Halloween Costume ideas 2015

स्त्री समानतेचे प्रणेते प्रेषित मुहम्मद (सल्ल.)

हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा जपणार्‍या आमच्या भारत देशात शांती आणि प्रेमाचा संदेश देउन सुव्यवस्थित, शिस्तबद्ध जीवन जगता यावे यासाठी भेदभावांच्या ज्वालाला थंड करून समस्त मानवाला सद्व्यवहार व सद्वर्तनाची शिकवण द्यायची आहे. प्रत्येकजण सुखी जीवनाच्या मागे आहे. एक आदर्श जीवन प्रणाली, सफलता आणि मुक्तीचा मार्ग, सत्कर्माचा अंगीकार करावा, दुष्कर्मापासून स्वत:ला, दूर ठेवावे. कारण, विश्‍वाचा स्वामी एक जो सर्वांवर लक्ष ठेवून असतो तोच एकमेव सर्वोच्च महान आहे. तोच विश्‍वाचा संसार चालवितो. इस्लामचा मूळ सिद्धांतच स्वस्थ समाज निर्माण करणे, वाईटाचे उच्चाटन करणे आहे पण आज मानव जीवनाचा उद्देशच विसरत चालला आहे, का बरे?
    मानवी समाजात स्वातंत्र्य व समानतेच्या विकासासाठी इस्लामचे योगदान विश्‍वव्यापी आहे. त्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचा जागतिक संदेश आहे. संबंध मानव जातीचा एका नात्याशी संबंध जुळलेला आहे. समस्त ब्रह्मांडाचा चराचर सृष्टीचा निर्माता अल्लाह, ईश्‍वर एकमेव आहे.
    आज मानव अनेक समस्यांनी जखडलेला आहे मग ती समस्या वैयक्तिक असो, कौटुंबिक असो, सामाजिक किंवा राजकीय असो . वर्णद्वेषामुळे माणूस माणसात वैरी बनत चालला आहे. त्या भेदभावांना मूठमाती देऊन सामाजिक ऐक्य टिकवायचे आहे.
    अखिल मानवजातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे गरीबांचे कैवारी, उपदेशाचा सागर, महान तत्वज्ञ, न्यायप्रिय, मानवाच्या कल्पणातच जीवनाचे ध्येय मानणारे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) समस्त मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे आणून, सामाजिक परिवर्तनातून उभारलेली आदर्श पैगंबरी व्यवस्थेने ’स्त्रीला’ खूप मानाचे स्थान देऊन स्त्रियांना त्यांचा नैसर्गिक दर्जा बहाल केला. सर्वप्रथम पुरूष व स्त्री मध्ये समानता असावी असा उद्घोष केला. स्त्रियांना अधिकार देऊन स्त्री-पुरूष समानता दिली. स्त्री गुलामगिरी विरूद्ध आवाज उठवला. समाजात त्यांना आदर सन्मान प्रदान केला.
    स्त्रियांचे मुक्तीदाता पैगंबर मुहम्मद (सल्ल.) म्हणतात, ”जो कोणी सत्कृत्ये करील, मग तो पुरूष असो की स्त्री, शिष्टाचारांच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे, महिलांच्या बाबत शिष्टविचार बाळगतो तोच तुमच्यात सर्वोत्तम आहे.”
    पुढे म्हणतात, ” महिलांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा, तुमचा महिलांवर आणि महिलांचा तुमच्यावर अधिकार आहे.”
    ” ज्या माणसाला मुलांद्वारे आजमावले जाईल (म्हणजे ज्याला मुली होतील) आणि त्याने त्यांच्या बरोबर चांगली वागणूक ठेवून, त्यांचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करील, तर त्या मुली त्याला नरकाच्या अग्नीपासून वाचविणार्‍या ढाली बनतील.” स्त्री पुरूष समानतेचा दावा असताना, स्त्री ला सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार असताना सुद्धा स्त्रीला फुलण्याआधीच खुडून टाकले जात आहे. समाजाचा मूलाधार स्त्री तिलाच जन्मापूर्वी संपविणे घोर अपराध, घृणास्पद बाब, स्त्री जन्म नाकारला जाणे निर्दयी, गंभीर समस्या आहे. भारतीय स्त्री सुशिक्षित होते आहे पण सुरक्षित का नाही? स्वातंत्र्याच्या नावावर पाश्‍चिमात्याचे काळे ढग तिच्यावर वावरत आहेत.
    मुलगी म्हणजे स्वर्ग प्राप्तीचे साधन पवित्र ईशग्रंथ कुरआनात म्हटले आहे.
    ” आणि आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार मारू नका. आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील देतो” (कुरआन अध्याय-6, आयात 151)
प्रेषित सल्ल. म्हणतात, ” मुलींचा तिरस्कार करू नका त्या तर दु:खभंजक आणि अत्यंत मौल्यवान आहेत. ”
    ”हे सारे जग म्हणजे संपत्ती आणि जगातील सर्वोत्कृष्ट संपत्ती म्हणजे सुशील पत्नी”
    ” हे विश्‍व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वात उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे. तिच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा तिचा द्वेष करू नका. चांगली वर्तणूक ठेवा.
    इस्लामने स्त्रियांचे संवैधानिक अधिकार देखील सुरक्षित केले आहेत आणि नैतिक स्वरूपात सुद्धा तिला उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे स्थान प्रदान केले आहे. मुलीच्या शिक्षणावर विशेषभर दिला आहे. प्रेषित सल्ल. यांचा आदेश आहे, ” तुमच्यापैकी उत्कृष्ट तो आहे जो आपल्या मुलां-बाळाच्या आणि पत्नीच्यासाठी उत्कृष्ट आहे. स्त्रीयांसाठी प्रेषित सल्ल. यांनी संदेश दिला आहे, ” तुम्ही जे खाल ते त्यांना खावयास द्या, जे कपडे परिधान कराल त्याच प्रकारचे कपडे त्यांना द्या त्यांना वाईट वागणूक देऊ नका आणि अपशब्द वापरू नका”
    पैगंबर सल्ल. विधवा, घटस्फोटित मुलींची काळजी घेण्यास सांगतात. विधवा मुलींचा विवाह करून नैतिकदृष्ट्या तिला अत्यंत सन्मान व आदराचे स्थान देण्यास सांगितले आहे. प्रेषित सल्ल. यांनी विधवेशी विवाह करण्याचे समर्थन केले व त्यात पुण्यकर्म म्हटले आहे.
    आईला उच्चस्थान दिले. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. महिलांचे उद्धारक प्रेषित मुहम्मद सल्ल. महिलांना वारसा हक्कात सह्योगी करण्याचे व वारसा संपत्तीत तिचा वाटा देण्याचे अधिकार स्त्रियांना आहेत. मुलींशी सद्व्यवहाराचे हे ते शिक्षण आहे याची उदाहरणे इतर कोठेही पाहावयास मिळत नाहीत.
    समस्त जगाचे नेते प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी समस्त मानवजातीला मार्गदर्शन केले. विशिष्ट काळापुरता मर्यादित नाही तर जगाचे अस्तित्व असे पर्यंत जगवासियांसाठी संदेश दिला.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पत्नी माननीय आयेशा रजि. यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा आचरणांचा आदर्श दिव्य कुरआन होते. म्हणजेच दिव्य कुरआनात ज्या, उच्चतम नैतिकतेचा आदर्श मांडण्यात आला आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. नेमक्या त्याच आदर्शाचा नमुना होते.
    स्त्रियांना पुरूषांच्या पेहरावाप्रमाणे पोशाख परिधान करण्यास सक्त विरोध केला आहे. स्त्रियांनी पातळ कपडे परिधान करू नये. परदा करण्याची आज्ञा दिली. वयात आलेल्या मुलीने/स्त्रीने पडदा केला पाहिजे. स्त्रीने आपल्या शरीराचे सर्व भाग चांगल्या प्रकारे झाकले जातील अशी चादर अंगावर घेणे आवश्यक आहे. यामुळे स्त्री शीलाचे व तिच्या सभ्यतेचे अत्यंत चांगल्या प्रकारे संरक्षण होते आणि दुराचाराला आळा बसतो. स्त्रीला सुरक्षित जीवन जगण्यासाठी आणि स्त्रीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणुकीची गरज आहे.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांच्या जीवनातील अंतिम हजच्या प्रसंगी दिलेल्या भाषणात मजूर आणि स्त्रियांच्या अधिकाराबाबत सविस्तर चर्चा करताना म्हटले, ” नीट लक्षपूर्वक ऐका ! तुमच्यावर स्त्रियांचे अधिकार हे आहेत की, तुम्ही त्यांच्याशी उत्तम व्यवहार करावा, त्यांना चांगले व योग्य अन्न व उत्तम पोशाख द्यावा. ” स्त्रियांचे रक्षण आणि त्यांच्याशी उत्तम व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे.
    इस्लामने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून बाहेर काढले, तिला न्याय दिला, मानवी अधिकार दिले, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्रदान केले, समाजात तिला मान, सन्मान दिला.
    माणसाने माणसांशी कसे वागावे हे स्पष्ट केले. ईशग्रंथात सत्याला सोडून असत्याच्या मागे धावणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावणेच.
    मृत्यूची वास्तविकता कोणी नाकारू शकत नाही. पारलौकिक जीवनात यश मिळविण्यासाठी ऐहिक जीवनात काय-काय करावे लागेल याचा विचार आम्हा सर्वांना करावा लागेल. परलोकातील यश खरे यश होईल. सत्कर्माचा अंगीकार करावा लागेल.
    एक दिवस असा येणार आहे की, सूर्य, चंद्र लोप पावतील, ग्रह, तारे एकमेकांवर आदळतील व हे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल.
    सदाचारी माणसाला त्याच्या सत्कर्माची व दुराचारी माणसाला त्यांच्या कुकर्माची फळे मिळणे आवश्यक आहे. जगात आमचे राहणे एखाद्या पाहुण्यासारखे आहे आणि शेवटी एक दिवस जग सोडून प्रत्येकालाच जगाचा निरोप घ्यायचा आहे. इहलोकात व परलोकात यश संपादन करणे हाच जीवनाचा उद्देश.
    आज स्त्रीयांच्या अनेक ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी स्त्रीला सुरक्षित जीवन जगण्यासाठी आणि स्त्रीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणुकीची नित्तांत गरज आहे. अल्लाह आम्हा सर्व भगिनींचे रक्षण कर. आमीन.

- डॉ. आयेशा पठाण, नांदेड
9665366489

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget