दावा विभागात कार्यरत होते. त्यांनी सोलापुरातील अल हसनात हॉल टावर येथे जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या कार्यालयात इस्लाम परिचय केंद्राची सुरूवात केली. याच कार्यक्रमांतर्गत त्यांनी शहरातील प्राध्यापक, वकील, मराठी प्रसारमाध्यमांतील पत्रकार, मराठा सेवा संघ आणि बामसेफ यांसारख्या संस्थांशी संपर्क साधला. दलित व मातंग समाजातील नेत्यांशीही त्यांचे निकटचे संबंध होते.
अशी अतिशय प्रशंसनीय आणि जबरदस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची साप्ताहिक शोधनच्या व्यवस्थापकपदी आणि त्यानंतर कार्यकारी संपादकपदी नियुक्त करण्यात आली. सन २०१४ ते २०१७ या कालावधीत ते शोधनमध्ये कार्यरत होते. शोधनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सोलापूरहून मुंबईला आले. पुढे वैयक्तिक कारणास्तव ते पुण्याला स्थायिक झाले. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी विविध प्रसंगी त्यांनी जमाअतद्वारा इस्लामी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबई येथील वास्तव्यकाळात त्यांनी मुहम्मद अली रोड येथील जमाअत-ए-इस्लामी हिंदचे सदस्यत्व प्राप्त केले होते. मुंबईत कार्यरत असताना त्यांनी आपला सामाजिक चळवळीचा वसा काही सोडला नव्हता. स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून भाग घेणे, मुस्लिमेतर बांधवांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, टीव्हीवरील विविध चर्चासत्रांत भाग घेणे, शैक्षणिक क्षेत्रासंबंधित समस्या असोत की प्रशासकीय व मनपाच्या स्थानिक पातळीवरील समस्या असोत, त्या सोडविण्यासाठी ते अतिशय तळमळीने पुढाकार घेत असत. मुंबईमध्येदेखील अनेक धार्मिक व सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. आयुष्याच्या अगदी शेवटपर्यंत ते या आंदोलनात राहिले आणि जमाअतच्या दावा विभागात कार्यरत राहिले. अल्लाह त्यांना त्यांच्या सामाजिक आणि इस्लामी सद्कार्याचा सर्वोत्तम मोदबदा देऊन जन्नतमध्ये स्थान प्रदान करो, अशी अल्लाहपाशी ‘शोधन परिवारा’तर्फे प्रार्थना करतो, आमीन.
- शाहजहान मगदुम
कार्यकारी संपादक
मो. 9876533404
Post a Comment