Halloween Costume ideas 2015

तडफडणारी जनता आणि धडधडणाऱ्या चिता


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अवस्था अनेक खिंडारे पडून बुडू घातलेल्या महाकाय गलबताला शेवटी एखाद्या भयानक वादळात एखाद्या महाप्रचंड लाटेने संपूर्ण ताकदीने तडाखा द्यावा आणि आधीच शकले झालेले ते गलबत जलसमाधी घेण्यासाठी सागराच्या तळाकडेगटांगळ्या खात निघावे अशी केली आहे. अशी एक म्हण आहे की, ‘शांत सागरात जहाजाचे सुकाणू हाती धरलेला कोणताही कप्तान महान असतो, खरा महान कप्तान कोण आहे हे कळते वादळ येते तेव्हा !’ पण आपल्या देशाच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची ही दाणादाण आम्हाला अनपेक्षित नाही. 

‘आरोग्य सेना’ स्थापन केली तेव्हा पंचवीस वर्षापूर्वी आम्ही घोषणा दिली की, ‘आरोग्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच.’ त्या वेळेपासून ते आजपर्यंत आम्ही सातत्याने हे सांगत आलो आहोत की ज्या आरोग्य व्यवस्थेने देशातील जनतेच्या आरोग्याचा आधार बनले पाहिजे; ती आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था स्वत: दुर्धर

रोगाने पछाडलेली आहे. या रोगाच्या मूळ कारणाचे निदानही आम्ही पंचवीस वर्षापूर्वी करून देशापुढे मांडले होते. या मूळ कारणावर तातडीने उपचार केले नाहीत तर ‘भारताची आरोग्य व्यवस्था’ नावाचा हा ‘रुग्ण’ त्याच्या आरोग्यावर अनपेक्षित असा हल्ला झाला तर आचकेद्यायला लागून स्वत: व्हेंन्टीलेटरवर जाईल असा भाकीत वजा इशारा अनेकदा दिला होता. या देशावर काँग्रेसने सर्वाधिक काळ, म्हणजे साडेपाच दशके (सत्तर वर्षे नाही) राज्य केले हे खरे असले तरी हेही विसरून चालणार नाही की देशात अनेक पक्षांची सरकारे सत्तास्थानी येऊन गेली. जनता पक्ष, ज्यात  पूर्वाश्रमीचा भाजपा म्हणजे जनसंघही होता, जनतादल, समाजवादी जनता पक्ष आणि तीन टप्प्यांमध्ये तब्बल एक तपापेक्षा अधिक काळ सत्तेवर असलेला भाजपा. सरकारे आली आणि गेली, पण सातत्याने देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी जी.डी.पी.च्या फक्त 1.2% तरतुदीची मर्यादा ओलांडावी असे शहाणपण कोणालाही सुचले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आकडा किमान 5% असला पाहिजे.

दुसऱ्या बाजूला संरक्षणावरील खर्च प्रचंड वाढवण्यात येत गेला. भाजपा तर त्यासाठी सातत्याने पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करीत राहिले. खाजगीकीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, या खाउजा, धोरणाचा अवलंब करताना काँग्रेसने देशाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही पूर्ण मोडीत काढून ती खाजगी उद्योगांच्या ताब्यात सुपूर्द करण्याचा घाट घातला. पी.पी.पी., पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या गोंडस नावाखाली एक-एक रुग्णाणालय खाजगी यंत्रणांच्या घशाखाली घालण्याची काँग्रेसने जेव्हा सुरुवात केली तेव्हा आरोग्य सेना त्याच्या विरोधात ठामपणे उभी राहिली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे ‘जनतेच्या पैशाने रुग्णालये उभी करायची आणि खाजगी संस्थांनी ती चालवून नफा लाटायचा. या धोरणामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे नुसते खाजगीकरण होत गेले नाही तर त्याचे व्यापारीकरण आणि पुढे औद्योगिकरण झाले.’ आरोग्य क्षेत्र अनिर्बंध नफ्याचे क्षेत्र बनू लागले आणि वैद्यकीय नीतीमत्ताही खालावू लागली. वैद्यकीय शिक्षण ही बाजारातील विक्री योग्य वस्तू बनली आणि क्रयशक्ती अधिक असणाऱ्यांच्या हाती ती पडू लागली. बरे ही वस्तूही अशी की तिचे दाम श्रीमंतांनाच परवडणार आणि हे दाम देण्याची क्षमता ते कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गांनी मिळवणार. रुग्णालये कॉर्पोरेट बनण्यास सुरुवात याच काळात झाली. त्यावेळी आम्ही देशाची सार्वजनिक आणि एकूणच आरोग्य व्यवस्था कशी असायला पाहिजे याचे आराखडे जाहीर करीत होतो. महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आरोग्याचे खुले जाहीरनामे देशापुढे ठेवत होतो. भारतासारख्या खंडप्राय, बहुतांश ग्रामीण भाग असणाऱ्या आणि 60% पेक्षा अधिक जनता दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या देशाने आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मोडकळीस आणून ती खाजगी व्यवस्थेकडे देणे हे आत्मघातकी आहे असे आमचे म्हणणे होते. आमच्या म्हणण्याकडे सत्ताधाऱ्यांनी तर सोडाच जनतेनेही लक्ष दिले नाही. भाजपाने तर यावर कळस चढवला. माणूस आपल्या शरीराला आणि आरोग्याला गृहीत धरतो. आपल्यावरच नाही तर एकूणच जगभरातील जनतेवर आरोग्याची एखादी आपत्ती कोसळेल ही गोष्ट एक वाईट स्वप्न म्हणून त्याकडे तो दुर्लक्ष करू इच्छितो. पण निसर्ग उदार नसतो. तो ‘स्टार वॉर्स एन्डगेम’ या हॉलीवूड चित्रपटातील वैश्विक खलनायक ‘थॅनोस’सारखा पाषाणहृदयी असतो. पण हा थॅनोस खलनायक नाही तर तत्त्वज्ञही आहे. विश्वातील साऱ्या दु:खांचे मूळ हे लोकसंख्येच्या स्फोटात आहे आणि त्यासाठी कोणताही भेदभाव आणि दुजाभाव न करता ती निम्म्याने कमी केली पाहिजे हे थॅनोसचे तत्त्वज्ञान. हे घडवण्याची अमर्यादित शक्ती या थॅनोसकडे आहे. पण असे असूनही अनेक सुपर हिरोज मोठ्या हिमतीने एकत्र येऊन या महाबलाढ्य थॅनोसचा पराभव करतात आणि विश्वातील मानवजातीला वाचवतात असे हे कथानक आहे. कोरोनाचा विषाणू या थॅनोसचे अतिसूक्ष्म रूप आहे. एखाद्या देशावर परका देश नाही तर परका जंतू आक्रमण करू शकतो हे कोणालाच मान्य नव्हते. या आक्रमणाविरुद्ध तुमची सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सैन्ये कुचकामी ठरू शकतात हे कोणाच्या स्वप्नातही आले नाही. असे आक्रमण झाल्यावर त्याच्याविरुद्ध लढणारा सुपरहिरो म्हणजे आरोग्याची सक्षम यंत्रणा आणि त्या यंत्रणेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करणारे सर्व आरोग्य योद्धे. मानव जातीवर शेवटचे असे संकट 102 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूच्या रूपाने आले होते आणि त्यामुळे आम्हाला केव्हाच त्याचे विस्मरण झाले होते. प्लेग, देवी तर फार जुने झाले. भूतकाळ हा इतिहास बनतो आणि वाईट इतिहास हा त्यापासून कोणतेही धडे न घेता विस्मरणाच्या अंधारात ढकलायचा असतो, हा मानवी स्वभाव आहे. अप्रिय गोष्टी विस्मरणाच्या अंधारात गाडल्यावर त्यांची पुनरावृत्ती होऊ शकते असा इशारा कोणत्याही भक्कम आधारावर दिला तरी माणसाला तो नको असतो. सामुदायिक संकटाचा इशारा त्याहूनही नकोसा वाटतो. कोरोना महासाथीबाबत अगदी हेच घडले. यामुळे ज्या देशांच्या सार्वजनिक आरोग्याच्या यंत्रणा सक्षम होत्या त्या देशांनी समर्थपणे हे संकट पेलले. ज्या देशांच्या सार्वजनिक आरोग्याच्या यंत्रणा आधीच कमकुवत होत्या ते देश या संकटापुढे कोलमडले. त्यातही ज्या देशांना ट्रम्प, बोल्सेनेरो आणि मोदी यांच्यासारखे आत्ममग्न, अहंकारी, अकार्यक्षम, अवास्तव प्रतिमा फुगवण्यात आलेले, सामान्य वकुबाचे आणि मुळात हुकुमशाही प्रवृत्तीचे नेते लाभले ते देश सर्वाधिक कोलमडले. कोरोना मृत्यू आणि संसर्ग यांत हे तीन देशच पहिल्या तीन स्थानांवर आहेत. सजग अमेरिकन जनता, तेथील भक्कम लोकशाही, लांगूलचालनाचा रोग न जडलेली प्रशासकीय यंत्रणा आणि माध्यमे यांनी एकत्र येऊन ट्रम्प नावाचे संकट दूर केले. ब्राझीलची अवस्थाही वाईट आहे. पण आपल्या देशाची अवस्था ही तर शब्दांपलीकडची आहे.

कोरोनाची दुसरी लाट आपल्या देशासाठी अत्यंत घातक ठरली. या लाटेचा इशारा जगातील अनेक देशांमध्ये आलेल्या लाटेने एकप्रकारे दिलाच होता. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने हा इशारा नोव्हेंबर 2020 मध्ये सादर केलेल्या अहवालात सरकारला दिला होता. या समितीने विविध तज्ज्ञांची मते विचारात घेतली होती. या अहवालात अत्यंत स्पष्टपणे असे म्हटले होते की कोरोनाचा दुसरा संभाव्य उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. देशात सरकारी रुग्णाणालयांमधील एकूण खाटांची संख्या फक्त  7 लाख 13 हजार 986 असून ती एका हजार लोकसंख्येमागे फक्त 0.55 % म्हणजे, अर्धी खाट एवढीच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हा आकडा एक हजार मागे किमान 3 खाटा इतका असला पाहिजे. आपल्या देशाची प्राणवायू निर्मिती क्षमता प्रतिदिन फक्त 6900 मेट्रिक टन आहे. अतिदक्षता खाटा, व्हेन्टिलेटर्स यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. याबाबी लक्षात घेऊन या समितीने सर्वात पहिली शिफारस केली होती की केंद्राने 2020-21 च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी जी.डी.पी.च्या किमान 2.5% टक्के, म्हणजे आजवरच्या तरतुदींच्या दुप्पट तरतूद करावी. त्याचबरोबर रुग्णालयांतील खाटांची संख्या, प्राणवायू निर्मिती, औषध निर्मिती, उपकरणे या सर्वांच्या संख्येत प्रचंड वाढ युद्धपातळीवर केल्याशिवाय येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा सामना आपण करू शकणार नाही. औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची सूचनाही केली होती.आत्ममग्न मोदी आणि उन्मत्त शहा या जोडीने या अहवालाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. शेवटी दुसरी लाट आलीच. सुरुवातीला आडवी पसरणारी ही लाट अधिक संसर्गजन्य पण कमी घातक आहे असे वाटले. बघता बघता या लाटेने अत्यंत वेगाने पसरत पसरत आपले घातक रूप दाखवायला सुरुवात केली. पहिल्या लाटेने ज्येष्ठ आणि    को-मॉर्बिडीटीज असणाऱ्यांना अधिक दणका दिला. दुसऱ्या लाटेने या बरोबर तरुण आणि धडधाकटलोकांनाही गिळंकृत करायला सुरुवात केली. कोरोनाची लक्षणे तशी चोरपावलांनी येतात आणि हळू-हळू पुढे जातात. कोरोनाने होणारे मृत्यूही तडकाफडकी होत नाहीत तर ते अनेक दिवसांनी, एक ते दोन आठवड्यांनी होतात. या काळात अत्यंत तातडीने योग्य ते उपचार मिळाले तर ते टळतात. वास्तवात भारतात कोरोना आला तो हवाई मार्गे. वेळीच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक थांबवली असती तर त्याला खूप आधीच अटकाव झाला असता. अमेरिकेच्या अराजकतावादी विदूषकाच्या चाटूगिरीचा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम अहमदाबादमध्ये ठेवलेला असल्याने देशाला धोक्यात घालून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. टाळ्या- थाळ्या, दिवे लावणे अशा विविध मार्गांनी अत्यंत बेमुर्वतखोरपणे संसर्गसाखळी अखंड राहील अशी व्यवस्था करण्यात आली. मग देशाला अचानक लॉकडाउनमध्ये ढकलून देण्यात आले. लाखो स्थलांतरित आपापल्या गावी परतले. नोटबंदी, जी.एस.टी. आणि अक्कलशून्य आर्थिक धोरणामुळे आधीच रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था पूर्ण नेस्तनाबूद झाली. आपापल्या गावी परतणाऱ्या गर्दीने कोरोना संसर्गाची साखळीही निर्माण केली. कोरोना हा संसर्ग साखळ्या तयार झाल्याने पसरतो. त्याच्या वारंवार येणाऱ्या लाटाही फक्त नव्या स्ट्रेनमुळे येत नाहीत तर त्या संसर्गसाखळ्या तयार झाल्याने येत राहतात. म्हणूनच यातील पहिला भाग आहे संसर्ग प्रतिबंधाचा. संसर्ग प्रतिबंधाची पहिली पायरी आहे संसर्गसाखळी निर्माण होऊ न देणे ही. 

संसर्गसाखळी ही जनतेने व्यक्तीगत पातळीवर प्रतिबंधक उपाय पाळणे यावर जरी अवलंबून असली तरी सामुहिक पातळीवर गर्दी प्रतिबंध हा त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. यासाठी अमानुष लॉकडाउनची गरज नाही. मोदी-शहा या जोडीने पुन्हा कुंभमेळा आणि लाखो लोकांच्या निवडणूक रॅलीज घेऊन आधीच्या चुकांवर कळस चढवला. यामध्ये इतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मनसोे भर घातली. संसर्ग प्रतिबंधाची दुसरी पायरी आहे जनतेची सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत वेगाने किमान 60% जनतेचे केलेले लसीकरण. एखादी नवी लस शोधण्याची प्रक्रिया ही किमान दहा-पंधरा वर्षे लागणारी आहे. लस संशोधन ही अत्यंत खर्चीक गोष्टही आहे. अमेरिकन सरकारने आठ खाजगी कंपन्यांना 83 हजार कोटी रुपये यासाठी दिले. इंग्लंडनेही अस्ट्रा झेनेकाला आर्थिक पाठबळ पुरवले. जगभरातील सर्वच कंपन्यांनी ऐतिहासिक वेगाने ही प्रक्रिया 15-16 महिन्यांमध्ये पार पाडली. रशियाने स्पुटनिक नावाने स्वत:ची लस तयार केली. चीनकडे आधीच लस तयार असावी. 33 कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेने संशोधन सुरू होताच विविध कंपन्यांशी 60 कोटी डोस पुरवण्याचे करारही करून टाकले. अस्ट्रा झेनेकाच्या लसीचे उत्पादन सिरम इंडियाने भारतात सुरु केले. भारत बायोटेक या लस उत्पादनाचा अनुभव नसणाऱ्या कंपनीनेही लस तयार केली. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताच्या सरकारने सिरमशी जानेवारी 2021 मध्ये फक्त सव्वा कोटी लसींच्या डोसचे करार केले. भारत बायोटेकशीही सुमारे तेवढेच करार झाले. 16 जानेवारी 2021 मध्ये आपल्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली. साडेतीन महिन्यांमध्ये आपण जेमतेम 2% जनतेचे पूर्ण लसीकरण केले आहे. या वेगाने देशातील 60% जनतेचे लसीकरण करण्यास आपल्याला पाच वर्षे लागतील. या साडेतीन महिन्यांच्या काळात मोदींनी 85 देशांना पावणेसात कोटी डोस पाठवले, यातील निम्मे डोस 44 देशांना भेट म्हणून आणि उरलेले 41 देशांना विकण्यात आले. आता तर को-विन साईटमध्येच बंद पडत आहे आणि अनेक लसीकरण केंद्रे लसीचा साठा न आल्याने ठप्प आहेत. केंद्र सरकार राज्यांना स्वतंत्रपणे लस खरेदीस परवानगी द्यायला तयार नाही. या सर्वांचा परिणाम असा की लसीच्या प्रतीक्षेत असणारे करोडो लोक दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचे शिकार बनत आहेत. लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग झाला पण तो सौम्य राहिला. लस न मिळालेल्यांना कोरोनाने गाठायला सुरुवात केली. 45 वर्षांपेक्षा वय कमी असणाऱ्यांना लस न देण्याच्या सुरुवातीच्या चुकीच्या धोरणामुळे असंख्य तरुण कोरोनाला बळी पडले ही दुःखाची बाब आहे. प्रत्यक्षात जगाच्या 700 कोटी लोकसंख्येपैकी 60% लोकांना लसीचे 2 डोस देता येतील एवढे लस उत्पादन जगात होत आहे. यातील विविध लसी युद्ध पातळीवर जनतेला उपलब्ध करून देणे तर सोडाच सिरमचे मालक अदर पूनावाला यांना जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून देश सोडून लंडनला जावे लागले. छपन्न इंच आपल्या देशातील आणि जगातील अत्यंत मोठ्या लस उत्पादकाला सुरक्षेची हमी देऊ शकले नाही ही शरमेची बाब आहे. आम्हाला तर उलट मोदी-शहा यांच्या मनमानीला कंटाळून त्यांनी देश सोडला असावा असा संशय येतो. प्राणवायू बाबत हेच. देशाच्या प्राणवायूच्या एकूण उत्पादनापैकी जेमतेम 5% प्राणवायू वैद्यकीय क्षेत्राला दिला जात होता, बाकी औद्योगिक क्षेत्राला दिला जात होता. अगदी काही दिवसांपूर्वी मोदींनी या काळात प्राणवायूच्या औद्योगिक वापरावर बंदी आणली. रेमडेस्वीरच्या बाबतही हेच. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत त्याची निर्यात चालू होती. देशातील जनता मरत असताना हे घडत होते. याच काळात कृषी विधेयके आणण्यात आली, राममंदीराचा घाटघालून त्यासाठी अब्जावधी रुपये गोळा करण्यात आले आणि 20 हजार कोटी रुपयांच्या सेन्ट्रल व्हिस्टाचे बांधकाम सुरू करण्यात आले. लसीकरण करण्याचा आपला वेग किती राहील आणि ते न होताच दुसरी लाटआली तर आपण आपल्या जनतेला कसे वाचवणार आहोत याचा कोणताही विचार करायला मोदी- शहा या जोडीला पाच राज्यांतील, विशेषत: पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे वेळ नव्हता. त्यांना देशातील माणसे जगविण्यात रस नव्हता, त्यांना वाट्टेल ते करून ममता दीदींना हरवायचे होते. त्याचवेळी देशभर लाखो लोक प्राणवायू अभावी तडफडत होते, रुग्णाणालयात खाटमिळावी म्हणून सैरावैरा धावत होते. सगळीकडे एकच आक्रोश, प्राणवायू हवा, व्हेन्टिलेटर हवा, कोणाला रेम्डेस्वीर हवे तर कोणाला टॅझिलीझुमॅब हवे. वाट्टेल ते दाम देऊ, आमच्या प्रिय व्यक्तीला वाचवाहो. अहो फक्त प्राणवायू मिळाला तरी ती जगेल. खबरदार कोणी प्राणवायू हवा म्हणून ट्वीट केले तर. शोधून काढू, घरे दारे जप्त करू. देशाची बदनामी करता? देशद्रोही लेकाचे. त्यापेक्षा पाकिस्तानात का जात नाही? आक्रोश आक्रोश! देशाचे नेते तिकडे जल्लोषात बहिरे बनले होते. लाखांच्या रॅलीजमध्ये बसेसच्या टपांवर उभे राहून फुले उधळून घेण्यात मश्गुल होते. आत्मनिर्भर बना! शेवटी मरण अटळ आहे, आत्मा अमर आहे. हिंदू राष्ट्रासाठी सारा देश काबीज करणे ही खरी गरज आहे. इकडे कोव्हीड वॉर्डात माणसांना मरणाला एकाकी सामोरे जावे लागत होते. भोगायचेही एकट्याने, मृत्यूला सामोरे जायचेही एकट्याने. मग त्यात काय झाले? जगात आलात तेव्हा एकट्यानेच आलात ना? मग जायचेही एकट्यानेच. अहो आमच्या प्रियजनाचे शेवटचे दर्शन तरी द्या! घ्या, हे चेहऱ्यावरचे झाकण काढले, पण स्पर्श नाही करायचा. अहो रामनाम सत्य है म्हणून चार फुले तरी उधळून द्या. कशासाठी? राममंदीर बांधायचे आहे आपल्याला, एकदा का राममंदीर उभे राहिले की रामराज्य येईल. रामराज्यात कोरोना वगैरेचे येण्याचे धाडसही (उर्वरित पान 8 वर)

होणार नाही. राममंदिरासाठी वर्गणी दिली होती ना? दिली ना. मग तुमाच्या माणसाला स्वर्गातच जागा मिळेल! अहो, पण आत्ता स्मशानात जाळायला जागा नाही. सारे मैदान धडधडणाऱ्या चितांनी भरले आहे. वाटबघा, येईल नंबर. आत्ता जाळले काय आणि उद्या जाळले काय? शेवटी राख ती राख! पण अहो आता तर देशाची राख रांगोळी झाली आहे. खबरदार, मोदी हे प्रभू रामाचा अवतार आहेत. त्यांनीही आपल्या सीतेला वनवासात पाठवून दिले. मग हनुमान कोण? हनुमान? अमित शहा! आणि श्रीकृष्ण? उघडच आहे, योगी! योगी? ते तर ब्रम्हचारी आहेत आणि प्रेमाचे विरोधी आहेत मुर्खासारखे बोलू नकात. योगी हे कर्मयोगी आहेत आणि गीतेत भगवान कृष्णाने सांगितलेले स्थितप्रज्ञ आहेत. बरोबर सांगताय तुम्ही, उत्तर प्रदेशात पदपथांची स्मशाने झाली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील रेषही हलली नाही. त्यांचा इतर धर्मातील गोपींना विरोध नाही, आपल्या धर्मातील मुलींनी मुस्लिम धर्मीयांच्या गोपी बनण्याला विरोध आहे. एक विचारू का? रागावणार नाही ना? नाही, बोला. भागवत कोण आहेत हो? भागवत? ते तर भगवान विष्णूचे अवतार!

आपल्याला या सर्व देवांची मंदिरे उभारायची आहेत. पण त्या ऐवजी रुग्णालये उभी केली तर? नाही, हिंदू राष्ट्राला रुग्णालयांची गरज नाही. या सर्व देवांच्या मंदिरांच्या जागी मुसलमानांनी मशिदी बांधल्या, त्या आपल्याला पाडल्या पाहिजेत. हे आपले धर्म कर्तव्य आहे. धर्म म्हणाला म्हणून बोलतो, हा गेला ना तो गोरक्षक होता. सांगू नका कोणाला, झुंडीत शिरून एका गोहत्या करणाऱ्याला ठेचून मारलेही होते त्याने. बाबरीला पण जाऊन आला होता. रेम्डेस्वीर मिळेना तर शेवटी श्रद्धेने त्याने थोडेगाईचे शेण खाल्ले आणि गोमुत्र सलाईनमधून देण्याचा आग्रह धरला. डॉक्टर म्हणाले असे करता येणार नाही तर त्याने ते प्यायले. पण काही उपयोग झाला नाही. त्याने अभिमानाने आणलेली बाबरीची वीट डोक्याखाली ठेवून पाहिली. शेवटी ‘मोदी मोदी’ असे नामस्मरण करत गेला. एक गोष्ट सांगू? रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, ज्या मिळाल्या त्या  वाट्टेल ते पैसे मागायला लागल्या. शेवटी एका मुस्लिम रिक्षावाल्याने नेले आणि पैसेही घेतले नाहीत. माणुसकी धर्मापलीकडे आहे. मूर्ख आहात. लव्ह जिहादचा हा दुसरा प्रकार, माणुसकीचा जिहाद! ही खरी माणुसकी नाही, ही धर्मासाठी माणुसकी. अशा गोष्टींना फसू नकात.आपल्याला खूप पुढे जायचे आहे. मोदी महागुरू आहेत. ट्रम्प आणि बोल्सेनेरो यांनी त्यांचा सल्ला घेतला म्हणून कोरोना महासाथीत त्यांचा क्रमांक जगात वर राहिला. पण शेवटी पहिल्या क्रमांकावर मोदीच येणार. आपल्याला महासत्ता बनायचे आहे. पाकिस्तानला संपवायचे आहे. चीन नष्ट करायचा आहे. नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश ताब्यात घ्यायचे आहेत. अखंड भारत उभा करायचा आहे. ये तो सिर्फ झांकी है, मथुरा काशी अभी बांकी है. एखाद्या मृत्यूने असे हडबडून जाऊ नका. काय बोलताय? अहो, ये तो सिर्फबरबादी है, और समशान बनना क्या बाकी है? अखंड भारत तर सोडा, आधी देशाचा आत्मा संपवलात, आता देशच संपवायला निघालात? ‘हिंदू खतरे मे है’ अशी हाकाटी पिटली आणि आता हिंदू मरत आहेत तर दाढी वाढवून मोराबरोबर नाचत आहात. नाही आता एकच, हॅशटॅग रीझाईन मोदी-शहा-योगी. हिंदू खतरे मे है क्योंकी मोदी-शहा-योगी कुर्सी पे है. (साभार : पुरोगामी जनगर्जना, पुणे) ***


- डॉ. अभिजित वैद्य

puja.monthly@gmail.com


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget