Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)


(६) आणि जर अनेकेश्वरवादींपैकी कोणी इसम शरण मागून तुमच्याकडे येऊ इच्छित असेल (जेणेकरून अल्लाहची वाणी ऐकावी) तर त्याला आश्रय द्या येथपावेतो की त्याने अल्लाहची वाणी ऐकावी. मग त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवा. हे अशासाठी करावयास पाहिजे की या लोकांना ज्ञान नाही.

(७) या अनेकेश्वरवाद्यांसाठी अल्लाह व त्याच्या पैगंबराजवळ कोणताही करार कसा बरे असू शकतो? - त्या लोकांखेरीज ज्यांच्याशी मस्जिदे हरामजवळ तुम्ही करार केला होता. म्हणून जोपर्यंत ते तुमच्याशी सरळ राहतील तोपर्यंत तुम्हीदेखील त्यांच्याशी सरळ राहा, कारण अल्लाह ईशपरायण लोकांना पसंत करतो. 

(८) परंतु यांच्याशिवाय इतर अनेकेश्वरवाद्यांशी कोणताही करार कसा बरे होऊ शकतो; जेव्हा त्यांची स्थिती अशी आहे की तुमच्यावर ताबा मिळविला तर ते तुमच्यासंबंधी नात्यागोत्याचाही विचार करणार नाहीत ना एखाद्या कराराच्या जबाबदारीचा? ते आपल्या संभाषणाने तुम्हाला प्रसन्न करू पाहतात परंतु हृदये त्यांची नाकारतात१० व त्यांच्यापैकी बरेचजण अवज्ञाकारी आहेत.११

(९) त्यांनी अल्लाहच्या वचनांच्या बदल्यात थोडीशी किंमत स्वीकारली,१२ मग अल्लाहच्या मार्गात अडथळा बनून उभे राहिले.१३ फारच वाईट कृत्ये आहेत जी हे करीत राहिले आहेत.

(१०) कोणत्याही श्रद्धावंताच्या बाबतीत हे नात्या-गोत्याचाही विचार करीत नाहीत किंवा एखाद्या कराराच्या जबाबदारीचादेखील नाही. आणि अतिरेक नेहमी यांच्याकडूनच झालेला आहे.

(११) पण जर यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली व जकात दिली तर हे तुमचे धर्मबंधु आहेत. आणि जाणणाऱ्या लोकांसाठी आम्ही आमचे आदेश स्पष्ट करीत आहोत.१४

(१२) आणि जर प्रतिज्ञा घेतल्यानंतर यांनी पुन्हा आपल्या शपथा मोडल्या आणि तुमच्या धर्मावर हल्ले करण्यास सुरवात केली तर द्रोहाच्या (कुफ्र) ध्वजधारकांशी युद्ध करा कारण त्यांच्या शपथा विश्वासपात्र नाहीत, कदाचित (मग तलवारीच्या जोरानेच) ते परावृत्त होतील.१५

(१३) काय तुम्ही १६ लढणार नाहीत अशा लोकांशी जे आपल्या प्रतिज्ञा भंग करीत राहिले व ज्यांनी पैगंबराला देशातून काढून टाकण्याचा निश्चय केला होता व अतिरेकास प्रारंभ करणारे तेच होते? तुम्ही त्यांना भिता काय? जर तुम्ही श्रद्धावंत असाल तर अल्लाह या गोष्टीला जास्त पात्र आहे की तुम्ही त्याची भीती बाळगावी.



८) म्हणजे युद्धासमयी शत्रू तुम्हाला सांगू लागला की मी इस्लामला समजून घेऊ इच्छितो तर मुस्लिमांनी त्याला शरण देऊन आपल्या येथे येण्याची संधी द्यावी आणि त्याला इस्लाम समजावून द्यावा. जर त्याने इस्लाम स्वीकारला नाही तर त्याला संरक्षण देऊन त्याच्या घरी त्याला पोहचवून द्यावे.

९) म्हणजे बनीकिनाना आणि बनीखुजाआ आणि बनीजमरा.

१०) म्हणजे ते तर कराराच्या अटी घालतात, परंतु मनात उल्लंघनाची इच्छा ठेवूनच. याचे प्रमाण अनुभवाने मिळते. त्यांनी जेव्हा कधी करार केला तो मात्र तोडण्यासाठीच.

११) म्हणजे असे लोक आहेत ज्यांना नैतिक दायित्वाची जाणीव नाही की चारित्र्याच्या बंधनांना तोडण्याची पर्वा.

१२) म्हणजे एकीकडे अल्लाहच्या आयती त्यांना भलाई आणि सच्चई आणि त्यावर आधारित नियमांचे पालन करण्याचे आमंत्रण देत होत्या. तर दुसरीकडे जगाच्या क्षणिक फायद्याचे आकर्षण होते जे मनेच्छांचे बेलगाम पालन करुन प्राप्त् होत होते. या लोकांनी या दोन्हींची तुलना केली आणि नंतर पहिलीला त्यागून दुसऱ्याला आपल्यासाठी निवडले.

१३) म्हणजे या अत्याचारींनी येथे थांबून घेतले नाही तर मार्गदर्शनाऐवजी मार्गभ्रष्टतेला आपल्यासाठी पसंत केले आणि यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी प्रयत्न केले की सत्य संदेशाचे काम पुढे न चालले पाहिजे. भलाई आणि सुधाराच्या पुकारला कोणीही ऐकू नये किंबहुना ते तोंडच बंद करावे ज्याकरवी हा सत्यसंदेश बुलंद होत आहे. ज्या आदर्श व मंगल जीवनव्यवस्थेला अल्लाह पृथ्वीवर स्थापित करू इच्छितो, त्या स्थापनेला रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या लोकांचे जगणे अवघड केले जे सत्याचे अनुयायी बनले होते.

१४) ''जाणणारे'' म्हणजे ते लोक जे अल्लाहच्या अवज्ञेचे परिणाम जाणून आहे आणि अल्लाहच्या कोपचे भय आपल्या मनात ठेवून असतात आणि हे जे सांगितले गेले की जर असे केले तर ''ते तुमचे धर्म (दीनी) बंधु आहेत.'' तर याचा अर्थ असा आहे की या अटींना पूर्ण करण्याचा परिणाम केवळ हाच होणार नाही की तुमच्यासाठी त्यांच्यावर हात उठविणे आणि त्यांच्या जीव आणि वित्ताला नुकसान करणे अवैध होईल तर याचा लाभ म्हणजे त्यांना इस्लामी समाजात समान अधिकार प्राप्त होतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदे संदर्भात ते इतर मुस्लिमांसारखेच होतील. काही एक भेदभाव त्यांच्या विकासाच्या मार्गात येणार नाही.

१५) या आयतच्या शब्दांनी प्रत्यक्ष असे वाटते की जर त्यांनी आपल्या प्रतिज्ञेला तोडले तर त्यांच्याशी युद्ध करा. परंतु संदर्भावर विचार केल्यावर स्पष्ट होते की येथे प्रतिज्ञा म्हणजे इस्लाम आणि आदेशाचे पालन करण्याची प्रतिज्ञा आहे. कारण करारभंग अगोदरच झालेला होता आणि पुढे त्यांच्याशी करार करणे संभव नव्हते. म्हणून येथे कराराविरुद्ध काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही आयत वरच्या आयत नंतर त्वरित आलेली आहे. त्यात सांगितले आहे की जर त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आणि नमाज आणि जकातची पाबंदी स्वीकार केली तर ते तुमचे दीनी (धर्म) बंधु आहेत. यानंतर असे म्हणणे, ''जर ते आपला करारभंग करतील'' याचा स्पष्ट अर्थ होतो की याने तात्पर्य त्यांनी इस्लामचा स्वीकार करणे आणि इस्लामच्या सामुदायिक व्यवस्थेचे पालन करण्याची प्रतिज्ञा करून ती तोडणे आहे. खरे तर या आयतीत इस्लामविरुद्ध त्या उपद्रवाकडे संकेत आहे जो दीढ वर्षानंतर माननीय अबू बकर (रजि.) यांच्या खिलाफतीच्या आरंभी निर्माण झाला होता. माननीय अबू बकर (रजि.) यांनी या वेळी जी कर्यपद्धती स्वीकारली ती ठीक या आदेशानुसार जो या आयतीत दिला गेला होता. (तपशीलासाठी पाहा माझा उर्दू ग्रंथ ''मुरतद की सजा इस्लामी कानून मे'') 

१६) आता व्याख्यानाचे संबोधन मुस्लिमांकडे वळते. त्यांना युद्धासाठी उभारणे तसेच धर्माविषयी नातेसंबंध आणि भौतिक लाभाचा विचार न करण्याची ताकीद दिली आहे. व्याख्यानाच्या या भागाची पूर्ण भावना समजण्यासाठी पुन्हा एकदा त्या स्थितीला डोळयांपुढे ठेवणे आवश्यक आहे जी त्या वेळी निर्माण झाली होती. यात शंका नाही की इस्लामचा प्रभाव देशाच्या मोठ्या भागावर होता. अरबमध्ये आता अशी एखादी मोठी शक्ती उरली नव्हती जी इस्लामला आव्हान देऊ शकेल. तरीपण निर्णायक पाऊल आणि अतिक्रांतीकारक पाऊल यावेळी उचलले जात होते त्याच्यात अनेक धोके प्रत्यक्षदर्शी लोकांना दिसत होते.

(१) सर्व अनेकेश्वरवादी कबिल्यांना एकाच वेळी सर्व करार रद्द करण्याचे आव्हान देणे, नंतर अनेकेश्वरवाद्यांच्या हज करण्यावर बंदी आणणे, तसेच काबागृहाच्या प्रबंध व्यवस्थेत परिवर्तन करणे आणि अज्ञानतापूर्ण रूढी-परंपरांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे सर्व देशाला पेटविण्यासारखे होते. अनेकेश्वरवादी आणि दांभिक आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या दुराग्रहासाठी आणि स्वार्थासाठी लढण्यास व मरण्यास तयार होते. 

(२) हजला फक्त एकेश्वरवादी लोकांसाठी निश्चित करणे आणि अनेकेश्वरवादींसाठी काबागृहाचा रस्ता कायमचा बंद करणे म्हणजे देशाचा मोठा भाग जो अद्याप अनेकेश्वरवादी होता, त्यांना काबाकडे येण्या-जाण्यापासून रोखणे होते. ही फक्त धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक दृष्टीनेसुद्धा अरब देशात महत्त्वपूर्ण घटना होती. अरब देशाच्या आर्थिक जीवनाचा तो महत्त्वाचा कणा होता.

(३) जे लोक हुदैबियाच्या करार आणि मक्का विजयानंतर ईमान आणून मुस्लिम बनले होते अशा नुकत्याच मुस्लिम झालेल्या लोकांसाठी हे सर्व अत्यंत कठीण कार्य होते. कारण त्यांचे अनेक भाईबंद नातेसंबंधी अनेकेश्वरवादी होते. त्यांपैकी काही लोक असे होते ज्यांचे आर्थिक हित प्राचीन अज्ञानी व्यवस्थेशी जुडलेले होते. आता प्रत्यक्षात अरबच्या सर्व अनेकेश्वरवाद्यांना संपविण्याची तयारी केली जात होती. त्याचा अर्थ म्हणजे या नवमुस्लिमांनी आपल्या स्वत:च्या हाताने आपले परिवार आणि नातेवाईकांना संपविणे आणि त्यांची प्रतिष्ठा आणि पद आणि पूर्वस्थापित भेदभाव नष्ट करणे होते.

यातील एखादा धोका व्यावहारिक रूपात समोर आला नाही. स्वत:ची त्यांच्यापासून सुटका करून घेण्याच्या घोषणेने देशात गृहयुद्ध भडकण्याऐवजी अरबांचे राहिलेले अनेकेश्वरवादी कबीले आणि सरदारांचे प्रतिनिधीमंडळ येऊ लागले. ते सर्व पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासमोर इस्लामचा स्वीकार करत गेले आणि आज्ञापालनाचे प्रण करत गेले. त्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांना आपापल्या पदावरच ठेवले. परंतु ज्या वेळी या नवीन पद्धतीची घोषणा केली जात होती तेव्हा त्याच्या या परिणामांना कोणीही जाणू शकत नव्हता.

या घोषणेबरोबरच मुस्लिम याला पूर्ण शक्तीनिशी लागू करण्यास तयार झाले नसते तर संभवता हा परिणामसुद्धा पुढे आला नसता. म्हणून अनिवार्य होते की मुस्लिमांना या समयी अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करण्यासाठी उभारले जाणे आवश्यक होते. त्यांच्या मनातून या प्रणाली विरुद्ध त्या सर्व आशंकांना दूर सारले गेले. मुस्लिमांना यावेळी आदेश देण्यात आला की अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी कोणत्याच गोष्टीची पर्वा करू नये. या व्याख्यानाचा हाच विषय आहे.  


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget