Halloween Costume ideas 2015

वर्धा येथील विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचे भाषण…


सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात हे १७ वे ऐतिहासिक विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यातही गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धेच्या भूमीत हे संमेलन साजरे होत आहे. सत्यशोधक, गांधीवादी, आंबेडकरवादी वारसा असलेल्या भूमीत, शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी व कर्मभूमी, चक्रधर स्वामींच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर. प्रखर स्रीवादी भूमिका आपल्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या निबंधातून मांडणार्‍या ताराबाई शिंदे या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या. राजमाता जिजामातेचं माहेर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा. अशा विदर्भाच्या संपन्न भूमीतील वर्धा येथे हे विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड आयोजकांनी केली, हा माझा औकातीपेक्षा जास्तच सन्मान आहे, असे मी मानतो व त्यासाठी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या आधीच्या संमेलनाध्यक्षांच्या नामावलीकडे जरी पाहिले तरी माझी छाती दडपून जाते. बाबुराव बागुल, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. अजीज नदाफ, जयंत पवार, ऊर्मिला पवार, कॉ. तारा रेड्डी, संजय पवार इत्यादी नावे याची साक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर या नावांचे दडपण माझ्यावर आलेच नाही असे नाही. पण मी विचार केला, गरुडाची चोच आणि आकाशात झेप घेणारे पंख चिमणीजवळ नाही म्हणून चिमणीने आपल्या चोचीने दाणा टिपूच नये का व आपल्या छोट्याशा पंखाने उडूच नये का? या विचारानेच मी नम्रपणे विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा स्वीकार केला आहे.

सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही. घोषित नसली तरी अघोषित आणीबाणी तर निश्चितच आहे. वातावरण विषाक्त बनविले जात आहे. वातावरणात परस्पर अविश्वास व जाती-जातीत, धर्माधर्मात ‘भया’चे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी सरकारी पातळीवरूनच हा प्रयत्न केला जात आहे, हा यातील सर्वात दुर्दैवी भाग आहे. नुकतेच घडून आलेला ऊर्फी जावेदच्या कपड्यावरूनचा वाद. आता ती केवळ ‘जावेद’ आहे म्हणूनच तो वाद उकरून काढला गेला की काय असेही वाटते. कारण त्याच दरम्यान कंगना राणावत, अमृता फडणवीस यांच्या तोकड्या कपड्यांचे दर्शन सोशल मीडियाने घडवून आणले. त्याआधी मिलिंद सोमण, मधू सप्रे यांच्या वस्त्रविहीन दर्शनाची आठवणही सोशल मीडियाने करून दिली. तात्पर्य एवढेच की, सप्रे-सोमण यांनी नंगाडपणा केला तरीही ‘हिंदू राष्ट्रात’ खपवून घेतला जाईल. पण ऊर्फी जावेदचा कदापि नाही, असा संदेश देण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. कधी कपडे, कधी टिकली, कधी ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या वेळी दीपिका पदुकोण या नटीने घातलेले कपडे यातही बहिष्कार दीपिका पदुकोणचा नाही तर शाहरुख खानचा. श्रद्धाचे तुकडे तुकडे करणारा मुस्लीम, मशिदीत शिवलिंग सापडल्याचे प्रकार, लव्ह जिहाद, हिजाब, भोंगे, हनुमान चालिसा याला झणझणीत हिंदुत्वाची फोडणी आणि ‘हिंदू खतरे में है’च्या सातत्याने चोहोबाजूकडून उठविण्यात येणार्‍या आरोळ्या हिंदूंची घटती व मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हा तर हिंदूंना प्रचंड भयभीत करून सोडणारा मुद्दा. मग याच मुद्यावर संसाराशी व प्रजननाशी संबंध नसलेले साधू-साध्वींचे हिंदू स्त्रियांना पोरांची पैदास वाढविण्याचे मार्गदर्शन म्हणजे एकूणच स्त्री म्हणजे पोरं पैदा करण्याची ‘मशीन’ व पुरुष म्हणजे त्या मशीनवर ‘काम’ करणारा कामगार. एकूणच ‘भ्रमित करावे सकळ जन’चा रेशीमबाग पुरस्कृत कार्यक्रम जोरात सुरू आहे.

साडेआठशे वर्षे या देशावर मुस्लिमांनी राज्य केले आणि नंतरची १५० वर्षेब्रिटिशांचे राज्य म्हणजे ख्रिश्र्चनांनी या देशावर राज्य करूनही या देशातील बहुसंख्य हिंदू हिंदूच राहिला. तो अल्पसंख्याक झाला नाही. या हजार वर्षांत या राजवटी निव्वळ गोट्या खेळत होत्या, म्हणून हिंदू बहुसंख्य राहिले?पण, आता ‘हिंदुत्ववाद्यां’च्या राज्यात मात्र हिंदू अल्पसंख्य होण्याची भीती? खरा इतिहास वेगळाच आहे. मुस्लिमांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून धर्मांतर कमी झाले. याउलट हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादाला व अतिरेकी वर्णश्रेष्ठत्वाच्या जाचाला कंटाळून धर्मांतर जास्त झाले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात महात्मा जोतिबा फुले म्हणतात, पुढे काही काळाने जेव्हा जहाँमर्द मुस्लीम लोकांचे या देशात राज्य झाले तेव्हा अज्ञानी शूद्रादी अतिशूद्र पवित्र कुराणातील सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागलीत. ब्राह्मणी धर्माच्या जाचाला कंटाळलेल्या हीन, शूद्र जातीतील असंख्य लोकांनी इस्लाम धर्माचा अंगीकार केला होता. आर्य चाहता हॅवेल हिंदूंच्या या धर्मांतराबद्दल म्हणतो, खालच्या वर्गात धर्मांतर फारच लवकर होत असे. विशेषतः ब्राह्मणांचे स्पृशास्पृश्यतेचे नियम ज्यांना जाचक होते ते फारच जलद स्वधर्म सोडीत असत. धर्मांतराने शूद्र वर्गाच्या शृंखला तोडल्या जाऊन त्याला ब्राह्मणांच्या बरोबरीचे स्थान मिळण्याची संधी निर्माण करून दिली. (महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य-लेखक- बा. रं. सुंठणकर. पान नं. ५२ चौथी आवृत्ती)

जीवसृष्टीचा सारा पसारा प्रजनन, पोषण आणि संरक्षण या तीन मुख्य प्रेरणांभोवती फिरत असतो. आपली वंशवृद्धी व्हावी, तिचं पोषण व्हावं, संरक्षण व्हावं यातही पोषणाचा आणि संरक्षणाचा मुद्दा वर-खाली होत राहतो. सर्वसाधारण परिस्थिती असेल तर पोषणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. पण परिस्थिती सर्वसामान्य नसेल,वातावरण असुरक्षित असेल, भयग्रस्त असेल तर पोषणाचा मुद्दा गौण ठरून संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. उदा. मी तीन-चार दिवसांचा उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही. चौथ्या दिवशी माझ्यासमोर अन्नाचं ताट आहे आणि पोटात सडकून भूक आहे. मी ताटावर बसतो, तेवढ्यात शेजारी आग आग म्हणून गलका ऐकू येतो. मी भरल्या ताटावरून तहान-भूक विसरून उठतो. येथे पोषणापेक्षा, भयापोटी संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा बनतो. सध्या अशाच धोरणाचा अवलंब राष्ट्रीय स्तरावर ‘हिंदुत्ववादी’ म्हणविणारे व मिरविणारे सरकार करताना दिसत आहे. ‘भीती मुसलमानांची बाळगा. त्यांच्या वतीने केल्या जाणार्‍या लव्ह जिहादची बाळगा. हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे त्याची बाळगा. शेजारच्या मुस्लीम राष्ट्राची भीती बाळगा.‘ घरात हे मुस्लीम घुसून आपल्या मुलीबाळींवर अत्याचार करतील, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी घरात कायम धारदार शस्त्र बाळगा, असा सल्ला तर विद्यमान भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर रोज देतात. अशाप्रकारे संशयाचे व भयाचे वातावरण देशात तयार केले की, लोक आपसूकच पोषणाचे मुद्दे विसरून जातात. मग बेरोजगारीचा प्रश्र राहात नाही. महागाई लोकांना छळत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भावांमधील वाढ लोकांना त्रास देत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची चर्चाही मग होत नाही. २०१६ मध्ये नॅशनल क्राइम ब्यूरोने शेतकर्‍यांच्या आत्महत्येची आकडेवारी देणे बंद केले. म्हणजे आत्महत्या थांबविण्याचा इतका साधा सोपा-उपाय आधीच्याही राजवटीला सूचला नाही, असेच म्हणायचे ना? पूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली की, देशाची किंमत घसरायची. आता मात्र ती किंमत न घसरता जगभरात भारताची किंमत वाढत आहे. असा ‘प्रपोगंडा’ आपल्याला सहजपणे गंडवून जातो.

हे विद्रोही साहित्य संमेलन आहे. विद्रोही या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरुद्ध लढा’ उभारणारे असा आहे. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापणा केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणे, प्रश्न विचारणे म्हणजे विद्रोह. विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं त्यावेळी सत्य त्याला आव्हान देतं. असत्य हे दमनासाठी वापरलं जाणारं विखारी साधन आहे. सत्यानं असत्याला ललकारण, आव्हान देणे म्हणजे विद्रोह. साहित्यिकांकडून सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या विद्रोहाची समाजाला अपेक्षा असते. पण, दुर्दैवाने काही अपवाद वगळता साहित्यिकही सरकारच्या ताटाखालील मांजर होत आहेत की काय, अशी शंका यायला लागते. यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते. पण, त्यांच्या इ-मेलवरील सरकारविरोधी भाषणामुळे सरकारने साहित्यिक संस्थांवर दबाव टाकून त्यांचे निमंत्रणच रद्द करवून टाकले आणि आयोजक संस्थांनी सरकारी अनुदानाने ‘भारभूत’ होत हा अपमान ‘सन्मानाने’ गिळंकृत केला. साहित्य क्षेत्रातील ही अभूतपूर्व अशी घटना होती. आता अशा घटना अपवादात्मक राहिल्या नाहीत.

यासंदर्भात ताजी घटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे वर्धा येथे सुरू आहे त्याच्या अध्यक्षपदावरून झालेला गदारोळ. एखादा लेखक सावरकर आणि गांधी यांच्या विचारांची चिकित्सा करणारे एखादे विधान भाषणात उच्चारतो आणि केवळ त्यामुळे त्या साहित्यिकाचे नाव वर्धेच्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घेऊ नका, असा आदेश मंत्रालयातून येतो, अशा वर्तमानपत्रात बातम्या येतात. यावरून आज या प्रस्थापित साहित्य संस्थाही कशा दहशतीच्या वातावरणात काम करीत आहेत, हे लक्षात येते. विशेष म्हणजे वर्धा ही गांधी-विनोबांची भूमी आणि तिथे गांधींच्या विचारांना सनातन्यांचा विरोध आजही होणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.

सरकारी अनुदानाच्या दबावाखाली साहित्यिक संस्था ‘लाचार’ झाल्या आहेत की काय, अशीही शंका यायला लागली आहे. स्वायत्त संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि या हस्तक्षेपाविरोधात आवाज न उठविता ‘शरणागती’ पत्करण्याची संख्याही सध्या वाढीस लागली आहे. हा लोकशाहीच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेचा विषय आहे.

विद्रोहाचा भला मोठा आवाज झाला म्हणजेच ‘विद्रोह’ ही व्याख्या पुरेशी नाही. बरेच वेळा विद्रोहाचं बियाणं जमिनीत पडतं. स्वतःचं टरफल विसर्जित करतं आणि शांतपणे जमिनीची छाती फाडून अंकुरतं. हाही विद्रोहच आहे, असं मी मानतो. बर्‍याच वेळा या शांतपणे झालेल्या विद्रोहाची ‘डाव्यां’नी विनाकारण उपेक्षा केली आहे, असं मला वाटतं. चार्वाक, बुद्ध, महावीर, चक्रधरस्वामी, बसवेश्वर ही विद्रोहाची परंपरा मानली तर या विद्रोही परंपरेत संतांच्या विद्रोही परंपरेचीही दखल आपल्याला घ्यावीच लागेल. भक्तिपंथापूर्वीच्या काळात महाराष्ट्रात अनेक समूह नांदत होते; पण समाज नव्हता. महात्मा फुले यांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास, ‘एकमय लोक’ नव्हते. येथे वेगवेगळी दैवते, वेगवेगळ्या उपासनापद्धती, वेगवेगळे खेळ व वेळ घालविण्याची साधने होती. या भूभागावर राहणार्‍या सर्वांना एकत्र आणील, असे काही नव्हते. भक्तिसंप्रदायांनी या वेगवेगळ्या समूहांना एकत्र आणून एक समाज निर्माण करण्याचे कार्य केले. भक्तिपंथाच्या संतांचे साहित्य हे आध्यात्मिक लोकशाहीचे साहित्य आहे. हे साहित्य म्हणजे समता, बंधुता व आध्यात्मिकता यांची ग्वाही देते. या साहित्याने समाजाला मातृभाषेविषयी, मराठी भाषेविषयी अस्मिता दिली. संतांच्या या साहित्यामुळे साहित्य हे ब्राह्मण, शूद्र अशा कोणत्याही एका समूहाचे न राहता ते मराठी साहित्य झाले.

संत साहित्याने निर्माण केलेले आध्यात्मिक आदर्श व ध्येय यांच्या एकात्मतेचा परिणाम म्हणून समाजाचे भौतिक आदर्श ध्येय व भाषा यांचीही एकात्मता झाली. म्हणून भक्तिपंथांच्या संतांनी केवळ साहित्य निर्माण केले असे नाही,  तर महाराष्ट्रातील लोकांना त्यांनी ‘राष्ट्र‘ बनविले. महात्मा फुलेंच्या भाषेत ‘एकमय लोक’ बनविले. भारतीय संस्कृत पंडितांनी आणि भट भिक्षुकांनी ज्ञान हे संस्कृत भाषेतूनच व्यक्त होऊ शकते, अशा बथ्थड समजुतीला बळी पडून मराठी मायबोलीच्या असंख्य खेडुतांना अज्ञानात खितपत पडू दिले होते. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी संस्कृत पांडित्याच्या पुरातन आणि अतिप्रतिष्ठा पावलेल्या प्रथेविरुद्ध पहिले प्रभावी बंड पुकारले व सर्व संस्कृतातील कडी कुलुपात बंदिस्त ज्ञानभंडार मराठी भाषेत खुले केले. संस्कृत ऐवजी मराठीचा उपयोग हा काही संस्कृत भाषेविरुद्धचा ज्ञानेश्वरांचा पवित्रा नव्हता तर संस्कृतवर मालकी हक्क प्रस्थापित केलेल्या मूठभर पंडितांविरुद्धचा तो विद्रोह होता. त्याचा परिणाम तेराव्या शतकापासून तर सतराव्या शतकापर्यंत घडून आलेला दिसतो. प्रथमच इतिहासात वेगवेगळ्या जाती-जमातीचे संत लिहिते आणि बोलते झाले. नामदेव शिंपी असेल, चोखामेळा महार असेल, सावता माळी असेल, गोरोबा कुंभार असेल, नरहरी सोनार असेल, संत जनाबाई, एकनाथ महाराज असतील आणि शेवटी तुकाराम महाराज. ही वेगवेगळ्या जाती-जमातीतील संतांची मांदियाळी तयार होण्याचे कारण ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील ज्ञानभंडार मराठी भाषेत आणलं, याला आहे हे विसरता येणार नाही. दुर्दैवाचा भाग एवढाच की, ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना व त्यांच्या हयातीतच त्यांच्या आई-वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे ब्राह्मण होते म्हणून त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर छळणारे ब्राह्मणेतर होते हेही तेवढेच दुःखद आहे. दुर्दैवाने संतांच्या भक्तीच्या मार्गातील समतेमुळे का होईना सनातन्यांना आवरक्ताची हगवण सुरू झाली हे समजण्यासारखे आहे. पण, समतावादी म्हणविणार्‍या समाजवाद्यांच्याही पोटात का दुखायला लागले, हे समजायला मार्ग नाही. सनातन्यांनी संत चळवळीला लावलेली संताळे, टाळकुटे ही विशेषणे समाजवाद्यांनी जशीच्या तशी लावावी, याचे आश्चर्य वाटते. संत तुकारामांच्या बाबतीत एकच अभंग ‘ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान’ हा वारंवार सांगून दाहक व कृतिशील संत तुकारामाला अडगळीत पेटीत टाकताना मी प्रत्यक्षपणे थोर समाजवाद्यांना सामाजिक क्षेत्रात अनुभवले आहे. परिवर्तनाचा पुरस्कार करणारे जर परंपरेच्या विरोधात राहिले तर पुष्कळदा त्याचा फायदा परंपरेमधील परिवर्तन विरोधकांना, विषमतावाद्यांना मिळतो. हे परिवर्तन विरोधक परंपरेवर कब्जा करतात आणि तिला परिवर्तनाच्या विरोधात राबवतात हे आपण आज प्रत्यक्ष अनुभवतो आहे.

हेमाडपंत हा त्या काळातील ब्राह्मण्याचे प्रतीक. 365 दिवसांसाठी या पंडिताने दोन हजार आचारमार्ग दिले आहेत. हेमाडपंताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ ग्रंथाची ओळ न ओळ कर्मकांडांनी भरलेली. या पुरोहितवर्गाने सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे विळख्यात घेतलेले. चक्रधरस्वामी थोर क्रांतिदर्श संत. त्यांनी माणसामाणसात भेद उत्पन्न करणार्‍या सर्व प्रथांना विरोध केला. स्त्री-पुरुष आणि ब्राह्मण-चांडाळ सर्वांना समान वागणूक दिली. अशा थोर महान संतांची हत्या, हेमाद्रीसारख्या हिंदू धर्मशास्त्री आचार्याने करविली. तेराव्या शतकातील सर्वात श्रेष्ठ मानल्या गेलेल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाच्या लेखकाने चक्रधरस्वामींचा महानुभाव पंथ आणि बसवेश्वराच्या लिंगायत पंथाने पुरोहितशाहीला केलेल्या प्रत्यक्ष विरोधामुळे या दोन्ही पंथांना प्रस्थापितांच्या कठोर विरोधाचा सामना करावा लागला. यातून बोध घेत वारकरी पंथाने आपल्या रणनीतीला ‘खुबसुरत’ मोड दिला. वेदांवर टीका नाही पण ‘नामवेद’ हाच श्रेष्ठ. मंत्रातंत्रावर, कर्मकांडावर टीका नाही पण ‘नाममंत्र’च महत्त्वाचा. देव कर्मकांडाचा भुकेला नसून, तो केवळ भावाचा भुकेला आहे. तो केवळ नामस्मरणाने प्रसन्न होतो आणि नामस्मरणाला ना देवाची मूर्ती लागत आणि ना त्याची पूजा. तुम्ही दैनंदिन काम करतानाही देवाचे नाव घेऊ शकता. त्यास काहीही लागत नाही.देवही लागत नाही, पुजारीही नाही. आणि पुजारीच नाही म्हटल्यावर त्याची ‘दक्षिणा’ही नाही. त्यामुळे वारकरी पंथाने ‘ब्राह्मणशाही’च्या पाठीवर न मारता डायरेक्ट ‘पोटावर’च पाय दिला. म्हणून त्याची परिणामकारकता व दीर्घकालिनता जास्त राहिली. वेदांवर काही टीका न करता तुकाराम महाराज असं म्हणत असतील की,

‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा,

येर्‍यांनी वाहावा भार माथा’

यातील ‘विद्रोह’ आवाज करीत नसला तरी परिणाम मात्र मोठा साधतो. चार वर्णांच्या निर्मितीची कथा मोठी रोचक आहे. ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र. चार वर्णातील श्रेष्ठ-कनिष्ठता, असमानता दर्शविण्यासाठीच अशाप्रकारे ब्रह्मदेवाच्या वेगवेगळ्या अवयवांना जन्मस्थळ म्हणून निवडले गेले. हे तर स्पष्ट आहे. पण, त्याकडे फारसे न बघता तुकाराम महाराज म्हणतात, अखेर सर्वांचा जन्मदाता एकच असेल तर माणसामाणसांमध्ये भेद कसा? वीण तर सर्वांची एकच ना? होय ती समतेची दिशा आहे.

समतेचा मुद्दा जेव्हा जेव्हा समोर येतो, तेव्हा तेव्हा हिंदू उच्चवर्णीयांना पोटदुखी सुरू होते. हिंदू उच्चवर्णीयांनी आपल्याच हिंदू बांधवांवर हजारो वर्षेकेलेल्या अन्याय-अत्याचारावर पडदा टाकण्यासाठी सातत्याने हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी घातलं जातं. मी, माझी जात व माझं जन्मजात वर्णश्रेष्ठत्व म्हणजेच राष्ट्र असं मानणार्‍यांचा राष्ट्रवाद सध्या जोरात आणि जोमात आहे. हा राष्ट्रवाद थोडा खरडला तर त्याखाली हिंदुत्ववाद दिसतो आणि हा हिंदुत्ववाद थोडा खरडला की, त्याखाली ब्राह्मणवाद दिसायला लागतो.

सध्या या राष्ट्रवादाच्या विरोधात बोलणार्‍याला देशद्रोही ठरवलं जातं. खरंतर हिंदुत्ववादी हा हिंदूच असत नाही. गाय आणि गायीच्या अंगावरचे गोचीड. गोचिडाच्या अंगातदेखील गायीचं रक्त आहे, म्हणून गोचीड जसा गाय होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांच्या अंगात हिंदूचं रक्त आहे म्हणून हिंदुत्ववादी हिंदू होऊ शकत नाही. दुर्दैवाने गोचिडाला मारण्यासाठी जी जी काठी उगारली गेली ती गायीच्या पाठीवर बसत गेली आणि आज परिणास्वरूपी गायच खाटिकधार्जिणी होऊन बसली. औरंगजेब हिंदूद्वेष्टा कसा होता, हे ठसविण्यासाठी औरंगजेबाने हिंदूंवर ‘जिझिया’ कर कसा लावला होता हे उच्चरवाने सांगितले जाते. पण, हा ‘जिझिया’ कर ब्राह्मणांवर नव्हता, ही बाब मात्र लपविली जाते. औरंगजेब ब्राह्मणांना हिंदू समजत नव्हता की काय? हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाहीत, या विधानाला ‘जिझिया’ करातून ब्राह्मणांना वगळून औरंगजेब पुष्टीच तर देत नाही ना? औरंगजेबासाठी ब्रह्मवृंदांनी दुवा मागितल्याचे दाखले आहेत. ब्राह्मणांनी आपल्या निष्ठा खाविंदचरणी अर्पण केल्या होत्या. औरंगजेबाच्या वतीने मिर्झा राजे शिवाजी महाराजांवर म्हणजेच स्वराज्यावर चाल करून जातो तेव्हा शिवाजी महाराजांविरुद्ध मिर्झा राजेंना जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोट चंडियज्ञ केला होता, ही बाब तर सर्वविदित आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसुद्धा महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांनी नाकारला होता. ही बाबही जगजाहीर आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन औरंगजेबाने ब्राह्मणांना ‘जिझिया’ करातून सवलत दिली असेल?                            (पूर्वार्ध)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget