महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 21 सप्टेंबर रोजी करण्यात आली. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचे 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जे काही राजकीय पक्षांना बोलायचे आहे, मतदारांना आश्वासने द्यायची आहेत, आपल्याकडे आकर्षित करायचे आहे, त्यांना भूलथापा द्यायचे आहेत, ते सर्व करायला फार कमी अवधी आहे. म्हणजेच जवळपास 25 दिवसांचा. त्यामुळे जसे युद्धात आणि प्रेमात सगळे काही माफत असते, असे म्हणतात ते आता राजकारण्यांनाही लागू पडत आहे. कारण त्यांच्यासाठी निवडणुकीचा काळ युद्धापेक्षा कमी नाही, असे काही वातावरण सध्या दिसत आहे. त्यामुळे जनतेने हा विचार करायला हरकत नाही की, ’नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे गेले वारे’. म्हणजेच ऐकायचं आणि सोडून द्यायचं; निवडणुकीनंतर दुसरेच काहीतरी होणार आहे, जे की मतदारांनी कधी विचारही केला नव्हता. आज महाराष्ट्राची राजकीय अवस्था पाहिली तर सत्तापक्षाच्या डोळ्यात डोळा घालून त्याच्या चुकीचा धोरणाचे वाभाडे काढेल असा दमदार विरोधक नाही! कारण जे विरोधात होते त्या पक्षातील अनेक दिग्गज नेते पक्षात ’अर्थ’ उरला नाही की ’अर्थ’ बरकरार ठेवण्यासाठी ते सत्तापक्षात सामील झाले, याचा जांगडगुत्ता सोडविण्यासाठी ते भरती झालेत. तसेच ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, अशी जनता जनार्धन अपेक्षा करीत आहे. मात्र ईडी टळो यासाठी पक्षांतर केले, याची महाराष्ट्राची जनता चर्वण करीत आहे. वयाच्या 79 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात दौरा काढीत जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या झंझावताला नागरिकांनी उत्स्फूर्त प्र्रतिसाद देत पवारांचे आत्मबल वाढविले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे झालेली दाणादाण, काँग्रेसमधील स्मशान शांतता यामुळे जनतेला विरोधक संपला की काय असे वाटत होते. मात्र शरद पवार यांनी दौरा काढला आणि महाराष्ट्र जनांच्या आशा पल्लवीत केल्या. त्यामुळेच की काय ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे सोडून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले. मात्र पवार यांनी त्याचे स्वागत केले. त्याचे स्पष्टीकरणही त्यांनी माध्यमांना दिले. पुढे पहावे लागेल की नेमके काय होते. मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकले आहे की शासकीय संस्थांचा निवडणूक काळात गैरवापर होत आहे. सत्तापक्षाने जर एवढी विकासकामे केली आहे तर आपल्या प्रचारसभेत त्यांनी राज्यातील विकास कामे सांगायची सोडून 370 वर पाठ थोपटून घेत आहेत. महाराष्ट्राचे यक्ष प्रश्न अजूनही सुटले नाहीत. त्यामुळे सत्तापक्षाने महाराष्ट्रातील मुद्यांवर निवडणूक लढवावी, असे सर्वसामान्य जनतेला वाटते. बेरोजगारी, वाळका-ओला दुष्काळाचा सामना जनता करीत आहे. अशात निवडणुकीचे रणांगण, आश्वासनांची खैरात, भूलथापा जनतेने शांततेने ऐकूण खर्या उमेदवाराला निवडूण देण्याचा प्रयत्न करावा. निवडणूक शांततेत पार पाडावी, अशी अल्लाहकडे प्रार्थना.
- बशीर शेख
Post a Comment