Halloween Costume ideas 2015

राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांच्या राजकीय शक्तीचा पुनरोदय

ज्या दोन दिग्गज बहुजन नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपला सत्तेच्या दालनात एन्ट्री दिली यात माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा सिंहाचा वाटा आहे. या दिग्गज नेत्यांनी जर भाजपला साथ दिली नसती तर आज भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणात जे महत्त्व प्राप्त आहे ते त्याच्यासाठी दिवास्वप्नच ठरले असते.

शिवसेनेनं मराठी माणसांची बाजू घेऊन राजकारणात प्रवेश केला त्या वेळी राज्यात केवळ काँग्रेस पक्षच सत्तेवर होता. त्यास इतर कोणत्याही राजकीय शक्तीचे आव्हान नव्हते. काँग्रेसने सेनेला पाठिंबा दिला, एवढेच नव्हे तर सेनेच्या स्थापनेसाठीही तो अनुकूल होता. खरे पाहता काँग्रेसला राज्यातील डाव्या पक्षांचं राजकारण संपवायचे होते. विशेषतः मुंबईतून त्यांना हद्दपार करायचे होते. यामध्ये काँग्रेसला यश आले. सुरवातीस काँग्रेसचा डाव सेनेला मुंबईपुरतेच मर्यादित ठेवायचा होता. पण राम मंदिराच्या राजकारणाने देशाचं राजकारण ढवळून निघाले. तेव्हा सेनेनं मराठी माणसाचं हित सोडून हिंदुत्व अंगीकारलं. नंतर मुंबईबाहेर आपला प्रभाव सुरू केला. छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज बहुजन नेत्यांनी बहुजनांना सेनेत दाखल करून घेण्याची धुरा सांभाळली. अशा प्रकारे ज्या वंचित बहुजनांना काँग्रेसने म्हणजेच मराठा समाजाने कायम उपेक्षित ठेवले होते, त्यांना आता सेनेत आधार मिळाला. पण जेव्हा १९९४ साली प्रथमच सेना-भाजपचे युती सरकार महाराष्ट्रात जन्माला आले अशा वेळी त्याच भुजबळांना ज्यांनी सेनेला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवले होते त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी न देता मनोहर जोशींना ते पद सोपवले. तेव्हापासूनच छगन भुजबळ नाराज होते. नंतर सेनेशी बंड करून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दुसरीकडे भाजपने सेनेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करीत एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने बहुजनांची मोठ्या प्रमाणात साथ मिळवली. २०१४ साली सेना-भाजप युतीला सत्तेची दुसरी संधी मिळाली. या वेळी मात्र गोपीनाथ मुंडे नव्हते. पण २००९ पासून २०१४ पर्यंत जे एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते त्यांना मुख्यमंत्रीपदावर नियुक्त न करता ज्या देवेंद्र फडणवीसांना नागपूरपलीकडे कोणी ओळखत नव्हते त्यांना मुख्यमंत्री केले. आधी खडसेंना मंत्रीपद दिले, नंतर त्यांच्यामागे भूखंड घोटाळ्यापासून विनयभंग प्रकरणात गुंतवून ठेवले. पाच वर्षे वाट पाहूनसुद्धा खडसे आपला मानसन्मान परत मिळवू शकले नाहीत. सुमारे चाळीस वर्षे भाजपची लाचारी बाळगल्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आपल्या जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. याच काळात फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकले. अशा प्रकारे भाजपने आधी गोपीनाथ मुंडे, नंतर भुजबळ आणि आता खडसे या शक्तिशाली बहुजन नेत्याचा प्रभाव संपवून टाकला. भुजबळ राष्ट्रवादीत असतानादेखील आणि राष्ट्रवादीचा भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला असूनही फडणवीसांनी भुजबळांचे हाल केले, पण राष्ट्रवादीने त्यांच्या बचावासाठी काहीही केल्याचे एकिवात नाही. आता भुजबळ आणि नुकतेच एन्ट्री घेतलेले खडसे यांच्या साहाय्याने शरद पवार काँग्रेसपासून दुरावलेल्या बहुजनांमध्ये आपल्या पक्षाचा प्रभाव पाडण्याचा आणि नंतर त्यास मतदानात रूपांतरीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ज्या पक्षाचा मुलाधार मराठा समाज आहे त्यास हे कितपत पटणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आधी भुजबळ आणि आता एकनाथ खडसे, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यामागे काही केल्या पेशवाई विचारांचे सरकार सत्तेवर नेहमी असावे हा यामागे हिंदुत्ववादी विचारधारेचा डाव आहे हे सर्वांना माहीत आहे. राज्यात शरद पवार एकीकडे मराठा समाज आणि बहुजनांना एकत्रित करून आपली राजकीय शक्ती बळकड करीत आहेत. त्याच वेळी ते शिवसेनेची हिंदू व्होट बँक पूर्णतः भाजपच्या पदरात जाऊ नये यासाठी सेनेला कोणती हानी होता कामा नये याची काळजी घेत राहाणार आहेत. राज्यात खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याने या पक्षाची शक्ती अधिक बाढणार आहे. आधीपासून पक्षात असलेल्या भुजबळांना खडसेंची साथ मिळेल आणि या दोघांमुळे मोठ्या संख्येने बहुजनवर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होईल. सध्या राष्ट्रवादीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरेंसारखे तरुण आणि प्रभावशाली नेते आहेत. त्याचबरोबर अशाच प्रकारचे भुजबळ आणि खडसेंसारखे दिग्गज नेते राष्ट्रवादीत आहेत. या सर्वांच्या तोडीचा एकही नेता भाजप आणि काँग्रेसकडे नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादी सोडून ऐन निवडणुकीच्या काळात जे नेते भाजपला मिळाले आहेत ते जर परतले तर या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल. काँग्रेस पक्ष नावाला उरला आहे. त्यांचे वैचारिक केंद्र नागपूरहून त्यांना जसे कळवते तसे ते करत असतात. राष्ट्रवादीतील मराठा समाजाने जर या सर्व पार्श्वभूमीला समजून घेतले आणि बहुजनांचा त्यांनी विश्वासघात केला नाही तर यात त्यांचेच राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे, हे त्यांना कळायला हवं. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना आपल्या भाषणात म्हटले की आज त्यांच्या डोक्यावरचे ओझे उतरले आहे. त्यांना हलके वाटत आहे. हे ओझे शरद पवारांच्या डोक्यावर पडले आहे. पवार ही बदलती परिस्थिती कशी हालाळतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. खडसे रा. स्व. सांचे कार्यकर्ते होते की आहेत माहीत नाही पण त्यांनी एक विधान केले होते की “संघात अशा प्रकारचे संस्कार केले जातात की गाढव जरी संघात दाखल झाले तरी ते माणूस म्हणून बाहेर पडते.” पण भाजपमधून जे बाहेर पडतात त्यांच्याविषयी काय? हे त्यांनी सांगितले नाही.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget