Halloween Costume ideas 2015

ईडी - पोपट ०.२

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात येणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे, नंतर ईडीमध्ये गुन्हा दाखल होणे, याते खरे तर धक्कादायक असे काहीच  नाही. ही कायदेशीर बाब आहे. शरद पवारांवर ही वेळ येणारच होती. कारण ही कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच असल्याचे स्पष्ट दिसत आहे आणि या कारवाईचे टायमिंग भाजपने ऐन  विधानसभेज्या निवडणुकीच्या वेळी साधले आहे. शरद पवार आणि शिखर बँकेच्या इतर संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांची संस्थानिके खालसा करणे ही भाजपची  रणनीती होतीच. त्या रणनीतीला अनुसरून भारतीय जनता पक्षाने संयम बाळगत काम केले आणि सगळ्यांना झटका दिला. त्याआधी लोकसभा निवडणुकीत भाषणांची तोफ चालवणाऱ्या  राज ठाकरे यांनाही ईडीने चौकशीला बोलवून शांत करून टाकले. अशीच शांती राष्ट्रवादीच्या गडात पण आता असाच सन्नाटा पसरेल. सध्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या  अटकेनंतर काँग्रेस तसेच इतर राजकीय पक्षांमध्येही सन्नाटा पसरला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही अटक झाली होती. त्यामुळे राजकीय आयुष्यात  अटक वा गुन्हे  अशा कारवाया या राजकारणाचा भाग असतात. या कारवाईमुळे शरद पवार या नावाची भीती, दहशत जमीनदोस्त होणार आहे. सत्तेपुढे कोणी मोठे नसते हेच खरे वास्तव आहे. गेली  अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांच्या अंगावर चिखलाचे काही डाग असतातच. अशा वेळी या कारवायांचे स्वागत करायलाच हवे, त्याच सोबतीने एक चिंता कायम सतावते, ती म्हणजे  विरोधकांवर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांनी सतत उपभोगले आहे. एक-दुसऱ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांवर कारवाई आणि सरसकट विरोधात असणाऱ्या सगळ्यांच्या मागे काही  ना काही कारवाई लावणे यात फरक आहे. भारतीय जनता पक्षात सामील झालेल्यांना अभय आणि जे विरोधात आहेत त्यांच्या मागे निवडणुकांच्या आसपास चौकशा-कारवाया-अटकसत्र  लावणे म्हणजे राजकीय षडयंत्राचा भाग आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. पक्षांतरांमुळे भाजपची शक्ती वाढली आहे. अशा वेळी जो नेता आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ८०  व्या वर्षी वणवण फिरत आहे आणि या परिस्थितीत त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे यामुळे राजकीय अस्वस्थता निर्माण होणे साहजिकच आहे, पण यामुळे भाजपला काही धोका  निर्माण होणार नाही. उलट अशा कारवायांमुळे कदाचित सहानुभूतीही निर्माण होऊ शकेल. भारतीय जनता पक्षापुढे खूप आव्हाने आहेत. ती आव्हाने विरोधी पक्षाची नसून त्यांनी स्वत: निर्माण केलेली आहेत. निश्चलीकरण, जीएसटीनंतर निर्माण झालेली आर्थिक स्थिती, ती सुधारण्याबाबत होत असलेला उशीर, परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्याने होणारे उलट सुलट  निर्णय आणि निर्णयांची फिरवाफिरवी यामुळे सरकारने स्वत:हून अडचणी निर्माण केल्या आहेत. इतक्या अडचणींवर तोडगा काढायचे सोडून विरोधी पक्षांचे अस्तित्व संपवण्यावर शक्ती  केंद्रीत करणे तसे शहाणपणाचे नाही. सत्तेत असलेले धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसतात. सध्याच्या सत्ताधारी पक्षालाही हे लागू आहे. अमर्याद सत्ता मिळवण्याच्या नादात जर  यंत्रणांना हाताशी धरून कारवाया होत असतील तर ती लोकशाहीच्या वर्खाखालची हुकूमशाही ठरेल. राजकारण्यांवरील गुन्ह्यांची प्रासंगिकता आणि परिणाम पाहिले तर अशा हुकूमशाहीचा  संशय येतो. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अमित शहांना उत्तर देत असताना मी तुमच्यासारखे जेलमध्ये जाऊन आलेलो नाही, असे म्हटले होते. त्याचाच हा परिणाम होय. येणाऱ्या  काळ कसा असेल याचे संकेत या कारवाईत आहेत. ईडीने भल्याभल्यांना रडवले आहे. पण तिच्यावर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोपही झाले आहेत. केवळ दोनच कायद्यांच्या  अंमलबजावणीचे अधिकार असलेली ही संस्था आर्थिक क्षेत्रातली इंटेलिजन्स एजन्सी म्हणून ओळखली जाते. ईडीमुळेच विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी यांच्यासारखे काहीजण  देश सोडून पळून गेले आहेत. ‘एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट’ ही संस्था आर्थिक कायदेकानून अमलात आणण्याचे काम करते. ईडीला मराठीत ‘अंमलबजावणी संचालनालय’ आणि ‘सक्तवसुली  संचालनालय’ अशी नावे आहेत. छगन भुजबळांच्या केसमध्ये समीर भुजबळ यांना ईडीने असंच दोनदा चौकशीसाठी बोलवले आणि तिसऱ्यांदा बोलवून थेट अटक केली. फसवणूक आणि  ३५४ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात रतुल पुरी यांना ईडीने अटक केली आहे. कथित विमान घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातही ईडी चौकशी  करते आहे. जमीन खरेदी प्रकरणात रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या आईचीही गेल्या पाचेक वर्षांपासून ईडी चौकशी करत आहे. भ््राष्टाचाराचे आरोप असलेल्या भाजपच्या नेत्यांना या  कारवाईपासून दूर ठेवण्यात आले आहे. अर्थातच ईडी हा ‘पोपट–०.२’ सिद्ध होऊ पाहात आहे. तद्वतच देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे केली जात असल्याचे दिसत आहे. शांतताप्रिय व  लोकशाहीप्रेमींसाठी ही धोक्याची घंटा आहे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget