Halloween Costume ideas 2015
February 2023


जरासी भी नेकी को वो जाया नहीं करता

और बेसब जलजला आया नहीं करता

जब-जब भी गुनाहों से भर जाती है धरती

करता है सफाई वो सफाया नहीं करता

फेब्रुवारी 2023 रोजी तुर्कीयेमध्ये आलेल्या महाप्रचंड भूकंपावर अनेक दृष्टीने विचारमंथन होत आहे. परंतु इस्लामी दृष्टिने मंथन झाल्याचे वाचणात आलेले नाही. म्हणून त्या दृष्टिने मंथन करण्यासाठी हा लेखन प्रपंच.

दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनचे कण एकत्र येताच पाणी तयार होते, हे विज्ञान सांगते. पण ते का तयार होते? हे विज्ञान सांगत नाही. ठीक याच प्रकारे तुर्कीयेमध्ये ज्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू होता त्या ठिकाणी भूगर्भात 18 किलोमीटर खाली असलेल्या शिळा सरकल्यामुळे हा भूकंप झाला आणि तुर्कीये दहा फूट युरोपकडे सरकला, अशी माहिती भूगर्भशास्त्रज्ञांनी दिली. पण त्या शिळा का सरकल्या याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. याचे उत्तर कुरआनकडे आहे. 

कुरआनमध्ये भूकंपासंबंधी एक संपूर्ण सुरा (अध्याय) अवतरित झालेला असून, त्याचा क्र.99 तर नाव सुरे ’जिलजाल’ आहे. याशिवाय, भूकंपाविषयी अनेक आयाती कुरआनमध्ये इतरत्र आलेल्या आहे. या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून भूकंपाविषयी इस्लामी दृष्टिकोण काय आहे हे स्पष्ट केल्यास भूकंपाबद्दल आपले मत तयार करण्यामध्ये वाचकांना मदत होईल. 

भूकंपासंबंधाचा अध्याय सुरे ज़िलज़ाल क्र. 99

आ.क्र. 1. जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हलवून सोडली जाईल  

स्पष्टीकरण : जेव्हा पृथ्वी आपल्या आवेशासहित हलवून सोडली जाईल याचा अर्थ असा की, आज जसे कधी किल्लारीला तर कधी तुर्कीयेच्या काही भागांना थोडेसे हलविले जात आहे, (ही प्रलयाची पूर्वसूचना आहे) प्रलयाच्या दिवशी मात्र असे छोटेमोठे झटके दिले जाणार नाहीत. त्या दिवशी तर पृथ्वीचा पूर्ण गोल पूर्ण आवेशानिशी हलवला जाईल. त्या दिवशी अंतिम निवाड्यासाठी ईश्वरीय न्यायालय भरविले जाईल. अरबी भाषेमध्ये ’जलजला’ या शब्दाचा अर्थ ’एकसारखे जोरजोरात हलविणे’ असा होतो आणि, ’’अर्ज’ चा अर्थ जमीन होतो. येणेप्रमाणे जमीनीचा एखादा भाग हलविला जाणार नाही तर पृथ्वीरूपी गोळाच संपूर्णपणे पूर्ण ताकदिनिशी हलविला जाईल. तो इतक्या जोरात हलविला जाईल की येथूनच प्रलयाच्या प्रक्रियेच्या पहिल्या चरणाला सुरूवात होईल. या झटक्याने काय होईल तर हा झटका इतका जबरदस्त असेल की पृथ्वीवरचे सर्व सजीव प्राणी मरून जातील. ही पृथ्वी तशीच छिन्नविछिन्न होऊन जाईल जशी आज तुर्कीयेच्या त्या भागात झालेली आहे ज्या भागात भूकंपाचे झटके आलेले आहेत. पक्के रस्तेे उलथून पडतील. पृथ्वीला मोठमोठ्या भेगा पडतील. मोठाली झाडे उन्मळून पडतील. पर्वत ढासळून पडतील. मोठमोठ्या इमारती पत्याच्या बंगल्यासारख्या कोसळतील.  

2. आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील  (99:2)

स्पष्टीकरण : जेव्हा दूसरा झटका येईल तेव्हा पृथ्वी आपल्या गर्भातील सर्व ओझेे बाहेर टाकून देईल. प्रलयाच्या प्रक्रियेचे हे दूसरे चरण असल्याची खबर ही आयत देत आहे. याचा अर्थ पृथ्वीवर आलेल्या पहिल्या मानवापासून शेवटच्या मानवापर्यंत, जे पृथ्वीवर आले आणि मरण पावले आणि पृथ्वीच्या आत हजारो वर्षांपासून गाडले गेलेले आहेत त्या सर्वांना पुन्हा जिवित केले जाईल.

मरूण माती/राख झालेली माणसं कसे बरे जीवंत केले जाऊ शकतील? असा प्रश्न ज्यांच्या मनात उठत असेल त्यांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर कुरआन दुसऱ्या ठिकाणी स्वतःच देतो की, ’’ज्या ईश्वराने तुम्हाला शुन्यातून जन्माला घातले त्याला तुमच्या राख, माती आणि विखुरलेल्या हाडांना पुन्हा जोडून जीवंत करणे फारसे कठीण काम नाही.’’ (संदर्भ सुरे यासीन आयत क्र. 78-79) 

पृथ्वी फक्त आपल्या गर्भातून माणसांनाच बाहेर फेकणार नाही तर सोने, चांदी, हिरे अर्थात सर्वच प्रकारची खनीज संपत्ती देखील बाहेर फेकून देईल. माणसे त्या संपत्तीकडे पाहून विचार करतील की, ह्याच का त्या गोष्टी होत्या ज्यासाठी आम्ही आयुष्यभर तळमळत होतो. एकमेकांचा विश्वासघात करत होतो, खोटे बोलत होतो, युद्ध करत होतो आणि एकमेकांचे मुडदे पाडत होतो. 

3. आणि मानव म्हणेल की, हिला हे काय होत आहे?  (99:3)

स्पष्टीकरण : पृथ्वीच्या या विध्वंसक हालचालींकडे पाहून ज्यांचा अंतिम निवाड्याच्या दिवसावर विश्वास नव्हता ते नखशिकांत हादरून जातील. त्यांना आश्चर्य वाटेल की हे सर्व काय घडत आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की, थोड्याच वेळात ईश्वराच्या न्यायालयाला सुरूवात होतील. ते भांबाहून जातील. या परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे त्यांच्या लक्षातच येणार नाही. राहिला प्रश्न मुस्लिमांचा तर जे सश्रद्ध मुस्लिम आहेत त्यांना हे पाहून अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जे काही होत आहे ते त्यांंच्या श्रद्धेबर हुकूम होत आहे हे पाहून ते आनंदित होतील. कारण या दिवसाला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच्या आयुष्यात केलेली असेल.  

4. त्या दिवशी ती आपले (वरील घडलेले) अहवाल निवेदन करील  (99:4)

स्पष्टीकरण : प्रलयाचा पुढचा भाग ईश्वरीय न्यायालयाची स्थापना होईल. मग प्रत्येकाच्या हातात त्याच्या कर्माचा अहवाल दिला जाईल. त्यात त्याने आयुष्यभर जे जे चांगले केले व जे जे वाईट केले त्याचा सर्व तपशील लिहिलेला असेल. असे कसे शक्य आहे? असा प्रश्न ज्या कोणाला पडेल त्यांनी रेडिओ, टि.व्ही. पासून मोबाईल फोन पर्यंतच्या सर्व वैज्ञानिक शोधांवर एक नजर टाकावी. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की लंडनमध्ये बीबीसीच्या स्टुडिओमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला भारताच्या सुदूर पूर्वेच्या कोणत्याही शहरात बसलेला एक व्यक्ती जसेच्या तसे आज एचडीमध्ये कसा पाहतो?. फक्त पाहूच शकत नाही तर स्टुडिओमध्ये बसलेल्या त्या व्यक्तीचे म्हणणे रेकॉर्ड करून ठेवता येते, लिंक सेव्ह करून ठेवता येते व मनाला येईल तेव्हा ते पाहता येते. आजमितीला हे माणसाला शक्य आहे तर ईश्वराला का शक्य होणार नाही?

5. कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला (असे करण्याची) आज्ञा दिलेली असेल (99:5)

स्पष्टीकरण : पृथ्वीवरच्या या विध्वंसक हालचाली पृथ्वीच्या मर्जीने होणार नाहीत. तर ईश्वराने तिला तसा आदेश दिल्याने होईल.

6. त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. (99:6)

स्पष्टीकरण : त्या दिवशी आपल्या कृत्याची चित्रफितच त्यांना दाखविली जाईल. ईश्वर मानवी शरिराच्या सर्व अवयवांना बोलण्याची शक्ती प्रदान करेल व आपली अवयवे आपल्या विरूद्ध किंवा बाजूने साक्ष देतील. चांगले कर्म केले असेल तर चांगली साक्ष देतील अथवा वाईट केले असेल तर वाईट साक्ष देतील. पृथ्वीलाही बोलण्याची शक्ती प्रदान केली जाईल. पृथ्वीसुद्धा म्हणेल की, अमुक एका व्यक्तीने माझ्या पृष्ठभागावर अमुक ठिकाणी अमुक चांगले कृत्य केले होते. तर अमुक ठिकाणी पाप केले होते. 

7. मग ज्याने तिळमात्र पुण्य केले असेल ते तो पाहील.  (99:7)

8. आणि ज्याने तिळमात्र पाप केले असेल तेही तो पाहील.  (99:8)

स्पष्टीकरण : ही सर्व साक्ष आणि पुरावे इतके ठोस आणि सबळ असतील की त्यामुळे प्रत्येक माणसाची व्यक्तीगत कृत्य निर्विवादपणे ईश्वरासमोर शाबित होतील. यालाच कायद्याच्या भाषेत, ’’निरूत्तर शाबिती’’ असे म्हटले जाते. तेव्हा ईश्वरासमोर तिळमात्र पुण्य कर्म असो की पाप कर्म असो की इतक्या ठळकपणे दिसेल की त्याला स्वीकारण्याशिवाय माणसाला गत्यंतर उरणार नाही.

 प्रलयासंबंधी या अध्यायामध्ये जरी वर्णन आलेले असले तरीही या वर्णनामागचा ईश्वरीय हेतू माणसाला त्याच्या मृत्यूपरांत जीवनाबद्दल संवेदनशील करणे हा आहे. कारण पृथ्वीवरील झगमगाटात आपले जीवन जगतांना माणसांना या गोष्टीचा संपूर्णपणे विसर पडतो की हजार वर्षे जरी जीवंत राहिलो तरी शेवटी एक दिवस आपल्याला मरायचेच आहे. मृत्यू संबंधी विसर पडल्यामुळे व मृत्यूपरांत सुद्धा एक जीवन आहे, तसेच त्या जीवनात या जीवनात केलेल्या कर्माचा हिशोब द्यावयाचा आहे. याचा संपूर्ण विसर पडल्यामुळे माणसं बेजबाबदारपणे वागतात व दूसऱ्यावर अन्याय, अत्याचार करण्यास प्रवृत्त होतात. पराकोटीचा भ्रष्टाचार करतात. याउलट ज्या लोकांना पारलौकिक जीवनाबद्दल जाणीव आहे ते या जन्मात नेकीने वागतात. भ्रष्टाचार करत नाहीत. संधी असूनही कोणावर अत्याचार करत नाहीत. पापभिरू असतात. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्याची ज्या वाचकांची इच्छा असेल त्यांनी कुरआनमधील सुरे क्र. 50 काफ आयत नं. 17-18, सुरे क्रमांक 82 इन्फीतार आयत क्र.10-12, सुरे क्रमांक 17 बनी इस्राईल आणि सुरे क्र. 18 अलकहफ आयत न.ं 18-19 चा अभ्यास करावा म्हणजे त्यांना मरणोत्तर जीवनाबद्दलची संपूर्ण कल्पना येईल. 

चांगल्या आणि वाईट कर्मांची फळे ईश्वर देईल हे जरी न्नकी असले तरी चांगल्या आणि वाईट कृत्यांचा विचार एकत्रितपणे करून चांगली कृत्ये जास्त आणि वाईट कृत्य कमी असतील अशा श्रद्धावान मुस्लिम व्यक्तीला स्वर्गात जागा मिळेल व ज्याची वाईट कृत्य जास्त असतील तो नरकात फेकला जाईल. तसेच आपल्या वाईट कृतीची शिक्षा भोगल्यानंतर त्याला जन्नतमध्ये प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे, असे कुरआनच्या अनेक अभ्यासकांचे मत आहे. राहता राहिला प्रश्न इन्कार करणाऱ्यांचा! तर त्यांच्या संदर्भात असे म्हणता येईल की ते कायम जहन्नममध्ये राहतील. त्यांच्यातील पुण्यवान लोकांना हलक्या स्वरूपाची शिक्षा दिली जाईल. कारण ईश्वराने सर्व मानवजातीसाठी एकच धर्म पसंत केलेला आहे तो म्हणजे इस्लाम. याचाच ज्यांनी इन्कार केला त्यांना त्याची शिक्षा मिळेल. ही बाब खालील आयातीवरून स्पष्ट होते. 

’’अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.’’ (सुरे आलेइमरान 3: आयत क्र. 19)

हेच कारण आहे की प्रत्येक श्रद्धावान मुस्लिम हा प्रत्येक बिगर मुस्लिम व्यक्तीपर्यंत इस्लामचा संदेश पोटतिडकीने देण्याचा प्रयत्न करतो. त्याला प्रामाणिकपणे असे वाटते की, प्रत्येक माणसाने आपल्याबरोबर जन्नतमध्ये यावे. 

या लेखावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतील. काही लोक विचार करतील की हे केवळ अशक्य आहे. मरूण माती झाल्यावर पुन्हा जीवंत केले जाणे, त्यांचा हिशोब केला जाणे हे केवळ अशक्य आहे. दूसरे ज्यांच्यात अध्यात्माचा अंश शिल्लक आहे ते गांभीर्याने या लेखात मांडलेल्या मुद्यांवर विचार करतील आणि आपल्या वर्तनात सुधारणा करतील.  

मित्रानों ! लक्षात ठेवा पहिल्या प्रकारच्या लोकांचे मत खरे ठरले तर तेही सुटतील आणि त्यांच्याबरोबर मुस्लिमही सुटतील. त्यांना कुठल्याच प्रकारचा पश्चाताप करण्याची गरज राहणार नाही. मात्र समजा मृत्यूनंतर वर नमूद केलेला घटनाक्रम सुरू झाला तर? यावेळेस मात्र मुस्लिमांना पश्चाताप करण्याची गरज राहणार नाही मात्र ज्यांनी मरणोपरांत जीवनाचा इन्कार केला त्यांच्यावर पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून हा लेख पुन्हा एकदा वाचा, डोळे बंद करा, दोन-चार खोल श्वास घ्या, शांतपणे विचार करा आणि मृत्यू आणि मृत्यूपरांत जीवनासंबंधी निर्णय घ्या. ईश्वर तुम्हाला सहाय्य करो. आमीन.



’ऑपरेशन दोस्त’चा एक भाग म्हणून आमची पथके अहोरात्र काम करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. या संकटाच्या काळात भारत तुर्कस्तानच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुर्कस्तानमधील भारताचे ’ऑपरेशन दोस्त’  काळजी, करुणा आणि माणुसकीचे उदाहरण घालून देत आहे. कठीण काळात मदत करताना जीवन हसत आहे.  

तुर्कस्तान-सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपात 50 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि  एक लाखाहून  अधिक  लोक जखमी झाले आहेत. भारताच्या बचाव आणि मदत पथकाने तुर्कस्तानच्या हाते प्रांतात 30 खाटांचे फिल्ड हॉस्पिटल उभारले आहे, जिथे भूकंपाची भीती, वेदना आणि जखमी लोकांवर उपचार केले जात आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत  7 विमानांद्वारे 250 बचाव कर्मचारी आणि 140 टन मदत सामग्री भारतातून पाठविण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हातयमधील इस्कंदरम येथील फील्ड हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात पाच महिलांसह नूरदगीमध्ये एनडीआरएफचे शोध आणि बचाव कार्य दिसत आहे. 

भारताची एनडीआरएफची टीम ग्राउंड झिरोवर बचाव आणि मदत कार्य करत आहे. या अंतर्गत आयएनडी-11 ने गुरुवारी (9 फेब्रुवारी) गाझियाबादमधील नूरदागी येथून एका 6 वर्षीय मुलीची सुटका केली.

1993 नंतरचा हा  सर्वात भीषण भूकंप आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपानंतर जगातील सर्व देश मदतीसाठी पुढे आले आहेत. भूकंपानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) दोन पथके शोध आणि बचाव कार्यासाठी तुर्कस्तानला पाठवली होती. त्यात विशेष प्रशिक्षित श्वान पथक आणि आवश्यक ती सर्व उपकरणे होती. तुर्कस्तानमध्ये भारतीय पथकासोबत डॉक्टर आणि पॅरामेडिक्सही उपस्थित आहेत. भारतीय पथके सातत्याने शोध आणि बचाव कार्यासह वैद्यकीय सुविधा पुरवत आहेत. भारताने तुर्कस्तानमधील या शोध आणि मदत मोहिमेला ऑपरेशन दोस्त असे नाव दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी 12 फेब्रुवारी रोजी ट्विट करून सांगितले की, ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत सामग्री घेऊन सातवे विमान तुर्कस्तानमध्ये पोहोचले. तुर्कस्तानव्यतिरिक्त सीरियातील भूकंपग्रस्त भागातही ऑपरेशन दोस्त राबवले जात आहे. रविवारी भारताने सीरियाला मदत सामग्रीची आणखी एक खेप पाठवली आहे. यामध्ये जनरेटर, सोलर दिवे, औषधे आणि इतर मदत साहित्याचा समावेश आहे. 

तुर्कस्तानने भारताला मदतीसाठी ’मित्र’ म्हटले आणि भूकंपग्रस्तांसाठी आपत्कालीन किट पाठवल्याबद्दल देशाचे आभार मानले. भारतातील तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांनी सोमवारी सर्वात भीषण आपत्तीतील बचावलेल्यांसाठी आपत्कालीन किट पाठवल्याबद्दल भारताचे आभार मानले. राजदूत फिरात सुनेल यांनी भारत सरकार आणि जनतेचे आभार मानले आणि ट्विट केले, धन्यवाद भारत! प्रत्येक तंबू, प्रत्येक ब्लँकेट किंवा स्लीपिंग बॅग लाखो भूकंपग्रस्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

तुर्कस्तानला भारताने ही मदत अशा वेळी केली आहे जेव्हा संबंध अजूनही तणावपूर्ण आहेत - विशेषत: काश्मीरवर तुर्कस्तानच्या विधानानंतर. 2019 मध्ये तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रमहासभेला संबोधित करताना जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यावर टीका केली होती. तरीही सरकारने राजकीय विचार बाजूला ठेवून मदत पाठवली ही वस्तुस्थिती जशी तुर्कस्तानने कोविडच्या काळात भारताला मदत पाठविताना केली होती, तशीच आहे. विशेषत: भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने केलेल्या मदतीमुळे विकसनशील देशांचा नेता म्हणून भारताची प्रतिमा उजळून निघाली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारत सरकारसोबतच देशातील अनेक संस्था आणि सामान्य नागरिकही भूकंपग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू दान करत आहेत. भारतीयांनी दान केलेले साहित्य घेऊन तुर्की एअरलाइन्सच्या विमानाने सोमवारी दिल्लीहून उड्डाण केले. 

तुर्की दूतावासाच्या म्हणण्यानुसार, तुर्की एअरलाइन्स भूकंपग्रस्त भागांना दररोज अशी मदत विनामूल्य देत आहे. देशातील अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मदतीसाठी पुढे आले असून मदत साहित्य गोळा करून तुर्कीच्या दूतावासापर्यंत पोहोचवत आहेत. गेल्या काही दिवसांत भारताने बचावकार्यात मदत करण्यासाठी सात सी-17 ग्लोबमास्टर लष्करी वाहतूक विमानांद्वारे औषधे,  एक फिरते रुग्णालय आणि एक विशेष शोध आणि बचाव पथक तुर्कीला पाठवले  आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-130 जे विमानातून भारताने सीरियाला मदत साहित्य पाठवले आहे.


- शाहजहान मगदुम


राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा


महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले होते तेव्हापासूनच भाजपाला ती सत्ता आपल्याकडे खेचून घ्यायची होती. ते सरकार स्थापन झाले होते तेच भाजपाला शरद पवारांनी आव्हान दिले होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या भाजपा-सेना युतीने एकत्र लढल्या होत्या. युतीला 161 जागा मिळाल्या होत्या. यात भाजपाला 105 जागा होत्या. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा केला आणि दोघांचे बिनसले. भाजपाने दिल्लीकडून युक्ती काढली आणि अजित पवारांना सकाळी पहाटे फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनवले. देवेंद्र फडणवीस आता म्हणू लागले आहेत की ते सरकार शरद पवारांच्या सहमतीने बनवले होते. आज त्यांना असा गौप्यस्फोट करण्याची काय गरज पडली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 

फडणवीस जसे म्हणतात तसे जर पवारांनी ते सरकार बनवण्यास पुढाकार घेतला होता तर त्यांनी ते सरकार पाडून सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महागठबंधनाचे सरकार बनवण्यास जे अनन्यसाधारण प्रयत्न केले होते. त्याची गरज काय होती जर त्यांना सत्तेत सहभाग हवाच होता तर त्या सरकारलाच पाठिंबा देत राष्ट्रवादी-भाजपा युती केली असती. आपल्या सक्रीय राजकारणाच्या ज्या अंतिम अतिमहत्वाच्या टप्प्यावर ते आहेत त्यांना नेमके काय हवे होते. याचे उत्तर स्पष्ट आहे. त्यांना महाराष्ट्रात गुजरात लॉबीचे सरकार नको होते. महाराष्ट्राच्या जडण घडणीत पवारांचा सिंहाचा वाटा आहे. सध्या महाराष्ट्राला प्रगतीच्या ज्या निर्णायक टप्प्यावर त्यांनी पोहोचवलेले आहे ते राज्य भाजपाला दान म्हणून देणे त्यांना कधीच आवडणारे नव्हते, म्हणून त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सेना-काँग्रेस मधील युती घडवून ज्याच्या राजकीय वर्तुळात कधी, कुणी विचार देखील केला नसेल आणि शरद पवारांशिवाय राज्याच्या इतर कोणत्याही नेत्याला हे जमले नसते. मुळात प्रश्न असा की आज जुन्या गोष्टी उकरून काढण्याची उपमुख्यमंत्री यांना का गरज भासली. सेनेत बंडाळी घडवून गुजरात-गुवाहाटी- गोवा मार्गे विधानसभा असे करत शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा-सेनेच्या बंडखोरांशी युती करून सरकार बनवले. पण एवढा सगळा खटाटोप करून देखील फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान करावे लागले. आता राज्याच्या निवडणुका जवळच आल्या आहेत. माजी राज्यपाल यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी बऱ्याच वेळा नको ती टीका केली आहे. त्याचा प्रभाव राज्याच्या मराठी माणसांवर झालेला आहे याची महाराष्ट्र आणि दिल्लीच्या नेत्यांना जाणीव झालेली आहे. शिवाय, फडणवीस यांच्या या खेळीमुळे जे सरकार अस्तित्वात आले आहे त्याचा सर्व वेळ सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याकडे चक्रा मारण्यातच जात आहे. विकासाच्या जेवढ्या काही बातम्या येत आहेत तेवढ्या गुजरातमधून येत आहेत. महाराष्ट्रातून विकास हद्दपार झाला की काय, अशी एकंदर परिस्थिती दिसत आहे.  

येत्या निवडणुकांच्या वेळी ते जर इथेच असते तर भाजपाला अडचणीचे गेले असते म्हणून त्यांची रवानगी करण्यात आली. सध्या महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जी वर्चस्वाची लढाई होत आहे त्याचा कोणाला फटका बसणार हे पक्के दिसत असले तरी मात्र कयास लावण्यापेक्षा वेळेची वाट बघावी लागेल. ठाकरेंना की शिंदे गटाला धक्का बसतो हा मोठा प्रश्न आहे. भाजपा एकट्याने राज्याच्या निवडणुका लढवल्या तर त्यांच्या हाती सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत लागणार नाही हे त्या पक्षाला चांगले माहित आहे. तेव्हा शिंदे गटाला बरोबर घ्यावेच लागणार म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्या तरी देखील फडणवीस यांना अवघड जाणार आहे. कारण मुख्यमंत्री पद पुन्हा शिंदे यांनाच द्यावे लागणार. मग फडणवीस यांनी हा जो एवढा खटाटोप केला त्याचा काय उपयोग? एक प्रश्न असा देखील आहे की जर न्यायालयात शिंदे गटांच्या विरूद्ध निकाल लागला तर मग राज्यात राष्ट्रपती राजवटी पलिकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. ह्या सर्व आव्हानांना सामोरे जाताना फडणवीस यांना काय करावे हे सूचन नसेल. शरद पवारांबद्दल त्यांनी जे विधान केले त्याचे उद्दिष्ट राज्यात राष्ट्रवादी नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण करण्याचे फडणविसांचे उद्दिष्ट असेल. पण शरद पवारांना आपल्या राजकीय जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा कोणालाही अर्पण करायचा नाही. कोणत्याही परिस्थिती ते भाजपाला साथ देणार नाही. त्यांना अगोदरच आपल्या राजकीय जीवनातले सर्वात महत्त्वाचा प्रसंग स्वतःच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे गमवावा लागेल म्हणजे त्यांनी जर काँग्रेस सोडली नसती तर मनमोहन सिंगच्या जागी ते पंतप्रधान झाले असते आणि तसे झाले असते तर 2014 च्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाली नसती.

- सय्यद इफ्तेखार अहमद



सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात हे १७ वे ऐतिहासिक विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यातही गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धेच्या भूमीत हे संमेलन साजरे होत आहे. सत्यशोधक, गांधीवादी, आंबेडकरवादी वारसा असलेल्या भूमीत, शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी व कर्मभूमी, चक्रधर स्वामींच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर. प्रखर स्रीवादी भूमिका आपल्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या निबंधातून मांडणार्‍या ताराबाई शिंदे या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या. राजमाता जिजामातेचं माहेर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा. अशा विदर्भाच्या संपन्न भूमीतील वर्धा येथे हे विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड आयोजकांनी केली, हा माझा औकातीपेक्षा जास्तच सन्मान आहे, असे मी मानतो व त्यासाठी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या आधीच्या संमेलनाध्यक्षांच्या नामावलीकडे जरी पाहिले तरी माझी छाती दडपून जाते. बाबुराव बागुल, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. अजीज नदाफ, जयंत पवार, ऊर्मिला पवार, कॉ. तारा रेड्डी, संजय पवार इत्यादी नावे याची साक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर या नावांचे दडपण माझ्यावर आलेच नाही असे नाही. पण मी विचार केला, गरुडाची चोच आणि आकाशात झेप घेणारे पंख चिमणीजवळ नाही म्हणून चिमणीने आपल्या चोचीने दाणा टिपूच नये का व आपल्या छोट्याशा पंखाने उडूच नये का? या विचारानेच मी नम्रपणे विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा स्वीकार केला आहे.

सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही. घोषित नसली तरी अघोषित आणीबाणी तर निश्चितच आहे. वातावरण विषाक्त बनविले जात आहे. वातावरणात परस्पर अविश्वास व जाती-जातीत, धर्माधर्मात ‘भया’चे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी सरकारी पातळीवरूनच हा प्रयत्न केला जात आहे, हा यातील सर्वात दुर्दैवी भाग आहे. नुकतेच घडून आलेला ऊर्फी जावेदच्या कपड्यावरूनचा वाद. आता ती केवळ ‘जावेद’ आहे म्हणूनच तो वाद उकरून काढला गेला की काय असेही वाटते. कारण त्याच दरम्यान कंगना राणावत, अमृता फडणवीस यांच्या तोकड्या कपड्यांचे दर्शन सोशल मीडियाने घडवून आणले. त्याआधी मिलिंद सोमण, मधू सप्रे यांच्या वस्त्रविहीन दर्शनाची आठवणही सोशल मीडियाने करून दिली. तात्पर्य एवढेच की, सप्रे-सोमण यांनी नंगाडपणा केला तरीही ‘हिंदू राष्ट्रात’ खपवून घेतला जाईल. पण ऊर्फी जावेदचा कदापि नाही, असा संदेश देण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. कधी कपडे, कधी टिकली, कधी ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या वेळी दीपिका पदुकोण या नटीने घातलेले कपडे यातही बहिष्कार दीपिका पदुकोणचा नाही तर शाहरुख खानचा. श्रद्धाचे तुकडे तुकडे करणारा मुस्लीम, मशिदीत शिवलिंग सापडल्याचे प्रकार, लव्ह जिहाद, हिजाब, भोंगे, हनुमान चालिसा याला झणझणीत हिंदुत्वाची फोडणी आणि ‘हिंदू खतरे में है’च्या सातत्याने चोहोबाजूकडून उठविण्यात येणार्‍या आरोळ्या हिंदूंची घटती व मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हा तर हिंदूंना प्रचंड भयभीत करून सोडणारा मुद्दा. मग याच मुद्यावर संसाराशी व प्रजननाशी संबंध नसलेले साधू-साध्वींचे हिंदू स्त्रियांना पोरांची पैदास वाढविण्याचे मार्गदर्शन म्हणजे एकूणच स्त्री म्हणजे पोरं पैदा करण्याची ‘मशीन’ व पुरुष म्हणजे त्या मशीनवर ‘काम’ करणारा कामगार. एकूणच ‘भ्रमित करावे सकळ जन’चा रेशीमबाग पुरस्कृत कार्यक्रम जोरात सुरू आहे.

साडेआठशे वर्षे या देशावर मुस्लिमांनी राज्य केले आणि नंतरची १५० वर्षेब्रिटिशांचे राज्य म्हणजे ख्रिश्र्चनांनी या देशावर राज्य करूनही या देशातील बहुसंख्य हिंदू हिंदूच राहिला. तो अल्पसंख्याक झाला नाही. या हजार वर्षांत या राजवटी निव्वळ गोट्या खेळत होत्या, म्हणून हिंदू बहुसंख्य राहिले?पण, आता ‘हिंदुत्ववाद्यां’च्या राज्यात मात्र हिंदू अल्पसंख्य होण्याची भीती? खरा इतिहास वेगळाच आहे. मुस्लिमांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून धर्मांतर कमी झाले. याउलट हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादाला व अतिरेकी वर्णश्रेष्ठत्वाच्या जाचाला कंटाळून धर्मांतर जास्त झाले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात महात्मा जोतिबा फुले म्हणतात, पुढे काही काळाने जेव्हा जहाँमर्द मुस्लीम लोकांचे या देशात राज्य झाले तेव्हा अज्ञानी शूद्रादी अतिशूद्र पवित्र कुराणातील सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागलीत. ब्राह्मणी धर्माच्या जाचाला कंटाळलेल्या हीन, शूद्र जातीतील असंख्य लोकांनी इस्लाम धर्माचा अंगीकार केला होता. आर्य चाहता हॅवेल हिंदूंच्या या धर्मांतराबद्दल म्हणतो, खालच्या वर्गात धर्मांतर फारच लवकर होत असे. विशेषतः ब्राह्मणांचे स्पृशास्पृश्यतेचे नियम ज्यांना जाचक होते ते फारच जलद स्वधर्म सोडीत असत. धर्मांतराने शूद्र वर्गाच्या शृंखला तोडल्या जाऊन त्याला ब्राह्मणांच्या बरोबरीचे स्थान मिळण्याची संधी निर्माण करून दिली. (महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य-लेखक- बा. रं. सुंठणकर. पान नं. ५२ चौथी आवृत्ती)

जीवसृष्टीचा सारा पसारा प्रजनन, पोषण आणि संरक्षण या तीन मुख्य प्रेरणांभोवती फिरत असतो. आपली वंशवृद्धी व्हावी, तिचं पोषण व्हावं, संरक्षण व्हावं यातही पोषणाचा आणि संरक्षणाचा मुद्दा वर-खाली होत राहतो. सर्वसाधारण परिस्थिती असेल तर पोषणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. पण परिस्थिती सर्वसामान्य नसेल,वातावरण असुरक्षित असेल, भयग्रस्त असेल तर पोषणाचा मुद्दा गौण ठरून संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. उदा. मी तीन-चार दिवसांचा उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही. चौथ्या दिवशी माझ्यासमोर अन्नाचं ताट आहे आणि पोटात सडकून भूक आहे. मी ताटावर बसतो, तेवढ्यात शेजारी आग आग म्हणून गलका ऐकू येतो. मी भरल्या ताटावरून तहान-भूक विसरून उठतो. येथे पोषणापेक्षा, भयापोटी संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा बनतो. सध्या अशाच धोरणाचा अवलंब राष्ट्रीय स्तरावर ‘हिंदुत्ववादी’ म्हणविणारे व मिरविणारे सरकार करताना दिसत आहे. ‘भीती मुसलमानांची बाळगा. त्यांच्या वतीने केल्या जाणार्‍या लव्ह जिहादची बाळगा. हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे त्याची बाळगा. शेजारच्या मुस्लीम राष्ट्राची भीती बाळगा.‘ घरात हे मुस्लीम घुसून आपल्या मुलीबाळींवर अत्याचार करतील, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी घरात कायम धारदार शस्त्र बाळगा, असा सल्ला तर विद्यमान भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर रोज देतात. अशाप्रकारे संशयाचे व भयाचे वातावरण देशात तयार केले की, लोक आपसूकच पोषणाचे मुद्दे विसरून जातात. मग बेरोजगारीचा प्रश्र राहात नाही. महागाई लोकांना छळत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भावांमधील वाढ लोकांना त्रास देत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची चर्चाही मग होत नाही. २०१६ मध्ये नॅशनल क्राइम ब्यूरोने शेतकर्‍यांच्या आत्महत्येची आकडेवारी देणे बंद केले. म्हणजे आत्महत्या थांबविण्याचा इतका साधा सोपा-उपाय आधीच्याही राजवटीला सूचला नाही, असेच म्हणायचे ना? पूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली की, देशाची किंमत घसरायची. आता मात्र ती किंमत न घसरता जगभरात भारताची किंमत वाढत आहे. असा ‘प्रपोगंडा’ आपल्याला सहजपणे गंडवून जातो.

हे विद्रोही साहित्य संमेलन आहे. विद्रोही या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरुद्ध लढा’ उभारणारे असा आहे. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापणा केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणे, प्रश्न विचारणे म्हणजे विद्रोह. विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं त्यावेळी सत्य त्याला आव्हान देतं. असत्य हे दमनासाठी वापरलं जाणारं विखारी साधन आहे. सत्यानं असत्याला ललकारण, आव्हान देणे म्हणजे विद्रोह. साहित्यिकांकडून सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या विद्रोहाची समाजाला अपेक्षा असते. पण, दुर्दैवाने काही अपवाद वगळता साहित्यिकही सरकारच्या ताटाखालील मांजर होत आहेत की काय, अशी शंका यायला लागते. यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते. पण, त्यांच्या इ-मेलवरील सरकारविरोधी भाषणामुळे सरकारने साहित्यिक संस्थांवर दबाव टाकून त्यांचे निमंत्रणच रद्द करवून टाकले आणि आयोजक संस्थांनी सरकारी अनुदानाने ‘भारभूत’ होत हा अपमान ‘सन्मानाने’ गिळंकृत केला. साहित्य क्षेत्रातील ही अभूतपूर्व अशी घटना होती. आता अशा घटना अपवादात्मक राहिल्या नाहीत.

यासंदर्भात ताजी घटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे वर्धा येथे सुरू आहे त्याच्या अध्यक्षपदावरून झालेला गदारोळ. एखादा लेखक सावरकर आणि गांधी यांच्या विचारांची चिकित्सा करणारे एखादे विधान भाषणात उच्चारतो आणि केवळ त्यामुळे त्या साहित्यिकाचे नाव वर्धेच्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घेऊ नका, असा आदेश मंत्रालयातून येतो, अशा वर्तमानपत्रात बातम्या येतात. यावरून आज या प्रस्थापित साहित्य संस्थाही कशा दहशतीच्या वातावरणात काम करीत आहेत, हे लक्षात येते. विशेष म्हणजे वर्धा ही गांधी-विनोबांची भूमी आणि तिथे गांधींच्या विचारांना सनातन्यांचा विरोध आजही होणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.

सरकारी अनुदानाच्या दबावाखाली साहित्यिक संस्था ‘लाचार’ झाल्या आहेत की काय, अशीही शंका यायला लागली आहे. स्वायत्त संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि या हस्तक्षेपाविरोधात आवाज न उठविता ‘शरणागती’ पत्करण्याची संख्याही सध्या वाढीस लागली आहे. हा लोकशाहीच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेचा विषय आहे.

विद्रोहाचा भला मोठा आवाज झाला म्हणजेच ‘विद्रोह’ ही व्याख्या पुरेशी नाही. बरेच वेळा विद्रोहाचं बियाणं जमिनीत पडतं. स्वतःचं टरफल विसर्जित करतं आणि शांतपणे जमिनीची छाती फाडून अंकुरतं. हाही विद्रोहच आहे, असं मी मानतो. बर्‍याच वेळा या शांतपणे झालेल्या विद्रोहाची ‘डाव्यां’नी विनाकारण उपेक्षा केली आहे, असं मला वाटतं. चार्वाक, बुद्ध, महावीर, चक्रधरस्वामी, बसवेश्वर ही विद्रोहाची परंपरा मानली तर या विद्रोही परंपरेत संतांच्या विद्रोही परंपरेचीही दखल आपल्याला घ्यावीच लागेल. भक्तिपंथापूर्वीच्या काळात महाराष्ट्रात अनेक समूह नांदत होते; पण समाज नव्हता. महात्मा फुले यांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास, ‘एकमय लोक’ नव्हते. येथे वेगवेगळी दैवते, वेगवेगळ्या उपासनापद्धती, वेगवेगळे खेळ व वेळ घालविण्याची साधने होती. या भूभागावर राहणार्‍या सर्वांना एकत्र आणील, असे काही नव्हते. भक्तिसंप्रदायांनी या वेगवेगळ्या समूहांना एकत्र आणून एक समाज निर्माण करण्याचे कार्य केले. भक्तिपंथाच्या संतांचे साहित्य हे आध्यात्मिक लोकशाहीचे साहित्य आहे. हे साहित्य म्हणजे समता, बंधुता व आध्यात्मिकता यांची ग्वाही देते. या साहित्याने समाजाला मातृभाषेविषयी, मराठी भाषेविषयी अस्मिता दिली. संतांच्या या साहित्यामुळे साहित्य हे ब्राह्मण, शूद्र अशा कोणत्याही एका समूहाचे न राहता ते मराठी साहित्य झाले.

संत साहित्याने निर्माण केलेले आध्यात्मिक आदर्श व ध्येय यांच्या एकात्मतेचा परिणाम म्हणून समाजाचे भौतिक आदर्श ध्येय व भाषा यांचीही एकात्मता झाली. म्हणून भक्तिपंथांच्या संतांनी केवळ साहित्य निर्माण केले असे नाही,  तर महाराष्ट्रातील लोकांना त्यांनी ‘राष्ट्र‘ बनविले. महात्मा फुलेंच्या भाषेत ‘एकमय लोक’ बनविले. भारतीय संस्कृत पंडितांनी आणि भट भिक्षुकांनी ज्ञान हे संस्कृत भाषेतूनच व्यक्त होऊ शकते, अशा बथ्थड समजुतीला बळी पडून मराठी मायबोलीच्या असंख्य खेडुतांना अज्ञानात खितपत पडू दिले होते. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी संस्कृत पांडित्याच्या पुरातन आणि अतिप्रतिष्ठा पावलेल्या प्रथेविरुद्ध पहिले प्रभावी बंड पुकारले व सर्व संस्कृतातील कडी कुलुपात बंदिस्त ज्ञानभंडार मराठी भाषेत खुले केले. संस्कृत ऐवजी मराठीचा उपयोग हा काही संस्कृत भाषेविरुद्धचा ज्ञानेश्वरांचा पवित्रा नव्हता तर संस्कृतवर मालकी हक्क प्रस्थापित केलेल्या मूठभर पंडितांविरुद्धचा तो विद्रोह होता. त्याचा परिणाम तेराव्या शतकापासून तर सतराव्या शतकापर्यंत घडून आलेला दिसतो. प्रथमच इतिहासात वेगवेगळ्या जाती-जमातीचे संत लिहिते आणि बोलते झाले. नामदेव शिंपी असेल, चोखामेळा महार असेल, सावता माळी असेल, गोरोबा कुंभार असेल, नरहरी सोनार असेल, संत जनाबाई, एकनाथ महाराज असतील आणि शेवटी तुकाराम महाराज. ही वेगवेगळ्या जाती-जमातीतील संतांची मांदियाळी तयार होण्याचे कारण ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील ज्ञानभंडार मराठी भाषेत आणलं, याला आहे हे विसरता येणार नाही. दुर्दैवाचा भाग एवढाच की, ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना व त्यांच्या हयातीतच त्यांच्या आई-वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे ब्राह्मण होते म्हणून त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर छळणारे ब्राह्मणेतर होते हेही तेवढेच दुःखद आहे. दुर्दैवाने संतांच्या भक्तीच्या मार्गातील समतेमुळे का होईना सनातन्यांना आवरक्ताची हगवण सुरू झाली हे समजण्यासारखे आहे. पण, समतावादी म्हणविणार्‍या समाजवाद्यांच्याही पोटात का दुखायला लागले, हे समजायला मार्ग नाही. सनातन्यांनी संत चळवळीला लावलेली संताळे, टाळकुटे ही विशेषणे समाजवाद्यांनी जशीच्या तशी लावावी, याचे आश्चर्य वाटते. संत तुकारामांच्या बाबतीत एकच अभंग ‘ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान’ हा वारंवार सांगून दाहक व कृतिशील संत तुकारामाला अडगळीत पेटीत टाकताना मी प्रत्यक्षपणे थोर समाजवाद्यांना सामाजिक क्षेत्रात अनुभवले आहे. परिवर्तनाचा पुरस्कार करणारे जर परंपरेच्या विरोधात राहिले तर पुष्कळदा त्याचा फायदा परंपरेमधील परिवर्तन विरोधकांना, विषमतावाद्यांना मिळतो. हे परिवर्तन विरोधक परंपरेवर कब्जा करतात आणि तिला परिवर्तनाच्या विरोधात राबवतात हे आपण आज प्रत्यक्ष अनुभवतो आहे.

हेमाडपंत हा त्या काळातील ब्राह्मण्याचे प्रतीक. 365 दिवसांसाठी या पंडिताने दोन हजार आचारमार्ग दिले आहेत. हेमाडपंताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ ग्रंथाची ओळ न ओळ कर्मकांडांनी भरलेली. या पुरोहितवर्गाने सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे विळख्यात घेतलेले. चक्रधरस्वामी थोर क्रांतिदर्श संत. त्यांनी माणसामाणसात भेद उत्पन्न करणार्‍या सर्व प्रथांना विरोध केला. स्त्री-पुरुष आणि ब्राह्मण-चांडाळ सर्वांना समान वागणूक दिली. अशा थोर महान संतांची हत्या, हेमाद्रीसारख्या हिंदू धर्मशास्त्री आचार्याने करविली. तेराव्या शतकातील सर्वात श्रेष्ठ मानल्या गेलेल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाच्या लेखकाने चक्रधरस्वामींचा महानुभाव पंथ आणि बसवेश्वराच्या लिंगायत पंथाने पुरोहितशाहीला केलेल्या प्रत्यक्ष विरोधामुळे या दोन्ही पंथांना प्रस्थापितांच्या कठोर विरोधाचा सामना करावा लागला. यातून बोध घेत वारकरी पंथाने आपल्या रणनीतीला ‘खुबसुरत’ मोड दिला. वेदांवर टीका नाही पण ‘नामवेद’ हाच श्रेष्ठ. मंत्रातंत्रावर, कर्मकांडावर टीका नाही पण ‘नाममंत्र’च महत्त्वाचा. देव कर्मकांडाचा भुकेला नसून, तो केवळ भावाचा भुकेला आहे. तो केवळ नामस्मरणाने प्रसन्न होतो आणि नामस्मरणाला ना देवाची मूर्ती लागत आणि ना त्याची पूजा. तुम्ही दैनंदिन काम करतानाही देवाचे नाव घेऊ शकता. त्यास काहीही लागत नाही.देवही लागत नाही, पुजारीही नाही. आणि पुजारीच नाही म्हटल्यावर त्याची ‘दक्षिणा’ही नाही. त्यामुळे वारकरी पंथाने ‘ब्राह्मणशाही’च्या पाठीवर न मारता डायरेक्ट ‘पोटावर’च पाय दिला. म्हणून त्याची परिणामकारकता व दीर्घकालिनता जास्त राहिली. वेदांवर काही टीका न करता तुकाराम महाराज असं म्हणत असतील की,

‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा,

येर्‍यांनी वाहावा भार माथा’

यातील ‘विद्रोह’ आवाज करीत नसला तरी परिणाम मात्र मोठा साधतो. चार वर्णांच्या निर्मितीची कथा मोठी रोचक आहे. ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र. चार वर्णातील श्रेष्ठ-कनिष्ठता, असमानता दर्शविण्यासाठीच अशाप्रकारे ब्रह्मदेवाच्या वेगवेगळ्या अवयवांना जन्मस्थळ म्हणून निवडले गेले. हे तर स्पष्ट आहे. पण, त्याकडे फारसे न बघता तुकाराम महाराज म्हणतात, अखेर सर्वांचा जन्मदाता एकच असेल तर माणसामाणसांमध्ये भेद कसा? वीण तर सर्वांची एकच ना? होय ती समतेची दिशा आहे.

समतेचा मुद्दा जेव्हा जेव्हा समोर येतो, तेव्हा तेव्हा हिंदू उच्चवर्णीयांना पोटदुखी सुरू होते. हिंदू उच्चवर्णीयांनी आपल्याच हिंदू बांधवांवर हजारो वर्षेकेलेल्या अन्याय-अत्याचारावर पडदा टाकण्यासाठी सातत्याने हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी घातलं जातं. मी, माझी जात व माझं जन्मजात वर्णश्रेष्ठत्व म्हणजेच राष्ट्र असं मानणार्‍यांचा राष्ट्रवाद सध्या जोरात आणि जोमात आहे. हा राष्ट्रवाद थोडा खरडला तर त्याखाली हिंदुत्ववाद दिसतो आणि हा हिंदुत्ववाद थोडा खरडला की, त्याखाली ब्राह्मणवाद दिसायला लागतो.

सध्या या राष्ट्रवादाच्या विरोधात बोलणार्‍याला देशद्रोही ठरवलं जातं. खरंतर हिंदुत्ववादी हा हिंदूच असत नाही. गाय आणि गायीच्या अंगावरचे गोचीड. गोचिडाच्या अंगातदेखील गायीचं रक्त आहे, म्हणून गोचीड जसा गाय होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांच्या अंगात हिंदूचं रक्त आहे म्हणून हिंदुत्ववादी हिंदू होऊ शकत नाही. दुर्दैवाने गोचिडाला मारण्यासाठी जी जी काठी उगारली गेली ती गायीच्या पाठीवर बसत गेली आणि आज परिणास्वरूपी गायच खाटिकधार्जिणी होऊन बसली. औरंगजेब हिंदूद्वेष्टा कसा होता, हे ठसविण्यासाठी औरंगजेबाने हिंदूंवर ‘जिझिया’ कर कसा लावला होता हे उच्चरवाने सांगितले जाते. पण, हा ‘जिझिया’ कर ब्राह्मणांवर नव्हता, ही बाब मात्र लपविली जाते. औरंगजेब ब्राह्मणांना हिंदू समजत नव्हता की काय? हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाहीत, या विधानाला ‘जिझिया’ करातून ब्राह्मणांना वगळून औरंगजेब पुष्टीच तर देत नाही ना? औरंगजेबासाठी ब्रह्मवृंदांनी दुवा मागितल्याचे दाखले आहेत. ब्राह्मणांनी आपल्या निष्ठा खाविंदचरणी अर्पण केल्या होत्या. औरंगजेबाच्या वतीने मिर्झा राजे शिवाजी महाराजांवर म्हणजेच स्वराज्यावर चाल करून जातो तेव्हा शिवाजी महाराजांविरुद्ध मिर्झा राजेंना जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोट चंडियज्ञ केला होता, ही बाब तर सर्वविदित आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसुद्धा महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांनी नाकारला होता. ही बाबही जगजाहीर आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन औरंगजेबाने ब्राह्मणांना ‘जिझिया’ करातून सवलत दिली असेल?                            (पूर्वार्ध)



लोकशाही समाजात पत्रकारितेला चौथा स्तंभ मानले गेले आहे. कोणतेही विशेष घटनात्मक अधिकार नसताना आणि भारतासारख्या देशात एखाद्या घटनेकडे सत्याच्या नजरेने पाहणे शक्य असेल तर पत्रकारिता हा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे. त्या दृष्टीने पत्रकारांना समाजाचे संरक्षण मिळाले पाहिजे. पण वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. पत्रकारितेच्या बाबतीत आता जगातील दहा सर्वात धोकादायक देशांमध्येही भारताचा समावेश झाला आहे. २०१६ मध्ये जगभरात पत्रकारितेची जबाबदारी पार पाडताना ५७ पत्रकारांना आपल्या जीवाची किंमत मोजावी लागली. दरवर्षी पत्रकारांवर हल्ले होतात. भारतातही लोकांना काम करताना जीव गमवावा लागतो. 

रत्नागिरीत मंगळवारी, ७ फेब्रुवारी रोजी वाहनाच्या धडकेत शशिकांत वारिशे (४८) यांचा मृत्यू झाला. त्या वेळी कार चालवणाऱ्या पंढरीनाथ आंबेरकर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. वारिशे यांनी या घटनेच्या आदल्या दिवशी रिफायनरी प्रकल्पाविरोधात या भागात झालेल्या आंदोलनाबाबत एका स्थानिक वृत्तपत्रात लेख लिहिला होता आणि लेखात आंबेरकर या आरोपीचेही नाव घेतले होते. 

'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल' हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावात सुरू होणारा जुना प्रकल्प आहे. यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल आणि लोकांची उपजीविकाही हिरावून घेतली जाईल, अशी भीती असल्याने स्थानिकांचा सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी राज्य सरकारने जनतेचा विरोध मान्य करून हा प्रकल्प रद्द केला होता, मात्र गेल्या वर्षभरापासून रत्नागिरीच्या दुसऱ्या भागात हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

वारिशे यांनी 'महानगरी टाइम्स' या वृत्तपत्रात या विषयावर अनेक लेख लिहिले होते, ज्यात त्यांनी यामुळे स्थानिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला होता. आंबेरकर हा या प्रकल्पाचे समर्थक होते. तो रिअल इस्टेट व्यावसायिक असून त्याच्यावर जबरदस्तीने जमीन हडप केल्याचा आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप आहे. वारिशे यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या लेखात म्हटले आहे की, रत्नागिरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बॅनर लावण्यात आले आहेत.

वारिशे यांच्या लेखात आंबेरकरांचा गुन्हेगारी रेकॉर्ड, अनेक बेकायदा जमीन व्यवहार आणि रिफायनरीच्या बांधकामाला भक्कम पाठिंबा याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

मुंबई प्रेस क्लबने हे निर्घृण, सार्वजनिक हत्या प्रकरण असल्याचे म्हटले आहे आणि वारिशे यांच्या मारेकऱ्यांवर त्वरित आणि गंभीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. क्लबने असेही म्हटले आहे की वारिसे यांच्या हत्येच्या कटात आणखी लोक सामील असण्याची शक्यता आहे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. या संपूर्ण घटनेला अपघात म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ही हत्या असल्याचे स्पष्ट होते. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्राने शिंदे सरकारकडे केली आहे. पोलिसांची निष्क्रियता आणि वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांविरोधात न्याय मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन प्रेस क्लबतर्फे देण्यात आले आहे.

१९९७  ते  २०२० या काळात भारतात  ७४ पत्रकारांची हत्या झाली. २०१४  ते  २०२० या काळात भारतात २७ पत्रकारांची हत्या झाली. २००९ ते २०१३ या काळात २२ पत्रकारांची हत्या झाली.  २०१९ मध्ये एकाही पत्रकाराची हत्या झालेली नाही. बेकायदा खाणकाम आणि काळा पैसा माफियांच्या क्रशरविरोधात सातत्याने बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांवर हल्ले केले जातात. 

जिल्हा मुख्यालयापासून छोट्या भागापर्यंत स्थानिक पोलिस,  प्रशासन, गुन्हेगार आणि कंत्राटदारांकडून पत्रकारांचा छळ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. भारतात पत्रकारांना वाढत्या धोक्यांमुळे ही प्रथा मोडीत निघाली आहे. पूर्वी हे काम पत्रकार करत असत. पण कराराची पद्धत विकसित झाल्यानंतर पत्रकारितेच्या जगात युनियन नाममात्र झाली आहे. पत्रकारांच्या व्यापक हिताचा लढा संघटनांच्या बांधिलकीच्या यादीत तळाशी गेला आहे. पत्रकारांच्या निरोगी अभ्यासाचे काम केवळ संघटनाच करू शकतात. पण त्यांचा आता दूरचाही संबंध उरलेला नाही असे वाटते. 

विडंबना अशी की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे अशी गतिमान वृत्ती अवलंबली जात आहे. कमिटी टू जर्नलिस्टच्या अहवालानुसार भारतात पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या ९६ टक्के गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. तर या प्रकरणांमध्ये फारसा न्याय मिळत नाही. ज्यांच्या पत्रकारितेत सामाजिकता आहे. स्वत:ला वेगळे न करणारे दुर्मिळ असतात. प्रश्न विचारणे हे कोणत्याही पत्रकाराचे हत्यार असते. किती जणांना आवडत नाही? प्रस्थापितांना ओळखणाऱ्या आणि त्याचा नाश करणाऱ्या शोधपत्रकाराची आक्रमकता या भ्रष्टांना आवडत नाही. त्यामुळेच ते पत्रकारांवर प्राणघातक हल्ले करतात. 

पत्रकारही समाजाशी जोडलेले असतात. समाज आणि राजकीय क्षेत्रातून जे काही साध्य होते, ते समाजाला देते. पत्रकारसौम्यता सहजता आकर्षित करते. पत्रकाराचे म्हणणे नीट ऐकून घेतल्यानंतर विचारमंथन करूनच तो बातमी प्रसिद्ध करतो. चांगले स्वच्छ लेखन चांगल्या आणि स्वच्छ विचारातून येते. कारण आपले विचार भाषेत उमटतात. भाषा हेही विचार सुधारण्याचे माध्यम आहे. सत्याची अनोखी तळमळ भरून काढली पाहिजे. 

बाजारीकरणाच्या या युगात पत्रकारितेवर ज्या धोक्याची चर्चा होत आहे. हा धोका पूर्वीही होता आणि आजही आहे. पण त्या काळात पत्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. अशा वेळी पत्रकारांना सोशल मीडियातून सन्मान मिळायला हवा, त्यांना तेवढा मिळत नाही. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत असताना दिसत नाही.

राष्ट्रीय कायद्यानुसार पत्रकारांना सुरक्षित ठेवण्याची चर्चा व्हायला हवी. वेळोवेळी नेत्यांच्या चारित्र्याकडे बारकाईने पाहिले जाते. या वेळी शासकीय प्रशासनाच्या दबावालाही सामोरे जावे लागते. लोभही दिला जातो. पण दडपणाखाली लोभ बाजूला सारून खरा पत्रकार तत्त्वांशी कधीच तडजोड करत नाही. संविधान त्यांच्या मनात कायम आहे. जे गरीब आणि वंचितांच्या हितासाठी पत्रकारिता करतात, त्यांचे जीवन ध्येय पत्रकारितेला लोकशाही बनविणे आणि लोकशाहीपुढे नेणे हे असते. 

आज बाजारीकरण आणि व्यावसायीकरणाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला आहे. शतकानुशतके व्यक्ती, विचार, संसाधने आणि भांडवल यांच्यात वर्चस्वाचे युद्ध होत आले आहे. पत्रकारितेत येताना आमचे ध्येय पैसे कमविणे नसून पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे हे होते. आमच्यात दृढ निश्चय आणि संयमाची स्पष्टता होती. आणि आज हा प्रयोग यशस्वी झाला आहे. लिव्ह फॉर कंट्री, निष्पक्ष पत्रकारिता ही देशाला मजबूत बनवण्यासाठी काळाची गरज आहे. जेव्हा शस्त्र सैनिकाच्या हातात असते, तेव्हा त्याचा वापर सुरक्षेसाठी केला जातो. जेव्हा एखादे हत्यार दरोडेखोराच्या हाती येते, तेव्हा ते सुरक्षेला धोका बनते.

भारतात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत असून, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील पत्रकारांना त्यांच्या बातम्यांचा स्त्रोत उघड न करण्याचा अधिकार आहे, परंतु लवकरच भारतातील पत्रकार या अधिकारापासून वंचित राहू शकतात. ताजे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाशी (सीबीआय) संबंधित आहे. एका प्रकरणात वृत्तपत्रे आणि वाहिन्यांच्या वार्ताहरांना बातमीचा स्त्रोत उघड करण्यास भाग पाडता येत नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे अवघड असल्याचे कारण देत सीबीआयने न्यायालयाकडून क्लोजर रिपोर्ट मागितला होता. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत दिल्लीच्या एका न्यायालयाने १९ जानेवारी रोजी म्हटले होते की, "भारतातील पत्रकारांना तपास यंत्रणांना त्यांचे स्रोत उघड करण्यापासून कोणतीही कायदेशीर सूट नाही."

सध्याचे सत्ताधारी निवडकपणे देशातील लोकशाही संस्थांना कमकुवत करत आहे. त्यांच्या वैचारिक-राजकीय वाटचालीत कुठलीही संस्था अडथळा आणू नये, अशी त्यांची इच्छा आहे. केंद्रातील सत्ताबदलानंतर सर्वात मोठा हल्ला देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर आणि आर्थिक रचनेवर झाला आहे. यामुळे सत्ताधारी नागरी हक्क कमी करण्यात खूप पुढे गेले आहेत. ते आपल्या वैचारिक अजेंड्यावर काही संस्थांवर थेट हल्ले करत आहेत, तर काहींना कमकुवत करण्यासाठी न्यायपालिका, संसद आणि माध्यमांचा आधार घेत आहेत. माध्यम संस्थांना पूर्णपणे सरकारचे केंद्र बनवल्यानंतर आता पत्रकार हेच त्याचे लक्ष्य बनले आहेत. काही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पत्रकारांच्या खासगी व्यावसायिक हक्कांवर अद्याप केंद्र सरकारने नव्हे तर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, हे खरे आहे. पण सरकार आणि नोकरशाहीच्या पाठिंब्याशिवाय हे करणे अवघड आहे.



सध्या आसाम राज्यात तिथल्या सरकारने बालविवाहाविरुद्ध एक अभियान छेडले आहे. त्याचे हे पाऊल स्वागतार्ह असले तरी ते परिस्थितीशी सुसंगत नसल्याने वऱ्याच प्रमाणात तिथे हिंसा होत असल्याच्या बातम्या येत आहेत. तीन हजारांहून अधिक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पोक्सो या लैंगिक अत्याचाराविरुद्ध लहान मुलांचे संरक्षणाचा कायद्याखाली कारवाई करणअयात येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस खात्याला शून्य सहनशीलता दाखवण्याचे आदेश दिले आहेत. बालविवाहाविरुद्ध राज्यातील ग्रामपंचायतींना बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे नियम लागू करण्यास सांगितले आहे.

बाल विवाहावर प्रतिबंध घालणे जरी आवश्यक असले तरी या समस्येमागची पृष्ठभूमीसुद्धा तपासून घेण्याची गरज आहे. मुळात पोक्सो कायद्याच्या तरतुदी लागू करणे कितपत योग्य आणि प्रचलित कायद्याच्या विरुद्ध आहे हेही तपासून घ्यायला हवे. बालविवाहास लैंगिक छळ म्हणता येणार नाही. कारण मुलीच्या मातापित्यांनी आणि मुलाच्या मातापित्यांनी आपसातील संमतीने दोघांचा विवाह करून देण्याचे ठरवलेले असते. यात अत्याचाराचा कुठे प्रश्न उद्भवत नाही. बालविवाहाचे कुणी समर्थन करणार नाही, पण या प्रथेमागची कारणे काय याचा सुद्धा तपास करून त्यानुसार कारवाई करणे उचित ठरेल.

बालविवाहाची समस्या भारतासहित बांगलादेश, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये आजही प्रचलित आहे. याला अनेक कारणे आहेत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे यामागे सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही परंपरा आजकालची नसून शेकडो वर्षांची ऐतिहासिक आहे. संस्कृती आली की धर्म आलाच. कोणत्याही धर्माने जरी बालविवाहास मान्यता दिली नसली तरी या प्रथेमागे धर्माची भूमिका असल्याची सर्व धर्मियांचा समज आहे. हा समज चुकीचा असला तरी तो सर्व समाजांमध्ये रुढ आहे.

एखादी सांस्कृतिक परंपरा जी शतकानुशतके जुनी किंवा प्राचीन असल्यास तिला तडकाफडकी संपुष्टात आणण्याचा विचार करणे म्हणजे वस्तुस्थितीला न समजल्यासारखे आहे. जुन्या काळात नव्हे मागील २०-३० वर्षांपूर्वी भारतात जितके विवाह होत होते त्यात निम्मे विवाह बाल्यावस्थेत होत होते हे तथ्य आहे. बालविवाहाची कारणेदेखील अनेकविध आहेत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक दौर्बल्य, शैक्षणिक सोयींचा अभाव आणि सध्या एका नवीन समस्येशी लोकांना तोंड द्यावे लागत आहे ती म्हणजे स्त्रीवर्ग प्रामुख्याने लहान मुलींविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांची समस्या.

बालविवाह थांबवण्याविरुद्ध त्यासाठी पूरक वातावरणाची निर्मिती करणे अत्यावश्यक बाब आहे गरिबी, बेरोजगारी. स्त्रीयांविरुद्ध अन्याय-अत्याचारावर जोपर्यंत उपाय केले जात नाहीत तोपर्यंत ही समस्या बाकी राहणार आहे. परंपरागत आणि अनेक प्रकारच्या विरुद्ध समस्यांचे जोपर्यंत निदान केले जात नाही तोपर्यंत केवळ कायद्याची सक्ती करून या समस्येवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ज्या समस्यांना नगारिक तोंड देत आहेत त्यांचे निदान करता येत नाही किंवा तशी राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हे अभियान छेडले गेले आहे असे लोकांना वाटेल आणि तसे वाटणे गैर नाही.

आधी गरीबवर्गाच्या रोजगाराच्या समस्या सोडविल्या, त्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा केली, त्यांना शिक्षणाच्या सोयी दिल्या आणि मग या समस्येचे गांभीर्य नागरिकांना कळवले तरच असे पाऊल उचलावे जर कोणत्याच समस्या न सोडवता फक्त बालविवाहच एक मोठी समस्या आहे असे नागरिकांना भासवू दिले जात असेल तर हा त्यांच्यावर अन्याय म्हणावा लागेल.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



प्रेषित मुहम्मद (स.) एकदा अन्नधान्याच्या एका व्यापाऱ्याच्या ढिगाऱ्यात हात घातला. तो आतमधून भिजलेला वाटला. त्यांनी त्या अन्नधान्य विक्रेत्याला विचारले, "हा काय प्रकार आहे?" त्याने उत्तर दिले की पाऊस पडला होता म्हणून हे तोडेसे भिजले. प्रेषितांनी विचारले, "मग तुम्ही भिजलेले धान्य वर का ठेवले नाही जेणेकरून लोकांना माहीत झाले असते." आणि प्रेषित म्हणाले, "जो कुणी लोकांना लुबाडतो त्याच्याशी माझा कललाच संबंध नाही." (ह. अबू हुरैरा, मुस्लिम, मिश्कात)

ह. मुअम्मर (र.) यांनी सांगितले की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे, "ज्यांनी आपले धान्य (किंमत वाढण्यासाठी)" रोखून ठेवले तो गुन्हेगार आहे." (मुस्लिम, मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की "अल्लाहजवळ सर्व जगाचा विध्वंस एका मुस्लिमाच्या हत्येपेक्षा कमी आहे." (अब्दुल्लाह विन अमरो, तिर्मिजी, मिश्कात)

हजरत अबू मसऊद बदरी (र.) म्हणतात की एकदा मी आपल्या सेवकाला मारत होतो. मागून कुणीतरी मला हाक मारली, पण मी त्या वेळी रागात होतो. म्हणून हा कुणाचा आवाज आहे हे मला कळले नाही. जेव्हा ती व्यक्ती जवळ आली, मी पाहतो तर ते प्रेषित मुहम्मद (स.) आहेत आणि ते म्हणत होते, "अबू मसऊद, हे जाणून घ्या की तुम्हाला जितके सामर्थ्य या सेवकावर आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहला तुमच्यावर सामर्थ्य आहे." मी म्हणालो की आता मी कधीच कुणा सेवकाला मारणार नाही. आणि त्याला मुक्त करून टाकले. प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "जर तुम्ही त्या सेवकाला मुक्त केले नसते तर नरकाग्नीने तुम्हाला वेढा घातला असता." (मुस्लिम, अबू दाऊद, तिर्मिजी, तरगीब व तरहीब)

ह. अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या एका अनुयायीला काही विशेष पक्वान्न पाठवले होते. त्या अनुयायीवनी सांगितले की अमुक एक अनुयायीला माझ्यापेक्षा जास्त याची आवश्यकता आहे. मग ते दुसऱ्या व्यक्तीला पाठवण्यात आले. त्या अनुयायींनी दुसऱ्या वय्क्तीला ते पाठवण्यास सांगितले. कारण त्यांना माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे. असे करत करत सात व्यक्तींना ते देण्यात आले. पण सर्वांनी घेण्यास नकार देत दुसऱ्या व्यक्तीच्या आवश्यकतेला स्वतःवर प्राधान्य दिले. शेवटी ती खाद्यवस्तू सुरुवातीला ज्यांना देऊ केली गेली होती तिथेच पोहोचली. (सहीफलहक)

हसन बसरी (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अनुयायींनी आपल्या घरच्या लोकांना हे सांगताना ऐकले आहे की "सर्वांत अगोदर अनातांना जेऊ घाला. आधी त्यांना द्या." (सहीहलहक)

ह. मुहम्मद (स.) म्हणतात, "मला धर्माचा प्रसार करण्यासाठी इतकी भीती घातली होती की दुसऱ्या कुणाला घातली गेली नाही आणि मला धर्माचा प्रसार करताना इतके कष्ट सोसावेल लागले जे दुसरे कुणी सोसले नाहीत. तीन दिवस आणि तीन रात्री अशा अवस्थेत होतो की आमच्याजवळ खायला अन्नाचा एक घास देखील नव्हता. बिलाल यांच्याकडे काही क्षुल्लक वस्तू होती." (तिर्मिजी)

संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद



(३६) हे पैगंबर (स.)! ज्या लोकांना आम्ही पूर्वी ग्रंथ दिला होता ते या ग्रंथावर जो आम्ही तुमच्यावर अवतरला आहे, खूश आहेत आणि विविध गटांत काही लोक असेदेखील आहेत जे या ग्रंथाच्या काही गोष्टी मानत नाहीत. तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका, ‘‘मला तर केवळ अल्लाहच्या बंदगी (भक्तीची) आज्ञा दिली गेली आहे आणि यापासून मनाई केली गेली आहे की एखाद्याला त्याच्याबरोबर मी भागीदार ठरवावे. म्हणून मी त्याच्याकडे निमंत्रित करीत आहे आणि त्याच्याकडे मी रूजू होत आहे.’’५५

(३७) याच आदेशानिशी आम्ही हे अरबी फर्मान तुमच्यावर अवतरले आहे. आता जे ज्ञान तुमच्यापाशी आलेले आहे ते असतानादेखील तुम्ही जर लोकांच्या इच्छेच्या मागे चाललात तर अल्लाहविरूद्ध तुमचा कोणी संरक्षक व मदतगारही नाही व त्याच्या पकडीतून तुम्हाला कोणी वाचवूही शकत नाही.

(३८) तुमच्यापूर्वीदेखील आम्ही अनेक पैगंबर पाठविले आहेत आणि त्यांना आम्ही पत्नी व मुलेबाळे असलेलेच बनविले होते.५६ आणि कोणत्याही पैगंबराचे हे सामर्थ्य नव्हते की अल्लाहच्या आज्ञेशिवाय एखादी निशाणी त्याने स्वत:च आणून दाखविली असती.५७ प्रत्येक युगासाठी एक ग्रंथ आहे.

(३९) अल्लाह जे काही इच्छितो त्याला नष्ट करतो आणि ज्या गोष्टीला इच्छितो तिला कायम ठेवतो. उम्मुलकिताब (मूळ ग्रंथ) त्याच्यापाशीच आहे.५८ 

(४०)आणि हे पैगंबर (स.)! ज्या वाईट परिणामाची धमकी आम्ही या लोकांना देत आहोत मग याचा काही भाग आम्ही तुमच्या जिवंतपणीच दाखवू किंवा तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला उचलून घेऊ. कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम फक्त संदेश पोहचविणेच होय आणि हिशेब घेणे आमचे काम होय.५९


५५)हे एका विशेष गोष्टीचे उत्तर आहे जी त्यावेळी विरोधकांकडून सांगितली जात होती. ते म्हणत होते की हे महाशय खरोखर तीच शिकवण घेऊन आले आहे जी मागील पैगंबरांनी आणली होती, असा ते दावा करतात. मग यहुदी आणि िख्र्चाश्न जे मागील पैगंबरांचे अनुयायी आहेत, ते यांचे स्वागत का करीत नाहीत? यावर सांगितले जात आहे की यातील काही लोक यावर प्रसन्न आहेत आणि काही अप्रसन्न परंतु हे पैगंबर मुहम्मद (स.)! कोणी प्रसन्न होवोत अथवा अप्रसन्न, तुम्ही स्पष्ट सांगा की मला अल्लाहने ही शिकवण दिली आहे आणि मी याचेच पालन करील.

५६)हे आणखी एका आक्षेपाचे उत्तर आहे जो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर घेतला जात होता. ते म्हणत होते की हा कसा पैगंबर आहे जो मुलंबाळं, पत्नीबरोबर राहतो. पैगंबरांचे मनोकामनांशी काय संबंध? कुरैशचे लोक तर स्वत: पैगंबर इब्राहीम व इस्माईल (अ.) यांची संतती असण्यावर गर्व करीत होते.

५७)हेसुद्धा एका आक्षेपाचे उत्तर आहे. विरोधक म्हणत, ``पैगंबर मूसा (अ.) शुभ्र चकाकणारा हात आणि लाठी घेऊन आले होते. इसा (अ.) नेत्रहीनांना नेत्रवान बनवित आणि कोढ फुटलेल्यांना निरोगी बनवित होते. सॉलेह (अ.) यांनी सांडणीचे निशाण दाखविले होते. तुम्ही कोणती निशाणी बरोबर घेऊन आला आहात?'' उत्तरात सांगितले गेले आहे की ज्या पैगंबराने जे काही दाखविले आपल्या शक्तीने अथवा आपल्या अधिकारात दाखविले नाही. अल्लाहने ज्यावेळी ज्यांच्या माध्यमातून जे काही प्रकट करणे उचित मानले, ते प्रकट झाले. अल्लाहने इच्छिले ते आता तो दाखवून देईल. पैगंबर स्वत: ईशत्वाचा दावेदार नसतो. मग तुम्ही त्याच्याशी चमत्काराची, निशाणीची मागणी कशी करता?

५८)हेसुद्धा विरोधकांच्या एका आक्षेपाचे उत्तर आहे. ते म्हणत होते की पूर्वी आलेले ग्रंथ आज उपलब्ध आहेत तर या नवीन ग्रंथाची काय आवश्यकता? तुम्ही म्हणता पूर्वीच्या ग्रंथात फेरबदल करण्यात आला, आता ते सर्व ग्रंथ निरस्त आहेत आणि म्हणून या नवीन ग्रंथाचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. परंतु अल्लाहच्या ग्रंथात फेरबदल कसा होऊ शकतो? अल्लाहने त्यांचे रक्षण का केले नाही? आणि ईशग्रंथ निरस्त कसा होऊ शकतो? तुम्ही तर सांगता की हा त्याच अल्लाहचा ग्रंथ आहे ज्याने तौरात आणि इंजिल अवतरित केले होते. मग हे कसे की तुमची पद्धत (जीवन) तर तौरातच्या विरुद्ध आहे? काही वस्तू तौरातधारक हराम (अवैध) ठरवितात तर तुम्ही मात्र त्यांना हलाल (वैध) समजून खाता. या आक्षेपाचे उत्तर पुढे सविस्तर आलेच आहे. येथे संक्षेपमध्ये व्यापक उत्तर दिले आहे. `उम्मुलकिताब' म्हणजे `मूळ ग्रंथ' म्हणजे तो स्त्रोत ज्यापासून सर्व आस्मानी ग्रंथ अवतरित झालेले आहेत.

५९)म्हणजे तुम्ही या चिंतेत पडू नका की ज्या लोकांनी तुमचा हा सत्यसंदेश अस्वीकार केला त्यांचा काय परिणाम होईल व तो कधी समोर येईल. तुम्हाला जे काम दिले गेले आहे त्याला पूर्ण एकाग्रत्तेने पार पाडा आणि निर्णय आमच्यावर सोडून द्या. येथे प्रत्यक्ष संबोधन तर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आहे परंतु खरे तर विरोधकांची कानउघडणी करणे अभिप्रेत आहे. विरोधक अनेकदा आव्हान देत म्हणत की ज्या आपत्तीची धमकी तुम्ही आम्हाला देत आहात ती येत का नाही?


मृतांची संख्या 10 हजारांहून अधिक. सर्वत्र हाहाकार...! 
भारतासह जगभरातून मदतीचा ओघ सुरू.


तुर्कस्तान आणि सीरिया एका अभूतपूर्व आपत्तीत बुडाले आहेत. बुधवारी हे लिहिताना मृतांचा आकडा 11 हजारांच्या पुढे गेला होता. दोन्ही देशांमध्ये हजारो इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की मृतांचा आकडा त्यापेक्षा जवळपास चारपट वाढू शकतो म्हणजेच सुमारे 40,000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हजारो लोक कोसळलेल्या घरांमध्ये अडकले आहेत आणि जवळपास 50 हजारहून अधिक जखमी झाले आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्य देखील कठीण आहे. भयभीत वातावरण. रिश्टर स्केलवर 7 पेक्षा जास्त भूकंपाचे तीन धक्के. सुमारे 250 किरकोळ भूकंपाचे धक्के बसल्याची ही माहिती आहे. 1930 मध्ये येथे झालेल्या भूकंपात  30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 1999 मध्ये पुन्हा भूकंप झाला तेव्हा तुर्कस्तान आणि सीरियाच नव्हे, तर लेबनॉन आणि सायप्रस या सीमावर्ती देशांमध्येही 17,000 हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

सीरिया सरकारच्या अखत्यारित नसलेल्या सीरियातील अनेक भागात दीर्घकाळापासून यादवी युद्ध सुरू आहे, त्यामुळे नुकसानीची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. 40 लाखांहून अधिक निर्वासितांचे वास्तव्य असलेल्या सीरियाच्या ईशान्य भागात भूकंपाने हाहाकार माजवला आहे. गृहयुद्ध सुरू असताना धर्मादाय संस्थांकडून पुरविण्यात  येणाऱ्या अन्नामुळे त्यांचे प्राण वाचत आहेत. या परिस्थितीत भूकंपाने हाहाकार माजवला आहे.

भूकंपांचे माहेरघर तुर्कस्तान हे असे क्षेत्र आहे जिथे नेहमीच भूकंप होत असतात. त्याच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार एकट्या 2020 मध्ये लहान-मोठे 33,000 भूकंप झाले, त्यापैकी 332  हालचाली रिश्टर स्केलवर चारच्या वर नोंदवल्या गेल्या. इस्तंबूल हे तुर्कस्तानमधील एक महत्वाचे शहर आहे, जिथे नेहमीच लहान भूकंप होत असतात. 6 फेब्रुवारीला पहाटे 4.30 वाजता तिथे झालेल्या पहिल्या छोट्या भूकंपाची कोणालाही कल्पना नव्हती. सकाळची वेळ असल्याने आणि अनेक जण घरी झोपले होते. इस्तंबूलमधील लोक आतापर्यंत सुरक्षित आहेत कारण भूकंपाची तीव्रता त्या तुलनेत तितकीशी जाणवली नाही. पण कारमन मराससारख्या इतर अनेक भागांतील परिस्थिती खूपच बिकट आहे.

तुर्कस्तानचा विचार केला तर सततच्या भूकंपामुळे होणाऱ्या भूकंपाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी तेथील प्रशासन सदैव तत्पर असते. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत शक्य तितक्या लवकर हस्तक्षेप करण्यासाठी पोलीस आणि लष्कर सदैव तत्पर असते. पण इतक्या तीव्र भूकंपात त्यांना सुरुवातीला काहीच करता आले नाही. हवामानही खराब होते आणि सर्व तयारी करूनही बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. सरकारचाच हवामान विभागकडून दर 24 तासाला लोकांच्या फोनवर महत्त्वाच्या सूचना पाठवल्या जातात. एखादी समस्या उद्भवल्यास ताबडतोब बाहेर पडण्यासाठी लोकांना पुरेसे अन्न आणि पाणी पिशवीत ठेवण्याची नेहमीच आठवण करून दिली जाते आणि दर तीन-चार फ्लॅटनंतर आपत्कालीन परिस्थितीत आश्रय घेण्यासाठी छोटी उद्याने बांधण्यात आली आहेत.

मात्र, तुर्कस्तान हा असा देश आहे, ज्याने अनेक भूकंप होऊनही अशा भूकंपांपासून पुरेसा धडा घेतलेला नाही, असेच म्हणावे लागेल. अशा नैसर्गिक आपत्तींचा धोका असलेल्या भागात बहुमजली इमारती टाळाव्यात. पण तुर्कस्तानमध्ये अनेक बहुमजली वास्तू आहेत. हे निकृष्ट दर्जाचे पदार्थांपासून बनलेले असते. 1999  मध्ये जगाला हादरवून टाकणारा भूकंप झाला असला तरी नंतर बांधण्यात आलेल्या इमारतींपैकी एकही इमारत पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजनांशिवाय बांधली गेली नाही. कायदे असूनही तुर्कस्तान हा गरीब देश असल्याने या कायद्यांच्या कडक अंमलबजावणीत अनेकदा तडजोड करावी लागते.

तुर्कस्तानसाठी वारंवार होणाऱ्या भूकंपांची भौगोलिक कारणे फार महत्त्वाची आहेत. ज्या भागात भूकंप झाला तो भाग मोठ्या संख्येने बहुमजली वास्तू असलेला भाग आहे. त्यामुळे तेथील हालचालींवर अधिक परिणाम झाला आहे आणि मृतांचा आकडा वाढला आहे. तुर्कस्तानमधील 10 हून अधिक शहरांना या भूकंपाचा फटका बसला आहे.

भौगोलिकदृष्ट्या या भूकंपांचे कारण टेक्टोनिक प्लेटच्या मांडणीला कारणीभूत ठरू शकते. पृथ्वीच्या बाह्य थरामध्ये सुमारे पंधरा टेक्टोनिक प्लेट्स असतात. ज्या भागात ते भेटतात (इमोहा खडक) त्या भागात भूकंप होतात. तुर्कस्तान अशा फॉल्ट लाइन्सच्या वर स्थित आहे, ज्यामुळे ते भूकंपप्रवण क्षेत्र बनले आहे. तुर्कस्तान युरेशियन-आफ्रिकन प्लेट्सच्या दरम्यान अनातोलियन टेक्टोनिक प्लेटवर स्थित आहे. तुर्की/अनातोलियन प्लेट्सच्या दक्षिणेला आफ्रिकन व अरेबियन प्लेट्स, उत्तरेला युरेशियन प्लेट आणि पश्चिमेला एजियन प्लेट आहे. त्यांच्यातील सापेक्ष गती भूकंपीय क्रिया असण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे सलग गडबड होण्याची शक्यता वाढते.

2013 ते 2022 या कालावधीत जगात आलेल्या 30,673 मोठ्या भूकंपांपैकी तुर्कस्तान हा तीन सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक होता. 1900 पासून जगभरातील 76 मोठ्या भूकंपांमध्ये  सुमारे 1,00,000 लोक मरण पावले आहेत, त्यापैकी निम्मे लोक 1939 आणि 1999 मध्ये तुर्कस्तानमध्ये झालेल्या दोन भूकंपांमध्ये मारले  गेले आहेत.

भारतासह अनेक देशांनी तुर्कस्तान आणि सीरियाला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे इराक आणि इराणमधून ब्लँकेटसह कपडे तुर्कस्तानात दाखल झाले आहेत. भारतातून दोन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल काल तुर्कस्तानमध्ये दाखल झाले. अधिकाधिक देशांची मदत तुर्कस्तानपर्यंत पोहोचली. ते सीरियातही जाण्याची शक्यता आहे.

तुर्कस्तान आणि सीरियासाठी कुठल्याही राष्ट्रीय आपत्तीच्या पलीकडे जाणाऱ्या घडामोडी घडत असतात आणि त्यातून सावरणे दोन्ही देशांना सोपे नसते, विशेषत: सीरियासाठी, जिथे नागरी संघर्षामुळे देशाचे सरकारच जवळजवळ कोसळले आहे. अनेक ठिकाणी ते नैसर्गिक आपत्तींनाही कसे सामोरे जातील हे पाहावे लागेल. इतर देशांकडून कितीही मदत मिळाली तरी इच्छाशक्ती असेल तरच नवा देश उभारता येतो आणि ते तुर्कस्तान आणि सीरियाला नक्कीच शक्य आहे.

जगभरातील देशांनी मदतीचे आश्वासन दिले आहे, तर काहींनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी बचाव पथके पाठविली आहेत.



वक्त-ए-फुर्सत है कहां काम अभी बाकी है

नूर-ए-तौहिद का इतमाम अभी बाकी है

२ फेब्रुवारीला राजस्थानच्या बाडमेर येथे हिंदू संतांच्या एका मेळाव्यामध्ये बोलतांना रामदेवबाबा यांनी इस्लाम व मुस्लिमांवर सडकून टिका केली. ते म्हणाले, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना धर्माच्या वेडाने झपाटले आहे. मुस्लिमांची अशी धारणा आहे की नमाज हिंदू मुलींच्या अपहरणांपासून ते आतंकवादांपर्यंतच्या सर्व गुन्ह्यांना धुवून टाकते. तुम्ही कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला विचारा की तुमचा धर्म काय आहे? ती व्यक्ती मग उत्तर देईल की, ’’ बस्स ! पाच वेळेस नमाज अदा करा मग काहिही करा’’ हिंदू मुलींना उचलून न्या, जे पाप करायचे ते करा. ते इस्लामचा अर्थ फक्त नमाज समजतात. आमचे मुस्लिम बंधू फार पाप करतील परंतु नमाज जरूर अदा करतील. कारण त्यांना हेच शिकविले गेले आहे की नमाज अदा करा बाकी जे करायचे आहे ते करा. म्हणूनच ते आतंकवादी बनले आणि त्यांच्यातील काही गुन्हेगार देखील बनले. त्यांची स्वर्गाची संकल्पना म्हणजे गुडघ्याच्या वर इजार असावी, मिशा साफ असाव्यात, डोक्यावर टोपी असावी, असे कुरआन किंवा इस्लाम म्हणते असे माझे म्हणणे नाही. मात्र लोक असेच करत आहेत. मग म्हणे त्यांचे जन्नतमध्ये स्थान पक्के होते! जन्नतमध्ये काय मिळते म्हणून त्यांना विचारले असता ते म्हणतात ’हूर’ आणि ’मद्य’ मिळते, अशी जन्नत तर जहन्नमपेक्षा बेकार आहे. हा शुद्ध वेडेपणा आहे. परत यांना सर्व जगाला इस्लाममय करायचे आहे. असे करून ते काय साध्य करणार आहेत? हे समजून येत नाही. परंतु या चक्करमध्ये ते पडले आहेत. या उलट हिंदू धर्म अहिंसा आणि प्रामाणिकपणा शिकवितो.’’ रामदेवबाबाच्या या बेताल वक्तव्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणे हे दोन अपराध होतात. त्यासाठी बाबांवर 153 ए आणि 295 ए भादंविप्रमाणे बाडमेर येथे गुन्हा दाखल झाला आहे. खरे तर देशभरात त्यांच्याविरूद्ध अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल व्हायला हवेत. रामदेवबाबा हे एक प्रतिष्ठित व्यक्ती असून, देशात योग गुरू म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांचा प्रभाव बहुसंख्य समाजाच्या अनेक लोकांवर आहे.  त्यांच्या या भाषणातील फोलपणा जर का दाखवून दिला गेला नाही तर बाबा जे बोलले ते खरेच आहे, असा एक चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा लेखन प्रपंच.

रामदेवबाबा यांनी इस्लाम आणि मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा शांत डोक्यांनी वस्तुनिष्ठ आढावा घेऊ. कारण निंदकाचे घर असावे शेजारी. त्यांनी केलेली टिका ही पूर्वग्रह दुषित आहे म्हणून सरसकट फेटाळून लावणे जरी शक्य असले तरी तसे करणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. इस्लाम आणि मुस्लिम यांच्याबद्दल त्यांचे असे (नकारात्मक) मत का बनले? याचे आत्मपरीक्षण मुस्लिम समाजाने सुद्धा करावयास हवे. त्यासाठी त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्यांचा समाचार खालीलप्रमाणे घेऊ. 

1. ’’पाच वेळेसची नमाज अदा करा, त्यानंतर मनात येईल तसे करा जे पाप करायचे ते करा.’’

रामदेवबाबा यांच्या भाषणातील हा प्रमुख मुद्दा. हा मुद्दा अत्यंत आक्षेपार्हच नाही तर खोटा सुद्धा आहे. कारण, कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’इनस्सलाता तन्हा अनिल फहशाई वल मुन्कर’  म्हणजे निश्चितच नमाज अश्लीलता आणि वाईट कृत्यांपासून रोखते. हा प्रत्येकाचा अनुभव आहे की, नमाजी व्यक्ती कधीच कुठलेही पाप करत नाही. कधी कोणाला त्रास देत नाही. 

2. ते इस्लामचा अर्थ नमाज एवढाच समजतात. बाबाचे हे म्हणणे केवळ त्यांचे अज्ञान दर्शविते. नमाजशिवाय, देशात जकातची व्यवस्था मुस्लिम समाजामध्ये व्यापक प्रमाणात उभी केलेली आहे. देशातील इतर समाजाबरोबर मुस्लिम समाजसुद्धा सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर भरूनसुद्धा स्वमर्जीने आपल्या बचतीवर अडीच टक्के वार्षिक जकात काढून गरीबांना आर्थिक मदत करतो. कोट्यावधी लोक दरवर्षी रमजानचे उपवास करतात, लाखो लोक हज आणि उमराहसाठी जातात, अनेक मुस्लिम अनेक मुस्लिम अशासकीय संस्था आणि धर्मार्थ रूग्णालय चालवितात, शाळा, महाविद्यालये चालवितात. ज्याचा लाभ सर्व समाजाला मिळतो. 

3. ’हिंदूंच्या मुली मुस्लिम घेऊन जातात’ रामदेवबाबांचे हे विधान फक्त आक्षेपार्हच नसून हिंदू मुलींचा अपमान करणारे आहे. मुस्लिम मुलं हिंदू मुलींना उचलून घेऊन जातात आणि त्या गुपचुप त्यांच्याबरोबर जातात. म्हणजे हिंदू मुलींना बाबा नादान समजतात काय? बाबांचे हे म्हणणे अतिशय आक्षेपार्ह असे आहे. हां! एवढे मात्र खरे की भारत एक बहुधर्मीय देश असल्यामुळे अनेक आंतरधर्मीय प्रेमप्रकरणे आणि लग्नसुद्धा होतात. मात्र या सर्व प्रक्रियेला मुस्लिम मुलं हिंदु मुलींना उचलून घेऊन जातात असे म्हणणे चुकीचे आहे. 

4. मुस्लिम आतंकवादी बनले आणि त्यांच्यातील काही लोक गुन्हेगार बनले. बाबांचे हे वाक्य सुद्धा चुकीचे आहे. मुस्लिमांना आतंकवादाशी जोडण्याची फॅशन 90 च्या दशकात होती. मात्र शहीद हेमंत करकरे यांनी यातील सत्य उघडकीस आणल्यानंतर सुद्धा पुन्हा मुस्लिमांना आतंकवादाशी जोडणे म्हणजे खोडसाळपणाचे लक्षण आहे. राहता राहिला गुन्हेगारीचा प्रश्न तर ही गोष्ट प्रांजळपणे स्वीकार करण्यास कसलीच हरकत नाही की मुस्लिम समाजातील काही लोक गुन्हेगारी कृत्यामध्ये आढळून येतात. मात्र ते त्यांच्या धर्मामुळे नव्हे तर गरीबीमुळे असे करतात. जगात जिथे कुठे गरीबी असेल तिथे गुन्हेगारी असतेच. उलट मुस्लिम लोक छोटे-मोठे गुन्हे जरूर करतात मात्र देशाची संपत्ती लुटून विदेशात पळून जात नाहीत, बँकांना बुडवत नाहीत, व्हाईट कॉलर क्राईम करत नाहीत. किरकोळ गुन्हे करणाऱ्यांपेक्षा हे असे गुन्हे करणारे देशासाठी जास्त घातक असतात, हे बाबांना कळेल तो सू दिवस. 

5. मुस्लिमांची स्वर्गाची कल्पना म्हणे त्यात फक्त मद्य आणि हूर मिळते. हे ऐकीव माहितीवर आधारित आहे. बाबा असो का बाबासारखे अन्य लोक ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, त्यांना इस्लामची पारलौकिक जीवन, मृृत्यूनंतर होणारी विचारपूस, अंतिम निवाड्याचा दिवस, स्वर्ग आणि नर्क ही कल्पना समजणेच शक्य नाही. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे उचित नाही, असे माझे मत आहे. 

6. त्यांना सर्व जग इस्लाममय करायचे आहे, असे करून काय साध्य करणार आहेत? बाबांचे हे म्हणणे इस्लामच्या इतिहासाविषयी त्यांचे अज्ञान सिद्ध करणारे आहे. इस्लाम जेव्हा सातव्या शतकात अरबस्थानात आला तेव्हापासून अवघ्या शंभर वर्षात अरबी मुस्लिमांनी जगाच्या एक तृतीयांश भूभागावर इस्लामची सत्ता स्थापित केली होती. परंतु त्यांनी कधीच ती सत्ता स्वतःसाठी हस्तगत केली नव्हती. याचा पुरावा असा की, आज मध्यपुर्वेतील मोजून पाच-सात चिमुकले देश व एक मोठा देश सऊदी अरेबिया वगळता जगात अरबांची सत्ता कुठेच नाही. जगात 55 मुस्लिम देश आहेत पण प्रत्येक देशात तेथील स्थानिक नागरिकांच्याच हातात सत्तेची सुत्रे आहेत. त्यांचे युद्ध फक्त तत्वासाठी होते. साम्राज्यविस्तार हा त्यांच्या खिजगणतीतच नव्हता. त्यांनी इराण जिंकला इराण्यांना परत दिला. इराक जिंकला इराकींना परत केला. सीरिया जिंकला सीरियनना परत केला. इजिप्त जिंकला इजिप्शिनींना परत केला. थोडक्यात त्यांनी कधीच आपली संस्कृती दुसऱ्यांवर लादली नाही. त्यामुळे मुसलमान हे सत्तापिपासू असतात. हा जो त्यांच्यावर आरोप होतो तो चुकीचा आहे. हां! एवढे नक्की  की इस्लाम एक मिशनरी धर्म असून, प्रत्येक सश्रद्ध मुस्लिम व्यक्ती ही दुसऱ्यापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचण्यासाठी इच्छुक असते. त्याचे कारण प्रत्येक मुस्लिम व्यक्ती प्रामाणिकपणे असे समजते की इस्लाम हीच कल्याणकारी जीवन व्यवस्था आहे आणि प्रत्येक माणसाचे जीवन इस्लाममय व्हावे. हा त्याचा भ्रम नसून मुस्लिमांच्या या विचाराला कुरआनचे भक्कम अधिष्ठान प्राप्त आहे.

’’अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही. (सुरे आलेइमरान 3: आयत नं. 19)

येणेप्रमाणे मुस्लिम समाज आपल्याबरोबर इतरांचेही कल्याण व्हावे या प्रामाणिक इच्छेमुळे इस्लामचा संदेश पोटतिडकीने इतर समाजापर्यंत पोहोचवत असतो. याला सत्तेशी जोडणे हे अज्ञानतेचे लक्षण आहे. एकंदरित रामदेवबाबा हे अनावश्यक बोलण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. अलिकडेच त्यांनी महाराष्ट्रात अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत महिलांच्या बाबतीत जे अपमानजनक उद्गार काढले होते, त्यासाठी त्यांना जाहीर माफी मागावी लागली होती, हे ही वाचकांनी लक्षात घ्यावे. थोडक्यात बाबांचे इस्लाम आणि मुस्लिमांविषयीचे मत पूर्वग्रह दुषित असे असून, मुस्लिम समाज यासाठी त्यांचा निषेध करतो. 

मिलियन डॉलर क्वश्चन

रामदेव बाबांचे हे विचार त्यांचे एकट्याचेच नसून अशा विचारांचे अनेक लोक बहुसंख्य बंधूंमध्ये आहेत. त्यांचे हे विचार पूर्वग्रह दुषित आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून शांत बसणे हे सुद्धा गफलतीत राहण्यासारखे आहे. या लोकांचे असे विचार का बनले? याचा शोध घेणेसुद्धा गरजेचे आहे. याचा शोध घेतला असता एक गोष्ट लक्षात येते की त्यांचे असे मत होण्यासाठी भारतीय मुस्लिम समाज सुद्धा दोषी आहे. मुस्लिम समाजातील मोठ्या भागाचा कुरआनशी व्यावहारिक संबंध तुटलेला आहे. त्यामुळे कुरआनच्या म्हणजेच इस्लामच्या आत्म्यापासून ते स्वतः वंचित आहेत. म्हणून ते बहुसंख्य बंधूंपर्यंत त्यांच्या भाषेत इस्लामचा संदेश पोहोचविण्याची योग्यताच हरवून बसलेले आहेत. जोपर्यंत मुस्लिम समाजातील मोठा भाग कुरआनशी व्यावहारिकरित्या स्वतःला जुळवून घेणार नाही आणि त्याचा संदेश खालील ईश्वरीय मार्गदर्शनाप्रमाणे देण्याचा प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत बहुसंख्य बंधुंमधील हे गैरसमज नष्ट होणार नाहीत. हे काम कसे करावे? याचे मार्गदर्शन कुरआनच्या खालील आयातीत दिलेले आहे. 

’’हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित, आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.’’ (सुरे नहल 16: आयत नं. 125). रामदेवबाबांच्या या अनर्गल वार्तालापापासून मुस्लिमांनी किमान एवढा जरी बोध घेतला तरी पुरे की यासाठी आपण स्वतःही यासाठी जबाबदार आहोत. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हाला इस्लामचा संदेश देश बांधवांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्याची समज आणि शक्ती दे.’’ आमीन. 

- एम. आय. शेख



मराठी संस्कृती आणि समाजजीवनावर चर्चा करण्यासाठी नववे अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलन 28 व 29 जानेवारी 2023 रोजी नाशिकमध्ये पार पडले. नाशिकमधील भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलनस्थळाला प्रा. फकरुद्दिन बेन्नुर नगरी असे नाव देण्यात आले होते. साहित्यिकांची आणि रसिकांची मांदियाळी बऱ्यापैकी होती. नाशिकमध्ये यापूर्वी 2001 मध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यानंतर आता 22 वर्षांनी हा मान पुन्हा नाशिकला मिळाला. ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. या दोन दिवसांच्या संमेलनात विविध कार्यक्रम, तसेच परिसंवाद पार पडले. या परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे, डॉ. अजिज नदाफ, माजी कुलगुरू डॉ. एन. एस. पठाण, ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई, डॉ. रफीक पारनेरकर आदी उपस्थित होते.

इस्लामचे संपूर्ण सार कुराणमध्ये आहे. संस्कृतीपासून ते अर्थक्रांतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची मांडणी त्यात केली आहे. संपूर्ण जगात पूर्वीपासून इस्लामला बदनाम केले जात आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची सुमारे 15 टक्के लोकसंख्या आहे. आजवरच्या साहित्यात मुस्लिमांना खलनायक, विदूषक या स्वरूपात सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे समाजात वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. भाषेला कुठलाही धर्म, जात नसते. जोपर्यंत माणूस भाषा वाचत नाही तोपर्यंत त्याला त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे भाषांचा अभ्यास करणे सर्वांसाठी महत्वाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेली आहेत तरी समग्र क्रांती झालेली नाही. समान अधिकारासाठी ज्ञानाचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य आणि साहित्यिकांची मोलाची भूमिका आहे. पुढे त्यांनी साहित्याची प्रेरणा व  प्रयोजन, मुस्लिम मराठी साहित्य भिन्नता व एकात्मता मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता व इस्लामी संस्कृतीची वाटचाल या मुद्यांद्वारे माहिती दिली. संमेलनाच्या सुरवातीस कुरआनची तिलावत करण्यात आली आणि संविधानाचे वाचन करण्यात आले. माजी मंत्री आणि ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई यांच्यासह संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, प्रा. जावेदपाशा कुरेशी, स्वागताध्यक्ष इरफान शेख, कार्याध्यक्ष हसन मुजावर, डॉ. अलीम वकील, डॉ. अजित नदाफ, गुलाम शेख, आयुब नल्लामंदू, लियाकत नामोले आदींच्या हस्ते वृक्षारोपास जलदान करून संमेलनाचे उद्घाटन झाले.

ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई म्हणाले, 20 ते 25 वर्षांपूर्वी मुस्लिम साहित्य संमेलनाची मूर्तमेढ रोवली गेली. समाजातील दरी कमी करण्यासाठी अनेक चळवळी निर्माण झाल्या. चळवळ पुढे नेण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे आणि करत आहेत. लढाई कठीण आहे. साहित्याच्या माध्यमातून लढाई लढावी लागेल. त्यामुळे भविष्यात नक्कीच परिवर्तन घडून येईल. मुस्लिम युवकांच्या हातात जादू आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. केवळ त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. सरकारने त्यांना योग्य शिक्षण दिल्यास देशाच्या विकासात हातभार लागेल, असेही दलवाई यांनी सांगितले.

संमेलनाचे स्वागतध्यक्ष इरफान शेख यांनी संमेलनाचे रूपरेषा विशद करताना नाशिक ही सुफी संतांची भूमी आहे. या भूमीत 9 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले.

संमेलनाचे प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले की, मानवाने निर्माण केलेल्या सर्व व्यवस्था वाजवी आहेत. मग समाजाच्या पुनर्स्थापनेची जबाबदारी साहित्यिकांवर येते, कारण अशी संमेलने नियमित व्हायला हवीत. भाषा ही फक्त संवादासाठी असते. शिवाय, सध्या संस्कृती युद्ध लादले जात आहे. काश्मीर फाइल्स, गोडसे विरुद्ध गांधी हे चित्रपट उत्तम उदाहरण आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर ओबीसी समाजाने संस्कृती निर्माण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. संस्कृती ही लढण्यासाठी नसून निर्माण करण्यासाठी असते. असेही त्यांनी सांगितले.

संमेलनाच्या स्वागत समितीचे सदस्य प्रा. शरद शेजवळ म्हणाले की, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या ठेकेदारांना व धोरणकर्त्या राजकारण्यांना चिंतन करायला लावणारे संमेलन आहे. धर्म जोडा राष्ट्र जोडले जाईल, भाषा जोडा मन जोडले जातील, हाच संदेश हे संमेलन सांस्कृतिक दहशतवादी काळात देत आहे. हे आम्हा संविधानवादी कार्यकर्त्यांना फारच आशादायक वाटते. अशा साहित्य संमेलनाच्या मागे तमाम जनतेने सर्वार्थाने उभे राहावे माणसं पेरण्यासाठी...!

साहित्य संमेलनानिमित्त सकाळी आठच्या सुमारास नॅशनल उर्दू हायस्कूल ते संमेलनस्थळी दादासाहेब गायकवाड सभागृहपर्वत रॅली काढण्यात आली. मार्गात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. संमेलनस्थळीदेखील मुस्लिम समाज व त्यांचे प्रश्न यावर जनजागृतीपर पथनाट्य सदर केले, चिमुकल्यांनी उपस्थित केलेले प्रश्न उपस्थिताना आकर्षित करून गेले.

या संमेलनात झालेल्या ‘साहित्य व सांस्कृतिक दहशतवाद’ विषयावरील परिसंवादात प्रा. जावेदपाशा कुरेशी म्हणाले की, इस्लाममध्ये दहशतवादाची शिकवण नाही. प्रेम, एकतेचे संदेश देणारे साहित्य इस्लाममध्ये आहे. पहिले दहशतवादी साहित्य मनुस्मृती निर्माण झाले. साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद अडीच हजार वर्षांचा आहे. कुठल्याही हिंदू संतांनी मुस्लिमविरोधी साहित्य लिहिलेले नाही किंवा त्यांचे आचरणदेखील मुस्लिमविरोधी नाही.

मुज्जफर सय्यद म्हणाले, की सांस्कृतिक दहशतवाद विकृत साहित्यातून झाला आहे. विकृत इतिहासात अफजल खान मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने सर्वांवर अत्याचार केले, असे सांगण्यात आले आहे. खरा इतिहास कधी पुढे येऊ दिला नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर विश्वासू सैन्य मुस्लिम होते. हे कधीही इतिहासात दाखवण्यात आलेले नाही.

डॉ. मुस्तजिब खान म्हणाले, की राजकीय भावना तयार करण्यासाठी सांस्कृतिक दहशतवादाला सुरवात केली. भाषा, सिनेमा, नाटकातील पात्र, टीव्ही मालिका यांच्यातून सांस्कृतिक दहशतवाद होत आहे.

राम पुनियामी म्हणाले, की भारतीय विविधता आणि संविधान धोक्यात आहे. राजकारण भारतीय परंपरेला अनुकूल नाही. देशाचे राजकारण भरकटत आहे. नारायण भोसले म्हणाले, की संस्कृत भाषा सर्वांसाठी नव्हती. भीती निर्माण करणे, असे वर्तन करणे म्हणजे दहशतवाद होय. अली निजामुद्दीन म्हणाले, की मुस्लिम समाज एकसंध नाही. पंथीय जाणिवा निर्माण झाल्या. त्यांच्यात टोकाचे गैरसमज आहे. साहिल कबीर म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रात मुस्लिमांना खलनायक केले आहे. हा दहशतवाद टिकून ठेवला. सांस्कृतिक दहशतवाद पेटला आहे, झिरपला आहे. त्याचप्रमाणे अन्वर राजन यांनी सुफी संतांनी इस्लाम धर्माची ओळख करून दिली आहे. लोकभाषांना प्रतिष्ठा दिली. लोकभाषा, लोकसंस्कृती जोडली असे सांगितले. प्रा. मेहबूब सय्यद यांनी साहित्यिक समाजातील वास्तव मांडताना दिसत नाही. मुस्लिमांना विकृत करण्याची परंपरा सुरू आहे. प्रजेची सत्ता असताना स्वातंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा फरक अजूनही लक्षात येत नाही. विशिष्ट समाजाला चिरडण्याचे षडयंत्र सुरू आहे. जाती धर्माच्या आधारे फूट पडण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले. या साहित्य संमेलनामध्ये ’मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : साहित्यिक , सांस्कृतिक, सामाजिक अन्वयार्थ’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. फारूक शेख हे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शकील शेख, प्राचार्य इ. जा. तांबोळी, सोलापूर आणि ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक, साहित्यिक शेख शफी बोल्डेकर हे होते. या वेळी साहित्यपीठावरून बोलताना शफी बोल्डेकर यांनी मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा इतिहास श्रोत्यासमोर मांडला. ग्रामीण भागात एकूण मुस्लिम संख्येच्या साठ टक्के समाज राहतो. सामाजिक वातावरणात वावरत असताना कुठे सामाजिक सलोख्याचे तर कुठे आपण विभक्त आहोत असले दाहक अनुभव त्याच्या वाट्याला येतात. याच अनुभवाच्या बळावर तो मराठी भाषेतून साहित्य निर्मिती करतो, असेही ते म्हणाले. 

समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी उपस्थितांनान आवाहन केले की, मुस्लिम समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. समाजात कुठल्याही प्रकारे फूट पाडू नका. धर्माच्या नावावर ज्यांच्याकडून राजकारण केले जाते, त्यांना थारा देऊ नका.

दलवाई यांनी मुस्लिम समाजाची आजची स्थिती, तिची कारणे आणि त्यावर मात करण्यासाठी मुस्लिमांनी कोणत्या बाबींना प्राधान्य दिले पाहिजे याचा उहापोह केला. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे नाव घेताना पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी यांचे नाव घेणेही महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनीही समाजासाठी आपले आयुष्य वेचले आहे. मुस्लिम समाजही शिवाजी महाराजांना मानणारा आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यामुळे राजकारण्यांनी इतिहास सांगतानाही खरा इतिहास सांगावा असे आवाहनही दलवाई यांनी केले.

संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी राज्यातील विविध शहरात राजकीय तणाव बघावयास मिळत आहे. नाशिक शहरात मात्र तसा कुठलाही तणाव नाही. एकमेकांमध्ये आदराची भावना दिसून आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलन या धाकट्या भावाची दखल घेण्यात यावी. मोठ्या भावाच्या वाड्यात धाकट्या भावाला देखील मोठे दालन उपलब्ध करून द्यावे. मराठीच्या बोली भाषेच्या पुस्तकात कोकणी मुस्लिम मराठी भाषाचा उल्लेख करावा. दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे सांगितले.

देश व राज्याच्या कुठल्याही वृद्धाश्रमात मुस्लिम समाजाचे वृद्ध आई-वडील दिसून येत नाही. इस्लामची शिकवण मुस्लिम बांधवास तसे करू देत नाही. जो आईवडिलांचा आदर करतो तो खरा मुसलमान आहे, असे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रवीण जोशी यांनी सांगितले. पाच टायमाची नित्य नियमाने नमाज, थुंकी न गिळता कडक उपवास करणे, सहनशीलता आणि मानवतेची जाणीव करून देतो, मात्र या समाजात शिक्षणाचा अभाव आहे, त्यांनी शिक्षण घ्यावे असे आवाहनही जोशी यांनी केले. या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अलीम वकील, कवी जावेद पाशा कुरेशी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजित नदाफ, प्राचार्य डॉ. फारुख शेख, डॉ. सुरेश जागीरदार आदी मान्यवरही उपस्थित होते. राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप झाला. स्वागताध्यक्ष इरफान शेख, इ. जा. तांबोळी, प्रदीप जोशी, आयुब नल्लामंदू, डॉ. युसूफ बेन्नूर, डॉ. अलीम वकील, माजी महापौर गुलाम शेख, कार्याध्यक्ष हसन मुजावर, प्रा. डॉ. फारुख शेख, मुजफ्फर सय्यद, ड. एस. यू. सय्यद आदी साहित्यिक तसेच मान्यवर उपस्थित होते.

या दोन दिवसीय संमेलनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिम प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची दशके : साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषण, आम्ही भारताचे लोक, सांस्कृतिक दहशतवाद आदी विषयांवर मंथन झाले. त्याचबरोबर साहिल कबीर आणि कलीम अजीम यांनी संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यात त्यांना त्यांच्या साहित्य प्रवाहातील योगदानाबाबत विविध पैलूंविषयी प्रश्न विचारण्यात आणि मुकादम यांनी त्यांची समाधानकारक उत्तरेही दिली. तसेच ग्रंथदिंडी, पथनाट्य, कवी संमेलने, चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, समाजप्रबोधनपर गीते, निसर्ग पोस्टर प्रदर्शन, विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन व विक्रीचे स्टॉल्स विविध प्रकाशकांकडून लावण्यात आले होते. त्यामध्ये इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई तर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच या ट्रस्टतर्फे प्रा. राम पुनयानी आणि इतर मान्यवरांना मराठी अनुवादित प्रत भेट म्हणून देण्यात आली तर वाचकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रकाशनाचे व्यवस्थापक रेहान मुबारक यांनी सांगितले. प्रा. मंगेश जोशी व शीतल भाटे, निलोफर सय्यद आदींनी सूत्रसंचालन केले. 

- शाहजहान मगदुम



व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.

जिंदगी भर का साथ हो निकाह की मुहब्बत

बेकार सी बात है ये हफ्ते भर की मुहब्बत

मुस्लिम समाजाची सर्वाधिक हानी पाश्चात्य (अ) सभ्यतेच्या प्रभावामुळे झालेली आहे. अनेक चुकीच्या प्रथांपैकी ’व्हॅलेंटाईन डे’  ही प्रथासुद्धा मुस्लिम तरूण-तरूणींमध्ये कमालीची लोकप्रिय झालेली आहे. सकृतदर्शनी जरी मुस्लिम समाज शरियतच्या आचारसंहितेने बांधलेला दिसत असला तरी ’बर्थ डे पासून व्हॅलेंटाईन डे’ पर्यंत अनेक बिगर इस्लामी, खर्चिक व अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या प्रथांचा शिरकाव या समाजात झालेला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येण्यासारखी नाही. इस्लाममध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेमाला मान्यता नाही. हे अगोदरच स्पष्ट करून मग या लेखाची सुरूवात करतो. 

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास

अगदी संक्षिप्तरित्या सांगावयाचे झाल्यास इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात रोममध्ये ’क्लाउडियस’ नावाचा एक राजा होता. तो शूर पण युद्धपिपासू होता. वीर्य पतनामुळे सैनिकांची शारीरिक शक्ती कमी होते, असा त्याचा समज होता. म्हणून त्याने आपल्या सैन्याला लग्न न करण्याचे फरमान जारी केले. त्याच्या या जुल्मी आदेशाचा विरोध तत्कालीन सेंट (संत) व्हॅलेंटाईन यांनी करत अनेक इच्छुक सैनिकांचे विवाह गुप्तपणे लावून दिले. क्लाउडियसला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद करून फाशीची शिक्षा सुनावली व इ.स.14 फेब्रुवारी 269 रोजी त्यांना फाशीवर लटकावण्यात आले. म्हणजे दुसऱ्यांची लग्न लावताना त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. 

या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस म्हणून ब्रिटनमध्ये पाळण्याची प्रथा 19 व्या शतकात सुरू झाली. वास्तविक पाहता सेंट व्हॅलेंटाईन यांची पुण्यतिथी शांतपणे साजरी करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करून प्रकरण संपवता आले असते. मात्र प्रत्येक गोष्टीत कॉमर्स शोधणाऱ्या पाश्चिमात्य लोकांनी या घटनेचे व्यापारीकरण केले. सेंट व्हॅलेंटाईन यांनी दुसऱ्यांचे कायदेशीर लग्न लावून दिले, म्हणजे परोपकार केले. अशा या परोपकारी धर्मगुरूंनी उदात्त भावनेतून केलेल्या नैतिक कृतीला व्हॅलेंटाईन डे च्या रूपाने अनैतिक प्रेमाचे उदात्तीकरण करून त्याला बटबटीत रूप देण्याचे पाप या ब्रिटिश लोकांनी केले. 

व्हॅलेंटाईन डे मागचे अर्थकारण

अमेरिकन ग्रीन कार्ड असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीप्रमाणे मागील काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे च्या हंगामात जगभरात एक अब्ज पेक्षा अधिक कार्डस् एकमेकांना दिली जातात व ही आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. वाचकांना माहित असेल भरमसाठ किमतीची ही कार्डे प्रेमात आंधळे झालेले लोक पुढचा-मागचा विचार न करता वेड्यासारखे खरेदी करत असतात. यावरून या मुर्खतापूर्ण व्यवहारात होणाऱ्या अब्जावधी रूपयांच्या उलाढालीचा वाचकांना अंदाज यावा. मुळात हा खर्च कमी म्हणून की काय दरवर्षी फेब्रुवारीचा दूसरा आठवडा प्रेमाला समर्पित करण्याची शक्कल पाश्चिमात्य व्यापारी वृत्तीच्या पुरूषांच्या सुपिक डोक्यातून निघाली. म्हणूनच 7 फेब्रुवारी - रोज डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमीस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अशा अनेक कार्यक्रमांनी हा आठवडा भरलेला असतो. या सात दिवसांत अब्जावधी रूपयांची होणारी आर्थिक उलाढाला ही व्हॅलेंटाईन डे मागची खरी प्रेरणा आहे, यात दूमत नाही. 

मुळात 18 व्या शतकाच्या शेवटी व 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच युरोपमध्ये मुक्त लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू झाले होते. चर्च प्रभावहीन झाले होते, धार्मिक शिक्षणाची जागा भौतिक शिक्षणाने घेतलेली होती. विज्ञानाचा विकास तीव्र गतीने होत होता. तंत्रज्ञान वेगाने वाढत होते. औद्योगिक क्रांती नुकतीच झालेली होती. त्यामुळे युरोपमधील लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा खुळखुळत होता. इतिहास साक्षी आहे की, माणसाच्या हातात जेव्हा-जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आला त्याची पाऊले आधी संगित, मग कोठे व त्यातून मुक्त लैंगिकतेकडे वळली.

18 व्या शतकातसुद्धा औद्योगिक क्रांतीमुळे आलेल्या भरमसाठ पैशाने युरोपीयन लोकांचा प्रवास मुक्त लैंगिकतेकडे सुरू झाला. आधी कार्विंग (कलाकुसर) केलेल्या लाकडांचा वापर करून स्त्री-पुरूषांच्या नग्न मुर्त्या, त्यांच्या गुप्तांगाचे ठोकळे तयार करून विकले गेले. फ्रांसमध्ये या ’वुड-पोर्नोग्राफी’ने अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता गाठली.

1839 मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला. 1855 मध्ये त्याद्वारे नग्न महिलांचे फोटो काढून विकण्याचा प्रयोग सुरू झाला. मात्र बाल्यावस्थेत असलेल्या या कलेची अडचण 1863 मध्ये तेव्हा दूर झाली जेव्हा प्रिंटरचा शोध लागला. आता अश्लिल चित्रांच्या लागेल तितक्या प्रती काढता येऊ लागल्या. जुगाराच्या पत्यांच्या पाठीमागच्या बाजूस अशी नग्न चित्रे वापरली गेली. 1876 मध्ये व्हीडीओ कॅमेऱ्याचा शोध लागला आणि खऱ्या अर्थाने अश्लिल चलचित्रांना चालना मिळाली. पहिला अश्लील चित्रफट लोमीर ब्रदर्स यांनी 1895 ला फ्रान्समध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक अल्बर्ट कोचर नावाचा व्यक्ती होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली होती. 

अशा पद्धतीने 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण युरोप अश्लील चलचित्रांच्या गर्तेत ढकलला गेला. चर्च निष्प्रभ झाल्यामुळे सैल झालेल्या धार्मिक बंधनाचा फायदा उचलत चतूर युरोपीयन पुरूषांनी व्यक्तीस्वातंत्र्य व महिला सबलीकरणाच्या नावाखाली घरंदाज महिलांना घराबाहेर काढण्यात यश मिळविले. भारतातही याच काळात अश्लील चित्रफीतिंनी व्हीडीओ कॅसेट, सीडी, डिव्हीडीच्या माध्यमातून मोठा धुमाकूळ घातला. साधारणपणे माणसे फार लवकर लैंगिक इच्छेच्या आहारी जातात. धार्मिक बंधने सैल असलेला समाज याला चटकन बळी पडतो. आज जेव्हा लैंगिक चित्रफिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर कॅटेगिरीवाईज उपलब्ध आहेत, सोबतीला भरपूर व्यक्तीस्वातंत्र्य आहे, हातात पैसा आहे, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि कॅम्पस बऱ्यापैकी मुक्त आहेत. तर या सर्वांचा उपयोग, ’अशा उद्योगासाठी’ केला गेला नसता तरच नवल. लक्षात ठेवा मित्रानों! आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या या सर्व गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम महिला आणि मुलींवर होतो. त्यात अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी होते. पुरूष मात्र नामानिराळे राहतात. 

ह्या प्रकारची थेरं ही भारताच्या महान हिंदू संस्कृती आणि महान इस्लामी संस्कृती या दोहोंच्या विरूद्ध आहे. म्हणून खरे तर गरज या दोन्ही समाजातील संस्कृती रक्षकांनी एकत्र येऊन या विदेशी संस्कृतीविरूद्ध एल्गार पुकारण्याची होती. मात्र सध्याच्या सांप्रदायिक वातावरणात हे शक्य नसल्याने किमान मुस्लिमांनी तरी आपले शरई कर्तव्य म्हणून व्हॅलेंटाईन व इतर डेज चा सनदशीर मार्गाने जमेल तसा विरोध करावा. 

मुस्लिमांची जबाबदारी

सुरे बकरामध्ये अल्लाहने फर्माविले आहे की, 

1.’लोक हो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा आणि सैतानाच्या मार्गाचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लिल गोष्टींचा आदेश देत असतो. जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाहीत.’ (सुरे बकरा आयत नं. 168-169).

2. ’ व्याभिचाराच्या जवळपासही फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग’ (सुरे बनी इसराईल आयत नं. 32).

व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.

मुळात ज्या मुस्लिमांचा कुरआनशी प्रत्यक्षात संपर्क तुटलेला आहे, त्यांच्यात आणि वरील प्रमाणे मुक्त वातावरणात राहणाऱ्या इच्छा-आकांक्षांच्या गुलाम प्रवृत्तीच्या लोकात कोणतेही अंतर नाही. म्हणून असे मुस्लिम सुद्धा सतत मुक्त लैंगिक संबंधाच्या शोधात असतात. स्त्री त्यांच्यासाठी एक सेक्स ऑब्जेक्ट असते. व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित देखील करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा.    -(उर्वरित पान 7 वर)

या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात. या लांडग्यांची लबाडी उघडी पाडून आपल्या व आपल्या देशबांधवांच्या निरागस मुलींना या शोषणापासून सावध करणे भारतीय मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी आहे. या संबंधीचे जमेल त्या पद्धतीने, जनजागरण करत राहणे व मुलींना यातील धोक्यासंबंधी सावधानतेचे इशारे देत राहणे, तूर्तास एवढेच आपल्या हाती आहे. तेवढेच आपण करावे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तरूण जोडप्यांना गाठून मारहाण करण्यासारखे अघोरी प्रकार कदापी करू नयेत. त्यांने फारसे काही साध्य होत नाही. त्यापेक्षा त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करावा.  

यासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी म्हणतात,’’ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाहीत. मग त्याच्या समोर काही लोक खर्ऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां, हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती. (संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35).

यात पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाचे वातावरण तर ’व्हॅलेंटाईन डे’ मय झालेले असते. अशात आपल्या मुलांना या मानवनिर्मित आपत्तीपासून वाचविण्याचे व्यवस्थापन करणे पालकांचे कर्तव्य आहे. यात मुस्लिम पालकांना शरियतचे अ‍ॅडव्हान्टेज मिळते. घरात जर जाणीवपूर्वक शरई वातावरण राखण्यात पालक यशस्वी झाले तर मुलांना बाहेरच्या नैतिकदृष्ट्या प्रदुषित वातावरणाला सुद्धा यशस्वीपणे तोंड देऊन स्वतःचे शील अबाधित ठेवता येईल. म्हणून सर्व पालकांनी या विषयी कायम दक्ष राहणे गरजेचे आहे. तातडीचा उपाय म्हणून पालकांनो व मुलींनो ’व्हॅलेंटाईन डे’च्या घातक जाळ्यात अडकू नका. एवढेच म्हणता येईल.  

- एम.आय.शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget