Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(४४) आम्ही तौरात हा ग्रंथ अवतरला ज्यात मार्गदर्शन व प्रकाश होता. सर्व नबी (पैगंबर) जे मुस्लिम होते त्याला अनुसरून या यहुदी७२ लोकांच्या सर्व बाबींचा निर्णय देत असत. आणि  याचप्रकारे रब्बानी (धर्मपंडित) आणि अह्बार (धर्मशास्त्री)७३ देखील (याआधारे निर्णया देत असत.) कारण त्यांना अल्लाहच्या ग्रंथाच्या संरक्षणाचे जबाबदार बनविण्यात आले होते व यावर ते साक्षी होते. म्हणून (हे यहुदी लोकहो!) तुम्ही लोकांना भिऊ नका तर माझे भय बाळगा आणि माझी संकेतवचने क्षुल्लक मोबदल्यात विकणे सोडून द्या. जे लोक अल्लाहच्या  अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करीत नसतील तेच अधर्मी होत.
(४५) तौरातमध्ये आम्ही यहुदी लोकांसाठी हा आदेश लिहिला होता की प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्यासाठी डोळा, नाकासाठी नाक, कानाबद्दल कान, दाताबद्दल दात आणि सर्व  जखमांबद्दल बरोबरीचा बदला.७४ मग जो किसास (मृत्युदंड) ऐवजी दान (सदका) करील तर तो त्याच्यासाठी पापक्षालन (कफ्फारा) होय.७५ आणि जे लोक अल्लाहद्वारे अवतरित  केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करत नसतील तेच अत्याचारी होत.
(४६) मग आम्ही त्या पैगंबरानंतर मरयमपुत्र इसाला पाठविले. तौरातपैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध होते, तो त्याची सत्यता प्रमाणित करणारा होता. आणि आम्ही त्याला ‘इंजिल’  (नवा करार) प्रदान केले ज्यात मार्गदर्शन व दिव्य प्रकाश होता आणि तो ग्रंथदेखील तौरातपैकी जे काही त्या काळी उपलब्ध होते त्यातील सत्य प्रमाणित करणारा होता७६ तसेच त्यात  अल्लाहचे भय बाळगणाऱ्या लोकांसाठी पुरेपूर मार्गदर्शन व उपदेश होता.
(४७) आमची आज्ञा होती की इंजिलधारकांनी या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करावा जो अल्लाहने त्यात अवतरित केला आहे, व जे लोक अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्याला  अनुसरून न्यायनिवाडा करीत नसतील तेच फासिक (अवज्ञा करणारे) होत.७७


७२) येथे संकेत त्या सत्याकडे असून सचेत केले गेले आहे की सर्व पैगंबर हे मुस्लिम (अल्लाहचे आज्ञाधारक) होते. याविरुद्ध हे यहुदी `इस्लाम' (ईशआज्ञापालन) पासून दूर होऊन आणि भेदाभेद वर्तनामध्ये गुरफटून फक्त यहुदी बनून राहिले होते.
७३) `रब्बानी' म्हणजे धार्मिक विद्वान (उलेमा) आहे. `अह्बार' म्हणजे धार्मिक विधिवेत्ता (फुकहा) आहे.
७४) तुलनेसाठी पाहा बायबल (जूनाकरार) ग्रंथ `निर्गमन' अध्यायन २१:२३-२५
७५) म्हणजे जो मनुष्य दान स्वरुपात बदला घेणे माफ करतो त्याच्यासाठी हे पुण्य त्याच्या अनेक अपराधांचे प्रायश्चित बनेल. याच अर्थाने पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,  ``ज्याच्या देहात काही घाव लागला आणि त्याने क्षमा केली तर ज्या श्रेणीची ती क्षमा असेल त्याचप्रमाणे त्याचे अपराध माफ केले जातील.
७६) म्हणजे इसा (अ.) नवीन धर्म घेऊन आले नाहीत तर तोच एक दीन (धर्म) जो पूर्वींच्या सर्व पैगंबरांचा धर्म होता. तोच धर्म इसा (अ.) यांचाही होता. त्याच जीवन धर्माकडे (दीन) ते   जगाला आवाहन करीत होते. तौरातच्या मौलिक शिकवणीनुसार त्यांच्या काळात जी शिकवण सुरक्षित होती, त्यांना इसा (अ.) स्वत:मानत होते आणि बायबलसुद्धा त्या शिकवणींची  पुष्टी करत होता. (पाहा, मत्ती, ५:१७-१८) कुरआन या सत्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे की, अल्लाहने जगात जिथे कोठे पैगंबर पाठविले त्यांच्यापैकी कोणीही त्यांच्या मागील पैगंबरांचे  खंडन करण्यासाठी आले नव्हते. आणि त्यांच्या कार्याला नष्ट करून आपला नवा धर्म स्थापण्यासाठीही आलेले नव्हते. प्रत्येक पैगंबर आपल्या मागील पैगंबरांची पुष्टी करीत होता आणि  त्यांच्याच कार्याला पुढे चालविण्यासाठी येत होता. या पवित्र कार्याला मागील पैगंबरांनी एक पवित्र वारसा म्हणून आपल्या मागे सोडले होते. याचप्रमाणे अल्लाहने आपला एखादा ग्रंथ  मागील ग्रंथांचे खंडन करण्यासाठी अवतरित केला नव्हता तर अल्लाहचा प्रत्येक ग्रंथ हा त्याच्या मागील ग्रंथांचे समर्थन करण्यासाठी व पुष्टी करण्यासाठी अवतरित होत होता.
७७) येथे अल्लाहने त्या लोकांसाठी जे अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसार निर्णय देत नसत, त्यांच्यासाठी तीन आदेश  दिले होते. एक म्हणजे ते काफीर (द्रोही) आहेत. दुसरे म्हणजे ते अत्याचारी आहेत. तिसरे म्हणजे ते अवज्ञाकारी आहेत. याचा स्पष्ट अर्थ होती की जो मनुष्य अल्लाहचा आदेश आणि त्याच्या अवतरित कायदेसंहिताला सोडून स्वत: किंवा  इतर मनुष्यांनी बनविलेल्या कायद्यानुसार निर्णय घेतो तो खरे तर तीन प्रकारचे मोठे अपराध करीत राहातो.
(१) प्रथम म्हणजे त्याचे हे कार्य अल्लाहच्या आदेशाला नाकारण्यासारखे आहे आणि हे सत्याला नाकारणारे आणि अधर्म (कुफ्र) आहे. (२) दुसरा म्हणजे त्याचे हे कार्य न्याय आणि  प्रतिष्ठेविरुद्ध आहे कारण ठीक ठीक न्यायसंगत जो आदेश आहे तो तर अल्लाहने दिलेला आहे. म्हणून जेव्हा अल्लाहच्या आदेशापासून दूर जाऊन त्याने निर्णय दिला तर त्याने   अत्याचार केला. (३) तिसरे म्हणजे दास असूनसुद्धा जेव्हा तो आपल्या स्वामीने निर्मित केलेल्या कायद्यांशी विमुख होऊन स्वत:चा किंवा दुसऱ्याने तयार केलेल्या कायद्याला लागू  करतो तर वास्तविकपणे तो भक्ती आणि आज्ञापालनाच्या सीमेबाहेर पडला. हीच अवज्ञा आहे (फिस्क). हे कुफ्र, जुल्म आणि फिस्क (द्रोह, अत्याचार आणि अवज्ञा) स्वभाविकपणे  अनिवार्यता ``अल्लाहच्या आदेशापासुन विमुख होणे आहे.'' हे असंभव आहे की जिथे विमुखता आहे तिथे या तिन्ही वस्तू आढळणार नाहीत. ज्याप्रकारे या विमुखतेच्या श्रेणीमध्ये फरक  असेल त्याप्रमाणे या तिन्ही श्रेणीत फरक आहे. जो कोणी अल्लाहच्या आदेशाविरुद्ध यासाठी न्याय देतो की तो अल्लाहच्या आदेशांना चुकीचे आणि स्वत:च्या किंवा इतरांच्या आदेशांना  योग्य मानतो असा मनुष्य पूर्णत: काफीर (विधर्मी) अत्याचारी आणि अवज्ञाकारी असतो. परंतु जो मनुष्य श्रद्धाशीलतेने अल्लाहच्या आदेशांना सत्य मानतो परंतु व्यावहारिकतेत  त्याच्याविरुद्ध वागतो. असा मनुष्य मुस्लिम समुदायापासून वेगळा होत नाही. परंतु आपल्या ईमानला कुफ्र (विद्रोह), जुल्म (अत्याचार) आणि फिस्क (अवज्ञा) यांच्याशी मिसळत असतो.  याचप्रमाणे ज्याने आपल्या सर्व जीवनव्यवहारात अल्लाहच्या आदेशापासून विमुखता धारण केली, तो जीवनाच्या सर्व क्षेत्रांत काफीर (विद्रोही), जालिम (अत्याचारी) आणि फासिक  (अवज्ञाकारी) आहे. जो एखाद्या जीवनक्षेत्रात अल्लाहचा आज्ञापालक आहे आणि बाकीच्या क्षेत्रांत त्यापासून विमुख आहे. अशा मनुष्याच्या जीवनात ईमान व इस्लाम आणि द्रोह आणि  अत्याचार, अवज्ञाचे मिश्रण असते. हे मिश्रण त्याच प्रमाणात असते ज्या प्रमाणात त्याने आपल्या जीवनव्यवहारात आज्ञापालन व विमुखता यांचे मिश्रण केले असेल. कुरआनच्या काही  टीकाकारांनी या आयतींना तर ग्रंथधारकासाठी खास करण्याचे प्रयत्न केले आहे. परंतु ईशवाणीच्या शब्दांमध्ये अशाप्रकारचे अर्थनिर्धारण करण्यासाठी काहीच वाव नाही. या अर्थनिर्धारणाचे  खरे उत्तर आहे जो माननीय हुजैफा (रजि.) यांनी दिला आहे. त्यांच्याशी कोणीतरी विचारले की या तिन्ही आयतीं तर बनीइस्राईलींशी संबंधीत आहेत. यावर माननीय हुजैफा (रजि.)  म्हणाले, ``किती चांगले बंधू आहेत तुमच्यासाठी हे बनीइस्राईली! की कडूकडू सर्व त्यांच्यासाठी आहे आणि गोडगोड सर्व तुमच्यासाठी आहे. कस्रfप नाही, खुदाची शपथ! तुम्ही यांच्याच  पद्धतीने चालू लागाल.''

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget