Halloween Costume ideas 2015

अर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(३३) मग काय तो जो एक एक जीवाच्या कमाईवर नजर ठेवतो५० (त्याच्या विरोधात हे दु:साहस केले जात आहे की५१ लोकांनी त्याचे काही भागीदार ठरविले आहेत? हे पैगंबर (स.)! यांना सांगा, (जर खरोखर ते अल्लाहने स्वत: बनविलेले भागीदार आहेत तर) जरा त्यांची नावे घ्या की ते कोण आहेत? काय तुम्ही अल्लाहला एका नव्या गोष्टीची माहिती देत आहात जिला तो आपल्या पृथ्वीत जाणत नाही? अथवा तुम्ही लोक असेच तोंडात जे काही येते ते सांगता?५२ वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांनी सत्य आवाहन स्वीकारण्यास नकार दिला आहे, त्यांच्याकरिता त्यांच्या कुटिलतांना५३ आकर्षक बनविले गेले आहे आणि ते सरळमार्गापासून रोखले गेले आहेत.५४ मग ज्याला अल्लाह पथभ्रष्टतेत राहू देतो त्याला कोणी मार्ग दाखविणारा नाही.

(३४) असल्या लोकांसाठी जगातील जीवनातच यातना आहेत आणि परलोकातील यातना याहूनही कठोर आहेत. कोणीही असा नाही की जो त्यांना अल्लाहपासून वाचविणारा असेल.

(३५) ईशपरायण माणसांसाठी ज्या स्वर्गाचे वचन दिले गेले आहे त्याचे वैभव असे आहे की त्याच्या खालून कालवे वाहत आहेत, त्याची फळे चिरंतन आहेत, आणि त्याची सावली अनश्वर. हा शेवट आहे पापभीरु लोकांचा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांचा शेवट असा आहे की त्यांच्याकरिता नरकाग्नी आहे.


५०)म्हणजे जो एक एक व्यक्तीच्या स्थितीला पूर्ण जाणून आहे आणि त्याच्या नजरेतून सदाचारी माणसाचा एकही सदाचार लपलेला नाही की दुराचारीचा दुराचार.

५१)दुस्साहस हे आहे की त्याच्या समकक्ष बनविले जात आहे. त्याच्या अस्तित्वात, गुणात आणि अधिकारात त्याने निर्मित केलेल्या वस्तूंना भागीदार ठरविले जात आहे. याच्या ईशत्वात राहून लोक समजतात की आम्हाला जसे वाटेल तसे आम्ही करू, आम्हाला विचारणारा कोणीही नाही.

५२)म्हणजे त्याचे भागीदार जे तुम्ही बनविले आहेत, त्यांच्याविषयी तीन मार्ग शक्य आहेत. 

एक म्हणजे तुमच्याजवळ एखादी प्रामाणिक सुचना आली असेल की अल्लाहने अमुक अमुक अस्तित्वांना आपल्या गुणांत, अधिकारात किंवा हक्कांमध्ये भागीदार बनविले आहेत. ही जर स्थिती आहे तर कृपया आम्हालाही दाखवावे की ते कोणते लोक आहेत जे अल्लाहचे भागीदार आहेत आणि याची सूचना आपणास कोणत्या माध्यमाद्वारे पोहचली? 

दुसरी स्थिती म्हणजे अल्लाहला स्वत: खबर नाही की पृथ्वीवर काहीजन त्याचे भागीदार बनलेले आहेत. आता आपण ही खबर अल्लाहला देण्यास निघाले आहात! जर हे असे आहे तर स्पष्टपणे आपल्या स्थितीचा स्वीकार करा. मग आम्हीसुद्धा पाहून घेऊ की जगात असे किती मूर्ख निघतात जे तुमच्या या अगदी निरर्थक पद्धतीवर टिकून राहतात. 

जर या दोन्ही स्थिती शक्य नाहीत तर तिसराच प्रकार शिलल्क राहातो. तो म्हणजे तुम्ही विनाप्रमाण आणि विनातर्काचे ज्याला इच्छिता त्याला अल्लाहचा नातलग ठरविता, अल्लाहचा नातेवाईक ठरविता. ज्याला इच्छिता त्याला दाता आणि दु:खहर्ता ठरविता. तुम्ही एखाद्याला अल्लाहच्या जवळचा ठरवून त्याच्या प्रशस्तीपत्रावर तुमचे काम फत्ते होते असे समजू लागता.

५३)या अनेकेश्वरत्वाला `कुटिलता' (मक्कारी) म्हणण्याचे कारण म्हणजे ज्या ग्रहांना, फरिश्त्यांना, आत्म्यांना किंवा बुजुर्ग माणसांना ईशगुणांत आणि अधिकारांचे धारक ठरविण्यात आले आहे आणि ज्यांना अल्लाहच्या विशेष हक्कांत भागीदार बनविले गेले आहे, त्यांच्यापैकी कोणीही या गुणांचा आणि अधिकारांचा दावा केलेला नाही. तसेच त्या हक्कांची मागणीसुद्धा केली नाही आणि लोकांना अशी शिकवण दिली नाही की तुम्ही आमच्यापुढे उपासनांचे विधी पार पाडीत राहावे, आम्ही तुमचे काम पूर्ण करीत जाऊ व तुमच्या प्रार्थना ऐकत जाऊ. हे सर्व धूर्त आणि चालाक माणसांचे काम आहे ज्यांनी सर्वसामान्यांवर आपल्या प्रभुत्वाचा शिक्का उमटविण्यासाठी आणि आपली कमाई वाढविण्यासाठी काही बनावटी ईश्वर बनवून टाकले. तसेच लोकांना त्या बनावटी ईश्वरांचे अनुयायी बनवून टाकले आणि स्वत:ला त्या बनावटी ईश्वरांचा प्रतिनिधी ठरवून आपले उखळ पांढरे करू लागले. अनेकेश्वरत्वाला धोकेबाजी म्हणण्याचे दुसरे कारण आहे की हा खरे तर मनाचा एक धोका आहे. तो एक चोरदरवाजा आहे ज्याद्वारे मनुष्य भौतिकतेसाठी, नैतिक बंधनापासून मुक्त आणि अनुत्तरदायित्वपूर्ण जीवन जगण्यासाठी पळवाट काढतो. तसेच अनेकेश्वरत्वाला धोका (मक्कारी) म्हणण्याचे तिसरे कारण पुढील आयतीमध्ये स्पष्ट होत आहे.

५४)ही मानवप्रकृती आहे की जेव्हा मनुष्य एका वस्तूऐवजी दुसरी वस्तू त्याच्या मुकाबल्यात स्वीकारतो तेव्हा आपल्या मनाला संतुष्ट करण्यासाठी तसेच लोकांना आपले सत्यच आहे हे पटविण्यासाठी तो प्रमाण पुढे करतो आणि स्वत: रद्द केलेल्या वस्तूविरुद्ध अनेकानेक गोष्टी रचतो. याच कारणाने सांगितले गेले की जेव्हा त्यांनी सत्यसंदेश स्वीकारण्यास नाकारले तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्यासाठी त्यांची मार्गभ्रष्टता आणि त्या मार्गभ्रष्टतेवर कायम राहाण्यासाठी त्यांची मक्कारी (धोका) शोभनिय बनविली गेली. तसेच स्वाभाविकपणे त्यांना सरळमार्गावर येण्यास रोखले गेले.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget