Halloween Costume ideas 2015

उर्दू साहित्यिक आणि विचारवंतांचा बेशरमपणा

Books
केंद्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सामाजिक-सांस्कृतिक अस्तित्वावर आघात करणाऱ्या अनेक घटना घडल्या. मात्र मुस्लिमांचे सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्या उर्दू साहित्यिकांत याविषयी  कमालीची असंवेदना आहे. एक-दोन अपवाद वगळता अशा घटना व निर्णयावर कुणी बोलताना, व्यक्त होताना आढळत नाही. एक काळ असा होता, ज्या वेळी उर्दूत राजकीय भूमिका  घेणारे अनेक क्रांतिकारक कवी होते. आज मात्र उर्दू साहित्यात राजकीय भूमिका घेणारे लोक नाहीत. साहित्य क्षेत्रात त्याविषयी उदासीनता दिसते. उर्दू साहित्य क्षेत्राला आलेल्या  मरगळीवर १५ सप्टेंबर रोजी मुंबई ‘उर्दू टाईम्स’ या उर्दूमधील राष्ट्रीय पातळीवरील दैनिकात प्रकाशित झालेला अग्रलेख उर्दू साहित्यिकांच्या वर्तमान भूमिकेवर टीका करणारा आहे.  एनआरसी आणि कॅबवर सर्वत्र चर्चा होत असताना उर्दू साहित्यिक मात्र शांत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या लेखाचे मराठी भाषांतर...
आमचे साहित्यिक आणि विचारवंत वर्तमानातल्या घटनांवर बोलायला तयार नसतात,ही बाब खेदाची आणि शरमेचीदेखील आहे. खेद आणि शरम यासाठी की, साहित्यिक, विचारवंत कोणत्याही समाजाचा मुख्य आधार असतात. ते एका ‘थिंक टँक’सारखे असतात. ज्या समस्या समाजासमोर उभ्या असतात, त्यांचा सामना करण्यासाठी हे सांस्कृतिक प्रतिनिधी  समाजमन तयार करत असतात. त्यांची सर्वांत महत्त्वाची भूमिका ही असते की, ते आपल्यासह समाजाचे नैतिक धैर्य, आत्मबळ अबाधित राखतात. मात्र प्रश्न हा आहे की, आमचे  साहित्यिक आणि विचारवंत जे कार्य त्यांनी करायला हवे, ते कर्तव्यबुद्धीने पार पाडत आहेत का?
या प्रश्नाचा वेध घेण्याआधी एका घटनेकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. गोष्ट तशी जुनी आहे. मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय किर्तीचे आणि भूमिका घेऊन जगणारे एक साहित्यिक आले होते. त्यांच्याशी भेट निश्चित झाली. त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो. त्या वेळी मी म्हटले, ‘साहित्यावर नाही तर वर्तमान स्थितीवर तुमच्याशी बोलायचे आहे?’’ त्यांनी तीव््रा नाराजी  व्यक्त केली. ‘‘आम्ही तर साहित्यातील लोक आहोत. आम्ही काय राजकारणावर बोलणार?’’ त्यांच्या या भूमिकेचे आश्चर्य वाटले आणि तितकाच धक्काही बसला. मी विचार करू लागलो  की, इतका मोठा साहित्यिक वर्तमान स्थितीवर बोलण्यासाठी का कचरत आहे? खूप विनंती केल्यानंतर त्यांनी सामाजिकतेवर काही प्रश्नांची उत्तरे दिली, पण खूप असंवेदनशील  पद्धतीने दिली. त्यात आत्मीयतेचा कोणताच अंश नव्हता. सामान्यत:आमच्या साहित्यिकांची स्थिती अशीच एकसारखी आहे. त्यांची या प्रश्नांवरील उत्तरेदेखील अशीच असतात. त्यातून  कोणत्याच समस्येचे निराकरण होत नाही, दिशा मिळत नाही.
कलम ३७० संपवण्यात आले. काश्मिरात कर्फ्यु लागलेला आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. या भागाचा संपर्क संपूर्ण दुनियेपासून तोडण्यात आला आहे. मात्र आमचे साहित्यिक आणि विचारवंत आपल्याच जगात मश्गूल आहेत. इतकी मोठी घटना घडली, साऱ्या जगात त्याचे पडसाद उमटले. मात्र यांना त्याची कसलीच फिकीर नाही. यांच्या तुलनेत  इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, बंगाली आणि मराठी भाषेचे साहित्यिक व विचारवंत वर्तमान स्थितीच्या गंभीरतेवर फक्त चिंतनच करत नाहीत, तर संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक  नेतृत्वदेखील करतात. ते काश्मीरवर लिहीत आहेत, बोलतही आहेत. ठीक आहे लघुकथा, शायरी, समीक्षा आणि संशोधन आपल्या ठिकाणी योग्य आहे. मात्र साहित्य तर डोळसपणा  शिकवते. आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे, त्याला एका नव्या परिप्रेक्ष्यात पाहण्याची, त्याची समीक्षा करण्याचे विवेक देते.
जर आम्ही जागतिक पातळीवर विचार केला किंवा आंतरराष्ट्रीय साहित्यिकांच्या भूमिका पाहिल्या तर आपल्याला अंदाज येईल की, अन्याय आणि दडपशाही विरोधात बोलताना ते  घाबरत नाहीत. उलट ते जनतेच्या रेट्याला आपल्या भूमिकेतून प्रतिनिधित्व प्रदान करतात. त्यातून जी सामूहिक भूमिका निर्माण होते, ती इतकी परिणामकारक ठरते की, शासकांचे  श्वास त्यामुळे रोखले जातात. आणि ते परिस्थितीला सुधारण्यासाठी राजी होतात. उर्दू साहित्यिकांना आणि विचारवंतांना याची जाणीव होत नाही का? यांच्यातील मोजक्या लोकांना  वगळले तर इतरांनी गुजरातच्या दंग्यांची सांस्कृतिक दखल घेतली आहे?
मुझफ्फरनगरचे दंगे, मॉब लिंचिंग, फॅसिझम, देशातील सत्तापरिवर्तनानंतर बदललेली परिस्थिती, त्यानंतर अल्पसंख्याकांची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात झालेली पिछेहाट, पोलीस स्टेटमध्ये रूपांतरीत होणाऱ्या राज्यात लोकांमध्ये दिसणारी बेचैनी आणि काश्मीरमध्ये पॅलेट गनमधून निघणाऱ्या छऱ्यांमुळे लोक आंधळे झाले आहेत. त्यावर उर्दू साहित्यिकांनी लिहिले आहे का? किंवा ते बोलले आहेत? कितीतरी घटना आहेत, ज्यावर तुम्हाला लिहावयाचे आणि बोलावयाचे आहे. समाजाला दिशा द्यावयाची आहे. त्याला गाफील  होण्यापासून रोखायचे आहे. आणि फॅसिझमच्या विरोधात जे युद्ध दुसऱ्या भाषेतील साहित्यिक व विचारवंतांनी सुरू ठेवले आहे, त्यामध्ये सामील होऊन सांप्रदायिकतेविरोधात लढा उभारावयाचा आहे. अरुंधती रॉयदेखील एक साहित्यिका आहेत. त्यांची काश्मिरवर कादंबरी आली आहे. पंकज मिश्रादेखील एक साहित्यिक व विचारवंत आहेत. त्यांनी फॅसिझमविरोधात  ‘एज ऑफ एंगर’ हे पुस्तक लिहिले आहे. रवीश कुमार एक लेखक आणि विचारवंत आहेत. त्यांच्या लोकशाही, संस्कृती आणि समाजाच्या स्थितीवरील ‘बोलना ही है’ या पुस्तकाने  खळबळ माजवली आहे. तुमच्या लेखणीला कधी वाचा फुटणार आहे? तुमचे तोंड कधी उघडणार आहे? तुम्ही केव्हा कथा, ़ग़जला, कवितांच्या जगातून बाहेर येऊन वर्तमान  परिस्थितीवर काही लिहाल किंवा बोलाल?

-शकील रशीद
संपादक, दै. उर्दू टाइम्स, मुंबई

(मराठी भाषांतर – सरफराज अहमद / सय्यद शाह वाएज)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget