Halloween Costume ideas 2015

स्त्री-स्वातंत्र्यातील मॉडर्निझम

एक काळ होता जेव्हा स्त्री अबला नारी होती, समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखली जात होती. तिला स्वत:चे असे काही अस्तित्व नव्हते, स्वातंत्र्य नव्हते, तिच्यावर होणारे  अत्याचार स्त्रीत्वाचे एक अविभाज्य अंग म्हणून तिने स्वीकारले होते. मुलीचा जन्म अपशकून, विधवा स्त्री अपशकून या घटनांचे खापरदेखील स्त्रीत्वाच्या माथी फोडले गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले.
अठवाव्या दशकात स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. स्त्री-स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल खूपच  यशस्वी ठरले. या कामात त्यांच्या सहकारी फातिमाताई शेख यांनी त्यांची खूप मदत केली. शाळेसाठी जागा दिली. अशा तऱ्हेने महिलांसाठी शिक्षणाची घरे उघडण्यात आली. रमाबाई  रानडे यांच्यासारख्या शूर महिलांनी हे काम पुढे नेण्यास मदत केली.
एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात जागतिक स्तरावर स्त्री-स्वातंत्र्य चळवळीचा उदय झाला. अमेरिका व यूरोपसारख्या मोठ्या खंडात स्त्रीचळवळी उदयास आल्या. याचा परिणाम म्हणून  स्त्रियांना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क या सर्व गोष्टी मिळाल्या. विसाव्या शतकात तिला नोकरी व शिक्षणाच्या क्षेत्रात आरक्षण सुद्धा मिळाले. या मिळालेल्या संधीचे तिने सोने  केले. स्त्री शिकली, सुशिक्षित झाली, घराबाहेर पडली, पैसे कमाऊ लागली... म्हणजेच मॉडर्न झाली आणि आधुनिक झाली!
आजमितीला आपण एकविसाव्या शतकात पाऊल टाकले आहे. या शतकाच्या सुरवातीला आपणास स्त्रीचे एक नवे रूप पाहायला मिळते. या आधुनिक युगात स्त्रियांची राजकीय व  सामाजिक प्रगल्भता वाढल्याची दिसून येते. त्या आता सामाजिक समस्यांसंदर्भात प्रश्न विचारू लागल्या आहेत. चार भिंतींत कोंडून घातलेल्याचा आरोप असलेल्या आणि आपल्या  कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या बुरखाधारी मुस्लिम स्त्रिया आज आपल्याला रस्त्यावर उतरून सामाजिक व्यवस्थेला जाब विचारू लागल्या आहेत. जामिया मिल्लिया, जेएनयू,  शाहीनबाग, लखनौतील घंटाघर आणि भारतभर झालेल्या आंदोलनातील अन्यायाविरूद्ध आवाज उठवणाऱ्या जवळपास सर्वच क्षेत्रांतील स्त्रिया ज्या प्रकारे बोलत आहेत त्यातून त्यांची  प्रगल्भता सिद्ध होते. अठराव्या शतकातील अशिक्षित स्त्री आणि विसाव्या शतकातील नोकरी करणारी शिकलेले मॉडर्न स्त्री या समूहाव्यतिरिक्त स्त्रीचा एक नवीन समूह एकविसाव्या  शतकात दिसून येतो आणि तो म्हणजे ‘शिक्षित पण नोकरी न करणारी स्त्री’... असे का? कारण जेव्हा स्त्री शिक्षित झाली तेव्हा तिचा अभिमान उंचावला, तिचे अस्तित्व जगापुढे आले,  पण हे अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात तिने स्वत:चे हाल करवून घ्यायला सुरवात केली. नोकरी केल्याने वा पैसे कमावल्यानेच माझे अस्तित्व सिद्ध होणार या अनाठायी हट्टापायी  तिला घर व ऑफिस ही तारेवरची कसरत करावी लागली. यात तिच्या तब्बेतीची हेळसांड आणि नात्यातील दुरावा कुठेन् कुठे तिने अनुभवला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रीला तिच्या  स्त्रीत्वाची ओळख करून देणारे सर्वांत मोठे नाते म्हणजे मातृत्वाचे नाते. कमकुवत झाले. येणाऱ्या लहान पिढीवर याचा परिणाम दिसू लागला. मातृत्वाच्या नात्याला न्याय न देऊ शकणारी अपराधीपणाची भावना तिला सतावू लागली. हे स्त्रीसह तिच्या पावलोपावली साथ देणाऱ्या यजमानांनी व घरातल्या इतर सदस्यांनीदेखील अनुभवले. यावर विचार करून  स्त्रीस्वातंत्र्याच्या एका नव्या पर्वाला सुरवात झाली. या नवीन पर्वाचेच नाव आहे ‘स्वातंत्र्यातील मॉडर्निझम’. यामध्ये ती वैचारिक ती वैचारिक पातळीवर मॉडर्न झाली, खऱ्या अर्थाने मॉडर्न झाली.
नोकरी व पैसे कमावूनच स्त्री स्वतंत्र होते या विचाराला तिने बदलले, नव्या ढाच्यात ढळून दाखविले. म्हणजे या विचारांची स्त्रियांची एक नवी श्रेणी उदयास आली ती म्हणजे उत्तम  शिक्षण, पदवी मिळवणारी पण नोकरीचा हट्ट न करणारी स्त्री. तिने मोठमोठ्या पदव्या मिळवून स्वत:ला सिद्ध तर केले, पण नोकरीत तडजोड करण्यात तिला कमीपणा नाही वाटला.  ‘गृहिणी’ किंवा ‘हाऊसवाइफ’ या शीर्षकाला खूप महत्त्व दिले गेले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांनी या श्रेणीतील स्त्रियांचा खूप आदर केला. कारण स्त्रीच्या नोकरीमुळे मुलांची होणारी  हेळसांड त्यांनीही जवळून अनुभवली होती. त्यामुळे आता या श्रेणीबद्दल त्यांच्या मनात खूप आदर निर्माण झाला. स्त्रीचे हे रूप तिच्या या गुणांचे संगम ठरले- तिची शैक्षणिक पात्रता,  नोकरी शक्य असूनही केलेला त्याग, मातृत्वाकडे लगाव आणि त्यातून समाधानी राहणाची वृत्ती. आजसुद्धा आपल्या मोबाइलवर ‘गृहिणी’च्या कार्याचा आदर करणारे संदेश फिरतात आणि त्यांना पसंतसुद्धा केले जातात. तर ही आहे स्त्री-स्वातंत्र्याच्या आधुनिकतेची नवीन व्याख्या... या व्याखेत स्त्रीचे शिक्षण, तिचे अस्तित्व, तिचे व्यक्तिमत्त्व या गोष्टींना खूप  महत्त्व दिले गेले आहे. याचा अर्थ स्त्रीने कमावण्याच्या वा आर्थिक उत्पन्नाच्या सर्व वाटा बंद करून टाकल्या असे नाही, तर तिने पर्यायाने कमी वेळेत किंवा घरबसल्या आर्थिक  उत्पन्नाच्या ज्या काही संधी आहेत त्या निवडल्या. ऑनलाइन व्यवसाय सुरू केले, शिकवण्या सुरू केल्या आणि साहजिकच तिच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली. ती होणार हे तिला  ग्राह्य पण होते. मात्र ती आता खूश राहू लागली. कुटुंबाच्या आनंदात, मुलांच्या सहवासात तिचा आनंद द्विगुणित झाला. तसेच किटी पार्टी, विविध महिला मंडळे, महिलांच्या सहली,  सामाजिक कार्ये यासारख्या तिच्या हक्कांच्या, आनंदाच्या गोष्टी करण्यात त्यांच्या घरधन्यांनीही कसर ठेवली नाही. अशा तऱ्हेने मध्यंतरी असुरक्षित झालेले तिचे घरटे तिने मायेने,  आपुलकीने पुन्हा कवेत घेतले.
ही आहे स्त्री-स्वातंत्र्याची नवीन व्याख्या, मॉडर्निझम... स्त्रीच्या या शक्तीलाही सलाम...! सलाम!!!

-  मिनाज शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget