महाराष्ट्रात महिनाभर सुरू असलेले सत्तानाट्याचा समारोप सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे झाला. सत्तालंपटांनी स्वहस्तेच आपले सत्तापालट घडवून पायउतार झाले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली. महिनाभर जमलेले ना ना शंकांचे ढग एका आदेशाने दूर झाले. सुप्रीम कोर्टाचा हा आदेश एका अर्थाने मास्टर स्ट्रोकच होता. या स्ट्रोकने महिनाभर सुरू असलेल्या वेगवेगळ्या ऑपरेशनचा निकाल लागला. त्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यावर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्यासह भाजपावर मोठी टीका झाली होती. त्याची दखल घेत भाजपाने विरोधात लढलेल्या आपल्या मित्रपक्ष शिवसेनेला थोडे बॅकफूटवर जात सत्तेत सहभागी करून घेतले. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी आणि पवारांना टार्गेट करून भाजपाने राजकारण केले. असे असताना आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यास काही तास उरलेले असताना राज्याच्या हिताचे कारण देत थेट अजित पवार यांच्यासोबत रातोरात फडणवीसांनी शपथविधी आटोपला. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी व भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात जे रात्रीचे नाट्य घडले, त्यातून भाजप सत्तेसाठी किती उतावीळ झाला होता, याचेच दर्शन साऱ्या देशाला घडले. वाट्टेल ते करू पण सत्ता आमचीच, हा भाजपचा मंत्र आहे. केंद्रात आमचे सरकार आहे, राज्यपाल व राष्ट्रपती आमच्याच विचारधारेचे आहेत, तेव्हा दुसऱ्या कोणाला सरकार स्थापन करून देण्याची आम्ही संधी देणारच नाही, अशी अटकळ भाजपने बांधली असावी. मात्र अपेक्षेप्रमाणे अल्पमतात आल्यामुळे अतिअल्पकाळातच हे सरकार कोसळले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार १४ दिवसांत कोसळल्याची जितकी चर्चा आजवर झाली, त्याहूनही अधिक चर्चा फडणवीसांच्या या औट घटकेच्या सरकारची होणार आहे. एकाच महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा दोन वेळा राजीनामा देण्याचा विक्रम फडणवीस यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी आणि गुप्त मतदानाऐवजी या चाचणीचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असा निकाल दिल्यानंतर काही तासातच फडणवीस आणि अजितदादांनी राजीनामा देत आपला पराभव उघडपणाने मान्य केला. राजीनामा देताना आणि दिल्यानंतरही भाजपातील अनेकांनी या सर्वांचे खापर शिवसेनेच्या माथी फोडत स्वत:ची फसलेली चाल झाकण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकांच्या आधीपासूनच २०२४ पर्यंत आपण सत्तेत आहोत अशा आविर्भावात वावरणाऱ्या भाजप नेत्यांची अवस्था हाती धुपाटणे आले अशी झाली आहे. भाजपा हटाव या सूत्रावरून त्यांच्यातील एकीचे बळ आता वाढलेले दिसत आहे. राष्ट्रपती राजवट हटविण्यात आल्यानंतर घटनात्मक तरतुदींचा, राज्यपालांच्या अधिकारांचा आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा बराच किस पाडला गेला. अजितदादांनी टाकलेला डाव पलटवून टाकताना शरद पवारांनी एका बाजूला राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावतानाच दुसऱ्या बाजूला सर्व कायदेशीर-घटनात्मक बाबींची माहिती घेऊन व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली होती. सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी खुलेपणाने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यामुळे पवारांचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांना आपला डाव फसल्याची जाणीव झाली. त्यामुळेच फडणवीसांच्या उतावीळ सरकारची मृत्यूघंटा वाजवली. या सत्तानाट्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर होणार आहेत. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणे ही बाब भारतीय जनता पक्षासाठी सणसणीत चपराक असणार आहे. भाजपच्या सत्तानाट्यामुळे घट्ट झालेले बंध पाच वर्षे कायम टिकले तर २०२४ च्या देशपातळीवरील राजकारणावर याचे परिणाम होतील. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपासोबत असलेल्या पक्षांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेसारखीच भूमिका इतर पक्षांनी घेतल्यास भाजपासाठी ती डोकेदुखी ठरणार आहे. एकूणच राज्यातील राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांत भाजपद्वारे घडलेल्या घटनांचे वर्णन केवळ अतक्र्य, अनाकलनीय आणि अनुचित असेच करावे लागेल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या विरुद्ध एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (इडी)ची नोटीस पाठवणे ही भाजपची सर्वांत मोठी चूक होती. ज्या अजित पवारांच्या नावे पाच वर्षे भ््राष्ट म्हणून ओरड केली, त्यांच्यापेक्षा मोठा भ््राष्टाचारी कोणी नाही, असं म्हणत ज्यांच्या विरुद्ध तपासणी सुरू केली त्यांच्यावरच भाजपने विश्वास ठेवला आणि स्वत:वर नामुष्की ओढवून घेतली. आपापसांतील मतभेद मिटवत एकत्र येत आपल्या विरुद्ध लढण्याची संधी भाजपने या तीन्ही पक्षांना दिली. मतभेद विसरून एकत्र येण्याखेरीज या पक्षांकडे दुसरा पर्यायच नव्हता, कारण हा त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न होता. महाराष्ट्रात जे काही घडले त्यासाठी फडणवीसांबरोबरच भाजपचे राष्ट्रीय नेतृत्त्वही तितकेच जबाबदार आहे, याचे परिणाम आगामी काळात त्यांना निश्चितच भोगावे लागतील.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment