Halloween Costume ideas 2015

दसरा,दिवाळी आणि जिहाद

मला माहीत आहे की माझ्या लेखाचे शीर्षक वाचूनच वाचकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण मला विश्वास आहे की लेख पूर्ण वाचल्यानंतर आपल्या मनात डोकावलेल्या प्रश्नांची  समाधानकारक उत्तरे आपणास मिळतील. भारत हा विविध धर्म व परंपरांनी नटलेला देश आहे. सर्व आबालवृद्धांमध्ये सणाच्या दिवशी आनंद व उत्साहाची लहर असते. हा एक भाग  झाला. पण सण साजरे करण्यामागचा खरा उद्देश असतो की त्या सणाशी निगडीत इतिहास जाणून घेणे व त्यामधून मिळणारी शिकवण, बोध आत्मसात करणे.
१. रामाने रावणाचा वध केला. या विजयास्तव दसरा सण साजरा केला जातो. म्हणजेच कुकर्मावर सत्याचा व हक्काचा विजय, हा बोध हा सण साजरा करण्यामागे असतो.
२. मातृइच्छेला मान देऊन बारा वर्षांचा वनवास संपवून, रावणाचा पराजय करून राम स्वदेशी परतले. या आनंदास्तव दिवाळी साजरी केली जाते.
३. श्रीकृष्णाने जुलमी राक्षस नरकासूराचा वध करून आपल्या बंदिवासात असलेल्या सोळा हजारांपेक्षा अधिक स्त्रियांना मुक्त केले. नरक चतुर्थी साजरी करण्यामागचा हा इतिहास आहे.   म्हणजेच कृष्णाने स्त्रीसन्मान व स्त्रीहक्कांसाठी दिलेला लढा हा या सणामधून मिळणारा बोध आहे.
४. कार्तिक आमावस्येच्या दिवशी पांडव बारा वर्षांच्या अज्ञातवासातून परतले होते आणि त्यांच्या स्वागतास्तव दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर महाभारत घडले.
आपल्याच लोकांना युद्धभूमीवर पाहून धनुष्य खाली ठेवलेल्या अर्जुनाला अन्यायाविरूद्ध लढणे का व कसे आवश्यक आहे हे कृष्णाने केलेले प्रबोधन हाच महाभारताचा गाभा आहे.  म्हणजेच हक्कासाठी व सत्य स्थापनेसाठा rलढणे आवश्यक आहे. हा बोध या सणामधून मिळतो.
५. लक्ष्मीपूजन या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून लक्ष्मीला बळी राजाच्या तावडीतून सोडविले होते. म्हणजे स्त्री अस्मितेसाठी तढा देणे हा बोध यामागे आहे.
६. राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक देखील याच दिवसांत झाला होता. विक्रमादित्य हे जनतेची काळजी घेणारे व शत्रूंशी लढणारे शूर राजा होते. म्हणजेच सामान्य जनतेसाठी शत्रूशी  लढणे महान कार्य आहे हा बोध या उत्सवातून आम्हाला मिळाला.
वरील सर्व इतिहास आणि आख्यायिका वाचल्यानंतर आम्हास समजते की दसरा व दिवाळी हे सण साजरे करण्यामागे ‘सत्याचा असत्यावर विजय’ हा मतितार्थ आहे. म्हणजे दसरा,  दिवाळी साजरी करण्यामागचा उद्देश ‘जिहाद’ होता, असे जर का मी म्हटले तर ते कानांना ऐकण्यासाठी खूप जड जाते. पण हे योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपण  प्रथम ‘जिहाद’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊ या. कारण दुर्दैवाने आमच्यासमोर जिहादची खूप चुकीची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. कुरआनच्या परिभाषेत जिहादचा अर्थ होतो   ‘अन्यायाविदूद्ध लढा देणे, स्वत:मधील व समाजामधील वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.’
जिहाद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे नैतिक जिहाद, आध्यात्मिक जिहाद, रक्षणात्मक जिहाद, वंशभेदविरोधी जिहाद, अन्यायाविरूद्ध जिहाद, सेवात्मक जिहाद इ.  स्वत:पुरते मर्यादित न राहता सर्व समाजाचे भले व्हावे यासाठी पुढाकार घेणे याला ‘जिहाद’ म्हणतात.
म्हणजे अन्यायाविरूद्ध लढा देणे हे स्वत: श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, तर इस्लामी व्याख्येत तो जिहादच झाला. किंवा परस्त्रीवर हात घालणाऱ्या रावणाचा जेव्हा राम अंत करतो, तर  हाही जिहादच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले, स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविला, दारूला हराम केले, व्याजाला हराम केले, असत्याविरूद्ध युद्धे लढली,  हा सर्व जिहादच होता.
जवळच्या भूतकाळात जायचे झाले तर म. गांधी, मौ. आझाद यांच्यासह इतर भारतीयांनी इंग्रजांविरूद्ध दिलेला स्वातंत्र्य लढा हादेखील जिहादच आहे. सध्याच्या काळातील उदाहरण  द्यायचे झाले तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, मेधा पाटकर यांचे वंचितांसाठी लढा देणे हा जिहाद आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा जिहाद आहे.  दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेला प्रयत्न जिहाद आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे आपणास अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या महान व्यक्तींची देता येतील.

जिहाद समजून घ्या
‘जिहाद’ म्हणजेच  अन्यायाविरूद्ध लढणे ही जर का चांगली गोष्ट आहे तर मग जिहादला तलवार व रक्तपात या व्याखेशी का जोडले गेले आहे? याचे उत्तर आहे कुरआनचे अर्धवट  ज्ञान! म्हणजे बघा कुरआनमध्ये म्हंटले आहे, ‘‘युद्ध करणे जरी तुम्हाला नापसंत असले तरी ते तुमचे कर्तव्य आहे.’ (अध्याय २, श्लोक २१६)
हा श्लोक वाचल्यानंतर वाचकाला शंका येते की शांतीचा संदेश देणाऱ्या कुरआनात लढायची गोष्ट का येते? आणि मग वाचक याचा अभ्यास करण्याऐवजी इस्लाम धर्माला वाईट समजू  लागतो. खरे पाहता कुरआनमध्ये जिहादचा आदेश तेव्हाच येतो जेव्हा सत्य व हक्काला दाबून असत्यावर चालणाऱ्या अत्याचारी लोकांचा बिमोड करणे आवश्यक असते. आता असाच  एक श्लोक महाभारतात आहे, ‘‘कृष्ण अर्जुनाला म्हणतो की- अन्यायाविरूद्ध लढणे, शस्त्र उचलणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे.’’ आता या दोन्ही श्लोकांमध्ये केलेले संबोधन एकच आहे.  म्हणजेच कोणाला उगाचच मारणे वा नुकसान पोहचविणे शंभर टक्के चुकीचे आहे. पण पोलिसांनी चोराला पकडणे, गुन्हेगाराला बंदुकीचा धाक देणे, गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने फाशीची  शिक्षा सुनावणे योग्य आहे की अयोग्य? रस्त्यात एकट्या मुलीला छेडणाऱ्या टोळक्याला शक्तीचा वापर करून पळविणे योग्य की अयोग्य? अर्थातच योग्य आहे. नाही तर वाईट  प्रवृत्तींना समाजात आणखी बळ मिळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागेल. कुरआनमध्ये अशा वाईट गोष्टींना ‘फसाद’ असे संबोधले आहे आणि अशा फसादींना  रोका म्हणजे जिहाद करा, असे सांगितले आहे. यासाठी तुमच्या वाणीचा उपयोग करा, समजवा, कायद्याचा उपयोग करा, तुमच्या हातांनी रोका, असे सांगितले आहे. या तुमच्या सर्व  सामूहिक प्रयत्नांना ‘जिहाद’ असे म्हटले गेले आहे.

गैरसमजांची कारणे-
१, प्रसारमाध्यमे- ‘इस्लाम व मुस्लिमांबद्दल शक्य तितके वाईट दाखवा आणि टी.आर.पी. वाढवा’ हे साधे समीकरण आज झाले आहे. कोणतेही चॅनेल उघडा हाच मुद्दा पुन्हा पुन्हा  चघळून तुमच्यासमोर सादर केला जातो आणि त्या आधारे माध्मयांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत.
२. इस्लामोफोबिया- जगात सर्वाधिक जोमाने पसरणारा धर्म म्हणजे इस्लाम होय. याची पडताळणी आपण कोठेही करू शकता. मग या धर्माला रोखण्यासाठी विरोधकांकडून निर्माण  केलेले वैचारिक षङ्यंत्र म्हणजे इस्लामोफोबिया. यामागे पूर्वग्रहावर आधारलेली इस्लामविषयी असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ‘इस्लामोफोबिया’  पसरत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ‘फोबिया' या शब्दाचा अर्थ आहे अतिशयोक्त, नीटपणे मांडता न येणारी व तर्कशुद्ध नसणारी भीती. कोणत्याही बुद्धिनिष्ठ, तर्कसुसंगत  कारणाशिवाय एखाद्या गोष्टीविषयी माणसाला सतत भीती वा संशय वाटत राहिला, तर त्याला 'फोबिया' म्हणतात.
३. खनिज तेल साठे- तिसरे कारण म्हणजे मुस्लिम देशांकडे असलेले तेलसाठे. त्यावर कब्जा करण्यासाठी स्वत:ला महापॉवर म्हणविणाऱ्या देशांकडे कारण हवे होते. मग जिहादी टोळ्यांची उपज करून त्यांना जेरीस आणण्याचा बू करून, युद्धे लादून तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळविणे हा या तथाकथित महाशक्तींनी उद्देश साध्य करून घेतला.

हा जिहाद नव्हे-
दाढी व टोपी धारण केलेल्या दहशतवाद्यांनी सामान्य लोकांवर केलेला गोळीबार.
‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन गोरक्षेच्या नावाखाली सामान्य माणसांची केलेली हत्या.
श्रीलंकेतील चर्चमध्ये खिश्चन बांधवांवर झालेला भ्याड हल्ला.
न्यूझिलंडच्या मस्जिदीमध्ये नमाजींवर झालेला क्रूर हल्ला.
ही सर्व उदाहरणे जिहाद नव्हे. निरपराधांना मारणे जिहाद होऊच शकत नाही. कुरआनात स्पष्ट सांगितले आहे,
‘‘ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली त्याने पूर्ण मानवजातीची हत्या केली आणि ज्याने एका निष्पाप व्यक्तीला वाचविले, त्याने संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले. (मग ती व्यक्ती  कोणत्याही जातीधर्माची असो)’’ (अध्याय ५, श्लोक ३२)

जिहाद असा करा
पाचशे रुपयांचे जेवण व दारू मिळेल त्या राजकीय पक्षासाठी मोर्चे काढणे योग्य आहे का? एका नि:शस्त्र माणसाला शंभर-दोनशे जणांच्या जमावाने काठ्यांनी, दगडांनी, लाथाबुक्क्यांनी  जीव जाईपर्यंत मारणे वीरता आहे का? आजच्या तरुणपिढीला सांगावेसे वाटते की जिहाद करायचाच असेल तर खालील बाबतीत करा-

१) व्यसनमुक्त राहा आणि इतरांनाही व्यसनमुक्त करा.
२) शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना मदत करा.
३) अन्यायाविरूद्ध उभे राहा आणि लढा द्या.
४) गरीब, अनाथ, रुग्ण यांची शक्य तितकी मदत करा.
५) सत्यासाठी उभे राहा, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.
आज दसरा-दिवाळीच्या निमित्ताने ‘जिहाद’बद्दल असलेले आपले गैरसमज दूर झाले असतील असा मला विश्वास आहे.

- -मिनाज शेख, पुणे

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget