Halloween Costume ideas 2015

सत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय

सत्ता विषाचा प्याला आहे, सोनिया गांधी यांनी हा मंत्र राहूल गांधी यांना दिल्याचे सर्वश्रुत आहे. सत्तेशिवाय प्रश्नही मार्गी लागत नाहीत हे ही तेवढेच खरे आहे. महाराष्ट्रात गेल्या   महिनाभरापासून सत्तेच्या विषाचा प्याला पिण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र राजकीय पक्षांच्या या घोडेबाजारात महाराष्ट्राची जनता होरपळून जातेय. सत्ता जर का विषाचा   प्याला असती तर सगळेच दूर गेले असते मात्र यात विष नसून अमृत असल्यामुळे सत्तेसाठी महाराष्ट्रात रस्सीखेच सुरू आहे. गेल्या तीन वर्षात राज्यातील 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 14 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या एक महिन्यात 68 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जवळपास 4.13 लाख कोटी रूपयांच्या कर्जाचा डोंगर महाराष्ट्रावर आहे. यासह आसमानी आणि सुलतानी संकटातून राज्याला बाहेर काढायचे सोडून सत्तेच्या मांडवलीत राजकीय पक्ष गुंतल्याने पुरोगामी महाराष्ट्र पुरता होरपळत आहे. महाराष्ट्र ही विचारवंतांची, संतांची, साहित्यिकांची, ज्ञानवंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच तत्त्वांशी बांधिलकी मानणाऱ्या निष्ठावान नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी परंपरा  राज्याला आहे. राजकीय विचारप्रणाली प्रगल्भ कशी होते, याचा वारसा आपल्याकडे आहे. त्यात यशवंतराव चव्हाण, सत्तेच्या मांडवलीत महाराष्ट्र होरपळतोय
प्रबोधनकार ठाकरे, अ.र.अंतुले, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे,  मधू लिमये, कॉम्रेड डांगे अशी अनेक नावे घेता येतील. वेगवेगळ्या विचारांचे हे नेते परस्परांशी सौहार्दपूर्ण संबंध राखून   असले तरी त्यांनी वैचारिक व्याभिचार कधीच केला नाही. राज्य जेव्हा केव्हा आसमानी संकटांनी घेरले असेल तेव्हा एकत्रितपणे राज्याच्या विकासाचा हे नेते विचार करायचे. मात्र आता   तशी भिस्त वा तसा विचार आजच्या राजकीय नेत्यांना उरला नाही. खरे तर, विचारांची सत्ता सध्या गौन आहे आणि रूपयाच्या सत्तेला अधिक  महत्व आहे. राज्य कोणाच्या  सत्ताकाळात आघाडीवर होते, हे तर जनतेला माहितच आहे. परंतु, त्यापुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राने युतीच्या हातात सत्ता दिली. खरे तर ही 2014 च्या वेळी ओढून घेतली असे  म्हणले तरी वावगे ठरणार नाही. तरी परंतु, अधिक खोलात न जाता एवढेच म्हणावे लागेल की, विचारधारा काही काळापर्यंत मर्यादित राहते. मात्र ज्यावेळेस यामध्ये सत्तेचा स्वार्थ  घुसतो त्यावेळेस यांच्यातील त्याग रसातळाला जातो आणि विचार मागे पडतो. यामुळे सत्तेची चुरस निर्माण होते; इथपर्यंत की ते दोन्ही गट विभागले जातात. सत्तेसाठी मग हे दोन्ही  गट कोणाशीही हातमिळविणी करण्यास तयार होतात. तसे तर राजकारणात हे नवीन नाही. मात्र विविधतेने नटलेल्या देशात स्वातंत्र्यानंतर एक वेगळी विचारधारा घेऊन युतीतील पक्ष   एकत्र आले होते. यांच्यातील एकसंघता पाहून ते कधी विस्कटणार नसतील असे वाटत होते. मात्र याला पूर्णविराम मिळाला आहे. नवीन विचारसत्तेची खिचडी महाराष्ट्रात  महाशिवआघाडीच्या (शिवसेना+राष्ट्रवाडी+काँग्रेस) नावाने शिजत असली तरी दीर्घकाळ ती टिकेल का नाही, याची शाश्वती नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांची संयमी वृत्ती आणि शिवसैनिकांची आक्रमक वृत्ती किती जुळेल हे ही पहाणे मजेशीर ठरेल.
राज्यात व्यापार, शेती, वाहन क्षेत्र, लहान व मध्यम उद्योग, बांधकाम क्षेत्र, बँकींग सर्वांची अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे सध्यातरी दिसत आहे. याचा परिणाम जीडीपीवर झाला  आहे. आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढावलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने राज्यातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. विशेषकरून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या  बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्रच सुरू आहे. जानेवारी ते नोव्हेंबर कालावधीत 610 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवठाळले. तर 14 ऑक्टोबर ते  11 नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीत मराठवाडयातील 68 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. हतबल झालेले शेतकरी केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. ओल्या दुष्काळामुळे अजूनही रबीची पेरणी सुरू झाली नाही. खरीप तर हातातून गेले. राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही. शिवाय राज्यपालांनी जी मदत  जाहीर केली तीही इतकी तुटपुंजी आहे की त्यातून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष महाराष्ट्रातील जनतेला कधीपर्यंत वेठीस धरतील तो   येणारा काळच ठरवेल. लेख लिहिपर्यंत म्हणजेच 20 नोव्हेंबर पर्यंत तरी सरकार स्थापन झाले नव्हते.
एका ठिकाणी खलीफा उमर इब्ने खत्ताब यांनी एका मेळाव्याला संबोधित करताना म्हटले होते की, हे लोकांनो ! आमचा तुमच्यावर हक्क आहे की आमच्या पश्चात आमचे हितचिंतक  रहा आणि नेकीच्या कामात आम्हाला मदत करा. (मग म्हणाले) हे शासन यंत्रणेतील लोकांनो ! शासकाची सहनशीला आणि त्याच्या नरमीपेक्षा जास्त लाभदायक आणि अल्लाहला प्रिय  दूसरी कोणतीच सहनशीलता नाही. त्याचप्रमाणे शासकाच्या भावनाशील आणि चुकीच्या पद्धतीने काम करण्यापेक्षा जास्त नुकसान दायक व तिरस्करणीय दूसरी कोणतीही भावनाशीलता  व दुव्यवस्था नाही.’’ (किताबुल खिराज).
वरील हदीसमधील विचार राजकीय लोक, जनता आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने आत्मसात करून वाटचाल केली तर निश्चितच प्रगती होणे दूर नाही.

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget