Halloween Costume ideas 2015

सन्मान आणि प्रगती

कुरआनमधील आले इमरान या अध्यायात आयत क्र. 26 मध्ये म्हटले आहे की, ’वतु इज़्ज़ुमनत्तशाऊ वतू ज़िल्लूमनत्तशाऊ’ अर्थात सन्मान आणि अपमान दोन्ही अल्लाहकडूनच  आहेत. सदरची आयत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरित झाली ती प्रलयाच्या दिवसापर्यंत येणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक आहे. याचा अर्थ समजून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी  आवश्यक आहे. या आयातीचा अर्थ लावताना कुरआनच्या अनेक भाष्यकारांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे या आयातीचा उद्देश पुण्यवान लोकांना  अधिक पुण्याची कामे करण्यासाठी प्रेरित करणे आहे.
माणूस जेवढा जास्त नीतिमान होतो आणि पुण्याची कामं करतो तेवढाच तो अल्लाहच्या पसंतीला उतरतो आणि त्या बदल्यात त्याला जगामध्ये सन्मान आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतात.  पुण्याची कामे केल्याने सन्मान आणि प्रसिद्धी विनासायास यासाठी मिळते की, त्या कामामुळे सामान्य जनांना त्याचा सरळ लाभ होतो आणि सामान्य माणसं मग पुण्यवान माणसांची  कदर करू लागतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांचे नाव लोकांच्या तोंडात राहते आणि लोकालोकी त्यांच्या पुण्यकर्माची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते.
जगामध्ये काही असे लोकही आहेत जे स्वार्थी, घमंडी आणि सदैव प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्यांना येनकेन प्रकारेन स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची आणि काहीही करून प्रसिद्धी  मिळवायची इच्छा असते. अशा लोकांना सुद्धा या आयातीमध्ये चेतावनी दिलेली आहे की, तुम्ही कितीजरी प्रयत्न केला तरी जोपर्यंत अल्लाह सन्मान आणि प्रसिद्धी प्रदान करणार नाही  तोपर्यंत तुम्हाला ती प्राप्त होणार नाही. सर्वसाधारणपणे पुण्य न करता प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या लोकांनी आपल्या मनाशी एक खूनगाठ बांधलेली असते की, प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही  स्वतःच्या प्रयत्नांनी अर्जित करता येतात. अनेक लोक बोलूनसुद्धा दाखवितात की, ही प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आम्ही स्वकष्टाने अर्जित केलेली आहे. मात्र ती कमावतांना ते अनैतिक मार्गाचा सुद्धा अवलंब करत असतात. ज्यावेळेस असे लोक अनैतिक मार्गाचा अवलंब करतात तर अल्लाह त्यांना मोहलत (संधी) देत असतो. मात्र काही लोक या संधी मागील ईश्वरीय  मन्सुब्याला ओळखू शकत नाहीत आणि आपल्याच भ्रमात फार पुढे निघून जातात. अशा लोकांना प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही मिळतात पण त्यातील फोलपणा त्यांना कळत नाही. अशा लोकांना मिळालेली प्रसिद्धी ही नकारात्मक असते आणि सन्मान हा फक्त तोंडावर केला जातो. पाठ फिरताच लोक वाईट बोलू लागतात. कारण ज्या पद्धतीने खोटे बोलून, चोरी   करून, फसवणूक करून, अप्रामाणिकपणे असे लोक धन, सन्मान आणि प्रसिद्धी मिळवत असतात त्याबद्दल जनतेला खडा न् खडा माहिती असते. केवळ ते तोंडावर बोलून दाखवत  नाहीत एवढेच. या वाईट गोष्टींबरोबर केली जाणारी प्रगती ही खरी प्रगती नसते. कारण या सगळ्या गोष्टी अल्लाहला नापसंत असून, त्याचा रोष ओढवून घेण्यासाठी पुरेशा आहेत.  अल्लाह आपल्या प्रत्येक बंद्याकडे पाहत असतो. त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माकडे पाहत असतो. ज्याला ज्या पद्धतीने प्रसिद्धी आणि प्रगती हवी असते तो त्याला त्याच पद्धतीने  पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करत असतो. जर वाम मार्गाने सन्मान आणि प्रगती मिळविणारे लोक वेळीच सावधान झाले आणि त्यांनी तौबा केली व वाईट मार्गाचा त्याग करून सन्मार्गाला लागले तर अल्लाह त्यांना क्षमा करतो. मात्र प्रगती आणि प्रसिद्धीच्या नशेमध्ये ती खेचून आणण्याकडेच ज्या लोकांचा कल असतो ते संधी मिळूनही सावध होत नाहीत, असे  लोक जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त पुढे जातात तेव्हा अल्लाह त्यांना त्यांची जागा सुद्धा दाखवून देण्यास मागे पुढे पाहत नाही. हाच या आयातीचा खरा अर्थ आहे.
म्हणजेच अल्लाह ज्याला सन्मान आणि प्रगती देऊ इच्छितो त्यांना ती देतो आणि ज्यांना देऊ इच्छित नाही त्यांना ती बिल्कूल देत नाही. तो अल्लाहच आहे ज्याने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आपलीही रचना त्यानेच केलेली आहे आणि तोच पूजनीय आहे.
अनेक लोक खोट्या सन्मान आणि प्रसिद्धीच्या मागे आयुष्यभर पळत असतात. आजकाल स्वस्थ प्रसिद्धी आणि खोटा सन्मान प्राप्त करण्यामध्ये लोक एकमेकांशी स्पर्धा  करीत आहेत  आणि हीच लालसा त्यांना वाममार्गाकडे घेऊन जात आहे. पण प्रसिद्धीच्या नशेमध्ये झिंगलेल्या या लोकांना आपण काही वाईट करत आहोत, हेच लक्षात येत नाही, असे लोक चांगल्या  लोकांचा दुस्वास करतात, त्यांची इर्शा करतात. अनीतिने कमाविलेल्या पैशाच्या जोरावर सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात.
त्याच वेळेस दूसरे लोक अत्यंत प्रामाणिकपणे अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर चालून कठीण परिश्रम करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात. खऱ्याने वागत असतात.  इतरांची मदत करतात. मग अल्लाह त्यांना त्याच मार्गामध्ये बरकत अता करतो. ज्यामुळे अशा लोकांची प्रगती आणि सन्मान जनतेमध्ये उत्तरोत्तर वाढत जातो. मात्र यामध्ये  कोणताही नकारात्मक पैलू नसतो.
या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात येते की, प्रसिद्धी आणि प्रगती एका गटाला अल्लाहकडून पुरस्कार स्वरूपात मिळत असते तर दूसरा  गट ती स्वतःच्या बळावर खेचून आणण्याच्या प्रयत्नात असतो. अशा लोकांना अल्लाह सन्मार्गावर चालण्याची समज देओ आणि जी प्रगती आणि सन्मान अल्लाहकडून मिळतो त्या  पुण्यवान लोकांची तशीच प्रगती होवो. (आमीन.)

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget