Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१७) नि:संशय कुफ्र (नकार) त्या लोकांनी केला ज्यांनी सांगितले की मरयमपुत्र मसीह हाच ईश्वर आहे.३९ हे नबी (स.)! त्यांना सांगा की जर अल्लाहने मरयमपुत्र मसीह आणि त्याची  आई तसेच पृथ्वीवरील सर्वांना नष्ट करू इच्छिले तर कोण त्याला या इराद्यापासून रोखू शकेल? अल्लाह तर पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आढळतात. तो जे काही इच्छितो सृजन करतो४० व त्याचे प्रभुत्व प्रत्येक वस्तूवर आहे.
(१८) यहुदी आणि खिस्ती सांगतात की आम्ही अल्लाहचे पुत्र व त्याचे लाडके आहोत. त्यांना विचारा, मग तो तुमच्या अपराधांकरिता तुम्हाला शिक्षा का देतो? खरे पाहता तुम्हीदेखील  तशीच माणसे आहात जशी इतर माणसे अल्लाहने निर्माण केली आहेत.तो ज्याला इच्छितो माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा देतो. पृथ्वी, आकाश आणि त्यात आqस्तत्वात  असलेल्या सर्व वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत आणि त्याच्याकडे सर्वांना परतावयाचे आहे.
(१९) हे ग्रंथधारकांनो! आमचा हा पैगंबर अशा वेळी तुमच्यापाशी आला आहे आणि धर्माची अशी सुस्पष्ट शिकवण तुम्हाला देत आहे - जेव्हा पैगंबरांच्या आगमनाचा क्रम एका  दीर्घकाळापासून बंद होता - ते अशाकरिता की तुम्ही असे सांगू नये की आमच्यापाशी कोणी शुभवार्ता देणारा आणि भय दाखविणारा आला नाही. तर पाहा, आता तो शुभवार्ता देणारा व   भय दाखविणारा आला आहे - आणि अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्वसंपन्न आहे.४१
(२०) आठवा, तो प्रसंग जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांना सांगितले होते की, ‘‘हे माझ्या बांधवांनो! अल्लाहची ती देणगी ध्यानात घ्या जी त्याने तुम्हाला प्रदान केली होती. त्याने  तुमच्यात नबी (पैगंबर) निर्माण केले. तुम्हाला सत्ताधारी बनविले आणि तुम्हाला ते सर्वकाही दिले जे या जगात कोणालाच दिले नव्हते.४२
(२१) हे माझ्या बांधवांनो! या पवित्रभूमीत दाखल व्हा जी अल्लाहने तुमच्याकरिता विधिपूर्वक बहाल केली आहे.४३ मागे फिरू नका नाहीतर अयशस्वी व निराश परताल.’’४४





३९) खिस्ती लोकांनी सुरवातीला इसा (अ.) यांच्या व्यक्तित्वाला मानवता आणि ईशत्वाचे मिश्रण दाखवून जी घोडचूक केली त्याची फलनिष्पत्ती इसा (अ.) त्यांच्यासाठी एक रहस्य  बनून राहण्यात झाली. या रहस्याला त्यांच्या धर्मविद्वानांनी शब्दजाळात आणि कल्पनाविलासाने जाणून घेण्याचा जितका प्रयत्न केला तितकेच ते आणखी भ्रमात पडत गेले.  त्यांच्यापैकी ज्यांच्या मनावर या मिश्रित व्यक्तिमत्त्वाच्या मानवअंशाचा प्रभाव होता, त्यांनी इसा (अ.) यांना खुदाचा बेटा (ईशपुत्र) आणि तीन ईश्वरांपैकी एक होण्यावर जोर दिला.   तसेच ज्या लोकांच्या मनावर ईशत्वाच्या अंशाचा मोठा प्रभाव पडला त्यांनी पैगंबर इसा (अ.) यांना अल्लाहचे शारीरिक प्रकटन समजून (अवतार) साक्षात ईश्वर बनवून टाकले आणि  पैगंबर इसा (अ.) यांना ईश्वर मानून त्यांची उपासना सुरु केली. या दोघांच्या मधला मार्ग ज्यांनी काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी शब्दजाळात फसून असे शब्दप्रयोग केले ज्यामुळे पैगंबर  इसा (अ.) यांना ईश्वर व मनुष्य दोन्ही समजण्यात येऊ लागले. अशाप्रकारे ईश्वर आणि मसीह (इसा) वेगवेगळेसुद्धा राहावेत आणि एकसुद्धा राहावेत. (पाहा कुरआन ४:१७१, टीप २१२,२१३,२१५)
४०) या वाक्यात एक सूक्ष्म संकेत आहे. फक्त इसा (अ.) यांचे चमत्कारिकरित्या जन्माला येणे आणि त्यांच्या नैतिक परिपूर्णतांना आणि साक्षात चमत्कारांना पाहून ज्यांनी त्यांना  ईश्वर ठरवून टाकले होते; ते लोक खरे तर नादान आहेत. पैगंबर इसा (अ.) तर अल्लाहच्या अगणित निर्मितीपैकी एक निर्मिती आहे ज्याला पाहून या दृष्टीदोष असलेल्या लोकांचे डोळे  विस्फारले गेले. या लोकांना व्यापक दृष्टी असती तर याना स्पष्ट दिसले असते की अल्लाहने यापेक्षासुद्धा अधिक चमत्कारिक निर्मिती केलेल्या आहेत. तसेच अल्लाहचे सामथ्र्य एका  मर्यादेत सीमीत नाही, याची त्यांना जाणीव झाली असती. म्हणून ही एक घोर अविचारी वृत्ती आहे की, सृष्टीच्या चमत्कारांना पाहून स्रष्टीलाच सृष्टा (निर्माता) समजून बसावे.  समजुतदार लोक तर ते आहेत जे सृष्टीच्या निशाण्यांमध्ये (चमत्कार) सृष्टीनिर्मात्या अल्लाह (स्रष्टा) च्या महान सामथ्र्याला पाहतात आणि त्यातून ईमानचा प्रकाश प्राप्त् करतात आणि आणखीन दृढ श्रद्धाशीलता धारण करतात.
४१) या प्रसंगी हे वाक्य अत्यंत भावपूर्ण आणि सूक्ष्म आहे. याचा अर्थ असासुद्धा होतो की अल्लाह शुभवार्ता आणि भयवार्ता देणारे पैगंबर पाठविण्याचे सामथ्र्य राखून होता. त्यानेच  आता पैगंबर मुहम्मद (स.) यांना जगात यासाठी पाठविले आहे. अल्लाह असे करण्याचे सामथ्र्य राखून आहे. दुसरा अर्थ होतो की जर तुम्ही शुभवार्ता आणि भयवार्ता देणाऱ्याचे म्हणणे  ऐकले नाही तर याद राखा की अल्लाह सामथ्र्यवान आणि बलशाली आहे. कोणतीही शिक्षा तो तुम्हाला विनाविलंब कधीही देऊ शकतो.
४२) हा संकेत आहे बनीइस्राईलच्या गतवैभवाकडे जे पैगंबर मूसा (अ.) यांच्या फार पूर्वीच्या काळात त्यांना प्राप्त् होते. एकीकडे पैगंबर इब्राहीम, इसहाक, याकूब आणि यूसुफ (अ.) असे  महान पैगंबर त्यांच्या वंशात जन्माला आले. दुसरीकडे पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या काळात आणि त्यानंतर बनीइस्राईलींना इजिप्तची पूर्ण सत्ता प्राप्त् झाली होती. बराच काळ सभ्य   जगाचे सर्वात मोठे शासक म्हणून हेच बनीइस्राईल लोक होते. इजिप्त् आणि त्याच्या लगतच्या प्रदेशात यांचा पूर्ण दरारा होता. सर्वसामान्यत: लोक बनीइस्राईलच्या उत्कर्षाचा इतिहास  पैगंबर मूसा (अ.) यांच्यापासून सुरू करतात. परंतु कुरआन येथे स्पष्ट करत आहे की बनीइस्राईलचा खरा वैभवाचा काळ हा पैगंबर मूसा (अ.) यांच्या पूर्वीचा काळ होता. या गत  वैभवाला स्वत: पैगंबर मूसा (अ.) आपल्या लोकसमुदायापुढे एक आदर्श काळ म्हणून सांगत होते.
४३) म्हणजे पॅलेस्टाईन (पॅलेस्टीन) ची भूमी जी पैगंबर इब्राहीम, इसहाक व याकूब (अ.) यांची जन्मभूमी होती, त्या काळी कट्टर अनेकेश्वरवादी आणि दृष्ट लोकांनी ती भूमी वसलेली  होती. बनीइस्राईल जेव्हा मिस्र (इजिप्त्) हून बाहेर पडले तेव्हा याच भूमीला अल्लाहने त्यांच्यासाठी नामांकित केले आणि आदेश दिला की जा आणि त्या भूभागावर विजय प्राप्त् करा.
४४) आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांचे हे भाषण त्या काळातले आहे जेव्हा इजिप्तहून बाहेर पडल्यानंतर दोन वर्षानी त्यांनी आपल्या अनुयायींना घेऊन फारानच्या जंगलात पडाव  टाकलेला होता. हे जंगल अरबच्या उत्तरे कडील सीना प्रायद्वीपमध्ये स्थित आहे जे पॅलेस्टाईनच्या दक्षिण भागाला लागून आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget