‘आसिफजाही’ आणि’ तिहेरी तलाक’ पुस्तकांचे प्रकाशन सोहळा संपन
पुणे : (शोधन सेवा)
इतिहास हे त्या-त्या समाजाचा आणि त्या घटकाची ओळख असते. त्याला विसरता येत नाही, जो इतिहास विसरतो त्याचे अस्तित्व शिल्लक राहत नाही. इतिहास का प्रत्येकांच्या घरचा पत्ता असतो, जो पत्ता विसरला त्याला घरी जाता येत नाही, त्यामुळे प्रत्येकांनी आपला इतिहास लक्षातच ठेवायला हवा, असे विधान प्रसिद्ध सहित्यिक डॉ. असगर वजाहत यांनी पुण्यात काढले. २ डिसेंबर २०१९ला (सोमवारी) पुण्यात गाजिय़ोद्दीन रिसर्च सेंटरच्या ‘आसिफजाही-खंड-१’ आणि ‘तिहेरी तलाक’ या सरफराज अहमद आणि कलीम अजीम संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डॉ. असगर वजाहत व डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते पार पडला. डॉ. के. जी. पठाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. असगर वजाहत यांनी सत्ताधारी भाजप सरकार व त्याच्या इतिहासाच्या धोरणावर टीका केली. मध्ययुगीन इतिहासाचे संशोधन गांभीर्याने झाले पाहिजे. केवळ संसोधन करून चालणार नाही तर त्याचे वस्तुनिष्ठ आकलनही योग्य पद्धतीने झाले पाहिजे. इतिहासाचे आकलन न झाल्याने गैरसमज वाढीला उत्तेजन मिळते व त्यातून नवे वाद निर्माण होतात. वाचकांपुढे चुकीचा इतिहास आणला जातो, त्याविषयी वाचकांची समज वाढविण्याची गरज आहे, असेही डॉ. वजाहत म्हणाले. तिहेरी तलाकवर बोलताना त्यांनी भाजप सरकारच्या धोरणावर टीका केली. मुसलमान महिलांना निवडून न्याय देता येत नाही, न्याय सर्वांसाठी समान असला पाहिजे, न्यायाच्या नावाने कुटुंबाचे उद्ध्वस्तीकरणही बरोबर नाही, सरकारच्या तिहेरी तलाक रद्द करणाऱ्या विधेयकांने प्रश्न सोडवले नसून नवे आव्हाने उभी केली आहेत, असेही ते म्हणाले.
पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. राजा दीक्षित यांनी निजाम राजवटीमधील गैरराजकीय इतिहास बाहेर येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. नेहमी राजवटीच्या वाईट बाजू बाहेर काढल्या जातात, सकारात्मक बाबींवरही प्रकाश टाकला पाहिजे, आसिफजाही ही गरज पूर्ण करते. कुठल्याही राजवटीचा इतिहास लिहिताना दोन्ही बाजूने लिहावा, तो एकांगी होता कामा नेय असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरफराज अहमद यांनी गाजियोद्दीन रिसर्च सेंटरच्या इतिहास लेखनामागची भूमिका बोलून दाखवली. वस्तुनिष्ठ इतिहास लिहिण्याची परंपरेचा प्रयोग म्हणून आसिफजाही राजवटीच्या इतिहास संकलित करण्याची सुरुवात केल्याचे ते म्हणाले. तिहेरी तलाक संदर्भात कलीम अजीम यांनी आपली भूमिका मांडला ते म्हणाले, ‘तिहेरी तलाकबद्दल खूप बोलले गेले; पण प्रश्न जिथे होते, तिथेच आहेत.
तलाकवर टीका करताना इस्लामी प्रथांचे विकृतीकरण करून मांडले गेले. मुस्लिमेत्तर घटस्फोटांचे प्रमाण ६८ टक्के आहे. तर मुस्लिमांमधील घटस्फोटांचे प्रमाण २३ टक्के आहे; पण चर्चा तलाकची अधिक केली जाते. गेल्या चार-पाच वर्षांतील तिहेरील तलाक संदर्भात अकादमिक मंडणी झालेले लेख संकलित करून हे पुस्तक तयार केल्याचे ते म्हणाले. तलाक प्रश्नाआड इस्लामचे व मुसलमानांचे शत्रुकरण करण्याची प्रक्रिया रोखली जावी, या उद्देशाने हे पुस्तक तयार केल्याचे ते म्हणाले. गाजियोद्दीन रिसर्च सेंटरकडून प्रकाशित झालेली ही दोन पुस्तके महत्त्वाची असल्याचे डॉ. के. जी. पठाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले. मुसलमानांचा इतिहास, त्यांचे राजकारण व सामाजिक विषयावर सेंटरने महत्वाचे कार्य केले असून येणाऱ्या काळात अधिक चांगल्या प्रकारे काम अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. मुसलमानांचा इतिहास व सामाजिक शास्त्रावर लिहिताना तो एकांगी होता कामा नये, असेही ते म्हणाले. मुस्लिम अकादमी, युवक क्रांती दल यांच्या तर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. घोले रोडवरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात हा सोहळा झाला. संदीप बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जांबुवंत मनोहर (राज्य संघटक, युक्रांद) यांनी प्रास्ताविक केले. सभागृहात शब्द प्रकाशनचे येशू पाटील, कॉ. सुबोध मोरे, डायमंड प्रकाशनचे दत्तात्रय पाष्टे, सामाजिक कार्यकत्र्या रझिया पटेल आदी मान्यवर हजर होते.
Post a Comment