Halloween Costume ideas 2015

संस्कृतीपासून ते अर्थक्रांतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची मांडणी कुरआनात आहे - संमेलनाध्यक्ष अ. का. मुकादम


मराठी संस्कृती आणि समाजजीवनावर चर्चा करण्यासाठी नववे अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलन 28 व 29 जानेवारी 2023 रोजी नाशिकमध्ये पार पडले. नाशिकमधील भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलनस्थळाला प्रा. फकरुद्दिन बेन्नुर नगरी असे नाव देण्यात आले होते. साहित्यिकांची आणि रसिकांची मांदियाळी बऱ्यापैकी होती. नाशिकमध्ये यापूर्वी 2001 मध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यानंतर आता 22 वर्षांनी हा मान पुन्हा नाशिकला मिळाला. ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. या दोन दिवसांच्या संमेलनात विविध कार्यक्रम, तसेच परिसंवाद पार पडले. या परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे, डॉ. अजिज नदाफ, माजी कुलगुरू डॉ. एन. एस. पठाण, ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई, डॉ. रफीक पारनेरकर आदी उपस्थित होते.

इस्लामचे संपूर्ण सार कुराणमध्ये आहे. संस्कृतीपासून ते अर्थक्रांतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची मांडणी त्यात केली आहे. संपूर्ण जगात पूर्वीपासून इस्लामला बदनाम केले जात आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची सुमारे 15 टक्के लोकसंख्या आहे. आजवरच्या साहित्यात मुस्लिमांना खलनायक, विदूषक या स्वरूपात सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे समाजात वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. भाषेला कुठलाही धर्म, जात नसते. जोपर्यंत माणूस भाषा वाचत नाही तोपर्यंत त्याला त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे भाषांचा अभ्यास करणे सर्वांसाठी महत्वाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेली आहेत तरी समग्र क्रांती झालेली नाही. समान अधिकारासाठी ज्ञानाचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य आणि साहित्यिकांची मोलाची भूमिका आहे. पुढे त्यांनी साहित्याची प्रेरणा व  प्रयोजन, मुस्लिम मराठी साहित्य भिन्नता व एकात्मता मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता व इस्लामी संस्कृतीची वाटचाल या मुद्यांद्वारे माहिती दिली. संमेलनाच्या सुरवातीस कुरआनची तिलावत करण्यात आली आणि संविधानाचे वाचन करण्यात आले. माजी मंत्री आणि ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई यांच्यासह संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, प्रा. जावेदपाशा कुरेशी, स्वागताध्यक्ष इरफान शेख, कार्याध्यक्ष हसन मुजावर, डॉ. अलीम वकील, डॉ. अजित नदाफ, गुलाम शेख, आयुब नल्लामंदू, लियाकत नामोले आदींच्या हस्ते वृक्षारोपास जलदान करून संमेलनाचे उद्घाटन झाले.

ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई म्हणाले, 20 ते 25 वर्षांपूर्वी मुस्लिम साहित्य संमेलनाची मूर्तमेढ रोवली गेली. समाजातील दरी कमी करण्यासाठी अनेक चळवळी निर्माण झाल्या. चळवळ पुढे नेण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे आणि करत आहेत. लढाई कठीण आहे. साहित्याच्या माध्यमातून लढाई लढावी लागेल. त्यामुळे भविष्यात नक्कीच परिवर्तन घडून येईल. मुस्लिम युवकांच्या हातात जादू आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. केवळ त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. सरकारने त्यांना योग्य शिक्षण दिल्यास देशाच्या विकासात हातभार लागेल, असेही दलवाई यांनी सांगितले.

संमेलनाचे स्वागतध्यक्ष इरफान शेख यांनी संमेलनाचे रूपरेषा विशद करताना नाशिक ही सुफी संतांची भूमी आहे. या भूमीत 9 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले.

संमेलनाचे प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले की, मानवाने निर्माण केलेल्या सर्व व्यवस्था वाजवी आहेत. मग समाजाच्या पुनर्स्थापनेची जबाबदारी साहित्यिकांवर येते, कारण अशी संमेलने नियमित व्हायला हवीत. भाषा ही फक्त संवादासाठी असते. शिवाय, सध्या संस्कृती युद्ध लादले जात आहे. काश्मीर फाइल्स, गोडसे विरुद्ध गांधी हे चित्रपट उत्तम उदाहरण आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर ओबीसी समाजाने संस्कृती निर्माण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. संस्कृती ही लढण्यासाठी नसून निर्माण करण्यासाठी असते. असेही त्यांनी सांगितले.

संमेलनाच्या स्वागत समितीचे सदस्य प्रा. शरद शेजवळ म्हणाले की, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या ठेकेदारांना व धोरणकर्त्या राजकारण्यांना चिंतन करायला लावणारे संमेलन आहे. धर्म जोडा राष्ट्र जोडले जाईल, भाषा जोडा मन जोडले जातील, हाच संदेश हे संमेलन सांस्कृतिक दहशतवादी काळात देत आहे. हे आम्हा संविधानवादी कार्यकर्त्यांना फारच आशादायक वाटते. अशा साहित्य संमेलनाच्या मागे तमाम जनतेने सर्वार्थाने उभे राहावे माणसं पेरण्यासाठी...!

साहित्य संमेलनानिमित्त सकाळी आठच्या सुमारास नॅशनल उर्दू हायस्कूल ते संमेलनस्थळी दादासाहेब गायकवाड सभागृहपर्वत रॅली काढण्यात आली. मार्गात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. संमेलनस्थळीदेखील मुस्लिम समाज व त्यांचे प्रश्न यावर जनजागृतीपर पथनाट्य सदर केले, चिमुकल्यांनी उपस्थित केलेले प्रश्न उपस्थिताना आकर्षित करून गेले.

या संमेलनात झालेल्या ‘साहित्य व सांस्कृतिक दहशतवाद’ विषयावरील परिसंवादात प्रा. जावेदपाशा कुरेशी म्हणाले की, इस्लाममध्ये दहशतवादाची शिकवण नाही. प्रेम, एकतेचे संदेश देणारे साहित्य इस्लाममध्ये आहे. पहिले दहशतवादी साहित्य मनुस्मृती निर्माण झाले. साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद अडीच हजार वर्षांचा आहे. कुठल्याही हिंदू संतांनी मुस्लिमविरोधी साहित्य लिहिलेले नाही किंवा त्यांचे आचरणदेखील मुस्लिमविरोधी नाही.

मुज्जफर सय्यद म्हणाले, की सांस्कृतिक दहशतवाद विकृत साहित्यातून झाला आहे. विकृत इतिहासात अफजल खान मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने सर्वांवर अत्याचार केले, असे सांगण्यात आले आहे. खरा इतिहास कधी पुढे येऊ दिला नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर विश्वासू सैन्य मुस्लिम होते. हे कधीही इतिहासात दाखवण्यात आलेले नाही.

डॉ. मुस्तजिब खान म्हणाले, की राजकीय भावना तयार करण्यासाठी सांस्कृतिक दहशतवादाला सुरवात केली. भाषा, सिनेमा, नाटकातील पात्र, टीव्ही मालिका यांच्यातून सांस्कृतिक दहशतवाद होत आहे.

राम पुनियामी म्हणाले, की भारतीय विविधता आणि संविधान धोक्यात आहे. राजकारण भारतीय परंपरेला अनुकूल नाही. देशाचे राजकारण भरकटत आहे. नारायण भोसले म्हणाले, की संस्कृत भाषा सर्वांसाठी नव्हती. भीती निर्माण करणे, असे वर्तन करणे म्हणजे दहशतवाद होय. अली निजामुद्दीन म्हणाले, की मुस्लिम समाज एकसंध नाही. पंथीय जाणिवा निर्माण झाल्या. त्यांच्यात टोकाचे गैरसमज आहे. साहिल कबीर म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रात मुस्लिमांना खलनायक केले आहे. हा दहशतवाद टिकून ठेवला. सांस्कृतिक दहशतवाद पेटला आहे, झिरपला आहे. त्याचप्रमाणे अन्वर राजन यांनी सुफी संतांनी इस्लाम धर्माची ओळख करून दिली आहे. लोकभाषांना प्रतिष्ठा दिली. लोकभाषा, लोकसंस्कृती जोडली असे सांगितले. प्रा. मेहबूब सय्यद यांनी साहित्यिक समाजातील वास्तव मांडताना दिसत नाही. मुस्लिमांना विकृत करण्याची परंपरा सुरू आहे. प्रजेची सत्ता असताना स्वातंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा फरक अजूनही लक्षात येत नाही. विशिष्ट समाजाला चिरडण्याचे षडयंत्र सुरू आहे. जाती धर्माच्या आधारे फूट पडण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले. या साहित्य संमेलनामध्ये ’मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : साहित्यिक , सांस्कृतिक, सामाजिक अन्वयार्थ’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. फारूक शेख हे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शकील शेख, प्राचार्य इ. जा. तांबोळी, सोलापूर आणि ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक, साहित्यिक शेख शफी बोल्डेकर हे होते. या वेळी साहित्यपीठावरून बोलताना शफी बोल्डेकर यांनी मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा इतिहास श्रोत्यासमोर मांडला. ग्रामीण भागात एकूण मुस्लिम संख्येच्या साठ टक्के समाज राहतो. सामाजिक वातावरणात वावरत असताना कुठे सामाजिक सलोख्याचे तर कुठे आपण विभक्त आहोत असले दाहक अनुभव त्याच्या वाट्याला येतात. याच अनुभवाच्या बळावर तो मराठी भाषेतून साहित्य निर्मिती करतो, असेही ते म्हणाले. 

समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी उपस्थितांनान आवाहन केले की, मुस्लिम समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. समाजात कुठल्याही प्रकारे फूट पाडू नका. धर्माच्या नावावर ज्यांच्याकडून राजकारण केले जाते, त्यांना थारा देऊ नका.

दलवाई यांनी मुस्लिम समाजाची आजची स्थिती, तिची कारणे आणि त्यावर मात करण्यासाठी मुस्लिमांनी कोणत्या बाबींना प्राधान्य दिले पाहिजे याचा उहापोह केला. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे नाव घेताना पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी यांचे नाव घेणेही महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनीही समाजासाठी आपले आयुष्य वेचले आहे. मुस्लिम समाजही शिवाजी महाराजांना मानणारा आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यामुळे राजकारण्यांनी इतिहास सांगतानाही खरा इतिहास सांगावा असे आवाहनही दलवाई यांनी केले.

संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी राज्यातील विविध शहरात राजकीय तणाव बघावयास मिळत आहे. नाशिक शहरात मात्र तसा कुठलाही तणाव नाही. एकमेकांमध्ये आदराची भावना दिसून आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलन या धाकट्या भावाची दखल घेण्यात यावी. मोठ्या भावाच्या वाड्यात धाकट्या भावाला देखील मोठे दालन उपलब्ध करून द्यावे. मराठीच्या बोली भाषेच्या पुस्तकात कोकणी मुस्लिम मराठी भाषाचा उल्लेख करावा. दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे सांगितले.

देश व राज्याच्या कुठल्याही वृद्धाश्रमात मुस्लिम समाजाचे वृद्ध आई-वडील दिसून येत नाही. इस्लामची शिकवण मुस्लिम बांधवास तसे करू देत नाही. जो आईवडिलांचा आदर करतो तो खरा मुसलमान आहे, असे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रवीण जोशी यांनी सांगितले. पाच टायमाची नित्य नियमाने नमाज, थुंकी न गिळता कडक उपवास करणे, सहनशीलता आणि मानवतेची जाणीव करून देतो, मात्र या समाजात शिक्षणाचा अभाव आहे, त्यांनी शिक्षण घ्यावे असे आवाहनही जोशी यांनी केले. या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अलीम वकील, कवी जावेद पाशा कुरेशी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजित नदाफ, प्राचार्य डॉ. फारुख शेख, डॉ. सुरेश जागीरदार आदी मान्यवरही उपस्थित होते. राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप झाला. स्वागताध्यक्ष इरफान शेख, इ. जा. तांबोळी, प्रदीप जोशी, आयुब नल्लामंदू, डॉ. युसूफ बेन्नूर, डॉ. अलीम वकील, माजी महापौर गुलाम शेख, कार्याध्यक्ष हसन मुजावर, प्रा. डॉ. फारुख शेख, मुजफ्फर सय्यद, ड. एस. यू. सय्यद आदी साहित्यिक तसेच मान्यवर उपस्थित होते.

या दोन दिवसीय संमेलनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिम प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची दशके : साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषण, आम्ही भारताचे लोक, सांस्कृतिक दहशतवाद आदी विषयांवर मंथन झाले. त्याचबरोबर साहिल कबीर आणि कलीम अजीम यांनी संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यात त्यांना त्यांच्या साहित्य प्रवाहातील योगदानाबाबत विविध पैलूंविषयी प्रश्न विचारण्यात आणि मुकादम यांनी त्यांची समाधानकारक उत्तरेही दिली. तसेच ग्रंथदिंडी, पथनाट्य, कवी संमेलने, चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, समाजप्रबोधनपर गीते, निसर्ग पोस्टर प्रदर्शन, विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन व विक्रीचे स्टॉल्स विविध प्रकाशकांकडून लावण्यात आले होते. त्यामध्ये इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई तर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच या ट्रस्टतर्फे प्रा. राम पुनयानी आणि इतर मान्यवरांना मराठी अनुवादित प्रत भेट म्हणून देण्यात आली तर वाचकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रकाशनाचे व्यवस्थापक रेहान मुबारक यांनी सांगितले. प्रा. मंगेश जोशी व शीतल भाटे, निलोफर सय्यद आदींनी सूत्रसंचालन केले. 

- शाहजहान मगदुम


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget