Halloween Costume ideas 2015

राष्ट्रनिर्मितीमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची भूमिका

वो फरेब खुर्दा शाहीं जो पला हो किरगीसों में
उसे क्या खबर के क्या है रहवे रसमे शाहबाजी

इस्लामी शिक्षण पद्धतीची निम्नलिखित उद्दीष्ट्ये आहेत. 1. विद्यार्थ्यांची अल्लाहशी जवळीक निर्माण करणे, 2. विद्यार्थ्यांमध्ये शऊर (प्रगल्भता) निर्माण करणे, 3. त्यांच्यातील चिकित्सक वृत्तीला उत्तेजन देेणे, 4. त्यांच्यात नैतिकता आणि लज्जाशिलता निर्माण करणे, 5. खुद एहतेसाबी (आत्मपरिक्षण)  ची जाणीव निर्माण करणे, 6. त्यांच्यामध्ये मरणोप्रांत जीवनासंबंधीचा विश्‍वास निर्माण करणे, 7. त्यांच्यात दुसर्‍यांचे अधिकार देण्यासंबंधीची जाणीव निर्माण करणे. या उलट पाश्‍चिमात्य शिक्षण पद्धतीचा एकमेव उद्देश्य, विद्यार्थ्यांमध्ये पैसा कमावण्याचे कौशल्य निर्माण करणे हा आहे. नाही म्हणायला, या शिक्षण पद्धतीतूनही काही शिष्टाचार मिळत असतात. परंतु पैसा समोर दिसला की ते कधीही गळून पडतात. आज आपल्या देशात याच पाश्‍चिमात्य शिक्षण पद्धतीचा बोलबोला असून, त्यातून पदव्या घेऊन निघालेले विद्यार्थीच देश चालवित आहेत. मात्र तो चालविताना ज्या राक्षसी आकाराचा भ्रष्टाचार ते करीत आहेत, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्या शिक्षण पद्धतीमध्ये काही ना काही त्रुटी जरूर आहेत. ज्यामुळे उच्च शिक्षित भ्रष्टाचारी लोक एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. स्पष्ट आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये दोन मोठ्या त्रुटी आहेत.
    एक सहशिक्षणाचा पुरस्कार तर दूसरी नैतिक मुल्यांचा अभाव. पहिल्या त्रुटीमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी चरित्रहीन बनत आहेत. तर दूसर्‍या त्रुटीमुळे भ्रष्टाचारी बनत आहेत. त्यांच्यामध्ये पैसा कमाविण्याची योग्यता तर निर्माण होत आहे मात्र त्यांच्या मनातून दया, करूणा, त्याग, प्रेम आदी मुल्यांचा र्‍हास होत आहे. म्हणून तर या शिक्षण पद्धतींमधून शिकून निघालेले तरूण जेव्हा शासन आणि प्रशासनामध्ये येत आहेत तेव्हा शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजमध्ये, मुक्या जनावरांना दिल्या जाणार्‍या चार्‍यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करीत आहेत.

    शिलवान युवापिढी

    शिलवान युवापिढी ही कोणत्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. अशी पीढि घडविण्यासाठी त्रीस्तरीय प्रयत्न आवश्यक असतात. पहिल्या स्तरावर पालक असतात. त्यांना आपली भावी पीढि शिलवंत असावी, याची काळजी असायला हवी असते. दूसर्‍या स्तरावर सरकार असते. सरकारने असे वातावरण निर्माण करावयाचेे असते की, ज्यातून शिलवंत पीढि आपोआप घडत गेली पाहिजे. तीसर्‍या स्तरावर स्वतः विद्यार्थी असतात. वर नमूद दोन्ही स्तरांंद्वारे निर्माण केल्या गेलेल्या वातावरणाचा लाभ उठवत त्यांनी स्वतःला घडवायला हवे असते. असे जेव्हा आणि जेथे घडेल तेव्हा व तेथे शिलवंत आदर्श युवा समाज तयार होईल, जो की मानवतेस पूरक ठरू शकेल. आपल्या देशातील युवा पीढि या निकषावर खरी उतरते काय? याचा हिशोब वाचकांनी स्वतः करावा.

    या मार्गातील अडचणी

    पाश्‍चिमात्य शिक्षण पद्धतीने सहशिक्षण आणि व्यक्ति स्वातंत्र्याला अवाजवी महत्व दिले. त्यातून मुल्यहीन शिक्षणाचे जे मॉडेल निर्माण झाले व ज्याला कमी अधिक प्रमाणात जगातील सार्‍याच देशांनी स्विकारले, त्यातून भ्रष्ट आणि निर्लज्ज तरूणांचे लोंढेच्या लोंढे समाजावर आदळत राहिले. जागतिक सज्जन समाज मात्र या लोढ्यांकडे हताशपणे पाहत राहिला. कारण की, या लोंढ्यात सामील असलेल्या तरूणांमधूनच एक फार मोठी जागतिक बाजारपेठ उभी राहिली.
    वाईट गोष्टींचा प्रचार आणि प्रसार लवकर होतो. त्यामुळे याशी संबंधित उद्योग आणि व्यापारामध्ये अब्जावधींची उलाढाल रोज होत असते. एकट्या दारू विक्रीमुळे सरकारला किती वार्षिक उत्पन्न मिळते याचा अंदाजसुद्धा सामान्य माणूस करू शकत नाही. म्हणून सरकार शिलवान पीढिच्या निर्मितीसाठी आपल्या महसुलावर पाणी सोडेल हे शक्य नाही. म्हणून सरकारची यात फारशी मदत होणार नाही. मग राहिले पालक. त्यातही दोन प्रकार आहेत. एक असे पालक ज्यांचे स्वतःचे अनैतिक उद्योग व व्यापार आहेत. दूसरे असे पालक ज्यांना यात काही विशेष वाईट वाटत नाही. उलट या पाश्‍चिमात्य शिक्षण पद्धतीतून तयार होणार्‍या अनितिमान पीढिला हे लोक पुढारलेली पीढि समजतात. शेवटी राहता राहिला भारतीय मुस्लिम समाज. त्यातही दोन गट आहेत एक मोठा गट अशा लोकांचा आहे जो पाश्‍चिमात्य शिक्षण व जीवन पद्धतीला भूललेला आहे. म्हणून ते लोक जाणून बुजून इस्लामी जीवन पद्धतीशी अंतर ठेऊन राहतात. इस्लाम त्यांना प्रतिगामी वाटतो. असे का घडते? याची चर्चा पुन्हा कधी करूया.

    मुस्लिम विद्यार्थ्यांसमोरील आव्हान

    अशा रितीने चारी बाजूंनी अनैतिकतेच्या समुद्रातून अश्‍लिलतेच्या प्रचंड लाटा उठत असतांना, मुस्लिम विद्यार्थ्यांच्या काही नैतिकवादी संघटना उदाहरणार्थ एसआयओ, जीआयओ, चिल्ड्रन सर्कल आणि युथ विंग ह्या, या खवळलेल्या समुद्रात ठामपणे पाय रोऊन उभ्या असलेल्या दीपस्तंभासारख्या उभ्या आहेत. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आजकाल बहुतेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे,’लव्ह बर्डस्’ची सुरक्षित आश्रय स्थाने झालेली आहेत. स्वातंत्र्यानंतर त्यातून आकारास येणार्‍या मागील पिढ्यांची नैतिक पातळी पाहता ती सातत्याने घसरत असल्याचे दिसून येते. अशा विपरित परिस्थितीतसुद्धा या विद्यार्थी संघटना कॅम्पसमधून सर्व वाईट प्रवृत्तींविरूद्ध लढा देत आहेत, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.
    हे कठीण काम आहे, अगदी प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याएवढे. कॅम्पसची विपरित परिस्थिती, घरातून मिळत नसलेले पुरेसे पाठबळ, मदू (संबोधित) विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला ’थंड’ प्रतिसाद इत्यादी परिस्थितीमधून नैतिकतेच्या प्रसाराचे खडतर काम करणे, खरे पाहता कोणीही हतोत्साहित होऊन जाईल, अशीच परिस्थिती आहे. तरीही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या विद्यार्थी संघटना ह्या नेकीच्या प्रचारासाठी प्रयत्नशील राहून कुरआनच्या आदेशाला अक्षरशः जगत आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,”तुमच्यात असा एक गट आवश्य असला पाहिजे जो, सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा, तसेच दुराचाराला प्रतिबंध करणारा असेल.”(संदर्भ ः आलेइमरान आयत नं.104).
संदेश
    अशा या विपरीत परिस्थितीत आत्मविश्‍वासाने काम करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना माझा संदेश असा आहे की, तुम्ही जे काम करीत आहात तेच काम करण्यासाठी अल्लाहने एक लाख चोवीस हजार प्रेषितांना पृथ्वीवर पाठविले होते. हतोत्साहित होऊ नका, नाराज होऊ नका, यशस्वी तुम्हीच व्हाल कारण तुमच्यासारख्यासाठीच कुरआनमध्ये अल्लाहने आश्‍वासन दिलेले आहे की, ”वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही श्रद्धावंत असाल” (सुरे आलेइमरान आयत नं.139)
    एस.आय.ओ. आणि जी.आय.ओ.च्या शाहीन मित्रांनों! तुम्हाला माहितच असेल जमाअते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या एका खास भाषणामध्ये म्हटले होते की, बाबीलोन पासून ते बनी इसराईलपर्यंत अनेक महान संस्कृती लोप पावल्या आहेत. कारण त्या संस्कृतीत जन्मलेल्या लोकांनी आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये जपण्यामध्ये जागरूकता दाखविली नव्हती. म्हणून त्या संस्कृतीचे लोक जरी आज जीवंत असले तरी त्यांच्यात ती गुणवत्ता राहिलेली नाही जी की, कधी काळी त्यांचे वैशिष्ट्ये होते. (संदर्भ ः आलमे इस्लाम की तालीम में मुस्लिम तलबा का किरदार, पान क्र. 6).
    कवि इक्बालने सुद्धा हिंदी तराण्यामध्ये भारताच्या गंगा-जमनी संस्कृतीबद्दल म्हटलेले होते की,
    युनान, फारस व रूमा सब मिट गए जहाँ से
    लेकिन अभी है बाकी नामों निशां हमारा

    आज प्राचिन भारतीय संस्कृतीची रक्षक मानली गेलेली गुरूकुल व्यवस्था लोप पावलेली असून, त्यांच्या जागी मोठमोठी व्यावसायिक (खरे तर धंदेवाईक) शिक्षणाची संस्थाने उभी आहेत. त्यातून शिकून बाहेर पडणारी तरूण पीढि पाश्‍चिमात्यांना अपेक्षित असलेली मुल्य घेऊन बाहेर पडत आहे. त्याच धंदेवाईक संस्थांनांतून तुम्ही देखील शिक्षण घेता. मात्र तुम्हाला त्यातून काय घ्यावे व काय सोडून द्यावे याचे भान आहे. जे की, इतरांना नाही. म्हणून तुम्ही इतरांपासून वेगळे आहात. तुमच्या सोबत नसलेल्या व झुंडीसोबत असलेल्या पथभ्रष्ट तरूणांबाबत कवी इक्बालने मोठा सुंदर आणि सारगर्भीत असा शेर म्हटला होता जो की मी, या लेखाच्या सुरूवातीला दिलेला आहे. त्याचा अर्थ समजून सांगणे विस्तार भयामुळे शक्य नाही. तो आपण जाणकारांकडून समजून घ्यावा.
    माझ्या तरूण शाहीन मित्रानों ! तुम्हाला एक जीवशास्त्रीय सत्य माहितच असेल की डायनासॉर सारखे अजस्त्र जीव कधी काळी या पृथ्वीवर अस्तित्वात होते. मात्र आजमीतिला ते नामशेष झालेले आहेत. मात्र चिमनी त्या काळापासून आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून आहे. कारण की, डायनासॉर आपल्या अंडी आणि पिलांची काळजी घेत नव्हते, तर चिमनी आजही आपल्या अंडी आणि पिलांची प्रचंड काळजी घेते. तुम्हाला सुद्धा मानवतेच्या कल्याणासाठी अत्यावश्यक असलेल्या इस्लामच्या कल्याणकारी मुल्यांची तशीच काळजी घ्यावी लागेल. नुसती काळजी घेऊनच चालणार नाही तर त्या मुल्यांना प्रथम आत्मसात करावे लागेल व त्यानंतर ते तुमच्या सोबत शिकत असलेल्या जाहील (अज्ञानी) विद्यार्थ्यांपर्यंत अत्यंत आदर आणि प्रेमाने पोहोचवावे लागेल व पुढच्या काही वर्षामध्ये जेव्हा तुम्ही स्वतः पालक बनाल तेव्हा आपल्या पुढच्या पीढिकडे त्या मुल्यांना हस्तांतरित करावे लागेल. मग कुठे तुमचे जीवन सार्थक झाल्याचे समाधान तुम्हाला मिळेल. नाहीतर...
    सुबह होती है शाम होती है
    उम्र यूं ही तमाम होती है

    अशा पद्धतीचे जीवन जगणारे तरूण आपल्यामध्ये कमी नाहीत. तुमचीही तशीच अवस्था होऊन जाईल. तर सावधान व्हा! स्वतः इस्लामी मुल्यांवर ठाम विश्‍वास ठेवा तेव्हा कुठे तुम्ही या अनमोल ईश्‍वरीय ठेव्याचे यशस्वी हस्तांतरण इतर सर्व तरूणांमध्ये करू शकाल. कुठल्याही देशाचा फक्त भौतिक विकास होऊन चालत नाही तर त्या देशात राहणार्‍या लोकांच्या नैतिक विकास होणेसुद्धा आवश्यक असतेे. तसे नाही झाले तर आज युरोप आणि अमेरिकेमध्ये जे सामाजिक आणि कौटुंबिक डिझास्टर (विध्वंस)  होत आहे, तो आपल्या देशातही झाल्याशिवाय, राहणार नाही. चांगली पादत्राणे बनविणे, चांगली विमाने बनविणे यापेक्षा चांगल्या चारित्र्याची तरूण पिढी घडविणे हे काम कमी महत्त्वाचे नाही. तुमच्या या महत्वपूर्ण कार्यास कोटी-कोटी शुभेच्छा!

-एम.आय. शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget