Halloween Costume ideas 2015

पोलिसांची मुस्लिमांविषयीची मानसिकता

मुझे डरा नहीं सकती फिजा की तारीकी
मेरी शरीस्त में है पाकी व दरख्तशानी
तू ऐ मुसाफिर शब में खुद चराग बन अपना
कर अपनी रात को दाग-ए-जीगर से नुरानी


सतत प्रवासात राहिल्यामुळे मागच्या महिन्यातील एक महत्त्वाचा विषय वाचकांपर्यंत पोहोचवायचा राहून गेला, तो या आठवड्यात आपल्या सेवेत सादर करीत आहे.
    मागच्या महिन्यात ’स्टेटस् ऑफ पोलिसिंग इन इंडिया रिपोर्ट 2019’ हा अहवाल प्रकाशित झाला होता. हा अहवाल एक सर्व्हेक्षण अहवाल आहे जो की, सर्वोच्च न्यायालयाचेे पूर्व न्यायाधिश जे. चेलमेश्‍वर यांच्या मार्फतीने ’कॉमन कॉज अँड सेंटर ऑफ द स्टडी डेव्हलपिंग सोसायटीज’ च्या माध्यमातून तयार करून घेण्यात आलेला होता. या अहवालामध्ये एक आश्‍चर्यजनक खुलासा असा करण्यात आलेला आहे की, देशातील प्रत्येक दुसर्‍या पोलीस कर्मचार्‍याला असे वाटते की, मुसलमान हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.
    या सर्व्हेक्षणादरम्यान अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. सर्व्हेक्षणाप्रमाणे 35 टक्के पोलीस कर्मचार्‍यांनी गोरक्षेच्या नावावर होत असलेल्या हत्यांचे समर्थन करतांना म्हटलेले आहे की, ”गोहत्येच्या प्रकरणामध्ये कथित अपराध्याला झुंडीकडून शिक्षा देणे ही स्वाभाविक बाब आहे.” देशाच्या 21 राज्यातील 12 हजार पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील जवळ-जवळ 11 हजार लोकांशी संवाद साधून सदरचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे, म्हणून या अहवालामध्ये असलेल्या तत्थ्यांना नाकारता येणार नाही.
    अलिकडेच मानवाधिकार आयोगाकडून पोलीस दलातील कर्मचार्‍यांची एक वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात ’मानवाधिकारांचे पालन करत आतंकवादाशी मुकाबला करता येईल काय?’ या विषयावर बोलताना तरूण महिला शिपाई खुशबू चव्हाण हिने जी मुक्ताफळे उधळली त्यावरून पोलिसांची मानसिकता केवळ मुस्लिमांच्या विरूद्धच नसून देशाच्या सामान्य नागरिकांच्या विरूद्ध असल्याचेही उघड झालेले आहे. बेरोजगार तरूण, आंदोलन करणारे शिक्षक आणि शेतकरी अशा समाजातील विविध घटकांवर ज्या निर्दयीपणे पोलीस लाठीहल्ला व बेछूट गोळीबार करतात ते पाहता पोलिसांच्या मानसिकतेचा सहज अंदाज येतो.
    उत्तर प्रदेशचे माजी पोलीस प्रमुख विभूती नारायण यांनी या संदर्भात म्हटलेले आहे की, ”पोलीस खात्यात सर्वसाधारणपणे ही धारणा आहे की जातीय दंगली मुसलमान सुरू करतात.” म्हणूनच प्रत्येक दंगलीनंतर पोलीसांद्वारे अटक केल्या जाणार्‍या लोकांमध्ये मुस्लिमांचीच संख्या जास्त असते, संचारबंदी सुद्धा मुस्लिम वस्त्यांमध्येच कठोरपणे लागू करण्यात येते, मुस्लिमांच्याच घरांच्या अधिक प्रमाणात झडत्या घेतल्या जातात. पोलिसांचा असा समज आहे की मुस्लिमांच्या विरूद्ध कठोर कार्यवाही केल्याशिवाय दंगली नियंत्रणात आणता येत नाहीत. एवढे सर्व होऊनही बहुसंख्य समाजात अशी धारणा असते की, दंगलींमध्ये मरणार्‍यांपैकी हिंदूच जास्त असतात.
    पोलिसांची अशी धारणा का झालेली आहे ?
    हा झाला सर्व्हेक्षण अहवाल. परंतु साधारणपणे पोलिसांच्या मनात अशी एक धारणा घट्ट रूजलेली आहे की, देशात जेवढे बॉम्बस्फोट होतात ते सुद्धा मुस्लिम तरूणच करत असतात. म्हणूनच बॉम्बस्फोट मंदिरात झालेले असोत की मस्जिदीत झालेले असोत, 1990 च्या दशकात अटक मुस्लिम तरूणांनाच होत होती. 2001 च्या जनगणनेनुसार देशात मुस्लिमांची संख्या 13.7 टक्के एवढी होती. मात्र तुरूंगामध्ये त्यांची संख्या 21 टक्के एवढी होती. यावरून पोलीस किती मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना अटक करतात याचा अंदाज यावा.
     पोलिसाच्या मनामध्ये मुस्लिम समाजाबद्दल ज्या चुकीच्या धारणा घर करून बसलेल्या आहेत त्याची अनेक कारणे आहेत.
    पहिले कारण राजकारण आहे. मुस्लिमांना सातत्याने खलनायकाच्या भूमिकेत ठेऊन, बहुसंख्य मतदारांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून, त्यांच्याकडून मतं पदरात पाडून घेण्याचा जुना फॉर्म्युला स्वातंत्र्यानंतर आजपावेतो सर्वच पक्षांनी अंमलात आणलेला आहे. याबाबतीत कोणत्याच पक्षाचा अपवाद करता येण्यासारखी परिस्थिती नाही.
    दूसरे कारण म्हणजे देशात अशा अनेक जातीयवादी संघटना आहेत ज्या मुस्लिमांची प्रतिमा हिंसक करून जनतेपुढे मांडतात. यासाठी ते चक्क खोटे बोलतात, चुकीची आकडेवारी देतात, कपोलकल्पित घटना सत्य असल्याचा भास निर्माण करतात, मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. याचा दुष्परिणाम पोलिसांच्या मानसिकतेवर होतो. 
    तीसरे कारण म्हणजे, मीडियाचा दुरूपयोग होय. मीडिया त्यातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा दुरूपयोग करून मुस्लिमांविषयी बहुसंख्य बांधवांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण कसा करता येईल, यासाठीचे पराकोटीचे प्रयत्न मीडियाद्वारे केले जातात. त्याचाही दुष्परिणाम पोलिसांच्या मानसिकतेवर होतो. 
    चौथे कारण म्हणजे शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून कनिष्ठ पोलिसांवर होणारे अत्याचार हे आहे. वरिष्ठांकडून सतत अत्याचार होत असल्याने व शिस्तीच्या बडग्यामुळे त्यांच्याविरूद्ध ब्र-सुद्धा काढण्याची सोय नसल्यामुळे खालच्या फळीमधील पोलिसांमध्ये एका प्रकारची मानसिक कुंठा निर्माण होते व समाजामध्ये एखादी घटना घडली की ती नियंत्रणात आणण्यासाठी कनिष्ठ कर्मचारी अवाजवी बळाचा वापर करतात. त्यावेळी कनिष्ठ कर्मचार्‍यांचा तोल ढासळतो व त्यांच्या हातून जनतेवर विशेषतः अल्पसंख्यांक मुस्लिमांवर प्रचंड अत्याचार केले जातात, ही एका प्रकारची कुंठेतून बाहेर पडण्याची त्यांची धडपड असते. 
    पाचवे कारण पोलिसांवर त्यांनी केलेल्या कृत्यांची जबाबदारी निश्‍चित करण्याची कुठलीच पद्धती आपल्या देशात अस्तित्वात नाही. पोलिसांनी जाणून बुजून निरपराध अल्पसंख्यांक तरूणांना अटक करूनही बेकायदेशीर अटक करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांविरूद्ध कधीच, कुठलीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे पोलिसांचे मनोबल अवास्तवरित्या वाढते व ते बेलगामपणे वागू लागतात. शेकडो मुस्लिम तरूण वर्षोन्वर्षे तुरूंगात खितपत पडून निर्दोष सुटल्यानंतरही त्यांना गैरकायदेशीर पद्धतीने अटक करणार्‍या पोलिसांवर कोर्टाने ताशेेरे मारूनही काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे पोलीस मुस्लिमांवर अत्याचार करताना मागचा पुढचा जरासुद्धा विचार करत नाहीत.
    सहावे कारण मुस्लिम समाजामध्ये राज्यघटनेच्या मुलभूत हक्कांच्या तरतुदी व देशातील कायद्यांच्या संबंधी पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळे पोलिसांच्या चुकीच्या कृत्यांनाही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये पीआयएलद्वारे आव्हान देण्याची पद्धत मुस्लिम समाजात नाही, म्हणून सुद्धा पोलीस बेडरपणे मुस्लिमांवर अत्याचार करीत असतात.
    सातवे कारण असे की, अडाणी, अशिक्षित आणि पराकोटीचे दारिद्रय असल्यामुळे पोलिसांविषयी मुस्लिम समाजामध्ये प्रचंड भीती घर करून राहिलेली आहे.  साक्षीदाराचे समन्स घेऊन जरी एखादा युनिफॉर्ममधील कर्मचारी एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या दारी गेला तरी सगळ्या मोहल्ल्यामध्ये त्याच्या घरी पोलीस का आला? याबद्दल कुतर्क केले जातात. आतंकवादाच्या आरोपांमधून निर्दोष सुटून आलेल्या तरूणांशीही अंतर ठेऊन वागण्याची समाजाची भावना पोलिसांविषयी असलेल्या भीतीतूनच निर्माण झालेली आहे.
    आठवे कारण हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून मुस्लिमांचे चित्रण गुन्हेगारी स्वरूपाचे केले जाते. त्याचा परिणामही पोलिसांच्या मानसिकतेवर होतो आणि ते मुस्लिमांवर अत्याचार करण्यासाठी धजावतात.
उपाय
    1. पोलिसांच्या मनामध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर करण्याची मुलभूत जबाबदारी सरकारची आहे. परंतु हा समाज जेवढा असुरक्षित राहील तेवढीच आपली मतपेढी सुरक्षित राहील, याचा विश्‍वास असल्यामुळे कोणत्याही पक्षाचे सरकार असो पोलिसांच्या मनामधील गैरसमाज दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न करतांना दिसून येत नाहीत. वास्तविक पाहता पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये मुलभूत सुधारणा करून मुस्लिम समाजाविषयी त्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला तर फरक पडू शकतो.
    2. पोलिसांविषयी गैरसमज दूर करण्यासाठी पोलीस दलामध्ये मुस्लिम तरूणांना मोठ्या प्रमाणात सामावून घेणे गरजेचे असतांनासुद्धा त्यांना डावलण्याची प्रवृत्ती सरकारमध्ये निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल? या संबंधी समाजातील धुरीणांनी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
    3. पोलिसांमधील गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला स्वतः होवून पुढाकार घेणे सुद्धा गरजेचे आहे. पोलीस प्रशिक्षण विद्यालय तसेच नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे संपर्क करून गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून मुस्लिमांची वास्तविक परिस्थिती प्रशिक्षणार्थी पोलिसांसमोर विशद करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. यासाठी मुस्लिम समाजातील बिगर सरकारी सामाजिक तसेच धार्मिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
    4. समाजमाध्यमाचा उपयोग करून मुस्लिमांची बाजू मांडणारे लेख, व्हिडीओ क्लिप्स आणि शॉर्ट फिल्म्स इत्यांदीची निर्मिती करून त्यांचा प्रचार व प्रसार समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात केल्यास पोलिसांच्या आणि बहुसंख्य बांधवांच्या मनामधून मुस्लिमांविषयी गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
    5. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, इस्लाम हा सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी असून, रूढ अर्थाने हा केवळ एक धर्म नसून एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. शिवाय मानवजातीला भेडसावणार्‍या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर या व्यवस्थेमध्ये आहे. जीवनात यशस्वी होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. हा संदेश पोहोचविण्यामध्ये मुस्लिम केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरसुद्धा फारसे यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांच्या सुरक्षा दलांच्या मनामध्ये सुद्धा मुस्लिमांच्या विरूद्ध मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झालेले आहेत. म्यानमार आणि श्रीलंका ही या संदर्भातील ताजी उदाहरणे आहेत. म्हणून मुस्लिमांना इस्लामचा संदेश मुस्लिम्मेत्तर बांधवांपर्यंत पोहोचविण्यात जोपर्यंत यश येणार नाही तोपर्यंत पोलिसांच्या मनामधून त्यांच्या विषयीचे गैरसमज जाणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. म्हणून या कामाला मुस्लिमांनी सर्वात अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.
    शेवटी सर्व्हेक्षण अहवालाबद्दल माझे वैयक्तिक मत जे की 32 वर्षाच्या पोलीस खात्यातील अनुभवावर आधारित आहे ते असे की, किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मुस्लिम लोक हे इतर समाजाच्या तुलनेत जास्त असतात, मात्र खून, बलात्कार, दरोडे , मोठे आर्थिक घोटाळे, पांढरपेशा गुन्हे यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांची संख्या लक्षणीय रित्या कमी असते. किरकोळ गुन्ह्यामध्येही मुस्लिमांचा सहभाग हा त्यांच्या गरीबी व अडाणीपणामुळे असतो. ही दोन कारणे त्यांच्यातून काढण्यासाठी जकात आणि व्याजविरहित पतसंस्था तसेच शिक्षणाची व्यवस्था योग्यपणे लागू केली तर मला आशा नव्हे तर विश्‍वास आहे की, काही वर्षातच या समाजामधून किरकोळ गुन्हेगारीचे सुद्धा उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही.

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget