Halloween Costume ideas 2015

बुरख्यातल्या ‘शाहीन’ची गरूड भरारी

CAA-NPR-NRC कायद्याविरोधात देशभरात पेटलेल्या आंदोलनाचा चेहरा लदिदा व आयेशा नावाच्या दोन तरूणी बनल्या. जामिया विद्यापीठामध्ये एक तरूण खाली पडला आणि त्याला पाच सहा पोलीस लाठीने मारहाण करतांना त्याच्या आजूबाजूला गराडा घालून पोलिसांना एक बोट दाखवत दरडावणारी जामीयाच्या त्या विद्यार्थीनीचा तो फोटो मुस्लिम महिलेविषयी काही प्रसिद्धी माध्यमांनी ’बेचारी’ अशीच काहीशी तयार केलेल्या प्रतिमेला पुसून टकाणारी होती. महिला सबलीकरण म्हणजे फक्त कमीत कमी कपडे नेसणे नव्हे, आंगभर कपडे नेसून, बुरखाकवच घालूनही एक सशक्त बनू शकते, स्वतःची प्रगती करू शकते हेच या मुलींनी सिद्ध केलंय. हा प्रस्तावित कायदा मागे होवो न होवो, पण मुस्लिम महिलेची खरी प्रतिमा या निमित्ताने सर्वांसमोर आली, हे या क्रांतीकारी आंदोलनाचं हशील आहे. तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी तीलाच रस्त्यावर यावं लागलं. पण बुरख्यातल्या या सबलेला स्वतःहून समजून घेण्याचा तिच्या विरोधकांनी आणि तथाकथित सहानुभुतीदारांनीही फारसा प्रयत्न केलेला दिसत नाही. समाजात स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा फार मोठा गैरसमज पसरलेला आहे. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. अल्लाह कुरआनात सांगतो -
“...स्त्रीयांना त्याचप्रमाणे हक्क आहे, परिचित पद्धतीनुसार जसे पुरूषांना आहे.” - कुरआन (2:228)
“इमानवंत पुरूष व इमानवंत महिला हे सर्व एकमेकांचे सहकारी आहे.” - कुरआन (9:71)

दुसर्‍या एका ठिकाणी सांगितले - “लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा, ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची पत्नी बनविली..” - कुरआन (4:1). याचा अर्थ स्त्री आणि पुरूषांची उत्पत्ती एकाच जीवापासून झाली आहे आणि आता विज्ञानही हेच मानते. म्हणजे स्त्रीचा वंश आणि पुरूषाचा वंश वेगळा नाहीये, दोघांचा उगम एकच आहे. स्त्री-पुरुष समानतेचं यापेक्षा जास्त आणखी काय उदाहरण होऊ शकते, की स्त्री व पुरूष एकाच शरीराचे दोन अंग आहेत.
    विवाहापूर्वीच वराकडून वधूला एक मोठी रक्कम दिली जाते, जेणेकरून आपलं घरदार सोडून जाणार्‍या त्या स्त्रीकडे पुढच्या आयुष्यभरासाठी कमी जास्तीला स्वत:ची एक रक्कम सोबत असावी. त्या रकमेवर फक्त आणि फक्त तीचाच अधिकार असतो. त्याला ‘महेर’ असे म्हणतात. याची रक्कम स्त्री स्वत:च ठरवत असते. इस्लामनुसार महिलांच्या लग्नानंतर त्यांच्या नावापुढे त्यांच्या पतीचे नव्हे तर पूर्वीप्रमाणे त्यांच्या वडिलांचेच नाव व अडनाव अबाधित राहते, ते बदलले जात नाही. उदाहरणार्थ बेनज़ीर भुट्टो ही शेवटपर्यंत बेनज़ीर भुट्टोच असते, ती बेनज़ीर जरदारी बनत नाही. प्रेषितांनी त्यांच्या पत्नीला इतकं जास्त स्वातंत्र्य दिलं होतं की, एक दिवस ते त्यांच्या पत्नी आदरणीय आयेशा सिद्दीक़ा यांना म्हणाले की, “आयेशा, घराच्या छतावर उभी राहून तुला माझ्याविषयी जे काही माहित आहे ते सांगून टाक.” इतके स्वातंत्र्य तर आजचा आधुनिक पतीही पत्नीला देणार नाही की, माझ्याविषयी तुला जे काही माहित आहे ते सोशल मीडियावर टाकूनदे म्हणून.
    प्रेषितांनी जगातली पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. त्यांच्या पत्नी आयेशा सिद्दीक़ा या जगातल्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यांच्या सर्व पत्नींची घरे त्यांच्या पत्नींच्या नावानेच म्हणजे ‘हज़रत आयेशा का घर’, ‘हज़रत सौदा का घर’ म्हणूनच ओळखले जातात. म्हणून महिलांच्या नावाने घरं, महाल वगैरे बांधण्याची परंपरा जगात मुस्लिमांनीच सुरू केली आहे. ‘मुमताज महेल’, ‘बीबी का मकबरा’, ‘चांद बीबी महल’ याची काही ज्वलंत उदाहरणे आहेत. महिलांना संपत्तीत वाटा सर्वात पहिले प्रेषितांनीच दिला. त्यामुळेच आज भ्रूणहत्या, हुंडाबळी मुस्लिम समाजात नगण्य आहे. कुरआन व पैगंबरांनी स्त्रीला दिलेले हक्क प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचण्याकरिता समाजात प्रबोधनाची, जनजागृतीची आणि लोक शिक्षणाची गती वृद्धींगत करण्याची गरज आहे, तरच मानवता टिकेल. 
आता आपण काही कर्तबगार मुस्लिम महिलांचा महिलांचे प्रयत्न करून घेऊ या. 1) हज़रत हव्वा - इस्लामचे पहिले प्रेषित सय्यद आदम (अलै.) यांच्या पत्नी आदरणीय माता हज़रत हव्वा या भूतलावरील पहिल्या महिला आहेत. मुस्लिम समाजात अनेक कर्तबगार व महान महिलांपैकी अनेकांच्या नावापूर्वी एखाद्या महापुरूषांप्रमाणेच ‘हज़रत’ म्हणजे ‘आदरणीय’ ही आदरयुक्त पदवी लावली जाते. जगातले सर्व मानव त्यांचीच लेकरे आहेत. माता हव्वा यांनी जेंव्हा लेकरांना जन्म दिला असेल तेंव्हा त्यांच्या मदतीला कोणताही वैद्य, कोणतीही सुईनी नव्हती. त्यांनी भविष्यातील संपूर्ण मानवतेलाच जन्म देण्याकरिता किती त्रास भोगला असेल. पुढील मानवजातीसाठी त्यांनी संगोपनाचे पायंडे पाडलेत. सौदी अरबमधील जेद्दाह येथे हव्वा (अलै.) यांची कबर आहे.
2) हज़रत मरयम -
    प्रेषित ईसा (अलै.) यांच्या माता हज़रत मरयम (अलै.) यांना ख्रिश्‍चन लोकं मेरीदेखील म्हणतात. कुरआनात त्यांच्या नावाचे शिर्षक असलेला अध्याय ‘सुरह मरयम’ आहे, ज्यात त्यांचा इतिहास व कार्य सांगितलेले आहेत. आदरणीय मरयम यांना प्रेषित मुहम्मद सल्लम् यांनी तत्कालीन सर्वोत्तम महिला म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. कोणत्याही पुरूषाने त्यांना स्पर्श न करता, एका मुलाच्या मातृत्त्वाची जबाबदारी आणि लोकांचे खोटे आरोप या सर्वांचं आकाश त्यांनी मोठ्या हिंमतीने सहन केले. कोणताही पिता नसलेल्या प्रेषित येशू यांचा त्यांनी योग्यपणे सांभाळ केला.

3) हज़रत खतिजा 
प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या पहिल्या पत्नी आदरणीय खतिजा (रजि.) या अरबस्थानातील फार मोठ्या व्यापारी होत्या. प्रेषितांना प्रेषित्त्व प्राप्त झाल्यानंतर प्रेषितांकडून दिक्षा घेणार्‍या त्या सर्वात पहिल्या महिला होत्या. प्रेषितांनी एकदा सांगितले होते की, “माझ्यावर कोणत्याही व्यक्तीचे उपकार नाहीत, शिवाय दोघांच्या. एक (हज़रत) अबू बकर (प्रेषितांचे सासरे) आणि दुसरे (हज़रत) खतिजा. या दोघांनी माझी त्यावेळी साथ दिली, जेंव्हा जगात माझी साथ द्यायला कुणी समोर आलेलं नव्हतं.”

4) हज़रत आयेशा (रजि.)
    प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या द्वितीय पत्नी आदरणीय हज़रत आयेशा यांच्याबद्दल प्रेषितांनी म्हटलेले आहे की, “जगात जेवढं काही ज्ञान आहे, त्यापैकी अर्धे ज्ञान एकट्या आयेशांकडे असून उरलेले अर्धे ज्ञान जगात विखुरलेले आहे.” अशाप्रकारे हज़रत आयेशा सिद्दीक़ा (रजि.) या पहिल्या महिला इस्लामी विचारवंत (आलेमा) होत्या. प्रेषितांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांच्या घरीच मुलींना शिकवायला सुरूवात केली होती. त्यांचं घर हेच जगातली पहिली मुलींची अनौपचारिक शाळा ठरली आणि हज़रत आयेशा (रजि.) जगातल्या पहिल्या महिला शिक्षिका!

5) मलेका ज़ुबैदा 
या बगदाद (इराक)चे खलिफा हारून अल रशिद यांच्या महाराणी (मलेका) होत्या. हज यात्रेकरूंना पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी जवळच्या जलस्त्रोतापासून अराफात मैदानापर्यंतच्या कालव्याचा कल्याणकारी प्रकल्प सुरु करविला. प्रकल्पाच्या हिशोबाची कागदपत्रे त्या कालव्यात फेकून कालव्याच्या अभियंत्याला ‘मूंह मांगी’ रक्कम त्यांनी देऊन टाकली होती. या कालव्याचं नाव ‘नहर (कालवा) ए ज़ुबैदा’ म्हणजे ज़ुबैदांचा कालवा आहे.
काही भारतीय मुस्लिम थोर महिला - सावित्रीमाई फुल्यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचं प्रशासन, व्यवस्थापन सांभाळणार्‍या फातेमा शेख या एकप्रकारे भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिकाच होत्या. अहमदनगरच्या चांद बीबी यांनी सोळाव्या शतकात अकबर बादशहाच्या भव्य सैन्याला दिलेल्या प्रचंड प्रतिकाराचा रोमहर्षक इतिहास आहे. त्या एक उत्कृष्ट योद्धाच नव्हे तर उत्कृष्ट चित्रकारही होत्या. त्यांना उर्दू, अरबी, फारसी, तुर्की, मराठी, कन्नडसहीत अनेक भाषा अवगत होत्या.

विद्यामान काळातील कर्तबगार महिला -
इजिप्तचे दिवगंत राष्ट्रपती मुहम्मद मोर्सी यांच्या पत्नी नग़ला महेमूद यांचा आज मुस्लिम ब्रदरहूड या क्रांतीकारी चळवळीत सक्रीय सहभाग आहे. मुंबईत समाजसेविका उज़मा नाहीद आणि लेखिका प्रा. मोनीसा आबेदी या मोलाची भुमिका वठवत आहेत. अकोट (जि. अकोला) येथील दिवंगत हूरजहां अंजूमताइंनी महाराष्ट्रातील मुस्लिम महिलांचे जमाअत ए इस्लामी हिंद चळवळीद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन कार्य केले आहे. आजही पुण्याच्या मुनीराताई खान, नांदेडच्या अतियाताई सिद्दीक़ी या कर्तबगार महिला जमाअत ए इस्लामी हिंद या सुधारणावादी चळवळीत महिलांमधील अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरांचे निर्मुलन करून खर्‍या इस्लामच्या शिकवणीद्वारे त्यांचे प्रबोधन करण्यात सक्रीय भुमिका वठवित आहेत. बुरख्यातली महिला किती सबला असते याचा प्रत्यय सध्या अख्ख्या देशाला जागतिक पातळीवर गौरवण्यात आलेल्या जागोजागी होत असलेल्या शाहीन बाग आंदोलनातून येतोय. शाहीन म्हणजे गरूड पक्षी. सामाजिक आंदोलनात उंच भरारी घेणार्‍या बुरख्यातल्या या सर्व शाहीन महामातांना मानाचा सलाम!

- नौशाद उस्मान
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget