Halloween Costume ideas 2015

ज्ञानाला हत्यार नव्हे तर विजेरी बनवा

lantern
जगामध्ये अनेकजण ज्ञानाचा उपयोग हत्यारासारखा करतात. आपल्याला नशीबाने प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या बळावर अज्ञानी लोकांचे शोषण करतात. त्यात त्यांना वाईटही वाटत नाही. ज्यांना ज्ञान नाही त्यांना तुच्छ लेखतात. स्वतः ज्ञानी असल्याचा गर्व बाळगतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अशा प्रवृत्तीवर सक्त नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी अज्ञानी समुहांना आपल्याला प्राप्त असलेले ज्ञान मोफत देण्याचे आदेश दिलेले आहेत. आज कोट्यावधी रूपये घेऊन जे ज्ञान देण्यात येते चुकीचे असून, ज्ञानावर सर्वांचाच अधिकार आहे ते मोफत असायला हवे. एवढेच नव्हे तर ते छोटे-छोटे सामाजिक गट मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांचा उत्साह वाढविण्याचेही आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिलेले आहेत. आपल्या सर्वांना त्यांच्या या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
    कल्पना करा की, आपण मोठे आहात, लहान भाऊ, बहिणींना उपदेश देण्याचा हक्क आपला आहे. तसेच त्यांची काळजी वाहण्याचे कर्तव्यही आपले आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाला शक्ती समजून त्या शक्तीच्या बळावर दुसर्‍यांना रोखणे, त्यांचा पाणउतारा करणे हे सभ्यपणाचे लक्षण नव्हे. उलट अशी कृती करणे इस्लामच्या दृष्टीने गुन्हा आहे. ज्ञान शक्ती जरूर आहे मात्र बोलतांना आणि दुसर्‍यांच्या चुका दुरूस्त करतांना विनयशीलता आवश्यक आहे. प्रेषित सल्ल. यांची कृती अशी आहे की, ते ज्यांना संबोधित करत किंवा ज्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांच्याशी अतिशय प्रेमाने आणि विनयशिलतेने बोलत. त्यांनी कधीच अशा लोकांना कमी लेखलेले नाही किंवा त्यांचा उपमर्द केलेला नाही. त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणताना जे ज्ञान प्रेषितांनी त्यांना दिले ते अतिशय प्रेमभावनेने दिले. त्यामागे त्या लोकांचे उत्कर्ष घडवून आणणे हाच एकमेव हेतू होता.
    खरा ज्ञानी तोच असतो जो ज्ञानदान करत असतांना ज्ञान ग्रहण करणार्‍यावर आपले मोठेपण लादत नाही. डोळे वटारून दिले गेलेले ज्ञान ज्ञानार्जन करणार्‍याच्या मनामध्ये ज्ञान देणार्‍याच्या विषयी कलुषित भावना उत्पन्न करते. ज्ञानाचे अवास्तव प्रदर्शन करणार्‍याला अल्लाह कधीच पसंत करत नाही. इस्लाममध्ये स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी हस्तगत केलेल्या  ज्ञानाला चांगले समजले गेलेले नाही. खरा ज्ञानी तोच जो आपल्या वडिलधार्‍यांच्या अनुभवाचीही कदर करतो.
    अल्लाहच्या कृपेने प्राप्त झालेल्या ज्ञानाला हत्यार बनविण्यापेक्षा त्याची विजेरी बनवा आणि प्रेषित सल्ल. यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या विजेरीचा उपयोग करून लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करा. तेव्हा पहा लोक तुमच्याशी जोडले जातील. तुमच्या सोबत बसण्यामध्ये लोकांना आनंद मिळेल. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांशी प्रेमाने वागा. तुमचं प्रेम आणि करूणा त्यांना जाणवेल इतपत स्पष्ट असावी. तुम्ही जर कठोरपणे वागाल तर त्यांच्यामध्ये तुमच्यापासून दूर जाण्याची भावना निर्माण होईल आणि ते दूर जातील. त्यामुळे ते ज्ञानापासून वंचित राहतील. त्यांच्या काही चुका असतील तर त्यांना त्या अशा सकारात्मक पद्धतीने निदर्शनास आणून द्या की त्याचे त्यांना वाईट वाटणार नाही. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या उणीवांची कुठेच चर्चा करू नका.
    स्वतःविषयी अहंकार बाळगणे अतिशय वाईट आहे. इस्लाममध्ये तर तो गुन्हाच आहे. ही बाब श्रद्धा कमकुवत असल्याची निशाणी आहे. निर्विवादपणे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. हे लक्षात ठेवूनच आपल्याला आयुष्याची वाटचाल करावी लागेल. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. हाच दृष्टीकोन माणसाला आपण कायम अपूर्ण असल्याची जाणीव करून देत राहतो व त्यातून माणसात अहंकार निर्माण होत नाही. शेवटी एवढेच म्हणावेशे वाटते की ज्ञानाला हत्यार बनवून दुसर्‍यांचे शोषण करण्यापेक्षा त्याची विजेरी बनवून दुसर्‍यांचे आयुष्य प्रकाशमान करा. हीच यशाची गुरूकिल्ली आहे.

- फेरोजा तस्बीह -9764210789

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget